[tta_listen_btn]
धर्म हा विषय खूप किचकट मुद्दा आहे!कोणताही धर्म वाईट नसतो धर्माला वाईट करतात ती त्या धर्मातील लोकं,धर्म कितीही चांगला असला तरी धर्माचे अनुसरण करणारे कसे आहेत त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,अल्लाहला मानणाऱ्या मुसलमानातील एखादा मुसलमान हा आतंकवादी निघाला की त्या धर्मालाच आतंकवादी धर्म ठरवून आम्ही मोकळे होतो,पण त्याच धर्मातील सच्चा मुस्लिम आम्हाला दिसत नाही,आतंकवादी त्याच धर्मात पैदा होतात का तर नाही,आतंकवादी हिंदुमध्येही असतात,पण आपला आतंकवादी निघाला की आपण बचावात्मक पवित्रा घेतो,आपलं झाकण्याचा आपण प्रयत्न करीत असतो,धर्म आणि धर्माच्या ग्रंथाचे अनुसरण ढोबळ मानाने आपण किती जण करतो तर संख्या अतिशय नगण्य! मंदिरात जाऊन देवाच्या पाया लागणे म्हणजे धर्म का?मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडणे म्हणजे धर्म का?चर्च मध्ये जाऊन येशूची प्रार्थना करणे म्हणजे धर्म का? की विहारावर भोंगा लावून त्रिपीठक वाचणे म्हणजे धर्म? असा दिखाऊ धर्म कोणाच्या कामी पडतो का? अशा गंभीर प्रश्नावर आम्ही हेतुपुरस्सर मौन बाळगून असतो.हिंदू खतरे मे है म्हणणाऱ्या किती हिंदूंना हिंदू या शब्दाचा अर्थ माहीत असतो किंवा किती मुसलमानांना जिहाद हा शब्द अर्थाने माहीत असतो की किती बौद्धांना पंचशील माहिती असतं.चला एकदा मान्य करू की सर्वांना या गोष्टींचा अर्थ सुद्धा माहीत असेल पण सर्वात मोठा प्रश्न तो हा असतो की अनुसरण कोण आणि किती जण करतात! माणसाचा सर्वात मोठा दुर्गुण असतो तो स्वार्थ ज्या ठिकाणी काही मिळवायचे असेल किंवा स्वार्थ साधायचा असेल त्या ठिकाणी धर्म आडवा येत नाही. मी स्वतःला काही प्रश्न विचारतो जे मला अजूनही अनुत्तरित आहेत. मी हिंदू,माझा बाप हिंदू म्हणून मी हिंदू, यापलीकडे हिंदू म्हणून मी काय करावे आणि हिंदू धर्म म्हणून धर्माकडून मला काय शिक्षण मिळाले,अर्थात काहीच नाही! बाप देव पूजत होता,आज्यानेही पुजले तेच मी ही करायचं,बापाने कधी धर्मग्रंथ वाचला नाही(आमचा धर्मग्रंथ कोणता यातच आम्ही कन्फ्युज आहोत) आम्हाला आमचा धर्मग्रंथ कोणता तेच अजून माहीत नाही,अनुकरण करणे तर दूरच.मग मी हिंदू कसा,म्हणजे हिंदूंची सर्वसामान्य लक्षणे ती काय? मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे ही भक्ती झाली,भक्ती आणि धर्म ह्या परस्पर वेगळ्या गोष्टी,मग यात धर्माची भूमिका काय,खूप गोंधळ होतो! चला एकवेळ मान्य केलं की मी हिंदू आहे मग मी कोणता ग्रंथ वाचून त्याचे अनुकरण करायला हवे! आणि कोणत्या देवाचे गुण स्वतः स्वीकारावे.मी बरेचसे ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला,वेद आणि मनुस्मृती हे ग्रंथ तर माणूस म्हणून जगणाऱ्याचे होऊच शकत नाही,ग्रंथ असा असायला हवा की माणसाने माणसाशी माणुसकीने वागता आले पाहिजे ही शिकवण त्यात असली पाहिजे,हे ग्रंथ वाचून भ्रमनिरास होतो,कामवासनेशिवाय आणि भेदाभेद शिकविणाऱ्या अशा ग्रंथांना एखाद्या धर्माचे ग्रंथ म्हणून आपण कशी मान्यता देणार.महाभारत आणि रामायण ह्या कथा आहेत त्यात घेण्यासारखे काही आहे अशी माझी खूप आशा होती पण कथा कथाच ठरतात त्या ऐकून काही उपयोगाचे नसते.
साधारणता एक विचार मनात येतो की जगाच्या पाठीवर असे कितीतरी समृद्ध देश आहेत ज्या ठिकाणी कोणत्याही देवाची,अल्लाह,ख्रिस्त वा बौद्धाची पूजा होत नाही,त्याठिकानीही माणसच वास्तव्य करतात, का बरे त्यांना देवा,धर्माची गरज पडत नसेल.त्यांना स्वर्ग,नरकाची भीती वाटत नसेल का?
काही अंधश्रद्धा सोडल्या तर इस्लाम धर्म हा सरस ठरतो,तो धर्म सर्व मुस्लिम लोकांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे काम करतो,काही मुस्लिम काटेकोर नियम पाळतात तर काही नुसतेच मुस्लिम म्हणून जगतात,जे केवळ नावाला मुस्लिम म्हणून जगतात त्यांच्यात आणि आमच्यात तसा विशेष फरक नसतो,ते कधी अल्लाहला नमाज पडत नाही,आम्हाला मंदिरात वैगेरे जाऊन दर्शन घ्यायचा कंटाळा येतो,गाडी चालवता चालवता मंदिर पाहून गाडीचा हॉर्न वाजविला की आम्हाला देव पावतो.
त्यामानाने सर्वात विज्ञाननिष्ठ धर्म म्हणून पाहिल्या जाते ते बौद्धधर्माकडे! परंतु आज व्यवस्था अशी निर्माण झाली आहे की केवळ शासनाचे अनुदान लाटण्यापूरते स्वतःच्या नावासमोर बौद्ध लिहिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढीस लागली आहे,पंचशील वैगेरे केवळ भोंग्यावरून सांगण्यापूरत्या गोष्टी ठरल्या आहेत पण प्रत्यक्षात वागणे तेवढेच विपरीत झाले आहे.
ही कोणत्या धर्मावर टीका नाही की कोणी सुधरावे हीही अपेक्षा नाही,ही चिकित्सा करण्यास बौद्ध धर्मच सांगतो पण आम्ही चिकित्सा कुठेच करत नाही.माझा धर्म श्रेष्ठ म्हणत एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच स्वतःला धन्य समजतो.कोणताच धर्म दुसऱ्या माणसाचे वाईट करा अशी शिकवण देत नाही,माणूस स्वतः माणसालाच मारतो…धर्म केवळ निमीत्त असते.