नांदगाव – मनातल्या नोंदी

दिवाळी आत्ताच गेली आणि ती येणार आहे हे लहानपणी भारी कौतुकाचं असायचं,लहानपणी कित्येक दिवाळ्या आमच्या घरी,मामांच्या घरी जेवढ्या साजऱ्या झाल्या नसतील तेवढया नांदगावला साजऱ्या झाल्या.दिवाळी आली की मायेच्या मागे लागून नांदगावला जायचं हे ठरलेलं असायचं,आईच्या दोन्ही मोठ्या बहिणी नांदगावला राहायच्या, पोडेचा नांदगाव अशी ज्या गावाची ओळख आहे,त्याच गावात पोड्यांच्याच घरी दोन्ही बहिणी होत्या.माझ्या मोठ्या आई स्वभावाने अत्यंत प्रेमाळू होत्या बिलकुल जशी माझी माय होती.दिवाळीला दोन्ही मोठ्या आईची मुलं, नात्रं एका ठिकाणी म्हणजे नांदगावला एकत्र यायची.सगळ्यांच्या भेटी गाठी व्हायच्या आणि मोठ्या भावांच्या घोळक्यात त्या ठिकाणी त्यांचा अगदी लहान भाऊ म्हणून मीच होतो,मोठ्या भावांची मुलही जवळपास माझ्या वयाची होती.त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा काका असून सुद्धा त्यांच्यात खेळायचो. दोन्ही मोठ्या बाबांचे निधन अकाली झाले होते पण त्या दोघीनी संसाराचा गाडा समर्थपणे पेलला होता.कुटुंबाची मूठ आवळून ठेवली होती.याउलट आमची आणि आमच्या कुटुंबाची वाताहत झाली होती,मला पुसटशी अक्कलही नसताना बाबा दारूच्या आहारी गेले होते आणि समृद्धीनेही त्याच दिवशी आमचा हात सोडला होता.ठेच लागल्यावर माणसाला अक्कल येते तो खरा माणूस,चुक घडली असेल पण नंतरच्या काळात बाबांनी दारूला कधी स्पर्शही केला नाही.त्यामुळे संसार कसाबसा तोल सावरत उभा राहिला. मोठ्या आईंना अनपेक्षितपणे आलेलं विधावापन आणि आईच्या नशिबात आलेला क्लेश दोन्हीचा विचार केला तर आठवणी अधिक काळ्याकुट्ट होतात.
आमच्या मानाने मोठ्या आईची मुले जीवनात यशस्वी झाली होती हे मानायला काही हरकत नाही कारण ती सगळीच त्या काळात कुठे ना कुठे नोकरीला लागली होती आणि त्यामुळे अर्थातच त्यांची जीवनशैली आमच्यापेक्षा चांगल्या दर्जाची होती. त्यांच्या जीवनशैलीमुळे त्या वेळी नांदगाव मला शहर वाटायचं,त्यांना त्या काळी जे खायला,अंगावर घालायला जे मिळायचं ते आमच्या खेळयात दुरापास्त होतं. केशवभाऊ तेथे स्थायिक होता,मोठ्या आईचं घर तसम्याचं तर होतच पण त्या घराला माळी होती तिचं मला खूप अप्रूप वाटायचं.तसम्यात लाकडी पाळणा असायचा…आजही सगळं आठवतं.दुसऱ्या मोठ्या आईचं घर थोडं दूर होतं आणि छोटी मंडळी इकडे जास्त वावरायची म्हणून तिकडे दिवसातून फक्त जाणं येणं असायचं, केशवभाऊंच्या घरी दिवाळीची मेजवानी असायची,माया वहिनी आपल्या हाताने सगळे फराळ करायची,अनर्षे,चाकोल्या, लाडू असे एक ना एक पदार्थ ती करायची,तिच्या हाताला एक वेगळीच चव होती.मला तिच्या हातचे अनर्षे खूप आवडायचे,आत्ताही तो आपला फेव्हरेट पदार्थ आहेच आणि हो तिचा धाक आणि भीतीही तेवढीच वाटायची.ती शिस्त लावणारी शाळेतली मास्तरीनच वाटायची. दिवाळीच्या त्या दिवसात एकदम धम्माल असायची.आमची परिस्थिती,माझे कपडे लत्ये,माझी भाषा यावरून माझी चेष्टा मस्करी इतर लहान मंडळींकडून व्हायची पण तेंव्हा काही वाटायचं नाही.अर्थात तेंव्हा समज नावाची गोष्ट कोसभर दूर होती.ते काहीही असो पण तो गाव,ती माणसं नेहमीच हवीहवीशी वाटायची.
वेळ जाते,काळ जातो,नाते बदलतात,नात्यात दुरावा निर्माण होतो,लग्न झालं की बायकोचे नातेवाईक जवळ होतात आणि आपले नातेवाईक दूर दूर होतात,कालांतराने बायकोचे नातेवाईकही दूर होतात,शेवटी उरतो आपण आपल्याच खुराड्यात,हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे,मोठ्या आईच्या मुलांची लग्ने झाली,त्यांचे संसार उभे झाले,आमची लग्ने झाली,आमचेही संसार उभे झाले,मुलांची लग्ने झाली,हळूहळू नात्यातली आत्मीयता कमी होत गेली,कित्येक वर्षांपासून कोणाशी भेट नाही,कोणी मेलं, एखाद्याचं लग्न असलं की पाच दहा मिनिटांपूर्ती भेट होते,बहुतांशी जी लहान मंडळी मोठी झाली, आपल्या संसारात गुंतली,काम धंद्याला लागली ती मी समोर आलो तरी ओळखणार नाहीत. नातं असं दूर दूर होत जातं,काळजात ज्या आठवणी साठलेल्या असतात त्या स्वस्थ बसू देत नाही,आज कोण कुठे काय करतो हे कळणे सुद्धा कठीण आहे,मनात वाटतं की जावं भेटायला पण पत्ताच भेटत नाही आणि पत्ता मिळाला तर ओळखेल की नाही ही सुप्त भीती असते.आई,मोठ्या आई असेपर्यंत नातं कायम झिरपत राहिलं, त्या गेल्या आणि नात्यातला ओलावाच संपला. मुलीला बाबाचं घर बाप असेपर्यंत हक्काचं वाटते,एकदा बाप गेला की कोनाड्यातल्या डब्याच झाकण उघडण्याचीही उजागिरी राहात नाही,भाऊ काय म्हणेल,वहिनी काही बोलणार तर नाही अशी भीती त्या मुलीच्या मनात घर करते.असच काहीसं नात्यांच्या बाबतीत होत जातं…..…..

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी