संसाराचा गाडा

[tta_listen_btn]


“बाई बाई कोण्या रांडलेक मोंढ्यानं पाजली असल एवढी, असा कसा नालीत पडला असल हा माणूस,मढं जावो पाजणाऱ्याचं,महा नवरा दारूच्या थेंबालेबी हात लावत न्हायी,तुमीस त न्हायी पाजली न यायले” बाई जोरजोरानं ओरडत होती,आम्ही मुकाट्याने ऐकत होतो कारण ज्याला नालीतून काढून त्याच्या घरी पोहचवलं ती टीम म्हणजे आम्ही होतो, तो परिचित होता,अस्सल बेवडा म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद व्हायची तेवढी बाकी होती अगदी त्याच वेळेस त्याला गंध्या नालीतून दोन हात दोन पाय पकडून वर काढून वरून विहिरीतून दोन बादल्या पाणी टाकून धुतला न त्याची घरी पोहचवला होता पण कमाल ही झाली की चोराच्या उलट्या बोंबा ती बाई आम्हालाच धूत होती जसा की तिचा नवरा राजा हरिश्चंद्र होता!
सांगायचं तात्पर्य एवढच की प्रत्येक बाईला आपला नवरा हा गुणी,सोज्वळ हरिश्चंद्राचा अवतारच वाटतो,नवऱ्याच्या प्रत्येक चुका ती झाकण्याचा प्रयत्न कसोशीने करीत असते.तो आमच्या समोर डोलत डोलत आला,नालीत पडला,आम्ही उचललं,घरी घेऊन गेला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्यापैकी दारूच्या थेंबालाही स्पर्श करणारा कोणीही नव्हता तरीही त्या बाईला तिचा नवरा हिरोच वाटला आणि आम्ही व्हिलन!! आणि आईच्या अशा अतिरिक्त विश्वासाने माणूस फायदा उचलतो,आम्ही नेऊन पोहचवला त्याच वेळेस त्या बाईने त्याला उभारीने कुटला असता तर दुसऱ्या दिवशी नैन्टि घ्यायच्या अगोदर घरातल्या बाईची आठवण आली असती पण नाही बाई बाईच असते,निसर्गाने प्रेम,माया,वात्सल्य तिच्या ओट्यात टाकलं आहे,त्याचा पदोपदी ती परिचय करून देते.तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं की तिचा नवरा रोज नैन्टि मारत असतो,एक नंबरचा बेवडा आहे पण त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी ती त्याची चूक रोज झाकत असते पण ह्या झाकणझुल्याला तिच्या प्रेमाचं काही पडलेलं नसतं की आपल्या लहान लहान लेकरांचा कधी विचार येतो.गम्मत म्हणून नव्हे तर सिरियसली माझं हे स्पष्ट मत आहे की माणूस लवकर मरण्याला तो स्वतःच जवाबदार असतो,निसर्गतः बाईपेक्षा माणसाला मिळालेलं अमर्याद स्वातंत्र्य त्याला त्याच्या ऱ्हासाकडे घेऊन जातं, अंगात रक्त असताना असे शौक काहीच वाटत नाही परंतु वयानुरूप लागलेल्या घाणेरड्या सवयीनमुळे उतरत्या वयात त्याला शारीरिक व्याधी जर्जर करायला लागतात तर मस्तीत खर्च केलेल्या पैशाने त्याची साथ सोडलेली असते.निसर्गतः बाईच्या वाट्याला अगदी लहानपणापासूनच कामाचा बोझा दिल्या जातो जो तिच्या आयुष्याच्या अंतापर्यंत तसाच राहतो,सकाळी 5 वाजता उठणारी बाई,पाणी भरते,अंगण सारवते, माणसासाठी गरम पाणी ठेवते,पाण्याची सोय नसेल तर चार गुंड पाणी दोन किलोमीटरवरून सुद्धा आणते,ते झालं रे झालं की स्वयंपाकाला सुरुवात करते,मुलांच्या शाळेची तयारी करते,नवऱ्याला डब्बा घालून देते न नवरा काय करतो? ढुंगण वर करून 8 वाजेपर्यंत झोपतो! कारण काय तर तो घरात कमाई आणणारा माणूस म्हणून! तो कसाही वागो त्याच्या शंभर चुका माफ करणारी बायको ही कधीच त्याच्या विरोधात जात नाही कारण ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करत असते आणि म्हणूनच माणसापेक्षा बाईचे आयुर्मान जास्त आहे,ती जास्त जगते.तिला आयुष्यात माणसासारखे दुर्गुण जडलेले नसतात,ती कधी सिगारेट ओढत नाही,ती कधी नैन्टि मारत नाही, ती वर्षानुवर्षे केवळ आपल्या कुटुंबासाठी राबत असते.बाईचं हृदय अफाट तेवढच निरागस असतं, जेवढं वात्सल्य निसर्गाने दिल आहे तेवढीच कोणतीही गोष्ट सहन करण्याची अमर्याद शक्ती निसर्गाने दिलेली आहे. या सगळ्यात काही अपवाद असू शकतात.नवरा बायोकोत सामंजस्याची गोष्ट नसली की संसार नीट चालत नाही,एक तापट असेल तर दुसऱ्याने शांत असणे गरजेचे असते,तेंव्हाच संसाराचा गाडा सुसाट चालत असतो.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी