[tta_listen_btn]
◾त्याच्या पाप पुण्याचा हिशोब एकदा झालाच की मग त्याचा हिशोब करायला तुम्हाला सुपारी दिली तरी कोण? माणूस जिवंत असताना माझा भाऊ,माझा भाऊ म्हणत नसलेल्या प्रेमाचे पूल बांधायचे आणि तो मेला रे मेला की अबब केवढा लफडेबाज माणूस होता म्हणून गावभर डफरा घेऊन बोंबलत सुटायचं, काय हे, ही कसली नीतिमत्ता! एखाद्यावर चिखल उडविण्याचा अधिकार आपल्याला नक्की देतो तरी कोण? माणूस सार्वजनिक जीवनात वावरत असेल, तो एखादा राजकीय नेता असेल तर त्याच्या कामाविषयी बोलण्याचा नक्कीच तुम्हाला अधिकार असतो कारण तुम्ही त्याला तुमचे अमूल्य मत देऊन तुमच्या कामांसाठी त्याला निवडून दिलेले असते परंतु तरीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार मिळत असतो का,अर्थातच तो मिळत नसतो.बरं तो नेता लफडेबाज असेलही पण त्याला निवडून देणाराही समाजच होता ना, समजा तो नेता स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात लफडेबाज आहे,बाईलवेडा आहे,भ्रष्टाचारी आहे हे माहीत असून भाऊ भाऊ म्हणून त्याच्यासोबत फोटो काढणारे कोण असतात,तुमच्या अनैतिक कामाला त्याचा पाठिंबा मिळविणारे कोण असतात,नेता तेंव्हाच गोड वाटतो जेंव्हा तो तुमची वैयक्तिक कामे करतो,तुमचे काम दोन नंबरचे असले तरीही त्याला सपोर्ट करतो,अन्यथा तुमच्या दृष्टीने तो तुमच्या काही कामाचा नसतो. आमच्याकडे एक नेता रोज संध्याकाळी नैन्टि मारून भेटायला आलेल्या लोकांना ल## पासून सुरू करून फावड्या पर्यंत शिव्या घालतो पण आम्ही काही म्हणतो का? मतलबच नाही न आपल्याला! ज्याचं पाप पुण्य त्याच्याजवळ! आज राजकारण म्हटलं की विनापैशाने कोणतेही काम होत नाही,विना कपटाने काही होत नाही,माणूस नंगा असल्याशिवाय राजकारण होत नाही,निवडणुकीच्या वेळेस जसे नेता लोक पैसे वाटतात,दारू वाटतात तसे घेणारी जनता एवढी इमानदार असते का? ती का म्हणून हे सगळं स्वीकारत असते,याला कोण जवाबदार असतं? मग तो पैसे वाटणारा नेता हा तुमच्याकडून वसूल करणार की नाही ? नंतर तो पैसे खातो म्हणून उलट बोंबलण्याचा नैतिक अधिकार तरी पैसे घेणाऱ्याला असतो का? त्याने बंगला बांधला, दारूभट्या खोलल्या,लफडे केले असे आरोप राजकारण्यांवर नवीन आहेत का? कमी अधिक प्रमाणात सगळ्याच नेत्यांची स्थिती अशी आहे,दोन नंबरचे काम केल्याशिवाय एखादा माणूस लीडर होऊच शकत नाही, खोक्यासाठी जेथे ज्यांनी पैदा केलं त्यांनाच दगा देणारी माणसे महाराष्ट्रात उपजली,सत्तेसाठी खून करणारे धुरंधर निपजले,एवढच कशासाठी? धुऱ्यांवरून भांडणारे भाऊ भाऊ इथं आहेत,स्वतःच्या शेतीवर नाव चढविण्यासाठी चिल्लर घेणारे तलाठी येथे आहेत,आबु बाबू येथे आहेत,मग राजकारणात तुम्ही आत्ता ह्या घडीला इमानदार,नीतीवंत नेता शोधत आहात, कमाल वाटते! आजच्या घडीला जसा इमानदार नेता शोधल्याने सापडत नाही तशी इमानदार जनता तरी सापडते का?
◾राजकारणात ज्याची सत्ता असते त्याच्या बाजूने लाळ गाळली की तुम्ही तुमचे कोणतेही धंदे करण्यास मोकळे होत असता,राजकारणच मुळी नैतिक राहिलेलं नाही त्यात तुम्ही नैतिकतेचे धडे सांगणार असाल तर ते कोणाला पटणार आहेत.नेता जिवंत असे पर्यंत त्याला भाऊ म्हणत त्याच्या मागे मागे लाळ गाळत राहायची आणि एकदाचा तो मेला की तो कसा लफडेबाज होता हे सांगत सुटायचं,हेच तो जिवंत असताना बोंबलायची तुम्हात का हिम्मत नव्हती,ही नैतिकता असते का? तो लफडेबाज होता हे जगाला माहीत असताना नेमके तुम्हीच ओरड करण्याची नेमकी गरज ती काय असते.याचा अर्थ एकच असू शकतो की तुम्हाला राजकीय स्वार्थापोटी त्याची बदनामी करायची असेल किंवा तुम्ही हे काम पैशासाठी सुपारी घेऊन करत आहात वा तुमचा त्यात वैयक्तिक स्वार्थ असू शकतो किंवा शेवटी त्याने तुमचे काही तरी नुकसान केलेले असेल,शेवटी ही ही शक्यता आहे की मेलेल्या नेत्याबद्दल सहानुभूतीचा फायदा कोणाला होऊ द्यायचा नाही. मेल्यानंतर माणसाशी वैर ते काय? सामान्य माणसाला कोणी मेल्याने कसाच फरक पडत नाही,इव्हन घरचा माणूस मेला तरी चवथ्या दिवशी सगळे विसरून कामाला लागून जातात,मग एखादा आत्ताचा नेता मेल्याने साधारण माणसाला काय असा फरक पडेल? माणूस मेल्यानंतर चांगला की वाईट या दोनच गोष्टी असतात.तो चांगली कर्म करून मेला तर चांगला म्हणतात किंवा वाईट कर्माने मेला तर वाईट म्हणतात,ती त्याची कर्माची फळे असतात,तो जिवंतपणी भोगला नाही तर मेल्यावर भोगतो,मग आपल्याला काय गरज असते त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकाविण्याची? चला मान्य करू की एकदा आपल्याला त्याला बोलण्याचा अधिकारही असेल तरी आपण देखील धुतल्या तांदळासारखे आहोत का? आपण एवढे पवित्र आहोत का की आपण कोणाची फसवणूकच केली नाही,आपण लफडेच केले नाही,आपल्या घरी संडास नसायचा आणि दुसऱ्याला संडास कसा बांधावा असा सल्ला देण्यासारखे नाही का हे? आपण किती लफडेबाज आहोत याचं निरीक्षण कोण बरे करत असेल. जो जैसा करेंगा वैसा पायेगा ही दुनियेची रीत आहे,आपण जे काही करतो ते आपल्या स्वतःला जरी चांगले वाटत असले तरी आपण जे करतो त्याचे परिणाम इथेच आणि इथेच जिवंतपणीच भोगावे लागतात,माणसाला स्वतः चांगलं करतोय की वाईट हे समजायला स्वतःला कठीण असतं पण लोकांना ते दिसत असतं.लोकांना चुकून दिसलही नाही तरी तुमच्या कर्माची फळं ही तुम्हालाच भरावी लागतात,एका नालायकाने दुसऱ्या नालायकावर बोलणं म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपविण्यासारखाच प्रकार आहे. तुम्ही त्याच्या नालायकपणावर बोलताना तुम्ही किती नालायक आहात की लायक आहात हे जगाला माहीत असतं राव! आपण कितीही चांगले असल्याचा बनाव आणला तरी जनता जो है वह सब जाणती है, असा कोण नेता आपल्या आजूबाजूला आहे ज्याच्यावर कोणता ना कोणता आरोप लागलेला नाही, राजकारणात बाई,बाटली आणि जुगार ह्या कॉमन गोष्टी आहेत फरक एवढाच असतो की ज्याची सत्ता असते त्याचे लफडे झाकून असतात तर ज्याची सत्ता नसते त्याची समाजातले काही सुपारिबाज सत्ताधाऱ्याला हाताशी धरून उघडे पाडतात.आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी अशी मंडळी कोणता थर गाठतील याचा काही नेम नसतो.असल्या नेत्यांचं समर्थन करणं जेवढं निंदनीय आहे तेवढच अशा सुपारीबाजांपासून सावध नसणं हे कधीही आरोग्याला हानिकारकच असतं.