[tta_listen_btn]
इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार माणसाने कधीच करू नये,व्यक्ती तितक्या नजरा असतात,लोकांना समोरचा माणूस आपल्या मताचा,आपल्या विचाराचा असावा हीच अपेक्षा असते,लोकांच्या नजरेत आपण काय आहोत आणि त्यांना जसं हवं तसही खरं तर वागण्याची गरज नसते.प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या दृष्टिनुसार आपल्याविषयी त्याच्याकडे एक विशिष्ट असं मत बनलेलं असतं.आपण जे वागतो,बोलतो यात आपण कधीच चुकत नाही अशी प्रत्येकाची ठाम भूमिका असते,हीच भूमिका समोरच्या माणसावर तो लादू इच्छितो आणि समोरच्या माणसाने त्याच्या भूमिकेवर विपरीत भूमिका घेतली तर त्या माणसाचे मत काही क्षणात बदलत असते.
मतपरिवर्तन कसे ठरते याचे सोपे उदाहरण याठिकाणी मी देऊ इच्छितो,आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार काळाचे काही प्रकार आपण ठरवलेले आहेत,सतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग आणि आत्ताच्या घडीला सुरू असलेले कलियुग! प्रत्येक युगात काही तरी कथा घडलेल्या आहेत असे आपला हिंदुधर्म सांगतो,तसं पाहायला गेलं तर हिंदू धर्म हा काही धर्म नाही,हिंदू धर्मात देवाला पूजण्यापेक्षा हिंदू धर्म माणसाच्या जगण्यास पूरक असे मार्गदर्शन करत नाही,बाप हिंदू होता म्हणून मुलगा हिंदू झाला,बाप देव पूजत होता म्हणून मुलानेही देव पुजले यापलीकडे हिंदू धर्माची फार काही चिकित्सा कोणी करण्याच्या भानगळीत पडत नाही,रोजच्या जीवनात धर्माची माणसाला गरज पडत नाही. हिंदू ही पर्शियन लोकांनी दिलेली एक शिवी आहे हे ही बहुतेक जणांना माहिती नसतं,हिंदू हा पारशी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो चोर! पण आपल्याला माहीतच नसल्याने गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणत म्हणजे आम्ही चोर आहोत म्हणत अख्या जगात दंडोरा पिटत बसतो!एवढेच नाही तर हिंदू हा शब्द हिंदू धर्माचे जे मानलेले ग्रंथ आहेत त्यांच्यातही या शब्दाचा उल्लेख आपणास आढळत नाही.देव आणि धर्माच्या नावावर लाखो,करोडोंचा बिझनेस मात्र अविरत करता येतो,धर्माच्या नावावर कित्येक कत्तली,नरसंहार घडवून घडवून आणता येतात, प्रत्येक धर्मात ठेकेदार निर्माण झालेत ते त्या त्या धर्मातील लोकांना हे सर्व करण्यास भाग पाडतात कारण त्यांना हा व्यवसाय अविरत सुरू ठेवायचा असतो, देव आणि धर्म यांची व्याख्या आणि व्याप्ती अशा लहानशा लेखात स्पष्ट करणे शक्य नाही.तसेच मला नेहमी एक प्रश्न पडतो की जर हे कलियुग आहे आणि याच कलियुगात अगदी काहीच वर्षांअगोदर साईबाबा,गजानन महाराज असे बाबा निर्माण झालेत जे लोकांना चमत्कार करून दाखवत होते,लोकांचे दुःख दूर करण्याचे काम करत होते,तसे बाबा आज का निर्माण होत नाही,काय आज लोकांकडे दुःख नाही,लोकं आज सुखी संपन्न आहेत? आज असे चमत्कार आणि चमत्कार करणारे बाबा कुठे आहेत?,चला एकदा मानलं की हे जे बाबा झालेत ते देवाचे अवतार होते,अगदी शंभरेक वर्षांपूर्वी जन्मलेले असले तरी तर आज असे बाबा का निर्माण होत नाही?याच्या मागे खूप मोठे कारण आहे, शिक्षणाचे! त्यावेळेसारखी लोकं आज अशिक्षित नाहीत,आज कोणी अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नाही, सत्य साईबाबांसारखे एखादे निपजलेच तर त्याच्या चमत्कारांची ऐशी तैशी करणारी माणसे आज आहेत, हे एक उदाहरण म्हणून आपणासमोर ठेवले आहे.
आता थोडा विचार करूया, वरील जे काही भाष्य मी लिहिलं त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील,तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदललेला असेल कारण मी तुमची आस्था असणाऱ्या विषयावर बोललो,त्या आस्था असणाऱ्या गोष्टीतल्या चुकांवर बोललो पण हीच गोष्ट तुम्हाला माझ्याबद्दल दोन मते बनविण्यास भाग पाडतील, काही अशा प्रकारची लोकं माझ्याविषयी असे मत प्रकट करतील की हा तर हिंदुधर्माचा विरोधी आहे,धर्मावर बोलतो म्हणजे काय! हा तर खूप शहाणा आहे,आपल्याच धर्माची निंदानालस्ती करतोय! याला कोण अधिकार दिला आमच्या धर्मावर बोलण्याचा वैगेरे वैगेरे बोलून,शिव्या देऊन शांत होतील,परंतु त्याच वेळी त्यांच्या मनात माझ्या विषयी असलेली चांगल्या माणसाची प्रतिमा तडकलेली असेल,हा माणूस आपल्या काही कामाचा नाही हे ते गृहीत धरतील. मग त्याच वेळी मी कोणतीही चांगली कामे करू द्या ते त्या कामांना कधीच चांगली म्हणणार नाही आणि अशी माणसे माझ्यापासून दूर जातील कारण मी जे काही लिहिलं हे त्यांच्या मतानुसार लिहिलं नाही,त्यांना जे अपेक्षित होतं ते मी लिहिलं नाही.अशावेळेस चिकित्सा,तर्क,अभ्यास करणारी लोकं मात्र माझ्या सोबतीला येतील,संख्या कमी असेल पण ते जे सत्य त्या बाजूने उभे राहतील.समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोलून जी माणसे दुसरावली गेली त्या माणसांना सत्य एकदिवस स्वीकारावेच लागते,त्यासाठी काही काळ जातो,वेळ जाते.
तर हा लेख अशासाठी होता की कोण काय म्हणतो यापेक्षा आपण काय करतो,कसे वागतो यावर लोकं आपल्याविषयी मत ठरवीत असतात,म्हणून आपल्या चिकित्सक बुद्धीला पटणारे,सत्य असत्याचा सारासार विचार करून मत मांडणे मला गरजेचे वाटते.माझ्या मतांवर कोण काय म्हणतो हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे.मी चुकीचा नाही हे कोणाला समजविण्याच्या भानगळीत पडू नये,जर मी खरा आहे.