[tta_listen_btn]
मी माझ्या अख्या जीवनात परिक्षेतल्या टक्क्यांना कधीच फार महत्व दिलं नाही,जीवन जगताना हे टक्के कुठे कामी पडतात हे मला अजूनही एक कोडच वाटत,ज्यांना टक्क्यांचं महत्व वाटतं त्यांनी स्वतःलाच विचारून बघावे की स्वतःला किती टक्के होते आणि त्या टक्क्यांनुसार त्यांचा परफॉर्मन्स होता का? अर्थातच तसा परफॉर्मन्स शंभरातून एखाद्याचाच असतो बाकी नव्यांनऊ लोकं आपण स्वतः दिलेल्या परीक्षेचे टक्केच विसरून गेलेले असतात,ह्या टक्क्यांसाठी कितीतरी पालक आपल्या पाल्ल्यांवर मानसिक दबाव टाकत असतात,दुसऱ्या एखाद्या हुशार मुलाचे प्रत्येकवेळी उदाहरण देत बसतात पण यांच्या हे लक्षात येत नाही की प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते आणि मुलांवर अशाप्रकारचा दबाव टाकून ते नकळत त्यांना नैराश्याच्या खाईत लोटत असतात.मला कायम हा प्रश्न पडतो की 80-90% घेणाऱ्या मुलांचे खूप कौतुक होते,मोठमोठ्या वर्तमानपत्रात,बॅनर्समध्ये फोटो छापून त्याचा गाजावाजा केल्या जातो पण कालांतराने त्या हुशार मुलांचे आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय होते,ती मुलं आपल्या वैयक्तिक जीवनात किती यशस्वी होतात हे कळायला मार्ग नसतो,या गोष्टींचा कोणीच कधी विचार करत नाही,पालकांना आपल्या पाल्यांच्या मनाचा त्याच्या स्वातंत्र्याचा विचार येत नाही केवळ आपल्या पाल्याने उत्तम कामगिरी करावी,आपण स्वतः ढब्बू असेल तरी चालेल पण आपल्या मुलाने परीक्षेत चांगले टक्के मिळविलेच पाहिजे या दुटप्पी भूमिकेत पालक सतत वावरत असतात.
निखिल नाईक या बारावीची परीक्षा दिलेल्या मुलाने आपल्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली,निमित्त काय तर बारावीत चांगले टक्के मिळाले नाही,परीक्षेत तो चांगले मार्क्स मिळवू शकला नाही.खरच एवढं तकलादू असतं जीवन! याला जवाबदार कोण पालक,शाळा,मास्तर की आपला समाज? बातमी वाचून मन सुन्न झालं, माय बापानी जीवाचं रान करावं,लहाण्याचं मोठं करावं आणि केवळ टक्के न मिळाल्याने मुलाने आपलं जीवनच संपवावं? जीवणापेक्षा काय टक्के मोठे असतात.
आज आपला देश मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे,बेरोजगारी,धर्मांधता,महागाई अशा निरनिराळ्या प्रश्नांनी देशाला पोखरायला सुरुवात केलेली आहे,चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ज्या वर्गाकडे जो उच्चवर्णीय समजला जातो त्यांच्या पिढ्यानी अतोनात पैसा जमवून ठेवला आहे,ज्यांची व्यवस्थेवर घट्ट पकळ आहे अशी लोकं स्वतःला फायदा होईल असे कायदे,असे वातावरण निर्माण करून आपल्या भविष्यातल्या पिढ्या कशा सुखात जगतील याची उपाययोजना करून ठेवत आहेत,आपल्या पिढ्या पैशाच्या जोरावर विदेशात शिकायला पाठवत आहेत,त्यामानाने आमच्याकडे पैसा नाही की ती व्यवस्था नाही जी आपल्या मुलांना भविष्यात चांगली नोकरी देईल वा जगण्यास पोषक वातावरण देईल आणि याच वातावरणात आपल्या शंभर लोकांमधील एखादाच कसातरी सगळ्या गोष्टींचा मेळ जमल्यासच एखाद्या चांगल्या पोष्टवर जाईल.ही परिस्थिती यापुढेही कायम राहील,आमची बुद्धी आम्ही गहाण ठेवलीय,आमचे हक्क,अधिकार आम्ही विसरून त्यांना पूरक असणाऱ्या व्यवस्थेचे आम्ही आज वाहक झालेलो आहोत.
माझ्या मते या टक्केवारीपेक्षा ज्या मुलाला व्यावहारिक ज्ञान आत्मसात होत असेल त्या शिक्षणाची आज गरज आहे,एक साधे उदाहरण घेऊ ,आम्ही शिकत असताना आमचा एक ग्रुप असायचा या ग्रुपची सर्वांच्या घरची परिस्थिती सारखीच म्हणजे तोलामोलाचीच होती,आमची मॅट्रिक हॉप पॅन्टवर गेली! आणि दुसरा ग्रुप हा सधन होता,फुलपॅन्टवर यायचा,शाळेत समोर बसायचा,आम्हाला मध्ये कुठेतरी जागा मिळायची ते नाहीच जमले तर बॅक बेंच तर आमचे रिझर्व्ह राहायचे,हा सधन ग्रुप समोर बसल्याने शिक्षकांचे लक्ष सुद्धा त्यांच्यावर जास्तच असायचे, टॉपटीप असणाऱ्या या मुलांच्या तुलनेत आम्ही सदैव गावठीच दिसायचो,त्यांचे टिफिनचे डब्बे,त्यांचे इस्त्री मारलेले युनिफॉर्म,त्यांच्या स्कुल बॅग्स सगळच कसं त्यावेळेला एकदम झक्कास वाटायचं आणि स्वतःकडे पाहिलं की एकदम भक्कास! तर सांगायची गोष्ट अशी की ही सदन मुलं अभ्यासातही खूप हुशार असायची,यांचे शाळेत शिकविणारे मास्तरच घरी ट्युशन घ्यायचे,त्यामुळे यांचा अभ्यास आधीच झालेला असायचा,आम्ही मात्र 10-20 किलोमीटरहुन सकाळी आठ वाजता निघायचं आणि सरकारी बसने संध्याकाळी 7 पर्यंत घरी पोहचायचे,धक्के खात खात! मला आजही आठवतं त्यावेळेला आम्हाला खेळयातले म्हणून कायम दुय्यम वागणूक मिळायची पण आम्ही परिस्थितीशी दोन हात करणारी गावठी पोरं होतो,कित्येक वेळा उधारीवर पुस्तके घेऊन आमचा अभ्यास चालायचा,एकमेकांसोबत पुस्तके अदली बदली करून आम्हाला जे हवं ते मिळवून घ्यायचो पण टक्के चांगली मिळतील किंवा आम्ही चांगल्या मार्कानी पास होऊ याची शास्वती कधीच नसायची. मला आठवतं की आमच्या ग्रुपमधला 71-72% च्या वर कोणी गेला नाही,मला मॅट्रिकला 55 आणि बारावीला पण 55 च पडले😀 पण काय फरक पडला,जगाच्या महाकाय सागरात पडल्यावर जिद्दीने पोहणं शिकता आलं पाहिजे आणि आलेली परिस्थिती तुम्हाला ते सगळच शिकवीत असते, बरं त्या टक्क्यांच आमच्या घरी काही देणंघेणं होतं का,अजिबात नाही,माय बापानी कधी विचारलं नाही,बापू तुले टक्के किती भेटले मा? काही गरज नव्हती,माह्य पोरगं पास झालं हाच आनंद त्यांच्यासाठी फार मोठा असायचा.जे काही आयुष्यात करायचं होतं ते आम्हाला करायचं होतं,स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे होते,त्यावेळी आम्ही काय करावं हे सांगायला देखील कोणी नव्हतं.मागे वळून बघताना दुसऱ्या ग्रुपमधील ते श्रीमंत पोरं, त्यांचे टक्के आणि ते आज कुठाय याचा थांगपत्ता देखील लागायला खाली नाही,आमच्या ग्रुपमधील कोणी रिकामं राहिलं नाही,आज कोणी मास्तर आहे,कोणी मॅनेजर आहे,कोणी कवी आहे,कोणी लेखक आहे,कोणी मोठ्या कम्पनीत जॉबवर आहेत तर एकूण ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात सुखी आहेत.
काळाच्या प्रवाहात टक्के वाहून जातात,ज्याला दुनियादारी समजली तो तग धरतो,पालकांच्या अनाठायी अपेक्षा मुलांच्या जीवावर उठतात,जे आपण साध्य करू शकलो नाही ते आपल्या मुलाकडून करवून घ्यायचा बळजबरीपणा कित्येक पालक करत असतात, अरे जगू द्या की त्याला आपल्या बुद्धिमत्तेने, सारं काही टक्के ठरवत नाही टक्के मिळाले नाही म्हणून कोणी अपयशी ठरतं का? की नापास झाला म्हणून तुमच्या पोराचं जीवन बनवायला ही दुनिया येणार आहे? सर्वात महत्वाचं जीवन आहे आणि तेच नसेल तर ते टक्के कुठे नेवून घालणार आहात,मुलांना एवढही प्रेशराईज करू नका की आपलं जीवनच संपवून टाकतील,त्याचे मार्गदर्शक व्हा,आपलं मूल योग्य मार्गावर आहे की नाही एवढं लक्ष ठेवा,त्याला जे जमण्यासारखं आहे ते करू द्या,मला तर कधी कधी असं वाटते की हे जे मोठमोठे बॅनर्स लावून टक्केवारीची जाहिरात करतात यांना जोड्याने हाणले पाहिजे,शंभर मुलांकडून लाखो रुपये वसूल करून दोन तीन मुलं चांगल्या गुणांनी पास होतात,ही त्यांची बुद्धिमत्ता असते,उरलेल्या,नापास झालेल्या मुलांची आकडेवारी ही मंडळी कधीच सांगत नाहीत,त्या मुलांनी काय करावे,कुठे जावे?
मला माझ्या मुलाचा सार्थ अभिमान वाटतो,तो माझ्यावर गेलाय,मी जसा आहे,तो ही तसाच आहे,मी जसे शिकताना तिर मारले,तसेच तिर त्यानेही मारले,मी जे काही आयुष्यात केले तेच तोही करेल यात मला तरी शंका नाही,टक्केवारीला गुंडाळून ठेवणारी आम्ही माणसं आहोत,दुनियादारीत टक्का कामी येत नाही,तो व्यवहारात पक्का आहे,काहीतरी करेलच! माह्या बापानं कधी टक्का विचारला नाही,मी ही विचारणार नाही! आज गल्लोगल्ली इंजिनिअर,एमबीए, उच्चशिक्षित पडलेले आहेत पण माझा पोरगा असा पडून राहणार नाही एवढं मात्र नक्की!