एका संघर्षाची गोष्ट


जग बदलवू इच्छिणारे बरेच मिळतील, जग बदलवू पाहणारा एखादाच असतो-ऍड.मारोती कुरवटकर! एक संघर्षमय प्रवास!
■एखादा माणूस आपल्या जीवनाचा संघर्षातून इतरांसाठी आदर्श कसा ठरतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे ऍड.मारोती कुरवटकर!
गरिबी,तुरुंगवास अशा अनंत यातना भोगून व्यवस्थेच्या नाकावर टिचून वकील बनणारा आमचा मित्र मारोती!आज 25 जुलै त्याचा वाढदिवस,त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करीत आहे,ही पोष्ट बरीच मोठी आहे परंतु युवकांना मार्गदर्शक ठरणारी आहे आणि ती सर्वांनी वाचावी अशी प्रामाणिक ईच्छा आहे.
■अल्पावधितच एक सामाजिक जाण असलेला वकिल म्हणून ज्याची ख्याती आहे त्या मारोतीची जीवनकथा एखाद्या रहस्यमय कादंबरी किंवा चित्रपटाला साजेशी अशी आहे.मारोतीचा जन्म राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही या छोट्याशा गावात गणपतराव कुरवटकर या सामान्य शेतकऱ्याच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण टेंबुरवाही येथील जि.प.उ.प्रा.शाळा येथे झाले. लहानपणापासून अभ्यासात चुणचुणीत असणारा मारोती वर्गात नेहमीच पहिल्या क्रमांकाने येत असे. सातवीनंतर मुलगा हुशार म्हणून वडिलांनी जि.प.हायस्कुल राजुरा येथे टाकले.मारोतीचे मामा श्री.उद्धवराव चापले यांच्याकडे तो राहू लागला.निसर्गतःच त्याला अचाट वक्तृत्व कला लाभली असल्याने त्याने अनेक शालेय वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या.नववीत असताना अल्पशा आजाराने आईचे निधन झाले,मारोती पोरका झाला, घरी शेती आणि एकुलत्या एक मुलाचा सांभाळ व्हावा तसेच शेतीला आधार म्हणून वडीलानी दुसरे लग्न केले. सावत्र आईने मारोतीवर जीव लावला,आपल्या मायेने त्याला आईची कधी कमी जाणवू दिली नाही.आजही मारोतीवर ती माय जीवापाड प्रेम करते.
■मारोती जसजसा शिकत होता तसतशी त्याची वक्तृत्व कला बहरत गेली. तो प्रत्येक विद्यालयीन स्पर्धा जिंकू लागला. तो काळ होता आणि त्याची काही साधारण स्वप्ने होती.बारावीनंतर डि.एड. करायचे आणि रामरतनभाऊ(चापले) आणि डॉ.किशोरभाऊ(कवठे)यांच्यासारखे शिक्षक बनायचे,त्याच्या मानाने हे स्वप्न खूप काही मोठं नव्हतं.तो अभ्यासू होता,जिद्दी होता,त्या स्वप्नांचा पाठलाग करून इयत्ता 12 वित त्याला 73% गुण मिळाले,अर्थातच तो काळ आणि त्या परीक्षा आजच्या सारख्या सोप्या नव्हत्या,अभ्यासू आणि जिद्दी मुलच हा सत्तरचा टप्पा गाठायची! त्यावेळचे डि एड ला सहज प्रवेश मिळेल असे ते गुण होते आणि कुठे माशी शिंकली अन त्याच वर्षी डि.एड.ची प्रवेश पद्धती राज्यस्तरीय झाली.त्यामुळे मेहनतीने 73%. गुण मिळवूनही त्याला प्रवेश मिळाला नाही. तो अतिशय निराश झाला पण यावेळी सरकारने 10% जागा व्यवस्थापन कोट्यात राखीव ठेवल्या होत्या आणि त्यावेळी कोट्याची किंमत होती तीन ते साडे तीन लाख! परिस्थिती एवढीही नव्हती की एवढी रक्कम एवढे पैसे जमविणे शक्य होईल,तरी पण एक प्रयत्न करून पहावा म्हणून तो आपले बाबा आणि मामा उद्धव चापले यांच्या सोबत गडचिरोलीला गेला, जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात एका नातेवाईकाच्या मदतीने व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, नातेवाईक प्रभावी असल्याने व्यवस्थापन प्रशासन नव्वद् हजार रुपये एवढ्या दरावर तयार झाले पण तेवढे पैसेही जमविणे म्हणजे त्याकाळी सोपे काम नव्हते आणि पैशाअभावी हे त्याचे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिले.त्याच्यापेक्षा कमी गुण असणारे त्याच्याच वर्गातील विद्यार्थी केवळ पैशाच्या जोरावर डि.एड झाले.मारोती हरवून हात टेकविणाऱ्या पैकी नव्हता पुढील शिक्षणासाठी त्याने चंद्रपूर गाठले आणि सरदार पटेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याठिकानीही आपल्या वक्तृत्व आणि गुणांच्या जोरावर तो महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून निवडून आला.याच काळात त्याने जिल्हा स्तरीय,राज्य स्तरीय अशा अनेक वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा जिंकल्या.2003 मध्ये पुणे येथे झालेल्या अखील भारतीय विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत संपूर्ण देशातून मारोतीचा प्रथम क्रमांक आला.वक्तृत्वा बरोबरच त्याच्या नेतृत्व गुणांनीही उतूनग भरारी घेतली,आपण गरिबीमुळे शिक्षक होऊ शकलो नाही हे शल्य त्याला नेहमी बोचत होते,समाजातल्या गरीब-श्रीमंत दरीमुळे गुण असूनही गरीब मागे पडतो याची चीड मनात निर्माण होत होती म्हणून तो आपल्या वक्तृत्वातून विषम व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू लागला.त्याच काळात अनेक पुरोगामी संघटनांशी त्याचा संबंध आला,हा काळ मारोतीसाठी जीवघेणा होता, नक्षल चळवळीशी संबधीत म्हणून त्याच्या अनेक मित्राची धरपकड झाली.त्यात मारोतीचे नाव सुद्धा ठळकपणे होते,त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला, त्याच्या शिक्षणात पुन्हा एकदा खंड पडला. दोन वर्षे सतत तो बाहेर भटकत राहिला,शेवटी पोलिसांनी त्याला पकडले त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केल्या गेले,त्याच्यावर देशविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवला गेला,पुरोगामी चळवळीवर नेहमीच सरकारची करडी नजर असते,सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणाऱ्याला सरकार देशद्रोही ठरवून मोकळे होते,आजच्या काळातही असे अनुभव रोज आपल्याला अनुभवायला मिळत आहे,सरकारच्या चुकीवर बोट ठेवले तर दैनिक भास्कर सारख्या वृत्तपत्रांच्या कार्यालयावरही छापे टाकले जातात हे ताजे उदाहरण आहे,JNU मध्ये देशविरोधी नारे दिले म्हणून कित्येक तरुणांना तुरुंगात पाठवलं जातं, नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून मारोतीची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली,तर कधी अमरावती कारागृहात ठेवण्यात आले.न्यायालयीन लढा सुरू होऊन एक एक वर्ष पुढे जात होते,आपल्यावर अन्याय झाला म्हणत तो तुरुंगातही तो खचला नाही. त्याठिकाणी सुद्धा ज्या गरीब कैद्याना कोणी वाली नव्हते, अशा गरीब कैदयासाठी काम करू लागला. तुरुंगात इतर कामासोबत आपला अभ्यास देखील सुरू ठेवला, अभ्यासात खंड पडू दिला नाही.
■तब्बल पाच वर्षानंतर त्याला न्याय मिळाला,त्याची जामिनावर सुटका झाली, सुटका झाल्यानंतर टेंबुरवाही गावात त्याचे गावकाऱ्यांद्वारे जंगी स्वागत करण्यात आले,घरी भेट घेण्यासाठी दुरदुरुन यायला लागली, त्याच्या नवीन जीवनाची ही सुरुवात होती,मध्ये थांबलेले महाविद्यालयीन शिक्षण पुन्हा सुरू केले.एखादा सामान्य माणूस असता तर कधीचाच खचून गेला असता, पाच वर्षे तुरुंगात राहणे ही नक्कीच साधी गोष्ट नाही पण या गोष्टीचा त्याने कधी बाऊ केला नाही.चांगल्या प्रकारे इंग्रजी वाइ-मय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण केले.पदवी घेऊन तो शांत बसला नाही,समाजातील गोर गरीब लोकांवर होणारे अन्याय तो स्वतः आपल्या नजरेने बघत आला होता,न्यायालयीन प्रक्रिया गरिबांसाठी किती जीवघेणी असते हे त्याला कळून चुकलं होतं आणि त्याच ध्येयाने पदवीनंतर त्याने शांताराम पोटदुखे विधी महाविदयालयात L.L.B. साठी प्रवेश घेतला. कायदयाचे शिक्षण घेत असतांना आजुबाजुला ज्या सामान्य माणसाच्या समस्या होत्या त्याला त्या समस्या’ स्वस्थ बसू देत नव्हत्या. टेंबुरवाही हे परिसरातील जंगल व्याप्त ‘गाव. त्यामुळे जंगली प्राणी पिकांचे नासधूस करायचे, मारोतीने आपल्या मित्रांना सोबत घेऊन वन खात्या विरोधात आंदोलन उभारले, सतत आठ दिवस वन खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण केले. अखेर वन खाते चर्चेस तयार झाले. तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि वनाभोवती तारेचे कुंपण करणे या मुख्य मागन्या मान्य झाल्या. आज तुलाना जंगलापासून टेंबुरवाही जंगलायर्यंत जे तारेचे कुंपण झाले, ते याच आंदोलनामुळे झाले हे विशेष!एका सात बाऱ्यावर अनेक नावे ही ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मोठी समस्या! वडील मरण पावल्यानंतर सर्वं वारसदारांचे नावे सातबाऱ्यावर चढत असे आणि वर्षानुवर्षे ते तसेच राहत, राजुऱ्याचे तत्कालीन तहसिलदार मा.रविंद्र होळी हे मारोतीचे चांगले मीत्र! मारोती आणि मित्रांनी होळी साहेबांना विनंती करून गावागावात शिबीर लावायला लावले आणि या शिबिरात अनेक शेतकयांची वर्षानुवर्षांची समस्या निकाली निघाली. अनेक सातबाऱ्यावरुन विनंतीनुसार नावे कमी झाली.
■याही पलीकडे माझ्यासहित प्रदिप बोबडे,अरविंद वांढरे,राजीवन वाघमारे,विनोद ढोबे इ. मित्रांना सोबत घेऊन म.ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणात भव्य शेतकरी परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला मा बच्चू कडू मा. राजू शेट्टी इ. मोठे नेते उपस्थित होते.त्या परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर मंथन केल्या गेले.
■याच दरम्यान मारोतीचे लग्न भाग्यश्री रासपल्ले या उच्च शिक्षित तरुणीशी झाले. पंचक्रोशीत या विवाहाची चर्चा झाली. कारणही तसेच होते. थोर महापुरुषाचे फोटो समोर ठेऊन अक्षता न टाकता, त्यावेळी जंगलात जी फुले उपलब्ध होती, त्या फुलाचा अक्षता म्हणून वापर करण्यात आला. लग्नात व्यर्थ खर्च करायचा नाही हा त्यामागचा उद्देश होता. मंगलाष्टके म्हणून तुकडोजी महाराजांची मंगलाष्टके म्हटली गेली. वरात बैलबंडीवरून काढण्यात आली. एका कुणबी कुटुंबात असा विवाह होणे दुरापास्त पण मारोतीने ते करून दाखविले. संपूर्ण हुंडाविरहीत आणि अहेर विरहीत हे लग्न होते.मारोतीचा संसार सुरु झाला आणि वकिलीचे शिक्षण पण चालू होते. प्रथम वर्षाचा एल.एल.बी. चा निकाल लागला. गोंडवाना विद्यापीठातून मारोती पहिला आला. आता सुद्धा तो अनेक स्पर्धा जिंकू लागला. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचा उत्कृष्ट वादविवाद पटू हा पुरस्कार मारोतीला मिळाला. आणि हे सर्व तो आपला संसार सांभाळून करीत होता.शिकत असतांना, संसार करत असताना पैशाची गरज वाटू लागली. सगळे सोंग करता येतात पण पैशाचे सोग करता येत नाही, म्हणून मारोती राजुरा येथिल सुप्रसिद्ध वकील अॅड. अरुण धोटे साहेब यांच्याकडे काम करू लागला. धोटे साहेबांचा अनुभव आणि कार्यप्रणाली मारोतीला जवळून बघता आली आणि वकिलीचे अनुभव त्याच्या भविष्यात कामी येणारे असतील हे नक्की!
■2020 हे वर्ष मारोतीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष. याच वर्षी तो LLB. ची अंतीम वर्षांची परीक्षा विशेष प्राविण्यासहीत पास झाला. चार महिन्यानंतर त्याला सनद प्राप्त झाली. आणि टेंबुरवाही गावचा पहिला वकिल बनला. कुटुंबात किंवा जवळच्या नातेवाईकात कोणीही वकील नाही, तरी मारोतीने मिळविलेले यश उल्लेखनिय आहे.
■आता संपूर्ण राजुरा तालुक्यात वकील म्हणून मारोतीचे नाव आदराने घेतले जाते.भेंडाळा प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यावर झालेला अन्याय असो वा ताडोबा परिसरातील ज्या शेतकऱ्यावर वन खात्याने कार्यवाही केली. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या तर्फे मारोती न्यायालयीन लढा लढत आहे. हेच नाही तर अशा अनेक शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना मारोती एक आधार वाटत आहे. कुणाला दवाखान्यात न्यायचे असो, गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करायची असो त्यांना शासकिय मदत कशी मिळवून देण्यासाठी तो पूरेपूर प्रयत्न करतो.आज वाढदिवस देखील रक्तदान शिबिर घेऊन तो साजरा करत आहे,माझ्याकडून मित्रा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!तुझ्या आयुश्यात तू खूप यशस्वी व्हावास हेच मनःपूर्वक वाटतं!
जीवनात कितीही संकटे आली तरी मारोती कधीच डगमगला नाही, आपले शिक्षण चालू ठेवले आणि आज तो एक नामांकित वकिल होण्याच्या मार्गावर आहे आणि जी तरुण मंडळी छोट्या छोट्या संकटाला घाबरून आपल्या जीवनात निराश होतात, त्यांच्यासाठी मारोती कुरवटकर एक दीपस्तंभ नक्कीच आहे.
-उमेश पारखी,
www.parkhiArts.in
-माहिती संकलन (मी आणि श्री.रामरतन चापले)

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी