[tta_listen_btn]
◆प्रबोधनकार म्हटलं की सर्वात आधी आपल्याला आठवतं ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि या नावाबरोबरच आठवतात प्रबोधनकारांच्या विपरीत वागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आचार! सामान्य माणूस जो प्रबोधनकारांचे विचार ग्रहण करतो अगदी त्याच वेळी त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की प्रबोधनकारांचे पुरोगामी विचार बाळासाहेबांनी का आचरणात आणले नसतील? का बाळासाहेब प्रबोधनकारांच्या विचारांवर चालले नसतील? पण बाळासाहेब हे राजकारणी होते आणि राजकारणात जनतेला मूर्ख केल्याखेरीज,त्यांच्या भावनांशी खेळल्याखेरीज राजकारण करता येत नाही हे बाळासाहेबांनी हेरले आणि प्रबोधनकारांच्या अगदी विपरीत जो जनतेच्या काळजातील अत्यंत भावनिक मुद्दा होता तो “धर्म” हा अजेंडा म्हणून वापरला आणि प्रबोधनकारांच्या विचारांना हरताड फासला तो कायमचाच!
◆प्रबोधनकार हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं,प्रबोधनकारांचे कुटुंब हे पुरोगामी विचारांचे होते,प्रबोधनकारांना घडविण्यामागे त्यांच्या आई ज्यांना मातोश्री म्हणल्या जात असे त्यांची फार मोठी भूमिका आहे,त्याकाळातही त्यांच्या आई कोणताही भेदभाव मानत नसे,ज्या काळात अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ पाळत असे त्याकाळात मातोश्रीनी कधी प्रबोधनकारांवर तसे संस्कार होऊ दिले नाही.प्रबोधनकारांचे कुळ हे कायस्थ प्रभू आहे,मुळातच ते पुरोगामी होते,जे सत्य ते सत्य म्हणून जनमानसात सत्य आणण्यास ते कधी मागेपुढे पाहत नसत आणि त्यावेळच्या ब्राम्हण समाजाचा ढोंगीपणा समोर आणण्याचे मोठे काम प्रबोधनकारांनी केल्याने ते ब्राम्हण समाजाचे १ नंबरचे शत्रू बनले.म्हणून आजही ब्राम्हण समाजाला त्यांच्या नातवांचे नेतृत्व मान्य नाही.
◆त्यांनी “कोदंडाचा टणत्कार” हा ग्रंथाद्वारे सातारच्या छत्रपती प्रतापसिहाचा सत्य इतिहास बाहेर आणला ज्या इतिहासाने त्यावेळच्या ब्राम्हणांचे टाळके गरम झाले आणि प्रबोधनकारांवर पेटून उठले.अगदी त्याचवेळेस छत्रपती शाहूमहाराजांच्या “वेदोक्त” प्रकरनाचे पडसाद अख्या महाराष्ट्रात पडत होते आणि शाहू महाराजांनी प्रबोधनकारांचे कर्तृत्व पाहून आपल्याकडे बोलवून घेतले.प्रबोधनकारांनी नुकतेच “भिक्षुक्षाहीचे बंड” हे पुस्तक लिहिण्यास घेतले होते त्या पुस्तकास ५ हजारांचा चेक देऊन हे पुस्तक लवकर छापून आमच्याकडे दोन हजार प्रति पाठवा असे सांगून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना प्रोत्साहित केले.अशाप्रकारे प्रबोधनकार सत्यशोधक चळवळीशी जोडल्या गेले.
■देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात नेमके प्रबोधनकारांना काय सांगायचे आहे त्याचा केवळ सारांश या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.निसर्ग नियमांनुसार कालानुरूप प्रत्येक गोष्ट ही बदलत असते,कधी काळी लहान असलेलं मुल हे अठरा वर्षानंतर पिळदार शरीरयष्टीचं होत असतं अगदी नेमकं तेच की कधीकाळी दगळावर लावलेला शेंदूर घसरून पडल्यास तो देव एखाद्याला केवळ दगळ दिसू शकतो,जुनं ते सोनं म्हणून प्रत्येक गोष्ट आजच्या भावाने कधीही विकल्या जाऊ शकेल असे होत नाही,एखादया काळात पुण्यवान वाटणाऱ्या गोष्टी आजच्या काळात तंतोतंत लागू पडणार असेही होत नाही.
■हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गौडबंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिन बुडाचे पिचके गाडगे” यापेक्षा यामध्ये दुसरे तिसरे काहीच नाही असे स्पष्ट मत प्रबोधनकारांनी या पुस्तकात मांडले आहे,त्याकाळी भारतात फार मोठा दुष्काळ पडला त्याकाळातही भटांवर मात्र दुष्काळाची सावली देखील पडली नाही,धर्म,संस्कृतीच्या नावावर त्यांची पारायणे,प्रवचने कधी संपली नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर उपाशी मरण्याची कधी वेळ आली नाही आणि याला सर्वस्वी कारणीभूत आमचा बहुजन समाज आहे जो स्वतःला हिंदू समजून भटांनी सांगितलेल्या काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवून आपले तन,मन,धन लुटवीत असतो म्हणून त्याही काळात प्रबोधनकारांनी सांगितले की तुम्ही जीवनात भटांचे पाय पकडू नका,भिक्षुक्षाहीच्या गुप्त कट कारस्थानाचे बळी होऊ नका आणि सतत त्यांचे पाय पकडणे असेच सुरू ठेवल्यास भटेतर बहुजन समाजाचे भविष्य कधीही उज्वल राहणार नाही असा संदेश प्रबोधनकारांनी दिला होता.
■प्रबोधनकार पुढे म्हणतात आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षाही पशू बनली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटांत आहे त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे”
भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवांच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय.या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय-वसतिस्थान – ते देवालय, आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव चराचर व्यापुनि आणली वर ‘दशांगुळे उरला,’ अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरुरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालांत जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा ‘चराचरात व्यापूनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग ओसाड टाकून हिंदूच्या देवळांतच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता नकळे. ‘बौद्ध धर्म हिंदूस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत ) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत घडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्वान्नाचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण!
📕पुस्तक : देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
📙लेखक: श्री.प्रबोधनकार ठाकरे
📘प्रकाशक: डॉ.बालाजी जाधव,पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद
📗संपादन: श्री.गणेश बुटे
📗पहिली आवृत्ती: २४ सप्टेंबर २०१७
💰किंमत: ₹ ३०/-
■आदर्श शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी जोर धरू लागली तसतशी जातिभेदाची आणि देवळांची पैदास डुकरीणीच्या औलादीला बरे म्हणू लागली. हिंदूच्या देवळांची ठत्पत्ती ही अशी झालेली
■शंकराचार्यानी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सूडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती की, चालू घटकेपर्यंत बौद्धधर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदुजनाच्या मनांत बौद्ध द्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते, हे वाटेल त्या बौद्ध लेण्यांत पाहून घ्यावे, वास्तविक या विहारात किंवा लेण्यांत महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षु ‘अहिंसा परमो धर्म:’ चे तत्वचिंतन आणि भूतदया-क्षमा-शांती या सात्विक गुणांचा परिपोष व प्रचार करीत असत. शंकराचार्याचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरतांच त्यांची खाडकन स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला. ताबडतोब प्रत्येक पाण्यात एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुर्यांनी संतुष्ट करण्यात भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या. यावेळी अठरा पुराणांचीही भटी पैदास झालेली असल्यामुळे, हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरी जातिभेदाच्या घरटांत वस्त्रगाळ भरडली गेली होती. तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्यांची जाळी सताड मोकाट सुटलेली होती. माणसांप्रमाणे देवांच्याही मागे बायकामुलांची लचांडे निर्माण झाल्यामुळे, पार्वती ही जरी जगन्माता-साऱ्या विश्वाची आई असली, तरी ब्राह्मण कवींच्या कल्पनेच्या मुर्वतीसाठी तिचे गंजड शंकरांशी लग्न लागून, कधी स्मशानात तर कधी हिमालयात, भैरव पिशाच्चादि सेवक गणांच्या संगतीत तिला संसार करणे भागच पडले. सृष्टीविधात्या ब्रह्मदेवाला, सृष्टी उत्पन्न झाल्यावर, विष्णूच्या बेंबटांतून खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देव देवीची गोतावळ्यांची लफडी इतकी निर्माण केलेली आहेत की, त्यांच्या वंशवेलात सद्धधर्माचाहि थांग आज लागणे मुष्किलीचे होऊन बसले आहे. फार दूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची, तेथल्या त्या ओऱ्या, ते दिवाणखाने, ते स्तूप सांची बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा. येथे बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नाव एकविरा. हिला वेहेरची देवी असेही म्हणतात.ही म्हणे पांडवांची बहीण; हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरुन काढली. हिचा दुसरा इतिहास काय, तर ही रेणुका, परशुरामाची आई, स्वत: परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार? चैत्र पौर्णिमेची काल्याची जत्रा मोठी दांडगी, हजारो मराठे, कोळी बरेचशे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जातात. नवसापाशी शेळ्यामेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पडून ही कार्ला लेणी रक्तांत न्हाऊन निघते. जो प्रकार कार्ला येथे , तोच इतर सर्व लेण्यात जेथे असले बोकडखाऊ देव देवीचे देऊळ नाही, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धा कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरु असलेले हे ‘देवळी’ प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय? सारांश, भिक्षुकशाहींचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो, हे विसरता कामा नये.
■मनुस्मृती; पुराणे आणि देवळे असा तीन पेडी फास हिंदूसमाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्माणांनी आपल्या जातीच्या सवत्या सुभ्याचे सोवळे वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घालतांच एक जात सुधारके दुर्धारक भट सापासारखी कां फुसफुसतात, याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठे आश्चर्य वाटते. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत या तीन गोष्टी नष्ट करा, जाळून खाक करा भिक्षुकशाही रसातळाला गेलीच! प्रदर्शनासाठी तिचा वाळूवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उगविण्यापूर्वी ब्राह्मणांनी या तीन महापातकांबद्दक भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे.
■भटांनी आपले पोट भरण्यासाठी देवळे निर्माण केली,प्रत्येक भट जगला पाहिजे या हेतूने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवाचे मंदिर स्थापन केले,देवांची संख्या वाढवत वाढवत ३३ कोटींवर नेऊन भिडवली,त्यातही वेगवेगळ्या श्रेष्ठ कनिष्ठ जाती निर्माण केल्या. विष्णु पुराण विष्णु श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे, गणेशपुराणात गणेश श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी, देवीपुराणांत देवी श्रेष्ठ, बाकी पुल्लिंग देव सगळे बदमाश, अशी देवतादेवतांतच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तसंघ हिंदु समाजांत चिथाऊन दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या अहमहमिकेने साऱ्या हिंदूस्थान भर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरु झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायांत जरी आडवा उभा विस्तव जाई ना, तरी सर्व देवळांत भट मात्र अभेदभावाने देव मानवांतला दलाल म्हणून हजरच. बापभट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक भट रावणाच्या पूजेला तयारच, शिवाय एकाच गावात एकाच देवाची अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्टी संप्रदाय पडला. शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली, तरी सोमवार-पेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर, भसाड्या तळ्यावर देऊळ म्हणूनच भसाडेश्वर, बाळोबा पगडबंदाने बांधले म्हणून बाळेश्वर, फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फांसेश्वर असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चबचबीत वंगणावर सफाईत सोडवून घेतला. काकतालीय न्यायाने पुजारी बनविलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनले, पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदू देवाला गावे, जमिनी, दागदागिने आंदण द्यावी. ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटांचे. एका भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालिना २०-२५ हजार रुपयांचे वर्षासन आहे. त्यांतले जेमतेम ७-७ ।। हजार देवांच्या नावाने कसे तरी कोठे तरी खर्ची पडतात. बाकीची रक्कम संस्थानाधिपतींच्या ढेकरांत गडप. देवस्थानचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळांत दिसतात. तेवढा दिवस पार पडला की मग साऱ्या वर्षभर ते पट्टराण्या घट्टराण्यांच्या अंगावर पॉलिश होत असतात. कित्येक देवळांचा तर असा लौकिक आहे की, देवाला भक्ताने वाहिलेला मोगऱ्यांचा हार तासाच्या आत गमनाजी जमनाजीच्या बुचड्यात गजऱ्यात रुपाने अवतरतो.
■तर हा धर्म आणि भटांनी पोटापाण्यासाठी उभी केलेली मंदिरे ही आपल्या नाशाची कारणे आहेत हे समजून घ्यायची वेळ आहे,आज श्री रामाचे मंदिर उभे होत आहे,त्यावर असंख्य भट जगतील आणि आमच्या पिढ्या त्यांना आयते दान देऊन त्यांच्या पिढ्या पोसतील.मंदिराच्या आड आमचे हक्क,अधिकार ही मंडळी लंपास करतील.