[tta_listen_btn]
आजच्या युगाला डिजिटल युग संबोधलं जातं, तेवढच हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेणारं युग आहे,प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने उतुंग अशी झेप घेतली आहे आणि याच तंत्रज्ञानाचा वापर जीवनातल्या छोट्यामोठ्या गोष्टीत अगदी सहजपणे होत असल्याचे आपल्या लक्षात येते.ढोबळमानाने तंत्रज्ञानाचा मोठा वापर हा उद्योगात आणि व्यापारात होताना आज दिसतोय,जसं जसं युग बदललं तस तसा तंत्रज्ञानाने आपला आवाका वाढवायला सुरुवात केली,एखादा कारखाना असो की एखादे लहानशे दुकान असो त्याचं डिजिटायझेशन झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.आज आपल्या जीवनातील दैनंदिन गोष्टी तंत्रज्ञानामुळे अगदी चुटकी सरशी सुटतात,आपल्या खिशात एक रुपयाही नसला तरी फोनपे,गुगलपे अशा रक्कम ट्रान्सफर करणाऱ्या प्लॅटफॉर्मनी आलेल्या अडचणींवर मात करता येते,रस्त्याच्या कडेला साधी भजी विकणारी मंडळी जरी भजी विकताना दिसली तरी त्यांच्याकडे अशा सुविधा आपणास दिसतात.पेट्रोल भरायला गेलं तरी त्याठिकानीही अशा सुविधा आपणास वापरायला मिळतात,कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या खिशात पैसाच असावा अशी काही अट कुठे राहिलेली नाही,केवळ तुमच्या अकाउंटमध्ये पैसा असला पाहिजे! आणि पैसा हेच जगण्याचं मूळ आहे तो कसा,कुठून मिळवता आला पाहिजे याची कल्पकता मात्र आपल्या जवळ असायला हवी.पैसा कसा उभा करता येतो याची कित्येक उदाहरणे आपल्या सभोवती आहेत,डिजिटल माध्यमाचा उपयोग आपल्या व्यापारासाठी किती उत्तमरीत्या करता येतो याचं एक उदाहरण आहे अमेझॉन! होय अमेझॉन ! अमेझॉन हे एक असं माध्यम आहे जे स्वतःची कोणत्याही वस्तूची निर्मिती करत नाही,अमेझॉन दुसऱ्यांच्या वस्तू विकून त्यावर नफा कमावते आणि हा नफा केवळ त्यांनी आपल्या कल्पकतेने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मिळविला आहे,जगात मोठ्या उद्योगात आज अमेझॉनची गणना होते,जगात 16 लाखाच्या वर कर्मचारी त्यात काम करतात,एका अर्थाने या व्यवसायाने लाखो लोकांना रोजगार दिलाय,1994 साली एका गॅरेजमधून जेफ बेजोस नावाच्या तरुणाने सुरू केलेला छोटासा ऑनलाइन व्यवसाय अख्या जगात पसरलाय,सुरुवातीला केवळ म्युझिक सिडीस आणि व्हिडीओ सीडी ऑनलाइन विकणाऱ्या जेफने आज प्रत्येक क्षेत्रात विक्रीचा महामेरू उभा केला आहे.कोणताही व्यवसाय हा लहान कधीच नसतो,सुरुवात लहान नक्कीच असते पण माणसाच्या मनात दृढ निश्चय,चिकाटी असली म्हणजे कोणत्याही व्यवसायात कितीही अपयश आले तरी तो एखाद्या ना एखाद्या व्यवसायात निश्चितच यश संपादन करू शकतो.
एखाद्या व्यवसायात अपयश आले म्हणजे जीवनात अपयशी ठरलो असे होत नाही,अशी कित्येक माणसे आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.व्यवसायाची सुरुवात खूप मोठ्या पुंजीने करावे असेही काही जरुरी नसते,तुमच्याकडे कल्पकता असेल तर अगदी लहान गोष्टींपासून आपणास सुरुवात करता येते.अशीच एक कल्पना ऑनलाइन मार्केटिंगची आपणास करता येते,आपल्याकडे एखादी गोष्ट विकायची असेल तर अगदी कमी खर्चात आपले उत्पादन ऑनलाइन आणता येते एवढेच नाही तर त्या वस्तूची ऑनलाइन मार्केटिंग सुद्धा स्वस्तात करता येते.एक उदाहरण मी देऊ इच्छितो, माझ्या मित्राने एक साधे घरगुत्ती किराणा विक्रीचे दुकान थाटले,कोरोनाचा काळ होता,परिस्थिती अत्यंत बिकट होती,जागोजागी लॉकडाऊन असल्याने घरातून लोकांना बाहेर पडण्यास सुद्धा खूप बंधने आली होती,अशा वेळेस आमच्या मनात एक कल्पना आली,संधीचं सोनं करण्याची वेळ आली होती.आम्ही असा विचार केला की लोकं आपल्याकडे येत नसेल तर आपण लोकांपर्यंत तर जाऊ शकतो ना! सुरुवातीला व्हाट्सऍपचा उपयोग करून ऑर्डर घेणे सुरू केले,त्यानंतर याच छोट्याशा व्यवसायाला डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल म्हणून एक पाऊल पुढे टाकले,त्या व्यवसायाची वेबसाईट तयार केली आणि ऍप्लिकेशन तयार करून गुगलवर सुद्धा ते अपलोड केले,कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी मनात जिद्द आणि चिकाटी असावी लागते,त्या जोरावर एखाद्या क्षेत्रात आपण पाऊल टाकलं तर निरनिराळ्या कल्पना सुचत जातात,वेबसाईट तयार करायला फार काही खर्च येत नाहीं पन आपल्या व्यवसायाचे स्वरूप आणि ब्रँडिंग जी बदलते ती वाखाणण्याजोगी असते.
एखादा व्यवसाय डिजिटल माध्यमातून करायचा असल्यास आपल्यात मित्र जोडून घेण्याची कला आत्मसात असली पाहिजे,ही मित्र मंडळी जी कामे करतात ते कोणत्याही माध्यमातून होत नाही,मित्रांची एक साखळी तयार करण्यात आपण यशस्वी झालो की आपल्या उत्पादनाची जाहिरात ही विनामूल्य होत असते,मित्र आपले साहित्य डिजिटल मार्गाने खूप दूर पसरविण्यास हातभार लावत असतात,म्हणून आयुष्यात कोणताही व्यवसाय करताना चांगल्या मित्रांची सोबत अनिवार्य असते.व्यवसाय करण्यासाठी कारणे असावी लागत नाही,व्यवसाय उभा करण्यास लागते ती जिद्द! आपल्या आजूबाजूला उच्च शिक्षित युवक वर्ग रिकामा फिरताना दिसतो याचे एकमेव कारण कोणत्याही कामाप्रती असणारी लाज आणि अनास्था होय.ज्याला कोणतेही काम करण्याची लाज येत नाही तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही,धीरूबाई अंबानींनी माती विकण्याची लाज बाळगली असती तर रिलायन्स नावाची भव्य दिव्य कंपनी जगासमोर नसती किंवा टाटांनी लहान सहान गोष्टींचा विचार केला असता तर भारतात टाचणी सुद्धा तयार झाली नसती.जगात सगळच विकलं जातं पण ते विकण्यासाठी असणारी बुद्धी मात्र आपल्या जवळ असायला हवी तसे नसते तर बॉटलीत पाणी सुद्धा विकलं गेलं नसतं.
आज डिजिटल माध्यमात आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे,तुम्ही घरी पिकणारे अन्न धान्य सुद्धा जागतिक बाजारपेठेत नेऊ शकता.एक साईट तयार करून आपल्या धान्याची विक्री करू शकता,युट्युबच्या माध्यमाने आपले स्वतःच्या शेतीत निरनिराळे प्रयोग करून ते पोष्ट करून युट्युब कडून पैसा मिळवू शकता,एखादी वेबसाईट तयार करण्यासाठी पैसाच लागतो अशातलाही भाग नाही,गुगलवर तुम्हाला फ्रिमध्ये साईट तयार करता येते,गुगलच्या माध्यमातून आपण व्यवसाय देखील करू शकतो.व्हाट्सऍप बिझनेसच्या माध्यमातून आपण घरून व्यवसायाची सुरुवात करू शकतो.तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची किंवा डिजिटल माध्यमांची ट्रेनिंग हवी असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये असणारी गरीबाची शाळा म्हणजे युट्युब खोला,प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथून शिकायला मिळेल,आपण एखादा विषय निवडला की त्या विषया संबंधित व्हिडीओ आपल्याला त्याठिकानाहून निश्चित मिळेल,आपल्या विषयाचा आपल्याला अभ्यास नसेल तर आपण कमकुवत ठरू,म्हणून विषयाशी संबंधित लेख,व्हिडीओ यांचा पुरेपूर अभ्यास करा,बाजारात व्यवसायाविषयी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत ती वाचण्याचा प्रयत्न करा.मी केवळ युट्युबवरून खूप काही शिकलो,बरेचशे ज्ञान घेता आले,प्रत्येक वेळेस यश मिळालेच असे नाही परंतु अपयशही पदरी आले नाही.तुमच्या मनात एखादा विषय शिकून घेण्याची,जाणून घेण्याची उत्कट ईच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ती ईच्छा पूर्ण करू शकता.मी डिजिटल माध्यम वापरून त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल किंवा स्वतःलाही कशाप्रकारे आपल्या ज्ञानात भर पडेल हे बघत आलोय,वेबसाईट तयार करण्याचे किंचितही ज्ञान नसताना मी स्वतः आजपर्यंत सहा वेबसाईट तयार करू शकलो,मी शिकलो तेंव्हा माहीत झालं की अरे हा ही तर एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो,मला तशी गरज नसल्याने हीच शिकलेली कला समाजासाठी वापरू शकलो.अँड्रॉइड ऍप्लिकेशन सुद्धा तयार करणे याच पद्धतीने आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने शिकता आले.
तुम्ही प्रत्येक व्यवसायात यश संपादन करू शकता,त्यासाठी अपार मेहनत करण्याची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे,वाटेत कितीही अडथडे आले तरी ते पार करून जाण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे.यशस्वी माणूस काय करतो त्याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे,यशस्वी माणसांच्या आयुष्यात कोणती संकटे आलीत किंवा काय अडथडे आलेत त्याचे जवळून निरीक्षण करून आपल्या जीवनात अशी संकटे आली तर कसा सामना करू शकू याचा अभ्यास केला पाहिजे.तुम्ही यशस्वी झालाच म्हणून समजा…