ठेचा लागल्याशिवाय

[tta_listen_btn]


■आयुष्यात जीवन जगताना ठेचा लागल्याशिवाय माणूस सुधरत नाही असं म्हटल्या जातं,ठेचा आणि चुका ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल.ठेचा परिस्थितीने लागल्या जातात तर चुका करणे हा मानवी स्वभाव असतो परंतु दोन्ही बाबतीत माणसाने योग्य पावले उचलली नाही तर त्या ठेचा,त्या चुका माणसाला माणसातून उठविल्याशिवाय राहत नाही आणि गंमत म्हणजे माणसाच्या हातून चूक झाल्याशिवाय ठेचा सुद्धा लागत नाही.
मी जगतांना स्वतः नेहमी एक मुद्दा ठाम ठेवतो,तो म्हणजे कोणताही प्रश्न असो त्याला उत्तर असतच फक्त ते शोधण्याची ताकद स्वतःमध्ये असली पाहिजे आणि तीच तंतोतंत गोष्ट चुका आणि ठेचांसाठीही लागू पडते! प्रत्येक ठेच माणसाला काहींना का शिकवत असते तर चूक माणसाला सुधारण्याची संधी देते पण चुका मान्य करण्याचा आणि त्या दुरुस्त करून घेण्याचा मोठेपणा आणि ठेच लागल्यानंतर मनाला होणारा पश्चाताप अंगी असायला हवा.एकदा घडलेली चूक सुधरवता येते,एका ठेचेनंतर दुसरी ठेच लागू नये म्हणून पश्चात्ताप झाला तर पुढच्या ठेचाही लागणार नाही याची काळजीही घेता येते पण मानवी अहंकार जो मनावर ताबा घेऊन असतो तो हे सगळं होऊ देत नाही.प्रकृती,निसर्ग प्रत्येकाला संधी देत असतो,आपल्या हातून झालेल्या चुका पुन्हा होऊ देऊ नकोस असं वारंवार कोणत्या ना कोणत्या माध्यमाने सांगत असतो.त्या संधिकडे काणाडोळा केला की पहिल्या चुकीपेक्षा मोठी चूक आपल्या हातून घडते आणि होत्याचं नव्हतं व्हायला काही क्षणही अपुरे पडून जातात.
■मी याठिकाणी चुका आणि ठेचा यांची काही उदाहरणं आपणा सर्वांसमोर ठेऊ इच्छितो जेणेकरून लहान लहान चुकांपासूनही आपल्याला काही शिकवण घेण्यासारखी असते ती माहीत व्हावी.मी आयुष्यात कोणत्याही कामाला कधीच दुय्यम समजलो नाही,माझं साधं सोपं तत्वज्ञान होतं,मला जगायचं आहे,परिस्थिती प्रतिकूल आहे आणि दोन घास पोटात टाकण्यासाठी अन्नाची गरज आहे,अशावेळेस पैसा महत्वाचा असतो आणि तो लोकांची चहाची कप धुऊन मिळत असेल तर त्यात गैर काय? तो स्वाभिमानाने मिळविलेला पैसा मला दोन वेळचे अन्न देत असेल तर त्यात वाईट काय?त्यात आपला अहंकार दुखवेल अशी गोष्ट काय असते? मी कम्पनीत लेबर म्हणून कामाला लागलो तेंव्हाची ही लहानशी गोष्ट आहे,प्रसाद नावाचे साहेब प्लांटचे मॅनेजर होते,खूप रॉयल माणूस! ते केबिनमध्ये बसले की कधी कधी मला चहा करायला लावायचे,वयाने वडिलांच्या वयाचे असल्याने त्यांची ऑर्डर मुलाप्रमाणे मी फॉलो करायचो,त्या दिवशी त्यांनी सहज प्यायला पाणी मागितलं,एका काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेलो,ऐनवेळेस ग्लास देताना तो हातातून सुटला अन ग्लास खाली पडून फुटला! ते रागाने ओरडले “इडियट कैसे छुटा ग्लास,एक काम ढंगसे नही होता तुमसे” असे म्हणत “चल भग यहांसे,तुमको पनीशमेन्ट तो मिलनी चाहीये”त्यांनी अकाउंटंटला आवाज देत “इसके सॅलरीसे ये ग्लासका पैसा काट देना” म्हणत फर्मान सोडलं.त्यावेळेला दिवसाची रोजी 65 रुपये तर 1700 रुपये माझा महिन्याचा पगार असायचा,माझ्या हातून ग्लास पडल्याचा पश्चाताप तर झालाच पण इवल्याशा पगारातून पैसे सुद्धा कापले जाणार याचे खूप दुःख झाले,माझ्या त्या दिवसात तो पगार म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न होता.त्या फुटलेल्या ग्लाससाठी मनात भयंकर पश्चाताप सुरू होता, दुसऱ्या दिवशी बाजारातून तसाच हुबेहूब ग्लास 7 रुपयाला विकत घेतला आणि कम्पनीत दाखल झालो.साहेब केबिनमध्ये बसले होते,तो ग्लास घेऊन साहेबांकडे गेलो,त्यांना तो ग्लास दाखवत म्हणालो “सर कल मेरे हातसे जो ग्लास फुटा था, उसके बदलेमे मैने ये ग्लास खरीदके लाया” साहेब माझ्याकडे एकटक पाहत राहिले,”कौन बोला खरीदनेके लिये,मैने बोला था तुमको? तुम्हारा पेमेंट कितना और तुम्हारे हातोंसे रोज कुछ टुटेगा तो तुम रोज क्या वही चीज खरीदके लावोगे” मी स्तब्ध होतो, “सर,मेरे हातसे गलती हुयी तो जिम्मेदार तो मैं ही हुवा ना सर,ऐसी गलती दूबारा नही होगी सर” साहेबांनी आश्चर्यकारक नजरेने पाहिलं आणि म्हणाले “पारखी,तुझे तेरे गलती का अहसास हुवा यही मेरे लिये बडी बात है,तू दूबारा ऐसी गलती कभी नही करेंगा,यह विश्वास है! आणि त्यांचा तोच विश्वास माझ्या हातून तुटणार नाही याची काळजी सतत घेत राहिलो,चूक माझी होती हे मान्य केलं आणि आयुष्यात तशीच चूक पुन्हा होणार नाही याची तसदी घेतली,चूक मी केली तर त्या चुकीची सजा म्हणजे तो ग्लास भरून देणे ही माझीच जवाबदारी होती.त्यांनी जो विश्वास त्यांनी त्या छोट्याशा गोष्टीतून माझ्यावर दाखवला तो कायम मला पुढे जाण्यास निर्णायक ठरला.त्यांनी पुन्हा दुसरी गोष्ट ही शिकवली ऑफिसमध्ये एक विंचू निघाला होता,त्यांनी त्यास पायाने तुळविण्यास सांगितलं आणि म्हणाले “जहर उगलणेवालोन्को पैरसे कुचल देना चाहीये क्योंकी वैसे प्राणी,वैसे लोग किसिके दोस्त नही होते” किती लहान गोष्ट पण किती खोलवर मनात घाव घालणारी.अशा लहान सहान गोष्टींपासून जीवनात खूप धडे मिळाले आणि ते समर्थपणे मी अमलात देखील आणले.
■दुसरी गोष्ट माझ्या भाच्याची! मला बहीण एकच,भाच्याला चुकीच्या संगतीने दारू पिण्याची सवय लागली,ती सवय मोडून काढण्यासाठी बहिणीने,आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली पण ती सवय दुर्दैवाने त्याच्यापासून सोडवता आली नाही,थोडी थोडी म्हणता तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला,एक दिवस दारूच्या नशेमध्ये त्याचा खूप मोठा अपघात झाला,पाय दोन ठिकाणाहून फ्रॅक्चर झाला आणि डोक्याला खूप मार लागला.त्याला आयसीयूत भरती केले,रोज सोबत बसून पिणारे त्याचे मित्र ढुंकूनही त्याला पाहायला आले नाही,साधे अपघात स्थळावरून त्याला उचलायलाही कोणी आले नाही,दारू पिणारा पितो पण घरच्यांची कशी होरपळ होते याच्याशी त्याला काही देणेघेणे नसते,बहीण आकांताने रडत होती,बाप आसवं गाळत होता,अशा वेळेस आई बाप वगळता मदतीला कोणी येत नाही,परिस्थिती बेताचीच असल्याने दोन अडीच लाख ऑपरेशन साठी कुठून आणायचे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला,शेवटी दोन एकर शेती विकावी लागली,पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी पोटाला अन्न देणारी भाकर विकताना त्या माऊलीस काय वाटले असावे,दारू माणसाला कुठल्या स्तरावर नेते याचे जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होते.भाचा म्हणून त्याचे आयुष्य सुखाचे व्हावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले होते,तो शिक्षणात कमी होता म्हणून मामा या नात्याने आमच्या मोठ्या भावाने स्वतःचे पैसे टाकून त्याला धंद्यासाठी गाडी घेऊन दिली होती पण त्याने आमचं न ऐकण्यानं आणि दारूच्या संगतीने स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतलं होतं जे कोणत्याही माध्यमातून भरून निघणं कठीण होतं. पण मी आधीच म्हटल्याप्रमानं प्रकृती,निसर्ग प्रत्येकाला एक संधी देत असतो,एवढ्या मोठ्या आपघातातूनही तो बचावला,सही सलामत वाचला! ही ठेच होती! पण त्याने ही चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही,आई वडिलांचा, कुटुंबाचा विचार केला नाही,त्या चुकीला पूर्णपणे दुर्लक्ष केले,पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याने तीच चूक पुन्हा केली,मित्रांच्या संगतीने पुन्हा एकच प्याला सुरू केला,शेवटी व्हायचं तेच झालं…तो सगळ्यांना सोडून एकटाच जग सोडून निघून गेला,आपल्या कर्माची फळं त्याने स्वतःच चाखली,आई वडील कोणाचाच त्याने कसलाही विचार केला नाही,जिवंतपणी आई वडिलांच्या डोळ्यात कायम अश्रू ओघळत ठेवणारा मेल्यावरही अश्रूच ठेवून गेला.
■आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणणारा मुलगा असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही,चुका माणसाच्याच हातून घडत असतात पण त्या वेळीच सुधारल्या पाहिजे तरच आपण आपलं कुटुंब सुखा समाधानीने जगू शकतो,ज्याच्या हातून चूक घडत नाही असा माणूस शोधून सापडणे नाही पण त्या चुका दुरुस्त करून हिमतीने,आनंदाने जगणारे लोकही याच जगात आहेत,एकामेकांचा आधार घेतल्याशिवाय जीवन नाही आणि एकमेकांचे चांगले गुण अंगिकारण्यात कोणता गुन्हा नाही.जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जग आहे,मग त्या आयुष्याला निरर्थक अर्थ देण्यात काय अर्थ आहे….
●सगळ्या चुका निस्तारून जगात टिकायचं असेल तर केवळ पारलेजि बिस्कीट कडे नजर फिरवा,पारले जीच्या मालकाने पुड्याचे वजन कमी करत नेले पण भाव मात्र तोच ठेवला याला म्हणतात परिस्थितीवर मात करून टिकून राहणं,कॅडबरीचे चॉकलेट पाहिले,खाल्ले असेल तर लक्षात येईल,आधी चॉकलेट सोनेरी कागदात गुंडाळून येत असे,मालकाला चूक कळली,येणारा नफा,ह्या कागदाने कमी होत होता,तो कागदच काढून फेकला,अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात ज्या काही चुका घडल्या त्या चुका दुरुस्त करून नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आयुष्य सुंदर आहे…..

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी