▪️आयुष्यात पैसाच सर्वकाही नसतो पण पैशाशिवाय एकही गोष्ट होत नसते हे त्रिवार सत्य आहे,केवळ माणुसकी माणुसकी म्हणत जगल्याने ना आपलं जीवन आपण सुसह्य करू शकत ना दुसऱ्याचं भलं करता येत.माणसाकडे पैसा असेल तर सगळ्याच प्रश्नांवर मात करता येते आणि पैसाच नसेल तर तुम्हाला कुत्रं देखील विचारत नाही.एका विशिष्ट वयापर्यंत जीवनात मौज मजा ही केली पाहिजे पण जसजसे वय वाढत जाते तशी माणसाला सगळ्याच गोष्टीची किंमत कळलीही पाहिजे.आयुष्यातले महत्वाचे वर्ष म्हणजे तारुण्य आणि याच तारुण्यात पैशाचं मॅनेजमेंट जर करता आलं नाही तर तुमच्या जीवनातल्या चढत्या वयात तुम्हाला नक्कीच घोडा लागेल हे लिहून घ्या.त्या वयात आपल्याकडे पैसा आहे म्हणून जीवनात संघर्ष न करता ऐश करण्यात जर तुमचे दिवसं जात असतील तर लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जवाबदाऱ्याना तुम्ही तोंडही दाखवू शकणार नाहीत.वय जसे वाढत जाते तशा गरजा वाढत जातात,एकाचे दोन आणि दोनाचे चार होतात,आई वडिलांच्या आयत्या कमविलेल्या धनावर मारलेली मौज तेंव्हा फिकी पडायला लागते,शाळेत पोरगं जायला लागलं की त्याचा युनिफॉर्म,त्याची पुस्तकं, त्याची फीस भरायला जेंव्हा हातात पैसा नसतो तेंव्हा पैशाची किंमत काय असते ते समजून येते, तरुण वयात तोंडाला नैन्टि लावली नसती तर आज अशी परिस्थिती आली नसती असा विचार मनात यायला लागतो.त्या वयात केलेला कारभार मुळावर उठतो,त्याचवेळी पालकांनाही पोराच्या तरुणपणात आपला कंट्रोल ठेवला असता तर पोरगं बिघडलं नसतं असं वाटायला लागतं पण तोपर्यंत अख्खी फ्यामिलीच डिस्टर्ब झालेली असते.माणसाने इतकेही कमावून ठेवू नये की मुलं गायरान वागतील आणि इतकेही कमी कमावून ठेवू नये की रस्त्यावर भीक मागतील.
▪️आपली पोरं जशी जशी मोठी व्हायला लागतात तशी आपल्याला भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव व्हायला लागते,चार पैसे आपण वाचवून ठेवले असते,मागे पाडले असते तर जीवन आज जे आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने आंनदी असतं असं वाटायला लागतं.ज्याने परिस्थितीनुसार पैशाचं मॅनेजमेंट केलं त्याच्यावर आपल्या भविष्यकाळात वाईट परिस्थिती बघण्याची क्वचितच वेळ येते.माणसाला त्याचे वय जसे वाढत जाते तसे स्वतःत सुधारणा करण्याची नितांत गरज असते,तारुण्यात जी गोष्ट माणूस सहज करू शकतो ती वाढलेल्या वयात करूच शकत नाही,वयानुसार शरीर साथ द्यायला तयार होत नाही,चाळीशी पार केली की डोळे अंधुक व्हायला लागतात त्याचवेळी कम्बर दुखणे,पाठ दुखणे सुरू होऊन माणसातला ऍक्टिव्हपणाच निघून जायला लागतो आणि दवाखान्याच्या वाऱ्या सुरू व्हायला लागतात तर नेमके याउलट याच वयात पोरांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो,मुलगी असेल तर तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाचा हिशोब जुळविल्याने जुळत नाही. इतके असूनही आपण समाजातील लोकांसोबत भूतकाळात कसे वागलो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात,आपली वर्तणूक चांगली असेल तर समाजातील अनेक लोक तुमच्या कामी पडतात पण तुमच्यात काड्या करण्याची प्रवृत्ती होती असेल तर तीच लोकं तुम्हाला पायाजवळही उभे ठेवायला तयार नसतात. म्हणून वाढत्या वयासोबत आपली वर्तणूक बदलणे हे क्रमप्राप्त असते. जगात संघर्षाशिवाय कुणीच पुढे जात नाही आणि संघर्ष करण्याची तुमच्यात तयारी नसेल तर तूम्ही आयुष्यात यशाचा पल्ला गाठूच शकत नाही.खोटे काम करून,इतरांना लुबाळून तुम्ही पैसा कमवत असाल तर तो तुमच्या जवळ कधीच टिकणार नाही,हवे तर आजमावून बघा! खोटा पैसा जसा तुमच्या आयुष्यात येतो तसा दुसऱ्या मार्गांनी निघूनही जातो,तुमच्या वाईट कामाचा हिशोब कोणी वर करत नाही,त्याचा हिशोब इथेच चुकता होतो,तो ही तुम्ही जिवंत असतानाच! तुम्ही इतरांबद्दल काय भावना बाळगता यावरही तुमच्या जीवनाचा संबंध असतो,तुम्ही इतरांवर जळत असाल किंवा तुम्ही इतरांविषयी मनात वाईट चिंतीत असाल तर तीच नकारात्मकता तुमच्या जीवनात तुम्हाला अपयशाकडे घेऊन जायला पुरेशी असते. समजा एखादा आपल्यात जीवनात यशस्वी जीवन जगत असेल आणि त्याविषयी तुमच्या मनात निगेटिव्ह भावना जागृत होत असेल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार नाहीत,उलट अरे तो जर यशस्वी होत असेल तर मी का होऊ शकत नाही,यशस्वी होण्यासाठी काय करावे,यशस्वी माणसाचे मार्गदर्शन घ्यावे का असे विचार मनात येत असतील तर तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह असाल आणि तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल!
▪️पैशाचे मॅनेजमेंट नक्की कसे करावे हे जर समजत नसेल तर एक सोप्पी ट्रिक मी तुम्हाला सांगू इच्छितो. उदाहरणार्थ तुम्ही महिन्याचे शंभर रुपये कमवत असाल तर मॅनेजमेंट कसे असावे. हिशोब करून बघा.
१.शंभरातले 5 रुपये समाजातील गरजुसाठी दान,मदत म्हणून बाजूला ठेवा,ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनात नक्कीच काम करेल,उरले 95
२.शंभरातील 10 रुपये किराण्यासाठी ठेवा,उरले 85
३.शंभरातील 10 रुपये ठेवा आपल्या आरोग्यासाठी,उरले 75
४.शंभरातील 20 रुपये ठेवा,मुलांच्या शिक्षणासाठी,उरले 55
५.शंभरातील 10 रुपये ठेवा,अत्यावश्यक वेळेसाठी,उरले 45
६. आणि हे उरलेले 45 रुपये पूर्णतः बचतीमध्ये टाका, हीच बचत तुमच्या आयुष्यातील सुखाच्या दरवाजावर लावलेल्या कुलुपाची किल्ली आहे हे लक्षात ठेवा..
आणि एवढं जर आपण करत असू तर अटी आणि शर्थी तर यायलाच हव्या.हे करत असताना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.इमर्जन्सी वगळता कर्ज उरावर घ्यायच्या भानगडीत कधी पडू नका,हि उदरी आहे जी जीवनाला कुरतडून टाकत असते. हे इतकं सगळं छान मॅनेज करत असताना तुम्हाला जर बाई,बाटली किंवा जुगार यापैकी एकही शौक असेल तर तुमची तपस्या कोणत्याही शेवटाला जाणार नाही हे एका कोऱ्या कागदावर लिहून ठेवा. वर मांडलेले गणित एकदा हाताळून बघा,ते केवळ गणित नाही तो फॉर्म्युला आहे जीवन सुखी करण्याचा! आपण जगा, दुसऱ्यांनाही जगवा!
जगण्याचं मॅनेजमेंट

