[tta_listen_btn]
🔸एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा आयुष्यात अनेक प्रकारची माणसे आपल्याला भेटत असतात,अशीही माणसे भेटतात जी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधी आलेलीच नसतात,व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे ठरलेलं असतं आणि त्यामुळे कोण माणूस कसा हे न पाहता आपण बरेचदा मैत्रीच्या धाग्यात नकळत गोवल्या जात असतो! कधी समोरच्याकडून नकळत अपेक्षा ठेवून बसतो तर नकळत समोरच्या माणसाकडून दगाही मिळत असतो.कित्येकदा गैरसमज आणि दुसऱ्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवून चांगल्या माणसांनाही दूर करतो तर एखाद्या वाईट माणसाबद्दल एखाद्याने चांगले जरी जे खोटे असेल ते ऐकून आपण वाईट प्रवृत्तींनाही जवळ करत असतो.
परंतु जीवन जगण्याचं साधं सोपं उदाहरण अवलंबिले तर आपण दुःखी कधीच होणार नाही याची मला पूर्ण खात्री वाटते.
🔹आपण मत कसे बनवतो?
आपण एखाद्या माणसाबद्दल कसे मत बनवतो? ते प्रामुख्याने पुढील गोष्टीवरून ठरत असते.
१.व्यक्तीच्या विचारसरणी
२.व्यक्तीच्या राहणीमानाहून
३.व्यक्तीच्या चारित्र्याहून.
४.व्यक्तीच्या इतिहासावरून
समोरच्या व्यक्तीविषयी जे काही मत आपण ठरवतो ते एकतर आपल्या स्वतःच्या अनुभवातून किंवा दुसऱ्या लोकांच्या सांगण्यावरून ठरत असतं.स्वतःच्या अनुभवातून जे काही मिळतं ते बहुधा सत्य असतं कारण समोरच्या व्यक्तीचा स्वभाव,आचार,विचार जवळून अनुभवलेलं असतं,त्या व्यक्तीचे बरेवाईट गुणदोष आपल्याला माहीत होत असतात तर दुसऱ्या प्रकारची व्यक्ती समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय सांगेल यावर विश्वास ठेवनं कठीण असतं.ते त्याच्या त्या माणसाशी असलेल्या संबंधातून तो आपले मत इतरांजवळ व्यक्त करत असतो,त्या माणसाचे संबंध समोरच्या माणसाशी चांगले असतील तर तो इतरांना हा माणूस खूप चांगला आहे म्हणून सांगत असतो परंतु त्याचे संबंध वाईट असतील तर समोरचा माणूस कसा वाईट आहे हे इतरांकडे पोटतीळकीने मांडत सुटतो,तो व्यक्ती वाईट माणसाच्या वाईट चुकावरही पांघरून घालून तो व्यक्ती कसा चांगला आहे हे पटवून देण्यात वेळ घालवेल कारण तो या व्यक्तीचा मित्र आहे,उदाहरणादाखल समजा अनिकेत नावाचा एक युवक आहे,त्याचे काम खूप चांगले आहे,तो व्यक्तीही खूप चांगला आहे परंतु मला तो पटत नाही किंवा तो समाजात चांगला नावारूपास असेल किंवा त्यांच्यामुळे माझ्या प्रसिद्धीस किंवा मला मोठे होण्यास अडथडे येत असतील तर साहजिक आहे मी अनिकेतला चांगला माणूस म्हणून कधीच म्हणणार नाही, अनिकेत चांगला आहे हे लोकांसमोर येऊ नये म्हणून त्याच्याविषयी मी लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करेन,त्याच्याविषयी ऐकीव खोट्या गोष्टी समाजात पेरेन आणि आपल्या समाजात त्याला कशाप्रकारे खाली खेचता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि आपला समाज कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता अनिकेत वाईटच आहे यावर डोळे झाकून विश्वास ठेवून देईल. मग त्या ठिकाणी मी कितीही वाईट माणूस असेल तरी समाज मला एक प्रश्नही विचारण्याची हिम्मत करणार नाही कारण मी नंगा तर आहेच पण नंगेको खुदा डरे अशी म्हणही समाजात रूढ असते!
🔸कित्येकवेळेला समोरच्या माणसाचा आपल्याशी काही एक संबंध नसतो,त्याचे खाजगी आयुष्य माहीत नसते तरी देखील आपण त्या माणसाच्या गोष्टीबद्दल नको तितके नाक खुपसत असतो,त्याच्याबद्दल एक तिरस्काराची भावना जोपासत असतो कारण त्या माणसाचे विचार वा आचार कुठेतरी आपल्या पचनी पडलेले नसतात! पण खरच समोरच्या माणसाला बोलण्याचा हक्क आपल्याला असतो का? हा अधिकार नेमका देतो तरी कोण? आणि समोरच्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण स्वतःचे तरी आत्मपरीक्षण करत असतो का? सामाजिक जीवन जगत असताना आपले चारित्र्य तेवढेच स्वच्छ पाहिजे जेवढे आपण समोरच्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असू,आपले चारित्र्य संपन्न नसेल तर लोकं फार काळ विश्वास ठेवत नाही.
――–――――――–―――――――
✍️उमेश पारखी
――–――――――–―――――――
🔹एक उदाहरण प्रकर्षाने देऊ इच्छितो एकाने एकावर आरोप केला असे म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्या जीवनातून उठविण्यासाठी लफडयांचे आरोप केले,बदनाम करण्यासाठी प्रत्येक ग्रुपवर फिल्डिंग लावली,त्याला वारंवार टार्गेट करण्यात आले पण वास्तविकता ज्यांनी आरोप लावले तेही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नव्हते,ज्याच्यावर आरोप केले अगदी त्याच प्रकारचे आरोप आरोप लावणाऱ्यांचे सुद्धा होते.एवढेच नाही तर ज्या लोकांनी आरोप लावले तेही तशाच प्रकरणात गुंतलेले होते.
याचा अर्थ असा घेता येईल की माणूस स्वतःच्या कितीही मोठ्या चुका का असोत त्या झाकून समोरच्या माणसाच्या चुका काढण्यात व्यस्त असतो.मी स्वतः काय आहे,मी किती स्वच्छ आहे हे स्वतःला कोणीच पडताडून पाहत नाही.
🔸मग मार्ग काय?
जो जसा आहे तसा त्याच्या परिस्थितीवर सोडून देणे हा उत्तम मार्ग आहे,एखाद्याचे आपल्यास चांगले करता येत नसेल तर त्याचे कमीत कमी वाईट करण्याचा अधिकार आपल्याला कोणीच देत नसतो मग जो व्यक्ती आपल्याला वाईट वाटतो त्याच्याबद्दल विचार तरी का करावा,का काड्या कराव्या! जगू द्यावे त्याला त्याच्या परीने! वाईट कर्म असेल तर त्याचे तोच भरेल,आपण न्यायनिवाडा करणारे नेमके कोण असतो.जो माणूस आपल्याला आवडतच नाही त्याच्याबद्दल बोलून,त्याच्याबद्दल लिहून आपण स्वतःचा बहुमूल्य वेळ का खर्ची घालवावा.का मनस्ताप करून घ्यावा.दुसऱ्याकडे एक बोट दाखविण्या अगोदर स्वतःच्या दिशेने चार बोटे असतात,म्हणजे आपण राजा हरिश्चंद्र नाही हे ते दर्शवित असतात मग हरिश्चंद्र बनण्याचा अट्टहास आपण उगाच कशासाठी करावा? चला स्वतःचे गुणदोष पाहू,स्वतःला जेवढे दुरुस्त करता येईल तेवढे करू,स्वतःच्या गुणदोषांवर चिंतन करू! दुसऱ्याला कमी जास्त लेखण्यापेक्षा स्वतःवर फोकस केला तर नाही चालणार का?