[tta_listen_btn]
◾मी एक हिंदू म्हणून माझ्या धर्मातील ग्रंथांचा जेंव्हा अभ्यास करण्याचे ठरवतो त्यावेळी माझ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, पुराण,मनुस्मृती,रामायण,महाभारत,भगवतगीता अशा कथा किंवा अशाच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो,सर्व सामान्य स्वतःला हिंदू समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही हेच करावे लागते.कित्येक लोकांना धर्मावर बोललेलं आवडत नाही किंवा कोणताही अभ्यास नसल्याने राईचा पर्वत करून विरोध करत बसतात परंतु हे ग्रंथ खरेच आपल्या जगण्याचा आधार आहेत का? हे ग्रंथ आपण जे जीवन जगतो त्याला उच्च दर्जाचे सामाजिक जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करतात का?ते मानवाला चांगला मार्ग दाखवतात का? या गोष्टींचा कधी विचार करत नाहीत.या साऱ्या प्रश्नांचे उत्तर आपण या ग्रंथाची पडताडणी जसे करत जाऊ तस तसे आपल्याला खरे काय ते कळायला लागते.एखाद्या धर्माच्या ग्रंथात सामान्य माणसाने चांगले विचार,चांगले आचरण आत्मसात करावे,सत्याचा मार्ग दाखवावा हे अपेक्षित असते परंतु हे जर काहीच त्या धर्मग्रंथात नसेल तर ते ग्रंथ धर्माचे ग्रंथ म्हणून मान्य करता येईल का? आता बरेच जण म्हणतील हा नसता उद्योग कशासाठी,नसली उठाठेव आपल्याच धर्मावर टिका टिप्पणी कशासाठी? तर त्यांना सांगू इच्छितो की मी जे काही लिहिणार आहे ती टीका टिप्पणी नव्हे तर आपल्याच धर्माची चिकित्सा करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मी जे काही लिहील ते माझ्या मनातले किंवा केवळ कोणाच्या भावना वैगेरे दुखावण्यासाठी लिहिणार नाहीये,जे काही लिहिणार आहे ते आपल्याच धर्मग्रंथात जे लिहिलं आहे त्याच गोष्टींच्या पुराव्याच्या आधारे लिहिणार आहे.माझ्या अगोदर आपल्या धर्माची चिकित्सा कोणी केली नाही असेही नाही,एखाद्या व्यक्तीला वाटले की असे काहीही कसे लिहिले असेल त्यांनी मी दिलेल्या पुराव्याचा शोध घ्यावा आणि सत्यता पडताडून बघावी.मी हिंदू म्हणून माझ्या धर्माचा अभ्यास आणि चिकित्सा करण्याचा मला पूर्णतः अधिकार आहे.दुसऱ्या धर्मावर,दुसऱ्या धर्मात डोकावून बघण्या अगोदर मला माझ्या धर्मात जी घाण आहे ती स्वछ करणे जरुरी वाटते,आज आपण जो धर्म अंगिकारला आहे तो मुळात सिंधू संस्कृती आणि द्रवीळ संस्कृतीतून आलेला आहे परंतु वैदिक संस्कृतीचे आक्रमण झाल्यानंतर आपली संस्कृती लोप पावून प्रस्तुत हिंदू धर्मावर वैदिक संस्कृतीचा पगडा बसलेला आहे नव्हे तो बसविण्यात आलेला आहे.वैदिक चालीरीती,परंपरा यांची मिसळ आपल्या धर्मात केल्या गेली आहे,आपली संस्कृती शेती संस्कृती होती,आम्ही निसर्ग पूजक होतो,गोपालक होतो,परंतु यज्ञात गायी कापणारे,घोडे मारून मांस खाणाऱ्यानी आपली संस्कृती उध्वस्त केली.
◾आज या ठिकाणी मी स्त्रियांचे कथित हिंदू धर्मातील स्थान हिंदू धर्मातीलच ग्रंथांच्या आधारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्याअगोदर हिंदुधर्मातील धार्मिक उतरंड जाणून घेणे महत्वाचे आहे.वैदिक हिंदू धर्म हा वर्णव्यवसस्थेच्या आधारावर उभारलेला धर्म होता वा आत्ताही अदृश्य स्थितीत ही मांडणी कार्यरत आहे. ही वर्णव्यवस्था हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथापैकी एक ऋग्वेदात आपणास मांडलेली दिसून येते.
◾ऋग्वेदातील दहाव्या भागाच्या 90 व्या स्तोत्राचे नाव पुरुषसूक्त आहे. यजुर्वेदातही पुरुषसुक्त दिसून येते. दोन्ही वेदांच्या मंत्रांमध्ये केवळ अनुक्रमांकाचा फरक आहे. पुरुषसूक्ताला वेदांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे स्तोत्र वर्ण पद्धतीचा वैदिक आधार मानले जाते.चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीचे वर्णन ऋग्वेदातील पुरुषसूक्ताच्या 12 व्या मंत्रात पुढीलप्रमाणे आढळते.
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
उरु तदस्य यादवैश्य पदभयम शूद्र अजयत.
(ऋग्वेद 10-90-12)
याचा अर्थ ब्राह्मण रूप हे परम परमेश्वराचे मुख आहे,म्हणजेच ब्राम्हणांचा जन्म हा परमेश्वराच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहूंपासून, वैश्य मांडीपासून तर शूद्रांचा जन्म परमेश्वराच्या पायापासून झाला.
मनुने या मंत्राच्या आधारे मनुस्मृतीमध्ये खालीलप्रमाणे लिहिले आहे:
लोकानां तु विवृद्ध्यर्थ मुखबाहूरुपादतः ॥
ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत् ।।1-3 ॥
म्हणजेच, महाप्रजापती ब्रह्मांनी, जगाच्या वाढीसाठी, प्रजोत्पादन केले: त्याच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांडीपासून वैश्य आणि पायातून शूद्रांना जन्म दिला.
◾आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ती अशी की हे चारही वर्ण हिंदुधर्माचे अविभाज्य अंग आहेत,ब्राम्हण हा मुखातून जन्मला म्हणजे त्याला उच्च दर्जा प्राप्त झालेला आहे,त्याच्या खालोखाल क्षत्रिय आणि व्यापार करणारा वैश्य याचाही उच्च धर्मीयांमध्ये समावेश केलेला आहे मग शूद्रानेच असे कोणते पाप केले होते की यांची वर्णी वरील तीनही उच्चवर्णीयांची सेवा करण्यासाठी लागावी,सहज सोप्पी समजून घ्यायची गोष्ट ती अशी की ही शूद्र मंडळी ही या भूभागातली मुलनिवासी,द्रवीळ,आदिवासी होती आणि उच्चवर्णीय मंडळी ही बाहेरून आलेली आक्रमनधारी होती,त्यांनी मुलनिवासी लोकांचे हक्क,अधिकार हिसकावून आपली संस्कृती लादली,शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला,आपले नियम आमलात आणले,आपले कायदे अमलात आणले! काहीच हाती न उरलेला शूद्र समाज आपला वैभवशाली इतिहास सुद्धा लिहू शकला नाही.यापलीकडेही आजचा ओबीसी समाज,तेली,माळी,कुणबी समाज आपण शुद्रच होतो हे मान्य करायला तयार नसतो,शूद्र म्हणजे केवळ महार,मांग अशीच धारणा या समाजाची अजूनही आहे,कुणबी अजूनही इतर समाजाच्या स्वतःला वर समजतो,स्वतःला उच्च समजतो.इतक्या पिढ्या आमच्या होऊन गेल्यानंतरही आमच्या पिढीचा इतिहास आपल्याला ठाऊक नसतो की तो इतिहास जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही कोणी करताना दिसून येत नाही.उच्चवर्णीय लोक ओबीसी,कुणबी,माळी,तेली अशा तत्सम समाजातील लोकांना छूटमुट पद देऊन त्यांना मानसिक आणि शारीरिक गुलाम करून सोडतात जे त्यांना त्यांच्या पूर्ण हयातीत माहीत पडत नाही.हेतुपुरस्सर मुसलमान आणि हिंदूंचा DNA सारखाच म्हणणाऱ्यांना आतून माहीत असते त्यांचा स्वतःचा आणि मुसलमानांचा DNA एक आहे,भारतातील मूळ लोकांचा DNA त्यांच्या DNA शी जुळू शकत नाही,स्वतः वैदिक असतानाही ते स्वतःला हिंदू म्हणवून आम्ही स्वतःला हिंदू समजणाऱ्यांच्या भावना उद्दपित करून आपला स्वार्थ साधतात.
◾स्वतःला हिंदू म्हणवून घेत असताना आपल्या धर्मात स्त्रियांचे स्थान नेमके कसे आहे आणि ते कुठे दर्शविले आहे हे आपल्याला कुठून मिळेल तर ते आपल्याच धर्मग्रंथात आपणास शोधावे लागेल.मी शोधण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला कथा,कादंबऱ्याचा आधार घेणार नाही,अशा कित्येक लेखकांनी आपल्या कल्पना शक्तीने कित्येक स्त्री पात्रे रंगवून सोडली आहेत ज्यांनी सत्याचा वापर केलाच नाही,मी एखाद्या अमुक तमुक स्त्रीची व्यक्तिरेखा या ठिकाणी मांडणार नाही,मला स्त्रीचे आपल्या धर्मातील स्थान काय हे शोधायचे आहे.
◾स्त्रियांच्या अधोगतीचे उगमस्थान जर शोधायचे असेल तर ते सर्वप्रथम चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आपल्याला मिळेल,चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित होता. चातुर्वर्णाच्या पद्धतीनुसार, फक्त पहिले तीन वर्ग ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना शिक्षणाचा हक्क होता. शूद्रांना शिक्षण देण्यास मनाई होती. या चातुर्वर्णाच्या नियमांनी केवळ शूद्रांना शिक्षित होण्यास प्रतिबंध केला नाही, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या स्त्रियांसह सर्व स्त्रियांना शिक्षित होण्यास मनाई केली होती.स्कंद,पुराण असो वा वेद असोत प्रत्येक ग्रंथात स्त्री ही केवळ उपभोगण्याची वस्तू आहे हेच दर्शविण्यात आले आहे,स्त्रीला कोणतेच अधिकार आपल्या कोणत्याही धार्मिक ग्रंथात दिल्याचे आढळून येत नाही,स्त्रीचा जन्म म्हणजे केवळ भोगण्यासाठी झालेली निर्मिती आहे,पुढे नमूद केलेली ही काही उदाहरणे आहेत जी वैदिक हिंदू धर्माची गीता म्हणविणाऱ्या मनुस्मृतीमधील आहेत,आपण ती वाचल्यास आपणासही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
▪️व्यभिचार हा स्त्रियांचा स्वभाव आहे. (9/11)
▪️माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरुषाने एकांतात बसू नये. (2/15)
▪️ ज्यांना फक्त मुलीच झाल्या असतील, त्यांच्या मुलीशी लग्न करू नये. (3/8)
▪️पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहणे हाच तिचा स्वर्ग होय. (5/155)
▪️पती सदाचारशून्य असो, दुसऱ्या बाईवर प्रेम करत असो, विद्येने गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाने सतत सेवा करावी. (5/154)
▪️ स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये. (5/162)
▪️ पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे. (5/168)
▪️ स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत. त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो. पुरुष सुरुप की कुरूप कसाही असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्याचा भोग घेतात. (9/14)
▪️ पुरुषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलाशा उत्पन्न होणे, हा स्त्रीचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात. (9/15)
▪️ नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते. (9/46)
▪️ जर एखादी बाई तिच्या नातेवाईकांच्या मोठेपणाच्या घमेंडीत अथवा स्वतःच्या तोऱ्यात येऊन नवऱ्याशी नीट न वागेल, तर तिला भर चौकात कुत्र्यांना खायला दिले जावे. (7/381)
◾अशाप्रकारे आश्चर्यकारक आणि माणुसकीला काळिमा फासणारे नियम त्याकाळी चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कार्यरत होते,आजही सुप्तावस्थेत हेच नियम लागू करण्यासाठी काही लोकांची सतत धडपड सुरू असते,आजच्या घडीला एखाद्या हिंदू धर्माचे आचरण करणाऱ्या माणसाला हे वरील विचार मान्य होतील काय,यापेक्षाही हीन दर्जाचे विचार आपणास वेद, उपनिषदे,पुराण यामध्ये सापडतील,वेद आणि पुराण आपण वाचायला घेतले तर एखादे लैंगिक कथेचे पुस्तक वाचत आहोत असा भास होईल.व्यभिचाराने काठोकाठ भरलेल्या कथा हे ग्रंथ एखाद्या धर्माचे ग्रंथ कसे काय होऊ शकतील असा प्रश्न सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा पडल्यावाचून राहणार नाही.
संदर्भ: ऋग्वेद,मनुस्मृती,स्कंद पुराण
(क्रमशः) दुसरा भाग पुढील पोष्टमध्ये.