[tta_listen_btn]
आपण जे वागतो त्याचे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतात,आपण केलेली कामे,इतरांसाठी आपल्या हातून हेतुपुरस्सर वा जाणूनबुजून केलेले वाईट वा चांगले कृत्य हे भविष्यात आपली प्रतिमा कशी असेल हे ठरवीत असते,आपले वैयक्तिक जीवन त्याच बाबीवर बहरेल की उधडेल हे ठरत असते.आपण भूतकाळात केलेल्या कृत्याचे परिणाम प्रत्येकाला आपल्या भविष्यात हे भोगावेच लागतात,पुनर्जन्म वैगेरे अशी काही गोष्ट अख्या विश्वात नाही!माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात वावरत असताना समाजाने जे नीती नियम वर्षानुवर्षे ठरवून दिलेत त्या प्रमाणे माणसाच्या जीवनाची वाटचाल होत असते,समाजात कोणती कामे वाईट आणि कोणती कामे चांगली हे ठरलेलं आहे आणि त्यानुसार त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात,माणूस हा मुळातच स्वार्थी असतो,तो स्वतःसाठीच जगण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतो,मनुष्य स्वभावात काम,क्रोध,मद,मत्सर इत्यादी गोष्टी या सामान्य आहेत ज्या सामान्य माणसाला वश करता आल्या नाही,ज्यांनी या गोष्टीचा त्याग केला ते संतपदाला पोहचले एकतर बुद्धपदाला पोहचले,सामान्य माणूस हा त्या त्यागा पर्यंत कधी पोहचला नाही किंवा भविष्यातही पोहचू शकणार नाही.सामान्यतः जीवन जगताना काही साधारण गोष्टी माणूस करत असतो ज्यावर तो आपले भविष्य अधोरेखित करीत असतो,माणसाचे आयुष्य पैसा,धन कमावणे याच वर्तुळात संपून जाते तर पैशाच्या जोरावर सुख शोधण्यात माणसाची अख्खी हयात संपते परंतु तो कधीच समाधानी,संतुष्ट होत नाही,माणसाची ओढ कायमस्वरूपी सुख कसे मिळविता येईल याकडेच असते आणि इथूनच माणसाच्या माणूसपणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते.धन कमविण्याच्या शर्यतीत माणूस माणसाच्या दूर होत जातो.बहुतेक लोकांचा समज असतो की मेहनतीने कमविलेला पैसाच पचनी पडतो परंतु समाजात काळे धंदे करणारी माणसे खूप ऐश आरामात जगताना दिसतात,सामान्यतः पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो,तो पैसाच असतो पण ज्यावेळेस तो पैसा माणसाकडे कुठून येतो त्यावर त्याचा रंग ठरविल्या जातो.पैशाने जगातली सुख समृद्धी पायाशी लोळत ठेवता येते तर विनापैशाने माणसाचा जीवही जातो,माणूस अनुकरणप्रिय प्राणी असल्याने श्रीमंत लोकांचे अलिशान जगणे बघून आपणही त्यांच्यासारखे का जगू शकत नाही याचा सतत तो विचार करत असतो आणि याच हव्यासातून माणसाचे विचार बदलत जातात,त्याचे जगणे बदलत जाते आणि शेवटी तो वाममार्ग पत्करून पैसा कसा कमविता येईल इथपर्यंत येऊन पोहचतो.पैसा हा दोन नंबरचा किंवा एक नंबरचा असा काही असत नाही,माणसाच्या गरजा आणि शॉक पूर्ण करण्यासाठी हवा असतो तो पैसा! मग त्याचे उगमस्थान कुठलेही असो.
सर्वसाधारण माणूस जैसे थे स्थितीत एकरूप होऊन,समाधान मानून जगत असतो परंतु काहीच अशी माणसे निर्माण होतात की ती या जळणघळणीच्या अगदी विपरीत दिशेला जाऊन पैसा कमविताना दिसतात.त्यांच्यासाठी पैसा हा एक नंबरचा असत नाही की दोन नंबरचा! त्यांना हवा असतो तो केवळ पैसा! पैसा कुठून,कसा येईल यापलीकडे ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला प्राधान्य देत नसतात.पैसा माणसातले माणूसपण हिरावून नेते.पैसा नातं, प्रेम सर्वच संपुष्टात आणत असतो तर तोच पैसा चांगल्या गोष्टीत वापरला तर तो माणूस आपल्या हयातीत मान सन्मानास प्राप्त होतो.
आपण सभोवती साधारणतः दोन प्रकारची माणसे बघत असतो,एक जे आहे तेवढ्यात,आपल्या मेहनतीने येणाऱ्या पैशात सुखी राहतात,आपलं कुटुंब सांभाळून इतरांना मदत करतात. जगण्यासाठी आणि आपली पुढची पिढी जगेल एवढा धनसंचय करण्यासाठी योग्य मार्गाने अहोरात्र झटणारी असतात तर दुसऱ्या प्रकारची लोकं सतत पैशाच्या मागे धावणारी,दुसऱ्याला फसवून,लुबाळून धनसंपत्ती जमा करणारी असतात,अशा व्यक्तींना कोणतीच भीती नसते,ते कोणतेही काम ते वाईट का असेना ते करताना त्यांना आपण काही वाईट काम करतोय याचे काहीच वाटत नाही,अशी माणसे कोणालाच सोडत नाहीत ते रक्ताचे नातेवाईक असो,ओळखीचे मित्र असो की सामान्य जनता असो यांच्याकडून आपल्याला केवळ पैसा कसा काढता येईल एवढेच ते विचार करत असतात आणि हीच गोष्ट या दोन प्रकारच्या लोकांची प्रतिमा समाजमनात निर्माण करीत असते.चांगली कामे करणाऱ्यांना मानसिक संतुष्टी मिळते,मानसिकदृष्ट्या ते सुखी राहतात तर दुसऱ्या प्रकारातली लोकं कायम मरेपर्यंत असंतुष्ट जगतात,ते कधीच सुखी होत नाहीत नव्हे त्यांनी भूतकाळात केलेली कृत्ये त्यांना संतुष्टी मिळू देत नाही.
लिहायचं तर खूप आहे परंतु शेवटी दोन उदाहरणे देऊन विषय आटोपता घेऊ इच्छितो! समजा मी पहिल्या प्रकारातला माणूस असेन तर एखादा रस्त्याच्या कडेला भुकेने व्याकुळ असलेला व्यक्ती आढळल्यास किंवा रस्त्यात अपघात होऊन पडलेला व्यक्ती दिसला तर साहजिक माझं मन बेचैन होईल,भलेही कोणतीही मदत जरी त्या लोकांना करू शकलो नाही तरी मनात हुरहूर नक्कीच लागेल,खिशात पैसा नसला तरी अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मनात मदत करण्याचे विचार येऊन जातील, अशी व्यक्ती मनाने शुद्ध असणारी व्यक्ती कोणाला फसवूच शकणार नाही कारण तो विचारच त्याच्या मनाला शिवणार नाही.तो आपले पोट भरण्यासाठी एकवेळ उपाशी राहील पण दुसऱ्याला उपाशी मारणार नाही.
समजा मी दुसऱ्या प्रकारातला माणूस असेन तर एखाद्या व्यक्तीला नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देईन,त्याच्याकडून किती पैसा उकडता येईल ते पाहीन,पैसा डबल करून देईन म्हणून समोरच्याला मूर्ख बनवेंन, समोरच्याची एखादी चूक पकडून त्याला ब्लॅकमेल कसे करता येईल याचा विचार करेन.
एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की पहिल्या प्रकारच्या व्यक्तीकडे गमविण्यासारखे काहीच नसते त्यामुळे एखाद्याला मदत जरी करू शकला नाही तरी त्याचे काहीच नुकसान होणार नाही परंतु दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तीचे भविष्य अतिशय वाईट होऊन जाते कारण त्याने जे काही केले त्यामुळे त्याची समाजात फसवी प्रतिमा तयार झालेली असते,समाजातील लोकांचा विश्वास त्याने गमविलेला असतो आणि एकदा गमविलेला विश्वास निरमा लावून घासला तरी तो मिळत नाही,ज्या व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास ठेवून आपल्या मेहनतीचा पैसा तुमच्या हवाली केला असतो त्यात अनेक स्वप्ने सामावलेली असतात आणि ती स्वप्ने केवळ तुमच्या पैशाच्या लालसेपोटी तुम्ही नष्ट करीत असता आणि हा डाग तुमच्या आयुष्यात तुम्ही मरेपर्यंत स्वच्छ करू शकत नाही!
म्हणून शेवटी एकच लक्षात ठेवून आपण जगलो तर आपण तर सुखीच राहू पण इतरांनाही सुखी पाहू शकतो! ती हीच गोष्ट की आपण इतरांचं भलं करू शकलो नाही तर त्यांचं वाईटही करू नये!