[tta_listen_btn]
दोस्ता
हो तुझ्यात आणि माझ्यात
फरक आहेच,
मी हाफ प्यांट वर पैदल
शाळेत निघायचो
तू फुल ड्रेसमध्ये कॉन्व्हेंट मध्ये
रिक्षाने जायचास
जातांना मम्मी पप्पांना
बाय म्हनायचास
तेव्हा माझी आई शर्टाची
तुटलेली गुंडी शिवून देत असायची
अन बाप आकाशाकडं
एकटक बघत असायचा…
तू जेव्हा नव्या कोऱ्या सायकलने
फुल प्यांटात
कॉन्व्हेंट मध्ये जायला लागलास
मी मात्र शाळेत ताराची थैली घेऊन
तसाच पैदल जायचो…….
माझ्याकडे सायकल आली
तेव्हा तू
दुचाकीवर स्वार झालेला दिसलास
मी कोस दरकोस सायकल
चालवून शाळेत यायचो तेव्हा
तूला लपून
सिगारेट ओढतांना पहायचो
तू आजही जीवनातले
शौक पूर्ण करतोयस!
मला माहीत नाही
तू किती उंचीवर गेलास…
पण
मला अभिमान आहे
मी कुडाच्या भिंतीआड
गरिबीचा दिवा घेऊन
जिंदगीतला उजेड शोधण्यात
यशस्वी झालो….