■कामगार एक असा माणूस जो एका साखळीत काम करणारा,आपल्या वर असणाऱ्या अधिकाऱ्याचा आदेश मानणारा,एखाद्याची नोकरी करणारा हा प्रत्येक माणूस एक कामगार असतो मग तो एखाद्या साध्या दुकानातला नोकर असू द्या की एखाद्या कंपनीत मॅनेजर पोष्टवर बसणारा एखादा व्यक्ती असू द्या,जो आपल्या मालकाचा आदेश पाळतो तो म्हणजेच नोकर किंवा कामगार!
आज डोळे उघडे ठेवून विचार करा वेळ भयंकर येणार आहे तत्त्वता आलेली सुद्धा आहे.कोरोना सारखे सुलतानी संकट अचानकपणे येऊन पडल्याने कित्येक कंपन्या डुबण्याच्या मार्गावर आहेत,अक्षरशः कार्पोरेट कंपन्यांचे कंबरडे मोडल्यात जमा आहेत,त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असणारे छोटे उद्योग सुद्धा डबघाईस आलेले आहेत,कोणत्याही कंपन्यांचा ताडेबंद आजच्या घडीला सैरावैरा झालेला असून या गोष्टीचा सरळ दुष्परिणाम हा लोकांच्या नोकरीवर होणारा आहे,प्रत्येक कंपनीकडे त्यांच्या वस्तूची मागणी नसल्याने उत्पादनावर अनिष्ट परिणाम झालेला आहे.कोणत्याही कम्पनीचे व्यवस्थापन हे खेळत्या भांडवलावर अवलंबून असते त्यामुळे खेळते भांडवल जर नसेल तर कंपनीचे चालणारे चक्र बंद पडते आणि त्याचे दूरगामी परिणाम हे त्या कंपनीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर होत असतात.एवढच कशाला साधा एक अंदाज आपण बांधू शकतो की सरकारसुद्धा आजच्या स्थितीत आर्थिकदृष्ट्या अत्यंत दयनीय अवस्थेत सापडलेले आहे त्यामुळेच सरकारी नोकरवर्गाला देखील त्यांचा पूर्ण पगार देऊ शकत नाहीये,सरकारकडे जमा होणाऱ्या महसूलाची आवक आज थांबलेली आहे,सरकारकडे जमा होणारे आर्थिक स्तोत्र कमकुवत झालेले आहे,ज्या कंपन्या सरकारी देखरेखीखाली काम करत आहेत त्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या कंपन्यांना द्यायला पैसा नाही आणि त्यामुळे ज्या कंपन्या कच्चा माल पुरवीत आहे त्यांचे आर्थिक बजेट बिघडल्यात जमा आहे.
■माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की माझ्यासारखी कित्येक मंडळी आहेत जी कॉर्पोरेट कंपन्यात काम करत आहेत ज्यांना आज मोठ्या बिकट मानसिक अवस्थेतून जावे लागत आहे.भविष्यात काय होईल याची शाश्वती राहिलेली नाही,आज आपण रस्तोरस्ती लोकांचा जो जत्था पाहत आहोत,रस्त्याच्या कडेकडेला उपाशीपोटी धावणारे जे पाय पाहत आहोत हे तेच कामगार आहेत ज्यांनी डिजिटल इंडिया घडविला आहे पण आज त्यांची अवस्था जीर्ण झालेली आहे तसेच जे मध्यमवर्गीय आहेत ते तर बुक्क्यांचा मार सहन करत आहेत,पाहायला मोठे घर,इज्जत सर्वकाही परंतु आपल्या लाजेखातर एकवेळ उपाशी राहून दिवसं काढत आहे,काय समस्या सांगायच्या आणि कोणाला सांगायच्या!
■माझं नोकरीतलं अर्ध आयुष्य एक कामगार म्हणून गेलं तर अर्ध आयुष्य एक अधिकारी म्हणून गेलं त्यामुळे कामगारांच्या समस्या,अडचणी किती मोठ्या असतात ते चांगल्या तऱ्हेने जाणून आहे,कामगारांसाठी केलेला संघर्षही माझ्या जीवनात आहे तर एक प्लांट कसा सांभाळायचा हाही अनुभव मी अनुभवलेला आहे,तीन राज्यात काम केल्याने तीनही राज्यातील कामगार आणि त्यांच्या अडचणी अगदी जवळून अनुभवलेल्या आहेत आणि त्याच प्रमाणात एखादी कंपनी चालविण्यासाठी किती पाठीवर मार सोसावे लागतात तेही चांगलेच अनुभवलेले आहे,मी ज्या तेलंगणा राज्यात जो की फुल्ली नक्सलाईट एरिया येतो त्याठिकाणी नोकरीची दहा वर्षे घालविली आहेत त्या राज्यात कामगारांचे मोठे प्रेम मला मिळाले केवळ माझ्या बदलीच्या अफवेने कामगारांनी एक दिवस कंपनी बंद केली त्याव्यतिरिक्त माझ्या या कार्यकाळात कधी कामगारांचा संप अथवा प्लांट कधी बंद राहिला हे पाहिले नाही याउलट त्याठिकाणी कामगार युनियन अत्यंत अग्रेसिव्ह असतात त्यांनी सुद्धा कधी कामगारांचे नुकसान व्हावे अशा रीतीने संबंध ठेवले नाहीत,कामगारांच्या काहींना काही मागण्या प्रत्येक ठिकाणी असतात,आजही त्याठिकाणी इंटक,सिपीआय,सिपीएम सारख्या संघटनांचे पदाधिकारी येत असतात कामगारांच्या मागण्या ठेवत असतात,जेवढ्या कंपनीला संभव असतात तेवढ्या मागण्या कंपनी पूर्ण करीत असते आणि ज्या शक्य नाही त्यावर विचारविमर्श केल्या जातो,एवढ्या घडामोडीत कंपनी कोणी बंद करण्याच्या विचारात मात्र कधी नसतो कारण त्या सर्वाना जाणीव आहे की कंपनी चालू राहिली तरच त्यावर अवलंबून असणारे कामगार जगतील अन्यथा कंपनी बंद पाडून रोज तीनशे रुपये कमविणारा,हातावर आणून पानावर खाणारा कामगार उपाशी राहील.ते हेही जाणून असतात की आपण ठेवलेल्या दहा मागण्या कधीच मंजूर होणार नाही पण त्यापैकी पाचेक तरी नक्कीच मिळतात.
माझा लिहायचा एवढाच उद्देश आहे की आजच्या घडीला एवढ्या गंभीर स्थितीत नोकरी मिळणे आणि ती सांभाळून ठेवणे तेवढ्याच जिकरीचे काम आहे,आज मी अत्यंत द्विधा स्थितीत आहे,मी मॅनेजर असून माझ्या नोकरीची खात्री मला राहिलेली नाही तर कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न मला उद्विग्न करतो आहे कारण मी एक कामगार एक सामान्य लेबर म्हणून जीवन जगलेलो आहे.कामगारांचे दुःख,वेदना सोसलेल्या आहेत.
■येणारा भविष्यकाळ माझ्यासहित कॉर्पोरेट कंपन्यात काम करणारे नोकर,कामगार यांचे भविष्य ठरवणार आहे,तोपर्यंत निर्धास्त जगू या!आनंदात जगू या!