[tta_listen_btn]
तुम्ही आमच्यासाठी काय केलं
हे आज विचारू नका
आमच्या मनात आत्ताही तुमचा तिरस्कार
ओतपोत भरलेला आहे!
आमच्या मनाच्या कोपऱ्यातून तुमची जात
कधी नष्ट होऊ देणार नाही
अशी व्यवस्थाच निर्माण करण्यात
“ते” यशस्वी होताहेत…
या व्यवस्थेला जेवढे “ते”
तेवढेच आम्ही स्वतःला
तुमचे सैनिक म्हणवून घेणारेही जवाबदार आहोत
तुमच्या नावाचा वापर आणि
तुमचा फोटो कुठे वापरायचा याचे कसब
“ते” शिकतांनाच
आम्ही सैनिकांनीही शिकून घेतले
तुमच्या विचारांशी आज काय देणं घेणं
तुमच्या नावावर आम्हाला सत्ता गाजवता येते
तर सैनिकांना सत्तेचे पाय चाटता येतात
स्वतःचे रिकामे पोट भरण्याचा आनंद घेता येतो…
तुम्ही किती झटलात हे सांगण्यासाठी
कुठेतरी एक निखारा पेटतांना दिसतो
तर तुमची मूर्ती फोडताना असंख्य शूद्र दिसतात….
तुम्ही फक्त विहारापूरते आणि केवळ जयंतीपुरते
शिल्लक राहणार का असा भाबडा प्रश्न पडतो
कारण
आम्ही कधीकाळी शूद्र होतो हे विसरलोय तुमच्यामुळं
आणि
तुमच्या विचारांचं घोंगळं नावापुरतं पांघरून
आम्ही साधतोय स्वतःचा स्वार्थ….
दलाली करून…..