अरे जे झालं ते झालं
जुनं पुन्हा आठवू नकोस
गेलेले दिवस आता
पापण्यात तुझ्या साठवू नकोस….
त्या भेटीगाठी तेंव्हाच्या
विसावा घेऊ देत नाही
मनात आलं जरी पण
जवळ तुझ्या येता येत नाही,
मोगऱ्याचं फुल तेंव्हाचं
वेड्या आत्ता पाठवू नकोस….
गेलेले दिवस आता
पापण्यात तुझ्या साठवू नकोस….
तुझ्या प्रेमाची माझ्याने
ना कधीही किंमत झाली
काळजातुन बाहेर यायला
ना हुंदक्यांची हिम्मत झाली,
थरथरणाऱ्या ओठांना माझ्या
तुझ्या ओठांनी गोठवू नकोस
गेलेले दिवस आता
पापण्यात तुझ्या साठवू नकोस….
तू आलास दारावरती
नजरेला नजर थेट झाली
ओळख न दाखविताही
तुटलेल्या मनांची भेट झाली,
काळजावर दगड ठेवून आता
उरलेल्या भावनांना पेटवू नको
गेलेले दिवस आता
पापण्यात तुझ्या साठवू नकोस….