फुकटचे सल्ले…

[tta_listen_btn]


❝ईच्छा आणि आकांक्षा❞.
माणूस म्हणजे सदैव अतृप्त असणारा प्राणी! माणसाचे संपुर्ण आयुष्य हे काही ना काही मिळविण्याच्या लालसेने संपून जाते पण त्याच्या ईच्छा आकांक्षा काही पूर्णत्वास जात नाही.सर्व काही मिळवूनही तो अतृप्त भावनेनेच जगाचा निरोप घेतो.माणसाच्या आयुष्याच्या तीनही टप्प्यात तो केवळ मिळविण्यासाठी धळपड करतो पण दुसऱ्याला देण्यासाठी तो काहीही करत नाही आणि त्यामुळे शेवटी सर्व काही मिळवूनही त्याचे आयुष्य निरस ठरते.आयुष्याच्या पूर्वार्धात प्रत्येक माणूस स्वप्ने बघतो आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान करतो,कधी तो यशस्वी होतो तर कधी कायमची निराशाच पदरी येते.काही वेळेस काही ठिकाणी एखादा निर्णय चुकला की अख्या आयुष्याची वाट लागते तर काही निर्णयामुळे आयुष्य अगदी सुखमय होऊन जातं.माणसाच्या आयुष्यात त्याच्या संपुर्ण जीवनाला बरे वाईट स्वरुपात बदलविणारा काळ असतो तो त्याच्या तारुण्याचा! बरेचदा तारुण्यातल्या सळसळता जोश,अति महत्वकांक्षा,मीच केवळ बरोबर आहे या स्वभावामुळे बरेचसे चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्यभर भोगावे लागतात.
❝ते वयच तसं असतं❞.
साधारणतः तारुण्याची 18 ते 26 वर्षे खूप महत्त्वाची असतात,याच वयात एखाद्या चांगल्या व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन लाभले तर पुढील आयुष्य सुकर होतं तर याच वयात वाईट संगत लागली तर त्याचे आयुष्य माती झाल्याशिवाय राहत नाही.ही वर्षे संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारी ठरतात.तारुण्याच्या याच वयात प्रेम नावाची गोष्ट हार्मोन्सच्या बदलामुळे मानवी मनात शिरकाव करते आणि त्यात अर्धे अधिक तरुण आपले भविष्य स्वतःहून अंधकारमय करून जातात.तारुण्याच्या या काळात माणसात प्रगल्भता नसते आणि विचार करण्याची शक्ती सुद्धा जवळपास नसल्यासारखी असते,आई वडिलांचा अतिरिक्त पाठिंबा या वयात त्याला मिळत असतो,कोणत्याही आईवडीलास असेच वाटते की आपला मुलगा कॉलेजमध्ये जातोय,छान शिकतोय,भविष्यात तो नक्कीच काहीतरी करेन पण प्रत्यक्षात स्थिती मात्र विपरीत झालेली असते,आईवडिलांचा अतिरिक्त विश्वास नाशास कारण ठरते,या वयात अर्थातच एकत्र कुटुंब असतं आणि शिकणाऱ्या तरुणाला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ नये म्हणून आईवडील झटत असतात आणि अशा वेळेस कोणताही “नेट” शिकणाऱ्या तरुणावर पडत नाही,दोन वेळचं आयतं खायला मिळतं,अशावेळेस श्रमाची किंमत त्याला माहित नसते, स्वतः श्रम करण्याची कधी गरज पडत नाही मात्र तारुण्यातील जोश सळसळत वाहतो,एखाद्या मुलीचा चेहरा त्याच्या पुस्तकाच्या पानात दिसायला लागतो तर मैं तुम्हारे लिये चांद भी जमी पर ला सकता हूं इथपर्यंत त्याची मजल जाते परंतु वास्तविकता यापेक्षा कित्येक पटीने विपरीत असते.याच वेळेस कित्येक तरुण आपले ध्येय सोडून भरकटतात,आई वडिलांच्या भरवशावर तो प्रेयसीला कित्येक शपथा देऊन जातो,मी तुला सुखात ठेवीन,गाडीवर फिरविन म्हणणाऱ्या तरुणाच्या खिशात प्रत्यक्षात प्रवासासाठी म्हणून आईवडिलांनी दिलेले दोन चार रुपये असतात.या वयात हे सर्व मृगजळ असतं जे भविष्यात भीषण स्वरूपात परिवर्तित होत असतं. तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात या सर्व गोष्टी कमी अधिक प्रमाणात घडलेल्या असतात पण यातून जो सावरला तो यशस्वी आणि जो वाहवत गेला,तो उन्हाळ रानात नाल्या खोदताना दिसून येतो.
❝प्रेम पाहावं करून❞.
माणसाला अभिप्रेत असणारी प्रत्येक गोष्ट,प्रत्येक ईच्छा पूर्णत्वास जाईलच अशी शाश्वती नसते,शाळेत शिकताना एखादी पोरगी आवडते किंवा एखादा पोरगा एखादीला आवडतो,त्याच्यावर/तिच्यावर प्रेम जळतं, हे स्वाभाविक आहे आणि प्रत्येकाच्या भूतकाळात कधी ना कधी हे होत असतं,पण जिच्यावर प्रेम झालं तीच आपली बायको म्हणून मिळेल हे मात्र होत नाही आणि तसं झालच तरी तिला पोसण्याची औकात अजून याची तयार झालेली नसते कारण केवळ प्रेमाने पोट भरत नसतं त्यासाठी स्वतःच्या पायावर उभं होऊन कमवावं लागतं, माय बापाच्या भरवशावर बायकोला पोसता येत नाही.त्यासाठी स्वतःचे भविष्य आधी उज्वल करणे जरुरी असते पण याच लफडयात पडून 75% तरुण आपले भविष्य नष्ट करून बसतात.प्रेम केलेल्या पोरीचे लग्न होऊन दोन कॅलेंडरही छापून होतात आणि हा सांड गावभर फिरताना दिसतो.प्रेम विरहाने अतिशय वाईट सवयी त्याला जडलेल्या असतात ज्या सवयी आई वडिलांनाही खूप उशिरा कळतात,जेंव्हा वेळ गेलेली असते.
❝वेळ❞
प्रत्येक माणसाच्या जीवनात वेळेला खूप महत्व असते,जो वेळेनुसार निर्णय घेऊ शकला तो अथांग समुद्रात तरला परंतु वेळेला ज्याने महत्व दिले नाही त्याला वेळ महत्व देत नाही,प्रत्येक गोष्ट करण्यासाठी,निर्णय घेण्यासाठी एक ठराविक वेळ असते आणि त्याच वेळेत जर अपेक्षित काम झाले तर परिणामही सकारात्मक येतात,एका ठराविक वेळेत तुम्ही स्वतःचे चांगले करून घेतले नाही तर भविष्यात कोणत्याही वेळेस भाऊ, बंद, आई,वडील,सगे सोयरे कोणीच तुमच्या कामी येत नाही,प्रत्येकाला स्वतःचा संसार लागलेला असतो एका मर्यादेपलीकडे कोणीही तुमची सोबत करू शकणार नाही.एकत्र कुटुंब असताना प्रत्येकजण तुमचा विचार करतो,तुमचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून मदत करत असतो पण एक वेळ अशी येते की तुमच्या निर्णयावर,वागण्यावर सर्व काही बदलून जाते,तुम्ही सुखी व्हावे ही सर्वांचीच ईच्छा असताना देखील एका मर्यादेपलीकडे ते तुम्हाला मदत करू शकत नाही,कुटुंबातील आई वडिलांनी एकदा जग सोडले की तुमचा सख्खा भाऊ देखील तुमच्या मदतीला येत नाही,एका कालमर्यादेपर्यंत लग्न झाल्यानंतर बायकोचे नातेवाईक जवळ येतात आणि आपले नातेवाईक दूर होतात परंतु भविष्यात तेच बायकोचे नातेवाईक केवळ चहा पाण्यापूरते येतात आणि आपले नातेवाईक जे दूर गेलेले असतात तेही जवळ येत नाहीत.हा प्रकृतीचा नियम आहे जो सर्वांना लागू आहे.
❝जीवन जगण्याचं तंत्र❞.
सुंदर आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी फार काही तिर मारण्याची गरज नाही,काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या आपण व्यवस्थित करू शकलो तरी एक सुंदर आयुष्य आपण जगू शकतो.काही टिप्स आहेत ज्या सर्वानाच कामी पडणाऱ्या आहेत त्या अशा!
●आपला जेथे संबंध नाही त्यावेळेस कोण काय करतोय याकडे फारसे लक्ष देऊ नये.
●दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात,गोष्टीत काड्या करू नये किंवा नाक खुपसू नये.
●सकारात्मक विचार अवलंबवावे.
●कोणालाही जवळून अनुभवल्याशिवाय समोरच्याविषयी आपले मत ठरवू नये.
●चांगले जीवन घडविण्यासाठी श्रम करण्याची तयारी ठेवावी,विना मेहनतीने कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही.
●आयुष्यात चांगले काम करण्यासाठी आलेली संधी कधीच सोडू नये,संधी पुन्हा येत नाही.
●आजचा दिवस वाईट निघाला तरी उद्याचा दिवस मात्र वाईट असणार नाही ही खूणगाठ मनात बांधून ठेवावी,कारण सर्व दिवस सारखे नसतात.
●दुसऱ्याच निरर्थक द्वेष करू नये,समोरच्याने जे यश संपादन केले ते मी का करू शकत नाही अशी सकारात्मक भावना बाळगावी.
●प्रेम,बिंम निरर्थक गोष्टी आहेत,वासनेच्या बाजारात स्वतःला निलाम करू नये.
●तुमच्याजवळ पैसा नसताना तुमची सोबत करतो अशा मित्रास कधी विसरू नये,पैसा असताना चोरही साथ देतात
●अपार कष्ट उपसण्याची तयारी असावी यश तुमच्या मागे येईल ही शंभर टक्के खात्री.
●आयुष्यात देव देव करत बसू नये,कोणताही देव आयतं देत नसतो,तुमचे चांगले कार्यच तुम्हाला यशस्वी किंवा अयशस्वी ठरवत असतात.
●नशीब नावाची कोणतीच गोष्ट नाही,जो नशिबावर अवलंबिला त्याचा कार्यभाग बुडाला.
●चांगल्या कामाचे परिणाम चांगलेच येतात,कडुनिंबाला कधी रसाळ फळे येत नाहीत.
●आपली क्रिया चांगली असेल तर प्रतिक्रियाही निश्चितच चांगली येईल.
●सर्वात महत्वाची गोष्ट ती ही की सदैव मदतीची भावना जोपासा,समोरच्याला आपल्या ऐपतीप्रमाणे जेवढी मदत करता येईल तेवढी करा,याचे परिणाम जे येतात त्यात समाधान एवढं असतं की तुमचं जीवनही सुंदर सुखमय होऊन जातं.
●स्वतःच्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका,चूक सुधरविणे आपल्याच हातात असते.ती मान्य करता आली पाहिजे.
●समोरच्याला कधीही वाईट समजू नका,चिंतन,आत्मचिंतनाने सर्व गैरसमज दूर करता येतात.
हे फुकटचे सल्ले मी स्वतः अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो,शंभर टक्के यशस्वी होऊच हा भाग नसला तरी काही तरी चांगली गोष्ट निश्चितच घडत असते.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी