[tta_listen_btn]
“चल आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” वय वर्षे 16 असणाऱ्या मुलींमध्ये आणि वय वर्ष 18 असणाऱ्या मुलांमध्ये हे वाक्य कमालीचं उपयोगात येतांना दिसतं. ती नुकतीच मॅट्रिक पास होऊन कॉलेजात आलेली असते तर तो दम टाकत काठावर पास होऊन कसाबसा तिच्यासोबत आलेला असतो.मुळातच पुरुषाच्या शरीरात हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होण्याचा हा परिणाम असावा. मुलामुलींचं एकमेकांकडे निर्माण होणारं हे आकर्षण ही अगदी स्वाभाविक प्रक्रिया असते जी तारुण्याचा उंबरठा ओलांडताना होत असते, हे प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं, ज्याने एखाद्यावर किंवा एखादीवर प्रेम केलं नाही तो माणूसच शोधून सापडणार नाही,एखाद्याला एखादी आणि एखादीला एखादा आवडत नसेल असे कोणत्याही स्त्री पुरुषाच्या जीवनात घडत नाही मग ते काही ठिकाणी व्यक्त झालेलं दिसतं तर काही ठिकाणी एकतर्फी मनातल्या मनात सलत राहिलेलं असतं,मुलींच्या मानाने मुलांमध्ये “प्रेम पाहावं करून” हे रिचार्ज या वयात खूप अगदी फुल स्पीडमध्ये काम करत असतं,काही वर्षाअगोदर ही प्रक्रिया अगदी संथ होती,त्यावेळेस समाजमन आजच्या सारखं दूषित झालेलं नव्हतं, टीव्ही,सिनेमाचा शिरकाव झालेला नव्हता,मोबाईलचा तर थांगपत्ताच कुठे नव्हता त्यामुळे त्याकाळच्या प्रेमात शारीरिक आकर्षणापेक्षा मन जुळले तरच प्रेम व्हायचं,ते ही लपून छपून चिठ्ठी देण्यापलिकडे कधी सरकत नसायचं पण आज स्थिती नेमकी उलट झालेली आपणास पहावयास मिळते,सर्रास मोबाईलचा वापर,तोकडे कपडे लावून नग्न प्रदर्शन करणाऱ्या नट्या,टिव्हीतली नग्नता,सहज मोबाईलवर दिसणारे पॉर्न व्हिडीओज,चॅटिंग आणि यामुळेच आजच्या पिढीच्या प्रेमाचे स्वरूप केवळ आणि केवळ शारीरिक भूक भागविणे एव्हढ्यापर्यंतच मर्यादित झालेले आहे,दुर्दैवाने आजची पिढी याच लफडयाला “प्रेम” असे समजतात आणि याचा परिपाक “मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूं” इथपर्यंत येऊन ठेपतो! काहीवेळेस अशा लफडयात होणारे प्रेमभंग नव्या पिढीला गारद करून टाकतात,सिगारेट,दारू,अफीम,गांजा अशी व्यसनं याच वयात लागतात जी जन्मभर साथ सोडणारी नसतात.घरात अशा गोष्टी खूप उशिरा तर आधी त्या गावभर माहीत झालेल्या असतात.या गोष्टींचा अतिशय गंभीर परिणाम हा नवीन पिढीच्या शिक्षणावर झालेला आहे,गावातील 90% मुलं,मुली तर शहरातील 76% तरुण,तरुणी आज या समस्येने ग्रासलेले आहेत.येणारा भविष्यकाळ दरोडे टाकणाऱ्या टोळ्या निर्माण करणारा काळ आहे नव्हे त्या दिशेने तरुण पिढीची वाटचाल सुरू झालेली आहे.
❝कारनामे❞
●काहीही न समजणारं वय,आयतं गिळायला मिळणारं हे वय केवळ आईवडिलांच्या भरवशावरचं असतं, बापू किंवा तानी कुठून आली,कोणासोबत गेली,काय करून आली हे आईवडील कधीच विचारत नसतात,बापू शाळेतून आला की बापुची माय पटकन जेवायला वाढते,बापूच्या आईला वाटते की बापू खूप मन लावून शिकत आहे,याला कोणताही त्रास आपल्याकडून होऊ नये पण बापू काय कारनामे करून येतो ते अख्या गावाला आधीच माहीत झालेलं असतं पण बापूच्या आईवडिलांना बापू सोज्वळ आणि निरागसच वाटतो.हे सोज्वळ आणि निरागस वाटणं हे प्रत्येक आईवडिलांना नेहमीच घातक ठरत आलेलं आहे.अशा वयात प्रेमभावना उचंबळून येणं हे साहजिक आहे,या अवस्थेतून कधी काळी आपणही गेलेलो असतो पण आपण आपला काळ विसरतो आणि मुलांनी त्या मार्गाला जाऊ नये,अशी निरर्थक अपेक्षा बाळगून बसतो,या वयात मुला, मुलींचे आईवडील होऊन राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून राहिल्यास आपण आपल्या पाल्याना कुठेतरी वाममार्गाला लागण्यापासून वाचवू शकतो हे प्रत्येक आईवडिलांनी समजून घेणे आवश्यक आहे.तसेच घरातले संस्कार आणि वातावरण हे आपल्या पाल्यांना चांगले किंवा वाईट बनण्यास उद्युक्त करतात,घरात चांगले वातावरण ठेवणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असले पाहिजे,आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करतात,कोणत्या मुलांच्या संगतीत राहतात हे वेळोवेळी तपासले पाहिजे!
❝करिअर❞
तरुण मुलांमुलीनी या वयात आपले करिअर निर्माण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवला पाहिजे,समाजातील यशस्वी,संघर्षातून मोठ्या झालेल्या व्यक्तींचा संग, त्यांचे विचार,त्यांचे मार्गदर्शन आत्मसात केले पाहिजे.आपल्याला भविष्यात काय करायचे आहे हे ठरवून ते पूर्ण कसे करता येईल यावर भर दिला पाहिजे.मित्रानो ही वेळ एकदा हातातून निघून गेली किंवा आपण मार्ग भरकटलो की अक्ख आयुष्य पश्चाताप करण्यात जातं, खिशात दमडी असेल तर तुमची किंमत असते अन्यथा तुम्हाला कोणी विचारणारही नसतं, तुम्ही काहीच करणार नाही,काहीच कमविणार नाही तर तुम्ही कशाच्या भरवशावर आपला संसाराचा गाडा चालवू शकणार.तुम्ही स्वतःच्या पायावर उभे होऊ शकले नाही तर जग तुम्हाला पाण्याजवळही उभं करत नाही,समोरचा माणूस ओळखायला शिकता आलं पाहिजे,तो आपल्याला आपल्या भल्याचं सांगतोय की वाईट होईल असं सांगतोय ते ओळखून आपले निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे.माणूस एकटाही असेल तरीही तो यशस्वी होऊ शकतो ती धमक आपल्या आचार,विचारातून उभी करता आली पाहिजे.आज तुमचं तारुण्य आहे म्हातारपणात पेन्शनची व्यवस्था कशी होईल याची तजवीज तुम्हाला करता आली पाहिजे अन्यथा तुमचा बट्याबोळ झालाच म्हणून समजा!