[tta_listen_btn]
माळ्याच्या स्टेटसवर म.फुलेंचं चित्र दिसलं
महारांच्या स्टेटसवर आंबेडकरांचं चित्र दिसलं
चांभाराच्या स्टेटसवर रविदासाचं चित्र दिसलं
कुणब्याच्या स्टेटसवर छ.शिवाजीचं चित्र दिसलं
तेंव्हा ह्या सगळ्यांची जयंती किंवा पुण्यतिथी होती….
हातात झेंडे,नैनटीच्या जोशात,डीजेच्या जोरात
हे सगळ्याच ठिकाणी नॉर्मल होतं….
स्टेटसवर जातीनिहाय जनगणना झाली
आजकाल विचार बिचार काय नसतो हो
कुणब्याला बाबासाहेब अजूनही खालच्याच जातीतला वाटतो
तर तोंडाने जय भीम म्हणून कापायच्या गोष्टी करणारे आंबेडकरी शेवटी जात पाहूनच माती खातात….
सोयीपुरता आंबेडकर आणि बुद्धाची अहिंसा वापरायला बहुतांशी आंबेडकरी विचारवंत शिकलेत आता…
यांना कापायचं कोणाला हेच ठाऊक नसल्याने गावातला कुणबी,तेली,माळी हाच एक नंबरचा दुष्मन वाटतो तर
स्वतःला उच्चवर्णीय समजणारे कुणबी जगन्नाथातच लिन होऊन गेलेत….जयंतीला मोठा भगवा झेंडा चौकात लावण्याशिवाय दुसरं काम नाही…
सख्या भावाच्या शेताच्या बांधावरच्या झगळ्यात बुद्धाची अहिंसा लोप पावते तेंव्हा भीम के लखते जिगर आधे इधर आधे उधर म्हणून वरच्या लेव्हलवरचे लीडर ज्यांच्या बायका बामन आहेत ते भीमाला गहाण ठेवतात.
गिनेचुने जे अनुयायी समजतात त्यांचं भक्तात रूपांतर झालं,जयंत्या,पुण्यतिथ्याना उत्सवाचं स्वरूप आलं,कधीकाळी शांत दिसणारा राम आता उग्र झाला कोणी केला त्यावर ऑब्जेकॅशन आमचं नसतच कारण कोण केला,कशासाठी केला हेच माहीत नाही.
ते फासे फेकतात धर्माचे,जातीचे त्यात अलगद फसतो आम्ही, बुद्धविहारात कुणबी,तेली,माळी जात नाही आणि महारांनी मंदिरात जाण्याचा प्रश्नच येत नाही….
शिवजयंतीला डिजेवर आम्ही नाचलो,भीमजयंतीला तुम्ही नाचताय…
काय फरक पडतो….कोणते विचार,कसले विचार
जिंदगी जगताना संध्याकाळची चूल पेटविण्याचा प्रश्न असताना हक्क,अधिकार कोण मागतो…. आणि सत्ता नालायकाच्या हाती असताना तिचा तख्तापालट तरी नक्की कोण करतो… विचारच तळागाळात अजून गेले नाहीत आणि अशावेळेस चार कविता विद्रोहाच्या जोरजोरात बोंबल्ल्याने विद्रोह होईल का? जोपर्यंत आग घरापर्यंत येत नाही तोपर्यंत शेजारीही विझवायला जात नाही अशा युगात क्रांतीची मशाल पेटेल?