प्रचार खोट्यास खपवी बाजारी..

प्रचार_खोट्यास खपवी बाजारी । प्रचार गोट्यास देव करी।
प्रचार युद्धाची वाजवी भेरी । वृष्टीहि करी अमृताची ॥४७॥
आजही महाराजांच्या मृत्यूनंतर आजच्या परिस्थितीवर या ओळी किती तंतोतंत लागू होतात,हीच ताकद ग्रामगीतेची आजही आहे,ज्याने आत्मसात केले तो भरून पावला ज्याने खंडन केले तो सरून गेला.महाराज प्रस्तुत ओळीत म्हणतात की एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रचार जर जोरकसपणे केला तर तो प्रचार गोट्यासही म्हणजे साधारण दगळालाही देवाचे रूप आणू शकतो तर तोच खोटा प्रचार युद्धाचे ढगही उभारू शकतो आणि कित्येक क्षणी खोट्यावर अमृताचा वर्षाव देखील करू शकतो परंतु त्याचवेळेस महाराज हेही सांगून जातात

▪️काहीकांचा स्वभावचि असे । अपप्रचार करोनि भरावे खिसे ।
जना नागविता आनंद दिसे । काहीकांना ॥४८॥ ग्रामगीता अध्याय ८

काही लोकांच्या स्वभावाला औषध नसते ते आपले कोण परके कोण असा कोणताही भेद न करता लोकांना नागवून आपलेच खिसे भरण्यात व्यस्त असतात,हा आनंद मिळविण्यातच काही लोकं स्वतःला धन्य मानतात.

तर मित्रांनो या केवळ दोन स्फोटक ओव्या आहेत ग्रामगीतेतल्या मग अख्खी ग्रामगीता कशी असेल? जगण्याची दिशा आणि आपले जीवन जर समृद्ध करायचे असेल तर ही ग्रामगीता आपल्या संग्रही ठेवून ती आचरणातही आणण्याचा प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे.
आज राष्ट्रसंत_श्री_तुकडोजी_महाराज यांची जयंती. दि.३०.०४.१९०९ रोजी अमरावती जवळ यावली या ठिकाणी श्री.नामदेवराव गणेशपंत इंगळे आणि सौ.मंजुळादेवी यांच्या पोटी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला.त्यांचं मूळ नाव हे माणिकदेव हे संत गुलाबराव महाराज यांनी ठेवलं होतं परंतु तुकड्या याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले.मुख्यतः १९३० च्या वैदर्भीय गोंडवणातील सत्याग्रही शिबिरामध्ये #झुटी गुलामशाही क्या डर बता रही है? अशी क्रांतिकारक भजनं त्यांनी जनतेला संबोधित केल्याने इंग्रजांनी त्यांना पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला.खऱ्या अर्थाने क्रांतिवीर भगतसिंगांच्या लढ्याशी एकरूप होणारी त्यांची ओजस्वी वाणी चिमूर सारख्या ठिकाणी क्रांतीची बीजे रुजविण्यात यशस्वी झाली.भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५५ साली विश्वधर्म आणि विश्वशांती परिषदेसाठी जापान कडून महाराजांना निमंत्रण मिळालं आणि त्या ठिकाणी सर्व जगाला विश्वशांतीचा संदेश देऊन त्यांनी स्तिमित केलं.
त्यानंतर अमेरिका,इंग्लंड,थायलंड,मलेशिया इत्यादी १८ देशाच्या समितीचे त्यांनी सल्लागार म्हणून सुद्धा कार्य केले.

▪️सर्वच करिती आपुल्यासाठी । स्त्री, पुत्रासाठी, चैनीसाठी।
आठवचि नाही येरांसाठी । काही करावे म्हणून त्या ।1१२ अध्याय ६

या त्यांच्या ओविंप्रमाणे त्यांनी आपलं अख्ख आयुष्य समाजातल्या गोरगरीब,दिन दलीत वर्गासाठी घालवलं.एकेका दिवशी १०-१० गावची मंदिरे दलितांसाठी खुली केली,तुकडोजी महाराजांच्या जीवनावर महात्मा गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिराव फुले,संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो तो आजही सहजपणे ग्रामगीता वाचताना आपल्याला लक्षात येईल.

▪️सर्वांस वाटे आमुचे ऐकावे । पण ऐकतील कैसे हे न ठावे।
म्हणोनि यास्तव पुढे जावे कोणा ||१३||
वाटे कार्य करावया पुढे जावे । साथ न मिळता फजीत व्हावे।
संकटी कोणी जीव द्यावे? | वाटे ऐसे बहुतेका ।।१४।। अध्याय ६

वरील त्यांच्या ग्रामगितेतल्या ओवीप्रमाणे आजची अवस्था आहे,सर्वांनाच वाटते की समोरच्याने आपले ऐकावे परंतु समोरचा ऐकेलच असेही नसते तेंव्हा आपण सहज विचार करतो आपण विचार सांगून काय उपयोग त्यापेक्षा न सांगलेलं बरं! एखाद्याची समाजसेवा करण्याची मनातून ईच्छा असतानाही त्याला सोबत कोणाची मिळत नाही आणि अशा वेळेस आपल्याला सोबतच कोणाची मिळाली नाही तर संकटसमयी आपला जीव का धोक्यात घालावा,असे आजही कित्येक लोकांना वाटते.
मग त्यासाठी तुकडोजी महाराज उपाय सांगतात की

▪️यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धि । शरीरशुद्धि, हृदयशुद्धि । 
घर-शुद्धि, ग्राम-शुद्धि । सर्वतोपरी ।।२२।।
जैसे तुम्ही कराल आपुले घर । ते पाहतील जन सत्वर ।
करतील तैसेचि प्रकार । आपुल्या घरी ।।२३ ।। अध्याय ६

आपलं आचरण योग्य करा,मन,हृदय शुद्ध ठेवा,घर शुद्ध ठेवा मग आपोआपच गाव,जनता तुमचे अनुकरण करेल कारण

▪️सर्वाआधी एक निश्चय । लोक, असती अनुकरणप्रिय ।
विशेष दिसे ती घेती सोय। न सांगताहि ॥१८॥
ग्रामगीता अध्याय ६ श्लोक १८

म्हणून नेहमी चांगले आचरण ठेवा,चांगल्या लोकांच्या संगतीत रहा,आपल्यातले दुर्गुण आपणच दूर करू शकतो,नेहमी तर्कशील रहा,समोरचा आपणास काय सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर तो काय म्हणतोय त्याची तार्किक पडताळणी करा.आपले आचरण शुद्ध असल्यास लोकं आपल्यातला चांगला गुण न सांगताही घेत असतात.

▪️दया, क्षमा, शांती, नम्रता । प्रत्येक जागी प्रामाणिकता।
सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी संपत्ति साधावी।।
सार्वजनिक कामी जाऊनि । कष्टत जावे नि:स्पृहपणी। जाति-पक्ष-मित्र-शत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे नसावा।।
ग्रामगीता अध्याय ७ श्लोक ३७

दया,क्षमा,शांती अशी बरीच तर्कशील जगण्याची समृद्ध मांडणी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडली आहे,आपणास शंभर टक्के जरी जसेच्या तसे वागता आले नाही,जगता आले नाही तरी आपल्या आचरणात नक्कीच थोडीबहुत सुधारणा घडवून आणू शकतो,एक समृद्ध माणूस बनण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो.
-उमेश पारखी

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी