#वाटचाल
सध्या भारताची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे,घटनेची मूल्ये पायदळी तुडविल्या जात आहेत असे आपणास वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे,हा तुमचा आमचा गैरसमज आहे.भारताची वाटचाल त्यांना अपेक्षित अशी होत आहे,शूद्राला शुद्रच ठेवणे हेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे ब्रीद आहे आणि शूद्राला शूद्र ठेवण्यासाठीच एवढा आटापिटा चाललेला आहे,त्यांच्या लेखी शूद्राला शूद्र करून ठेवल्याशिवाय त्यांच्या मनातील राज्य ते स्थापू शकत नाहीत.भारतात इंग्रज आले नसते तर भारताची प्रगती झाली नसती,शूद्राला मान वर करून चालण्याची संधी मिळाली नसती,जोपर्यंत इंग्रज होते तोपर्यंत उच्च समजणाऱ्या जातींनी शूद्रावर प्रतिबंध लादण्यासाठी प्रयत्न तर केले परंतु ते अयशस्वी ठरले कारण इंग्रज हा भेदभाव पाळत नव्हते.परंतु इंग्रज जाताच इंग्रजांचीच नीती त्यांनी वापरण्यास सुरुवात केली,फोडा आणि राज्य करा! आणि आज ते यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत.
#गुंगीचे_औषध
त्यांनी सर्वात अगोदर काम कशावर सुरू केले असेल तर लोकांच्या मनात धर्म बिंबविण्याचे आहे,धर्म अफूची गोळी आहे आणि धर्माची नशा सहजासहजी उतरत नाही हे ते जाणून आहेत.जनता अडाणी असेल तर तिला कसेही वाकवता येते हे गणित त्यांना जमलेले आहे,म्हणून जनतेला कशाप्रकारे अडाणी ठेवता येईल याचे रोज ते निरनिराळ्या माध्यमातून प्रयोग करत असतात.जनता शिक्षित असेल तर ती सत्तेला प्रश्न विचारते,आपल्या अधिकारांबद्दल सजग होते हे त्यांनी हेरले आणि यावर रामबाण औषध शोधून काढले ते “धर्म”. धर्म हा आस्थेचा विषय आणि आपल्या धर्मावर,धर्मातल्या चुकांवर कोणी काही बोललं की आपलीच माणसे आपल्याच माणसांवर तुटून पडतात,त्यांचा सनातन धर्म हिंदू धर्माच्या पडद्याआड असा काही काम करतो की त्यांना अपेक्षित असलेले हिंदू धर्माचे रोबोट त्यांचे काम सहज पार पाडतात.मूळ हिंदू जणांना अजूनही त्यांनी कळू दिले नाही की त्यांचा धर्म वेगळा आणि यांचा धर्म वेगळा असतो,त्यांचा धर्म चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील उच्च स्थानावर स्वतःला स्थापित करतो तर शूद्राला शुद्रच ठेवण्याचे काम करतो.मुळात स्वतःला हिंदू समजणारे स्वतःला शूद्र कधीच समजत नाहीत हेच त्यांच्या रणनितीचे यश आहे.
#रोबोट
त्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदू धर्मातील लोकांचे रोबोट तयार करणे अपरिहार्य होते आणि आज ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत,त्यांनी मोठ मोठ्या पदांवर त्यांचे रोबोट ठेवलेले आहेत जे केवळ ऑर्डर फॉलो करतात,न्यायव्यवस्था,सत्ता,निवडणूक आयोग अशा मोठ्या असणाऱ्या स्वायत्त संस्थांवर त्यांनी रोबोटीक राज्य प्रस्थापित केले आहे,त्यांना हवे असणारे निर्णय त्यांच्याकडून वदवून घेण्याची व्यवस्था प्रत्यक्षात आणली आहे.त्यांचे निर्णय कोणत्याही कायद्याशी धरून असो वा नसो त्यांना काही फरक पडत नाही आणि त्याविरुद्ध आवाज काढायची धमक सुद्धा कोणामध्ये ठेवलेली नाही.त्यांचे निर्णय म्हणजे ब्राम्हवाक्य ते कोणालाही खोडता येत नाही.प्रत्येक संस्थेवर त्यांचे रोबोट ठेवलेले आहेत ती ईडी असो,सीबीआय असो की कोणतीही असो त्यांचा खुबीने वापर करून आपला उद्देश गाठण्यासाठी ते रोज काम करत आहेत.त्यासाठी इतर पक्षातील सर्व नेत्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्यात सामावून घेणे आहे,कोणताही नेता कितीही भ्रष्ट असू द्या त्याने काही फरक पडत नाही कारण त्यांचे ध्येय ते नाहीच.त्यांचे ध्येय हे आहे की एकसंघ भारत आपल्या ताब्यात करून त्यावर राज्य करणे,त्यांच्या आयडल पुरुषांनी लिहून ठेवलेले विचार प्रत्यक्षात आणने,एकप्रकारे तथाकथित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे ज्यात चातुर्वर्ण्य व्यवस्थेची उतरंड असेल.त्यासाठी ते लोकशाही मार्गानेच मार्गक्रमण करत आहेत,त्यांना नाईलाजाने घटनेच्या तत्वांवर सध्या चालावे लागत आहे,निवडणूक घटनेनुसार घ्यावी लागत आहे आणि त्या निवडणुकीत सरकार बहुमतात कसे आणता येईल ही काळजी ते घेत आहेत,एकदा बहुमतात सरकार आले की ते प्रत्येक गोष्ट बदलवतील इव्हन घटना देखील! अख्खी अर्थव्यवस्था ते काबीज करतील,आरक्षण संपुष्टात आणतील,स्वतःला हिंदू समजणाऱ्या शूद्रांच्या छाताळावर ते बसतील,मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या आमच्याच शूद्र हिंदूंकडून कत्तली घडवून आणल्या जातील,एसी एसटी असा कोणताही भेद असणार नाही,सगळे शूद्रात गणल्या जातील, मोठ्या प्रमाणात आम्ही कालही शूद्र होतो उद्याही शुद्रच राहू हीच ती व्यवस्था होय त्यात केवळ आमच्यावर आम्ही हिंदू असण्याचा केवळ मुलामा असेल.
#उपकार_विसरणारी_जमात
संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांनी समाजाला समतेची,बंधुतेची शिकवण दिली ती आज जवळपास पुसल्या गेली आहे,त्यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात करून त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि विचार खोडल्या जात आहे,अशात स्वतःला त्यांचे अनुयायी समजणारे मूग गिळून स्वस्थ बसले आहेत,ज्यांच्या कर्तृत्वाने ते आज नोकऱ्यांवर लागले,ज्यांना सुख लाभले ते आणि माझ्यासारखे महाभाग केवळ घर दार याच्यातच व्यस्त झालेले आहेत,जयंती पुण्यतिथी आली की मै भीम का दिवाना हूं म्हणत भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा म्हणून आपापसातच टक्कर द्यायला निघाले आहे जे की त्यांना अपेक्षित आहेत.भारताला आमच्या संस्कृतीला जे भोक त्यांनी पाडलं ते भविष्यात अधिक विस्तीर्ण होत जाईल तेंव्हा ना तुमची पिढी वाचेल ना आमची! आज समाजात त्यांच्या विरोधात नगण्य संख्या आहे तर समर्थनार्थ संमोहित झालेल्या मूर्खांच्या झुंडी…ह्या झुंडी थोपवणं कोणालाही शक्य होणार नाही.
✍️उमेश पारखी
झुंडी…

