नात्यातलं ग्रीस संपलं कि ..

[tta_listen_btn]


▪️लग्नाच्या वाढदिवसाला प्रत्येक जण आपल्या बायकोवर लिहितो,तू होती म्हणून माणसात आलो,तू होती म्हणून माझा संसार यशस्वी झाला,तू होती म्हणून माझ्या आयुष्यात संकटावर मात करू शकलो,तू कधी रुसलीस कधी फुगलीस कधी उपाशी झोपलीस पण तक्रार नाही केलीस इत्यादी इत्यादी. पुरुषाच्या अशा बोलण्या पुरत्याच गोष्टी असतात..सगळ्याच पुरुषांना आपली बायको प्रिय असतेच असे नाही,पण व्यथा दाखविण्यासाठी असे काही तरी लिहिण्याची गरज भासते,काही जणांची लग्नाच्या एका वर्षात अप्रिय व्हायला लागते तर काही जणांना वर्ष लोटतात.कालांतराने लग्नाच्या पहिल्या वर्षात असणारं बेशुमार प्रेम झिरपू झिरपू आटून जाते.
▪️माणूस एक नंबरचा बदमाश प्राणी असतो,एकीकडे बायकोवर अत्युच्च प्रेम दाखवतो तर दुसरीकडे तिला दगाही देत असतो.माणसापेक्षा बाया तीक्ष्ण असतात,आपला नवरा कुठे जातो,कुठे शेण खातोका यावर त्या बारकाईने लक्ष ठेवत असतात. केवढाही मोठा माणूस असू द्या,तो कोणत्याही पदावर असू द्या पण बाईविषयी त्याची नजर ही एका नरासारखीच असते,शेवटी मानवजात ही एक प्राणिजातच आहे,त्याच्या शरीरातले नर हार्मोन्स त्याला हे सगळं करण्यास बाध्य करतात.गाडीच्या मागे आपली सुंदर बायको जरी बसली असेल तरी पुढून येणाऱ्या बाईवर हमखास त्याची नजर जातेच,हे नर आकर्षण असतं जे तो थांबवू शकत शकत नाही.रस्त्याच्या कडेला एखादी सुंदर बाई जात असेल तर तो बोलून दाखविणार नाही पण मनातल्या मनात क्या बात है म्हणून मनाचं समाधान करू घेईल.उलट बाई ही सौम्य स्वभावाची असते,आपला माणूस काय करतोय हे माहीत जरी असलं तरी ती जाणूनबुजून दुर्लक्ष करते कारण ती आपल्या संसाराशी समर्पित झालेली असते,आपला संसार तुटू नये,मुलाबाळांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ती सगळ्या गोष्टी माहीत असून एकप्रकारे मुकाट्याने सहन करते.
▪️5% बाया सोडल्या तर 95% बाया आपल्या संसाराप्रती प्रामाणिक असतात,मुलंबाळं,सासू,सासरे यांच्या देखभालीतच त्यांचं अर्धअधिक आयुष्य निघून जातं,लग्नापूर्वी ती जी काही स्वप्न पाहतात ती स्वप्न लग्न झाल्यानंतर मरून जातात.त्या स्वप्नांना मूर्त स्वरूप ती कधीच देऊ शकत नाही नव्हे पुरुषी मानसिकता तिच्या स्वप्नांचा गळा घोटत असते.उरलेल्या 5% बाया आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि स्वतंत्र जगण्यासाठी जेंव्हा प्रयत्न करतात तेंव्हा तीला उनाड समजून ही पुरुषी मानसिकता तिला बरबाद करून सोडते,अशावेळेस ना ती धड संसार फुलवू शकत ना सुख मिळवू शकत.पुरुषसत्ताक समाज तिला अळगळीत फेकून देतो.
▪️माणूस आणि बाई ही संसाराची चाके आहे,एकाही चाकात सामंजस्याचं ग्रीस कमी पडलं तर संसारात किरकिर नावाचा आवाज सुरू होतो जो कमी होण्याऐवजी वाढतच जातो.माणूस कसाही वागू द्या,बाहेर चरून येऊ द्या,बाई नाईलाजाने का होईना शेवटी मान्य करते पण बाई एखाद्या माणसासोबत थोडी बाजूला होऊन बोलू द्या माणसातला संशयी किडा जागृत झाल्याशिवाय राहत नाही. काही नसतानाही माणूस बाई ते बेड इथपर्यंत संबंध लावून टाकतो.
▪️काही घटना अशा असतात की वरून सगळं काही नीट दिसत असताना आंतरिक पारिवारिक कलह सुरू असतो,काही बाया घोडका करून बसल्या की एक एक टॉपिक सुरू करतात “ती नाही का व,त्याच्यावर कनं हाये म्हणते,का कमी पडत असल बरं तिले,नवरा त दिसाले चांगलास हाये न हे कायले बाहेर चरत असल” समाज अशा संबंधांना अनैतिक संबोधून स्वतःची पाठ थोपटून घेतो,अनैतिक संबंध खरच अनैतिक असतात का? समाजात 2% बाया,पुरुष अशा असतात की लग्न झालेले असताना बाहेर संबंध ठेवतात,का ठेवत असतील? याच्यामागची कारणे जर शोधली तर हे संबंध अनैतिक ठरवता येतील का? माणूस जातीचा स्वभाव असतो जे आपल्याकडे नाही ते मिळविण्याचा! आपली ईच्छा,आकांक्षा पूर्ण करून घेण्याचा! निसर्गतः माणूस आणि बाई ही नर आणि मादी ह्या प्राणिकक्षेमध्ये येतात,निसर्गात नराचे गुणधर्म आणि मादीचे गुणधर्म इतर प्राण्यांमध्ये आहेत तेच गुणधर्म माणसात आणि बाईत आहेत,केवळ प्राण्यांपेक्षा माणसात विकसित असलेला मेंदूचं काय तो वेगळा आहे,त्या विकसित मेंदूने अनेक प्रकारची बंधनं स्वतःवर लादून घेतली आणि सुसंस्कृत समाज नावाचे गोंडस नाव धारण केले. खरच अनैतिक म्हणविणारे संबंध अनैतिक असतात का,ज्यांचे संबंध असतात त्यांना हे कधीच अनैतिक वाटत नाही याचे मुख्य कारण असते गरज! जे आपल्या माणसाकडून मिळत नाही ते इतरांकडून मिळविण्याचा तो प्रयत्न असतो.काही ठिकाणी ऐकू येतं माणूस तर माणूसच असतो पण हिले नाही समजलं का व,कसा हात देल्ला हिनं! याचा अर्थ असा की माणूस हा कायम निर्लज्जच असतो आणि बाई ही कायम सुसंस्कृत असते आणि याच सुसंस्कृतपणामुळे ती एकतर आयुष्यभर कुंठत जीवन काढते वा तिला जे मिळत नाही ते दुसऱ्या माणसात शोधते.जे आपल्याला मिळाले नाही ते कुठूनही मिळविण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असताना लैंगिक आनंद मात्र या सगळ्यांना अपवाद ठरतो.संसारचक्र फिरत राहण्यासाठी माणसाने उत्पन्न केलेले कायदे कानून बायांच्या बाबतीत मात्र काहीसे अन्यायकारक आहेत, माणूस दहा ठिकाणी तोंड मारून आला तरी समाज त्याला सहज स्वीकारतो पण एखाद्या स्त्रीच्या हातून थोडीही चूक झाली तर तिची बदनामी होते आणि तिला हा पुरुसत्ताक समाज अलगद बाजूला सारतो.
▪️विषय भारी आहे,लिहायचही पुष्कळ आहे आणि मनात जे चालतं ते बिनधास्त लिहायला मला काहीच वाटत नाही.प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो पण शंभर टक्के माणसे सारखीच असतात,आपली बायको कितीही सुंदर असली तरी त्याला दुसऱ्याचीच चांगली वाटते आणि बाईला माणूस कुठूनही तोंड मारून येऊ द्या तिला तिचा नवरा हरिश्चंद्रच वाटत असतो.बाईमुळे महाभारत घडलं असं बरेच जण म्हणतात पण महाभारत तर माणसाच्या नालायकपणामुळे घडलं हे कोणी मान्य करत नाही.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी