लै लोकं मला आवर्जून प्रश्न करतात की मी स्टेटसवर देवांचे फोटो वा व्हिडीओ का लावत नाही,उत्तर साधं आहे-देवाकडे मोबाईल नावाची गोष्ट असेल असे मला वाटत नाही त्यामुळे ते माझं स्टेटस पाहायला यायची शक्यता नाही आणि मी किती मोठा भक्त आहे हे मला लोकांना दाखवायचीही काही गरज नाही,प्रभूची लेकरे सारी असं जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा तो प्रभू माझं काही वाईट करेल असे मला अजिबात वाटत नाही कारण मी त्याचं लेकरू आहे आणि लेकरांचे वाईट करणारा जर देव असेल तर तो देव कसला,देवाचे स्टेटस लावून लोकांनां दाखवून जर माझ्यातले दुर्गुण संपले असते तर मी ही स्टेटस लावत बसलो असतो पण तसे होत नाही,आपण स्टेट्सवर देवाच्या नावावर स्टेटस लावत दया,क्षमा शांतीचा पुरस्कार करतो आणि सकाळी उठल्यानंतर नेमके त्याच्या उलट आपले वर्तन असते,दरवाज्यावर येणाऱ्या साध्या भिकाऱ्याला सुद्धा एक रुपया द्यायला जीव कसातरी होतो,स्टेटसच काय मंदिरात जायला आणि मूर्तीला पुजायला सुद्धा मला कंटाळा येतो त्याचं कारण असं की तो जळी,स्थळी,काष्टी,पाषाणी वसलाय असं आपण जेंव्हा मानतो तेंव्हा मंदिरच काय,इतरत्रही कुठेच त्याला शोधण्याची गरज नसली पाहिजे, तो जर कुठे असेल नसेल तरी काय फरक पडतो,भुकेल्याला अन्न, एखाद्याच्या संकटात आर्थिक व मानसिक मदत आपल्याकडून होत नसेल किंवा दिवसभर दोन नंबरची कामे,खोटी कामे,तंटे,वाद आपण करत असू तर संध्याकाळी देवाचे स्टेटस लावल्याने तो पावणार असतो का? खरं तर आपल्या वर्तनात तो असायला पाहिजे,माझा कर्म सिद्धांतावर विश्वास आहे,मी जर चांगले काम करत असेल तर त्याचे परिणाम हे शत प्रतिशत चांगलेच येतील आणि मी जर वाईट काम करत असेल आणि परिणाम चांगले येवो म्हणून देवाला पूजत असेल तर तो देव एवढा मूर्ख आहे का की तो मला चांगले फळ देईल. नुकताच शिर्डी,शनी शिंगणापूरला आम्ही फिरून आलो,ह्या स्थळांना आज धंद्याचं स्वरूप आलेलं आहे,मंदिराच्या आजू बाजूला बसणारे श्रद्धाळू लोकांना एवढे लुटतात की भगवान के घर मे अंधेराही है असं मनोमन वाटतं, मंदिराशेजारी बसणारा तो दुकानदार अर्धा पाव पेढा आणि एक नारड जेमतेम शंभर दीडशे रुपयाला मिळतो तो भक्तांना तीनशे रुपयाला टिकवतो म्हणजे बाजूला साक्षात देव आहे आणि तो भक्ताला लुटतोय,त्याला देवाची भीती वाटत नाही का? पण हा बिझनेस आहे आणि तो दुकानदार देवाच्या नावावर मूर्ख भक्तांना लुटायला मोकळा आहे.दुसरी गोष्ट- खुद्द मंदिरात देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर पैसे मोजून तुम्ही व्हीआयपी दर्शन घेऊ शकता,साध्या रांगेत न लागता.म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तर रांगेत उभ्या राहून वाट पाहणाऱ्याच्या नाकावर टिच्चून तुम्हाला देवाची लवकर भेट घेता येते.हा कसला देव दरबारी न्याय ठरतो? दुसरं उदाहरण घेतो,जेंव्हा आम्ही शनी शिंगणापूरला उतरलो तेंव्हा बसवाल्याने बरोबर ज्या दुकानदाराशी सेटिंग होती त्या ठिकाणी उतरवलं,सेटिंगची गोष्ट नंतर कळली.माझ्यासोबत माझी बायको,आकडसासवा होत्या,बाया आधीच देवभोळ्या असतात,बसमधून उतरताच त्या दुकानदाराने आपल्या दुकानात नेले,त्याचे दोन चमचे कार्यरत होतेच,हातात दोन टोपल्या त्यात पुजेचं साहित्य,तेल असं साहित्य होतं, आमच्या प्रत्येक बाईच्या हातात त्यांनी टोपली ठेवली आणि शनी महात्म्य सांगायला सुरुवात केली,ते महात्म्य ऐकून शे दोनशेला मिळणारी टोपली त्याने प्रत्येकी सातशे रुपयात यांच्या उरावर मारली,तेंव्हा ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही की याने सर्वाना गंडवलं! त्या टोपल्या घेऊन सर्वजण पूजेला निघालो,पूजा करून झाली,तेथे टाकलेलं तेल एका ठिकाणी जमा होत होतं आणि ते तेल पुन्हा शुद्ध करून विकायला काढतात याची मला तर खात्रीच झाली पण शनिदेव आहे आपण उलट विचार केला तर शनी आपल्या मागे लागेल अशी पक्की भीती आधीच त्या दुकानदाराने भरवली असल्याने कोणी ब्र काढायला सुद्धा धजावत नव्हतं,पूजा झाल्यानंतर रस्त्याने येताना सहज म्हणून आमच्या बायांनी दुसऱ्या दुकानदारांना पूजेच्या समुग्रीच्या किमती विचारल्या, सटकन बायांच्या मेंदूचा फ्यूज उडला, त्यांनी टोपलीचा रेट केवळ तीनशे रुपये सांगितला,साहित्य तेच होतं,मग आपल्याला गंडवलं गेलं याची बायांना मनोमन खात्री झाली,त्या तळतळ करीत ज्या दुकानातून आधी साहित्य घेतलं त्या दुकानात आल्या,त्याला जाब विचारायला सुरुवात केली, बायांनी अशी धुलाई केली की रांडलेक मोंड्यापासून शनी तुले घेऊन जावो कुत्र्या,तुझ्या रिठावर दिवा नाही राहो इथपर्यंत शिव्या घातल्या पण त्याचा तर धंदा झाला होता,अशा कित्येक बाया रोज येतात जातात त्याने त्याला काहीच फरक पडत नसतो तो कशाला ऐकेल! मग प्रश्न असा पडतो की बाजूला शनी असताना तो असे पाप करतोय तर शनी का त्याच्यावर कोपत नाही,पूजा करणाऱ्या भक्तांवरच तो कसा काय कोपू शकतो? तो माड्यावर माड्या बांधतोय आणि आम्ही भक्त देवाचा कोप होईल म्हणून मेहनतीने कमविलेल्या पैशांचा नाश करतोय.धर्माच्या नावावर चाललेला हा धंदा सो कॉल्ड कट्टर हिंदुत्ववाद्यांना का दिसत नसेल.
आणि म्हणूनच जेथे पैसा देऊन देवाला पावन करून घ्यायचा प्रश्न येतो त्या ठिकाणी मी जाणे टाळतो. एक रुपयाही दान पेटीत टाकण्याचा मी विचार करत नाही,वेळ पडली तर एखाद्या भिकाऱ्याला एक प्लेट आलूबोंडा चारून टाकीन पण अशा गोष्टी करण्यास माझे मन मानत नाही.कोण काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,देव पुजायचाच असेल तर तो आपल्या अवती भवतीच असतो,माणसात असतो,प्राण्यात असतो,पाना फुलात असतो,मी तो पूजेन पण त्यासाठी स्टेटसवर व्हिडीओ लावून प्रदर्शन मी करू शकत नाही.
मनी नाही भाव…

