[tta_listen_btn]
ज्यावेळेला महारांना
विहिरीवर लोकं पाणी भरायला
अर्धीच विहीर द्यायचे,
त्यांच्या सावलीलाही विटाळ मानायचे
त्यांच्या कपातला चहापण नाही प्यायचे
अगदी त्याचवेळेला माझ्या घरातल्या चुलीपर्यंत
ही महारांची पोरं बिनधास्त फिरायची,
सोबत जेवायची,सोबत खेळायची
महारांच्या लग्नात आमचे कुनबी जायचे नाही
मला आठवतं…
एका महाराच्या मुलीच्या लग्नाचं जेवण
यांच्यासाठी आमच्या घरी ठेवलं होतं
अन अख्खा गाव जेवला होता…
गावातल्या मुसलमानाच्या घरी
मी नेहमीच शिरखुरमा खायचो
ते माझ्या जिवलग मित्राचं घर होतं
दोस्त म्हणून माझ्या घरी तो आवडीने यायचा
माय तेवढ्याच आवडीने त्याला जेवू घालायची
अरे,तूच सांग यार
माझ्या मायबापाने कधी भेदाभेद केला नाही,
मला शिकवला नाही…
तो माझ्या रक्तात नाही
तर तो तू….
माझ्या मेंदूत कसा काय भरवशील?…….