[tta_listen_btn]
▪️राम बोढेकर सरांच्या एखाद्या पुस्तकावर माझ्या सारख्या पामराने लिहिणे म्हणजे तेजोमय सुर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखे होय.विपुल ज्ञान संपदा लाभलेले अत्यंत साधे संयमी असे हे व्यक्तिमत्व आहे.सरांसोबत माझी फारशी ओळख नाही,माझा मित्र प्रख्यात लेखक,कवी डॉ.किशोर कवठे यांच्या सहवासात त्यांची ओळख झाली.त्यांच्याबद्दल माहिती मिळाली,त्यांची एक दोन वेळा भाषणं ऐकण्याची संधी मिळाली,त्यांची वक्तृत्वशैली एवढी सुंदर आहे की ते बोलताना नुसतं ऐकत राहावं असं वाटतं.एवढा मोठा माणूस स्वतःला मी कुणी मोठा प्रतिभावंत नाही असे प्रांजळपणे कबूल करतो त्यावेळेस त्यांच्या मोठेपणाची व्याप्ती आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.अशा व्यक्तीचे क्षणभर का होईना सानिध्य लाभले तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.
▪️काव्यसंग्रह वाचायला घेतला आणि त्यांनी जी कृतज्ञता व्यक्त केली त्यात किशोर कवठे,मनोज बोबडे,रत्नाकर चटप,विजय सोरते, इरफान शेख,चंदू झुरमुरे,जयवंत वानखेडे,राम रोगे, अविनाश पोईनकर इत्यादी साहित्यातील नामवंत लेखकांच्या पंगतीत माझ्या सारख्या सामान्य माणसाचे नाव पाहून आश्चर्याचा धक्काच बसला,सरांचा फारसा सहवास नसताना माझ्या सारख्या लहान माणसाची आठवण त्यांना असावी ही बाब माझ्यासाठी खूप मोठी आहे.तसेच सरांनी त्यांच्या प्रोत्साहन आणि लेखनाचे मुख्य स्रोत म्हणून सौ.चंदा मॅडम यांना प्रांजळपणे सांगितले आहे,ही मॅडमसाठी सरांनी दिलेली प्रेमाची एक पावतीच आहे.
▪️मी आज आपल्याला त्यांच्या एका पुस्तकाचा परिचय करून देऊ इच्छितो,सरांनी हा काव्यसंग्रह पोष्टाने पाठवला,तो लवकर मिळालाही परंतु माझ्या सतत बाहेर असण्याने पुस्तक वाचू शकलो नाही आणि न वाचल्यामुळे काही लिहुही शकलो नाही परंतु आज पुस्तक वाचायला घेतले आणि त्यावर लिहिण्याचा मला मोह आवरता आला नाही.अर्थातच मला लिहिण्याची खूप आवड असल्याने मी लिहीत असतो,मी साधा वाचक आहे,मला समोर येणाऱ्या पुस्तकातून उणिवा काढून समीक्षक असण्याचा खोटा आव आणायचा नाही.प्रामाणिकपणे वाचणे आणि जे सुंदर ते टिपणे एवढेच माझे काम आहे,मी रसिक आहे साहित्याचा,बस्स एवढेच!
📚काव्यसंग्रह : मनातलं सारं काही
✍️कवी : प्रा.डॉ. राम बोडेवार
📍हक्क : सौ.चंदा राम बोडेवार
📇प्रकाशक : मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
🎯मुखपृष्ठ : श्री.सुदर्शन बारापात्रे
▪️प्रस्तुत काव्यसंग्रह हा सरांच्या तरुणपणातल्या सुंदर,निर्मळ,प्रेमळ भावनांची गुंफण आहे,प्रेम एक वैश्विक सत्य आहे,त्याच्याशिवाय सारेच शून्य असे सरांचे प्रामाणिक मत आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य कोणालाच नाकारता येऊ शकणारे नाही.प्रेम ही भावनाच माणसाला माणसात आणण्यास पुरेशी असते,जगाला युद्धाने नव्हे तर केवळ प्रेमानेच जिंकता येते हे अंतिम सत्य आहे.
▪️मनातलं सारं काही काव्यसंग्रहाला विदर्भातील साहित्यश्री,आचार्य ना.गो.थूटे सर यांची अतिशय सुंदर प्रस्थावना लाभली आहे तर श्री.सुभाष उसेवार”विश्वकर्मा” यांनी काव्यसंग्रहाचे अतिशय उत्तम अवोलकन केले आहे.
▪️प्रस्तुत काव्यसंग्रहात एकूण ५८ एकापेक्षा एक दर्जेदार कवितांचा समावेश असून कविता वाचताना आपण एका वेगळ्याच विश्वात भ्रमण करायला बाध्य होत जातो.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी कवितेचा रसिक आहे,कवितेतील व्याकरण,ताल,लय याकडे मी फारसं लक्ष देत नाही की ती समीक्षा मी करत नाही,कवितेतून वाचकाला समाधान किती मिळते ते महत्वाचे या मताचा मी आहे.
▪️काव्यसंग्रहाची सुरुवात “प्रतिभेस” “वसुंधरेस” “मधुबाला” आणि “श्यामला” या कवितांनी होताना आपणास दिसून येते,कवी आपल्यावर प्रतिभेची आणि वसुंधरेची कृपा असावी असं आवर्जून व्यक्त होतात तर मधुबाला ती अशी
“मधुमय मधुगात्री, मनोहारी मधुयुक्त तू मधूबाला, मधुबंध मधुर, मधुहृदयी उफाळे मद्यमय मधुज्वाला, मधुसुधा, शृंगार, मधुसुंदरी मदीराक्षी हे मधुनीला, नेत्र! छे.. मधुबंध-मधुकलश मदीरामय मधुशाला.”
▪️कवितेतला प्रेम हा विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि अतिशय प्रेमाचा विषय आहे आणि या विषयावर लिहायला मला जाम आवडते,प्रेम ही निष्काम भावना,ती पवित्र आणि तिचे पावित्र्य जपण्यासाठी मी कायम प्रयत्नरत असतो.
“संभ्रमातून सौन्दर्याकडे
की
सौन्दर्याकडून संभ्रमाकडे?
तुझ्या सौन्दर्य सागरात
कशाचाही अंत नाही
▪️अहा…. अशा ओळी वाचून संभ्रमात पडणार नाही तो वाचक कसला? सौन्दर्य सागरात कशाचाही अंत नाही. जो माणूस निस्सीम प्रेम करतो,तिचे सौन्दर्य मनात साठवतो,त्या भावणेलाच अंत नसतो परंतु ही भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचेल की नाही याचा ठावठिकाणा नसतो,मग तो स्वतःशीच तळजोळ करतो आणि विचारतो
मी ह्या अनिश्चिततेच्या
कालक्रमात
तुझ्या सुखद विरहलहरीच्या
मधूशालेत कुठपर्यंत भटकू…?
▪️अशा सुंदर कवितांची मधूशाला म्हणजे सारं काही मनातलं!
तुझे लावण्याचे रूप,
आहे यौवनाचे माप
भुंगे उडती अमाप, तुझ्यावरी –
गडे तारुण्याची वेल,
वाढे मस्त नखरेल
फुले फुलूनी येतील, उपवनी
फुला-फुलात पराग,
तुझ्या ओठी अनुराग
घाली मोह तुझा रंग, मजला ग
बोला-बोलात सुगंध,
उडे प्रेमाचा तो गंध
वाहे प्रेमे मकरंद, मुखातून
तीर नयनांचे दोन,
पाहे तुझे निरखून
तोल जाईल सुटून, सखे माझा
त्यात आहे तरी काय,
मन धावोनिया जाय
तुझ्या गालीची ग साय, ओढी मला
कुठे लागे ना हे मन,
आसे आलिंगणी तन
तुझ्या प्रेम विरहानं, वाढे व्यथा
जावे नेत्रात विरुन,
साऱ्या जगा विसरुन
तुझ्या कुशीत शिरुन, राहो सदा
▪️कवितेतील एक एक शब्द मन प्रफुल्लित करतं तर कविता आपल्या भूतकाळातल्या आठवणींना जागं करतं, तिची एक एक विस्मृतीत गेलेली अदा,लकब प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलायला भाग पाडते.
माणूस कितीही कोणाच्याही प्रेमात पडला तरी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना विसरू शकत नाही,आपल्यासाठी त्यांनी केलेले कष्ट हे अनमोल असतात,त्यांनी आपल्यासाठी केलं म्हणून आज आपण हे दिवस बघत आहोत याची जाणीव प्रत्येकाला असते आणि ज्यांना नसते तो माणूसच नसतो! ती जाणीव शब्दरूपाने कवी रेखाटतो तर ज्यांना शब्दात लिहिता येत नाही ते कवींच्या शब्दात आपल्या भावना शोधत असतात.सरांची बाबांवर लिहिलेली कविता वाचून आपल्या आईबाबानीही आपल्यासाठी किती कष्ट केले असतील याची जाणीव ही कविता वाचून प्रत्येकालाच झाल्याशिवाय राहणार नाही.
कर्मयोगी माझा बाप
उंच मचानी बैसुनी, मी ती पाखरे हाकतो,
केली गोफण खुबीची, दगड तो भिरकावतो.
पक्षी उंच उंच जाई, भारी मौज अशी वाटे,
टंच दाणे भरलेली, डुले कणसाची ताटे.
किती हाकला तयांना, येती फिरुन फिरुन,
येती थवेच्या थवे ती, जणू कमानी करुन.
सारं शिवार हिरवं, शालू धरेचा हिरवा,
झालं मन ही हिरवं, फुले फुलांचा ताटवा.
किती राबता राबता, सुख आलेया हे दारी,
घास जाईल का तोंडी, भीती मनाला ही न्यारी.
घाम गाळत गाळत, राबे बाप धुऱ्यावर,
माय संग-संग त्यांच्या, भारा घेई डोईवर.
▪️बाप शेवटी काय करतो,शेतात राबणारा बाप अविरत घाम गाळतो,आपल्या चिल्या पिल्याना कसलाही त्रास होऊ नये म्हणून रात्रंदिस झटत असतो,त्याचे यतार्थ वर्णन ह्या कवितेतून आपणास दिसून येते.
कर्मयोगी बाप माझा, गीत श्रमाचे हे गाई,
पाहुनिया त्याच्याकडे, ऊर भरूनिया येई.
▪️कर्मयोगी असलेला बाप पाहताना,सदा श्रम करणारा बाप पाहताना अभिमानाने आपला उर भरून नक्कीच येत असतो,त्याच्या श्रमाचे मोल आपण आपल्या अख्या आयुष्यात चुकवू शकत नाही.
माणूस कुणा म्हणावे? हा खरच सर्वाना विचार करायला लावणारा प्रश्न आहे,स्वार्थीपणामुळे माणसातली माणूसकी लोप पावत चाललेल्या या जगात माणूस शोधून सापडेणासा झाला आहे आणि ही माणुसकी खोट्या नाट्या पुराणात कैद झाली आहे.
माणूस कुणा म्हणावे, शोधून सापडेना
माणुसकी कैद आहे, खोट्या भ्रमी पुराणा.
माणसाच्या रुपात शैतान पदोपदी वावरताना दिसत आहेत,ढोंगीपणा ठासून भरलेल्या माणसाचा चेहरा एक आणि कृती विपरीत आहे.
रूपात मानवाच्या, शैतान संचारिलाहे
घेऊन सोंग सारे, अहमास पोसताहे.
मी मी पणात गेले, जीवीत असून मेले
नाहीच नोंद कोठे, आले कधी न गेले.
अंधारले हे विश्व गगनी असून सूर्य
शोधून सापडेना, गेला कुठे तो आर्य.
दडपून भावनांना, जगणेच व्यर्थ आहे
संघर्ष हेच जीवन, त्रिकाल सत्य आहे.
▪️मी पणात जगणाऱ्या प्रत्येकाने विचार करावा,ते जिवंत असून मेल्यासारखे आहेत,जे समाजाच्या कामी पडत नाही त्यांची नोंद कुठल्याच दफ्तरी होत नाही.यावर उपाय म्हणून प्रत्येकाने आपल्यातल्या मी पणाला बाजूला सारून जगाकडे पाहिले पाहिजे मग जग तुम्हाला आपोआपच निर्मळ दिसायला लागेल,कुठेही स्वार्थीपणाचा दर्प येणार नाही.जीवन म्हणजे संघर्ष आहे आणि हेच अंतिम सत्य आहे.
▪️सरांच्या कविता वाचताना अत्यंत सहज सुलभ वाटतात,कवितांमधून एक विशिष्ट संदेश येतो परंतु त्या कवितेचा आशय शब्दात मांडणे म्हणजे साहित्याच्या महाकाय डोहात बुचकाळ्या खण्यासारखे काम होय.जे साहित्य मेंदूला चालना देतं, एक जगण्याचं बळ देतं ते खरं साहित्य! सरांच्या प्रत्येक कवितेतून वाचकाला काही ना काही अवश्य मिळतं, जे अनपेक्षित असतं!
अशीच एक कविता मनाला चटके देऊन जाते,मन भरून येतं.
आपल्या प्रेमाची कहानी
मला अमृताच्या शाईनं
लिहायची होती
पण…
तू रक्ताच्या शाईन
लिहिण्यास मला
मजबूर केलंस
प्रीतीचे पुष्प
स्नेहाच्या दोरीत ओवतांना
मला
अनुरागाचा रंग
उधळायचा होता
पण…
तू द्वेषाच्या सुने
टोचण्यास
मला
मजबूर केलंस
मेहंदीचा हात हातात घेऊन
मनीच्या मलिकेला,
हृदयाच्या आर्ततेत
सजवायचे होते
पण…
तू मधुर स्वप्नांच्या मानेवर
कुठाराघात करण्यास
मजबूर केलंस मुखचंद्रापुढे
तुझ्या शशीला तुच्छ लेखून
मोत्यांनी तुझा भांग मला भरायचा होता पण…
तू सूडाने कुंकू
पुसावयास
मला
मजबूर केलंस
संसार सागराच्या नावेत
कर तुझा करात घेऊन
जीवनातल्या संघर्षाशी लढायचं होतं.
मला
पण…
एकट्यालाच
या भोवऱ्यात बुडण्यास
तू मजबूर केलंस…
▪️हा काव्यसंग्रह माझ्या आवडत्या पुस्तकातील एक पुस्तक झाले,मनाला भावणारी तजेलदार भावना उलगडणारी शब्दसंपदा माझ्या पदरी पडली,मला याच पुस्तकावर पुन्हा भरभरून लिहायचे आहे,कामाचा अतिरिक्त व्याप सध्या आहे त्यामुळे लिहिणं थोडं अवघड झालय! आपण सर्वांनी एकदा नक्कीच वाचावा असा हा काव्यसंग्रह आहे.
आपल्या माणसांच्या साहित्यावर मला लिहायला,बोलायला आवडतं, माझं जेवढं अवलोकन आहे तेवढं करायला आवडतं, मी साहित्यातील ज्ञानी नाही की पंडित नाही,मी वाचक आहे.