मी शांती आणि अहिंसेच्या मार्गावर विश्वास ठेवणारा माणूस आहे,त्याचवेळी एका गालावर कोणी विनाकारण थप्पड मारत असेल तर दुसरा गाल समोर करणाराही माणूस नाही,समाजात जात,धर्मावरून आग लावणाऱ्यांची संख्या सध्या वाढीस लागलेली आहे,आग लावणाऱ्यांना आपण ओळखू शकत नाही आहोत हे आपलं दुर्दैव आहे,आपल्या स्वार्थासाठी,राजकारणात ध्येय साधण्यासाठी कुणीतरी आग ओकतो,कोणीतरी कोणालातरी चढवतो आणि बाकीचे त्याची बाजू घेऊन समाजात विष पसरविण्याचा धंदा करतात,नेत्याला खुश करण्यासाठी कार्यकर्ते कोणताही विचार न करता,नेत्याने फेकलेल्या आगीच्या गोळ्याने आपल्याच लोकांच्या घराला आग लावतात,यात अविचारी लोकांचा भरणा दिवसेंदिवस वाढायला लागला आहे,अधेमध्ये धमकीवजा फोन येणे,मॅसेजेस येणे हे काही माझ्यासाठी आता नवीन नाही,माझ्या काही पोष्ट रंगदल,एसेस यांच्या ग्रुपवर शेअर होतात,त्यात शिव्यांचा भडिमार असतो,कोणी हितचिंतक ते स्क्रीनशॉट काढून मला पाठवतो तर कोणी सांभाळून रहा म्हणून फोन करतो आणि गंमत म्हणजे माझ्या मुद्यांवर त्या ग्रुपवर कोणीच तार्किक उत्तर न देता केवळ त्यात द्वेषपूर्ण “बघून घेऊ” ही भाषा वापरलेली दिसते,खरे तर हा त्यांचा दोष नसतोच कारण त्यांचा मेंदूच तार्किक विचार करण्यासारखा “त्या” लोकांनी ठेवलेला नसतो,एखादी खोटी गोष्ट तुमच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जेंव्हा अनेक वेळा पोहचवली जाते तेंव्हा ती गोष्ट जी धादांत खोटी असते,ती ही तुम्हाला खरी वाटायला लागते पण त्याच वेळेस त्या गोष्टीची सत्यता जर कोणी मांडायचा प्रयत्न केला तर त्याला अगदी सहजपणे हा कंपू देशद्रोही वा अधर्मी ठरवून मोकळा होतो. मन,मस्तक,मनगट ह्या तीनही गोष्टीवर त्यांनी ताबा मिळविला आहे,आम्ही ऑर्डर्स द्यायचे आणि कोणताही प्रतिप्रश्न न करता ते तुम्ही पाळायचे एवढ्यापर्यंत त्यांनी आमच्या लोकांवर ताबा मिळविलेला आहे.आजच्या घडीला सामाजिक वातावरण कमालीचे बदलले आहे,
“झूटोने झूटोसे कहा… सच बोलो…
सरकारी ऐलान हूआ है… सच बोलो..
घरमे झूटकी मंडी लगी हुई है…
दरवाजेपर लिखा है,…सच बोलो…“
एका विशिष्ट संस्थेने जी की नोंदणीकृत सुद्धा नाही,एका विशिष्ट माणसाने जो की अनपड आहे,एका विशिष्ट जातीने जीने हजारो वर्षांपासून राज्य केले आहे,जीने वर्णव्यवस्था निर्माण केली आहे- अशा लोकांनी खोट्या गोष्टींच्या आधारावर समाजमन एवढे संमोहित केले आहे की वर्तमानातली अख्खी पिढीच गारद झाली आहे,वर्तमानातली पिढी गारद झाल्याने भविष्यातील पिढी सुद्धा नासली जाईल यात तिळमात्र शंका नाही.माणसाने धार्मिक असणं आणि धर्मांध असणं यात कमालीचा फरक आहे,धर्मांध लोक ऑर्डर देतात आणि धार्मिक लोक ते अंधपणे फॉलो करतात हे आजचं चित्र आहे. वरच्यांना अभिप्रेत असलेली झोम्बियन्सची निर्मिती समाजात मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे,त्या झुंडीला मन नाही,मेंदू नाही की मनगटात ती ताकद ठेवलेली नाही,भविष्यात ह्या झुंडींना रोखनं कठीण तर आहेच पण त्याही पेक्षा आपली मुलं त्या झुंडीत सामील तर होणार नाही ही भीती सुज्ञ लोकांच्या मनात घर करत आहे,घराबाहेर आपला मुलगा कोणासोबत राहतो,कोणत्या विचारांच्या सानिध्यात आहे याची पुसटशी कल्पना देखील नसते आणि एक दिवस अनपेक्षितपणे तो कुठला तरी झेंडा घेऊन,हातात तलवार घेऊन,धर्मवीर व्हायच्या अविर्भावात गाड्यांवर दगळ भिरकवतांना दिसतो! बापाला धक्काच बसतो तेंव्हा त्यांच्याकडे असलेली वेळ केंव्हाचीच निघून गेलेली असते,म्हणजे आपली पिढी आपल्या डोळ्यादेखत नासली गेली तरी त्याचा थांगपत्ता आपल्याला लागत नाही,आपल्या पिढीला आपण कसे वाचवू शकू हा साधा विचार देखील आज कोणत्याही पालकाच्या मनाला आधी शिवलेला नसतो आणि जेंव्हा माहीत होते तेंव्हा आपल्या मुलाला वाचविण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरलेला नसतो.याला कारणही अगदी विचार करण्यासारखे आहे,समाजातील शिक्षित वर्गाचे समाजात अनिष्ट घडत असलेल्या गोष्टींवर कायम मौनव्रत धारण करणे हे मोठे कारण आहेत,सुज्ञ समाज मौन असेल तर अन्याय करणाऱ्याला अधिक बळ मिळते हा इतिहास आहे,त्या समाजाकडे बघा,त्यांच्यापासून शिकण्यासारखं भरपूर आहे,भारतावर राज्य कोणीही करो पण त्यांनी आपल्या हातातून सत्ता कधीच जाऊ दिली नाही,ते एकीने राहिले,राजा कोणीही असो,तो मुघल असो,शिवाजी महाराज असो,इंग्रज असो की ताजी लोकशाही असो,सत्ता त्यांनीच काबीज करून ठेवली आहे.फोडा आणि राज्य करा हे त्यांचे ब्रीद आहे,आम्ही फुटतो हे त्यांना माहीत आहे,आमच्यावर पकड कशी निर्माण करायची हे त्यांना माहीत आहे,दोन चार पदं आम्हाला मिळाली की अख्खा समाजच त्यांच्या दावणीला बांधायला आम्ही मागेपुढे करत नाही,एक दोन ठेके मिळाले की आम्ही त्याला आयुष्यभर सोडत नाही,एक दोन पुरस्कार मिळाले की आम्ही कायमचे त्यांचे गुलाम होऊन बसतो, त्यांनी काहीही निर्णय करोत जे की आपल्या पिढीला बरबाद करतील त्याविषयी एक ब्र ही आम्ही लिहीत नाही की छापत नाही.स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यांचे बॅनर लावणाऱ्या माझ्याच बंधूंना आज समजून येत नाही की ते स्वतःचीच पिढी नष्ट करण्याच्या कामात लिप्त झालेले आहेत,आपल्या सोयीने भूमिका घेणारे आमचे भाई बंधू तार्किक,चिकित्सक विचार करून,समोरची गोष्ट खरी की खोटी हे पडताडून बघत नाही ही मोठी खंत वाटते!
“लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है“
अशा ओळी म्हणून आम्ही शांत राहण्याचा विचार करत असू तर त्यांनी लावलेली आग कधी तुमच्या आमच्या घरांची राख रांगोळी करेल हे सांगता येत नाही,फेसबुकवर साधी एक तार्किक पोष्ट लिहिली,जी की फॅक्ट असते ती ही त्यांना सहन होत नाही,पोष्टमध्ये काय लिहिलय,का लिहिलय,लिहिलं ते खरं की खोटं असा साधा विचारही न करता,ते तुटून पडतात,त्यांच्या म्होरक्याला काही म्हटलं की म्होरक्या राहतो बाजूला पण टोळ्यांची टोळधाड मात्र नक्की पडते.बरं, ही टोळी समोरासमोर चर्चा करायला किमान जी गोष्ट पोष्टमध्ये लिहिली त्याचं खंडन करायला तरी पुढे येते का?ते यांच्या विचारांपलिकडचे असते,ते व्यक्त होऊच शकत नाही,मी वर म्हटल्याप्रमाणे ते झोम्बियन्स आहेत,त्यांना व्हाट्सएप किंवा त्यांच्या म्होरक्याकडून येणाऱ्या सूचना केवळ पाळायच्या असतात,स्वतःच्या डोक्याने विचार करायचा नसतो.मी प्रत्येक पोष्ट लिहिताना येणाऱ्या परिणामांचा आधी विचार करत असतो,पोष्ट कायदेशीर फसणार नाही,त्या पोश्टला संदर्भ असल्याशिवाय माझं लिखाण मी करत नाही.मी विचार केलेलं मत हे मी अभ्यास केल्याशिवाय मांडत नाही.मी काही कोणतीही गोष्ट नव्याने मांडत नाही,माझ्या आधी थोर लोकांनी जे मांडलं तेच नव्या स्वरूपात मी मांडत आलोय,पेरियार ईव्ही रामस्वामी,म. ज्योतिबा फुले,जगद्गुरू तुकाराम महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,दिनकरराव जवळकर,एल आर बाली,मा. म.देशमुख,डॉ.आ.ह.साळुंखे अशा कित्येक लोकांनी अशा अनेक मुद्यांना हात घातला की जे तुम्हा आम्हाला ज्ञातच नाही,शूद्र पूर्वी कोण होते?हिंदुजम धर्म या कलंक?विद्रोही तुकाराम,शिवशाही,रामदास आणि पेशवाई अशा अनेक पुस्तकांमध्ये जे लिहिलय त्याचा केवळ सारांश मी मांडत आलोय. पण काय होतं, ही पुस्तके वा या लोकांचे विचार आपण कधी वाचलेलेच नसतो त्यामुळे आपल्याला एकदम धक्काच बसतो,अरे हा असं कसं धर्मविरोधी लिहितोय म्हणून अनेक लोकं मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात पण मी जे काही लिहिलय ते आधीच लिहून ठेवल्या गेलं आहे, मी केवळ त्यांचा विचार घेऊन पुढे सरकवतो आहे याचा तिळमात्र देखील विचार ही टोळधाड करताना दिसत नाही.हां उमेश पारखीने असं लिहिलं ना,मग साला तो धर्मद्रोही आहे,धर्माची खिल्ली उडवतो मग याचाच बंदोबस्त केला पाहिजे हाच विचार यांच्या डोक्यात घुमतो.मी आधीच म्हटल्याप्रमाणे यांचा अजिबात दोष नसतो,ते केवळ ह्या सिस्टमचे बाहुले झालेले आहेत,त्यांच्या डोक्यातून तर्क,चिंतन करण्याचा धडाच मायनस करण्यात आला आहे.
ज्यांना माझ्या पोष्टवर ऑब्जेक्शन असेल त्यांनी सरळ माझ्याशी संपर्क साधावा,माझ्याशी चर्चा करावी,चर्चेत आणि शांतीत विश्वास ठेवणारा मी माणूस आहे,मी केवळ तुमच्या मतांना संदर्भ देईन जे की ते तुम्हालाही मान्य करावे लागतील,बाकी दोन हात करण्याची आणि देख लेंगे अशी भाषा मलाही येते,जेवढा मी बुद्धांचे तत्व अंगिकारतो तेवढाच शिवरायांचा गनिमीकावा देखील मला वापरता येतो.विनाकारण मी कुणाच्या वाटेला जात नाही,विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे,चर्चेला कुठेही बोलवा,मी येईन,मैदान सोडून पळणाऱ्यापैकी मी नाही…..