[tta_listen_btn]
●कोरपना तालुक्यातील नांदा या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालेला हा माणूस मनाने मात्र फार हळवा आहे,खरे तर यांचे शिक्षण बीएससी बीएड असे झालेले असले तरी,तो प्रांत ते शिक्षण कवीचे नसले तरी कवी माणूस कुठे जन्म घेईल हे सांगता येत नाही आणि ज्याच्याकडे मुळातच हळवं मन असेल तो कोणत्याही प्रांतात कवी झाल्याशिवाय राहणार नाही.बालपण,तारुण्य ज्या गावखेड्यात गेलं,पिंजलेल्या परिस्थितीत स्वतासहित आजूबाजूला जे घळलं याचं यतार्थ दर्शन त्यांच्या कवितेतून आपल्याला पहायला मिळतं.कवितेसोबतच आता त्यांच्या बहारदार गझला समोरच्या माणसाचं मन सुन्न करून जातात,माणसात असलेला खोटा दंभ,खोटेपणा उघडा पाडण्यात त्या कसर सोडत नाहीत.मी गझलांबद्दल अजूनही अनभिज्ञ आहे,मला त्या खूप आवडतात परंतु त्यातले नियम मला अजिबात माहीत नाही,ग्रंथवसाच्या आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे मी काही समीक्षक नाही,त्यामुळे समीक्षा कशी करायची हे मला माहीत नाही,माझ्या हातून जेही लिहिलं जातं ते केवळ माझ्या मनात आलेल्या संवेदना असतात,मी वाचक याच भूमिकेतून त्या लिहीत असतो.
📕पुस्तक : काळजाची स्पंदने
📙लेखक,कवी: श्री.रामकृष्ण रोगे,नांदा,त.कोरपना,जिल्हा चंद्रपूर
📘प्रकाशक: श्री.मनोज बोबडे,सप्तरंग प्रकाशन,राजुरा
📗पहिली आवृत्ती:०७ जून २०१५
💰किंमत: ₹ ८०/-
हिंसा मजला चालत नाही,
बकरा खातो,कापत नाही…
असा रोखठोक शेर ऐकल्यावर कोणत्याही माणसाच्या मनात चलबिचल झाल्याशिवाय राहील असे वाटत नाही. काळजाची स्पंदने हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे आणि मुळातच त्यांची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळली असल्याने,जे भोगलं,अनुभवलं त्याचं प्रतिबिंबच खरे तर हा काव्यसंग्रह आहे.समाजात घळणाऱ्या घडामोडी आणि स्वतःचा शेतकरी कुटुंबात झालेला जन्म,आलेली संकटे,भोगलेल्या अडचणी याचा ताडमेळच म्हणजे हा काव्यसंग्रह!
फाटका संसार,नेटाने तारला
नाही पसरला,हात कधी…
गेली ती सोडून,मले अधांतरी
शोधतो अंतरी,माय माझी…
जीवनात साऱ्या,भोगले दुःखाला
कधी ना रडला,बाप माझा…
मायबापाच्या संसाराचा पाढा वाचतांना माय बाप किती खंबीर होते,संकटाशी झुंज देऊनही स्वाभिमान जपत होते,एवढेच नाही तर हा फाटका संसार चालवताना कोणापुढे हात पसरून कधी लाचारी पत्करली नाही.ही संसाराची वेदना अधोरेखित करणारी कविता वाचताना मी स्वतः भोगलेल्या यातनाच कवितेतून येत आहेत की काय असा भास झाला,राम सरांचे अनुभव हे खेळयात जगणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचे अनुभव असतात,त्याला शब्दांचे मूर्त स्वरूप केवळ ज्याच्याकडे हळवं मन असतं तोच आणि तोच देऊ शकतो.कुणबी म्हटलं की परंपरागत शेती हाच व्यवसाय ग्रामीण जीवनाशी जुळलेला असतो,शेती पिकली तर ठीक नाही तर हातात माती अशी विदारक परिस्थिती ही प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक वर्षी असते,वर्ष जातात पण शेतकऱ्याची परिस्थिती मात्र कधी बदलत नाही.
कर्ज व्याजाने काढते,धान्य मातीत गाडते
सदा निसर्ग कोपतो,दैव रडगाणे गाते….
शेत पाण्यात बुडाले,पीक मरोनिया गेले
अवकडा पसरली,डोळे भरोनिया आले….
वस्त्र नाही अंगावर,घाली फाटले शिवले
घरी नव्हती भाकर,पोरं उपाशी निजले…
असा परिस्थितीसमोर हतबल झालेला शेतकरी हा प्रत्येक वर्षी जगतो,हंगामाच्या पूर्वेला व्याजाने पैसा काढून बियाणे घेतो,पोटच्या पोरासारखी देखभाल करतो आणि त्याच्या पुढ्यात मात्र आस्मानी संकटे येऊन उभी ठाकतात.
जीव विटूनिया गेला,पार हतबल झाला
गळा आवळोनी दोर,जग सोडोनिया गेला…
ही शेतकऱ्याची हतबलता शेवटी त्याला मरणाच्या दारावर नेऊन सोडते,शेतकऱ्याप्रती उदासीन असलेले शासनाचे धोरण,केवळ मतदानाच्या वेळेस शेतकऱ्याला आपल्या स्वार्थासाठी वापरून घेणारा पांढरपेशा पुढारी वर्ग,पीक बुडीत झाल्यावर सरकारी बाबू वर्गाकडून नेहमी हेटाळणी खाणारा शेतकरी,पीक निघाल्यानंतर मिळत नसलेला हमीभाव,नशिबी आलेले भोग आणि शेवटी आत्महत्या सारख्या शेवटच्या निर्णयाप्रती आलेला शेतकरी! जगाला पोसणारा हा पोशिंदा जिवंत राहिला काय, मेला काय याचे सोयरसुतक कोणालाच राहत नाही आणि अशा वेळेस केवळ शेतकरिपुत्रच शेतकऱ्याची वेदना जाणू शकतो,त्याला धीर देऊ शकतो..
जाऊ नको रे खचून,मना ठेव तू काबूत
नाही हरला अजून,दोन हात रे शाबूत..
शेतकाऱ्या एवढा संयम या जगात कोणाकडेच नसतो शेवटी मैदान सोडणे आपले काम नाही,दोन हात शाबूत आहेत,दगळातूनही पाणी काढण्याची ताकद तुझ्या मनगटात आहे,आत्महत्या करणे हे षंढाचे काम आहे हे शब्द केवळ शेतकरीपुत्रच उच्चारू शकतो आणि हेच राम सरांच्या कवितेचा गाभा आहे,प्राण आहे.
●श्री.राम रोगे सरांचा फार पूर्वीपासून माझा तसा काही परिचय नव्हता,तिसरे अभंग साहित्य संमेलन बिबी या गावी पार पडले,त्यांची गझल ऐकली आणि त्यांच्या प्रेमात पडलो,बहुतांशी माझं प्रेम आंधळं नसतं नावच पारखी असल्याने माणसाची पारख मला नीट करता येते आणि व्यावहारिक अनुभव इतका आहे की बाहेरून एक आणि आतून एक वागणारी माणसे मला निश्चित ओळखता येतात.आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असो त्याने नाव कमवावे,यशस्वी व्हावे यासाठी मी माझ्या परीने काम करत असतो,समोरचा माणूस आपला तिरस्कार करतोय की प्रेम करतोय हे मी चुकून पाहत नाही,लोकांकडून काय घेता येईल यापेक्षा इतरांना आपल्याला काय देता येईल,हा माझा ठरवलेला नियम आहे,आपल्या माणसाला आपणच कसं मोठं करायला पाहिजे हाच माझा तरी ध्यास असतो,आता कधी कधी काही मित्र नाव चमकल्याबरोबर हवेत उडायला लागतात हा भाग वेगळा आणि तशा मित्रांपासून हातभर दूर सुद्धा राहतो.
पाऊल ठेवले चंद्रावर
व्यासही मोजला सूर्याचा
पण नाही सुटला ध्यास
धागा,लिंबू मिरचीचा..
काय गंमत आहे नाही,मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने असंख्य शोध लावले,पारंपारिक रूढी नष्ट केल्या,सूर्य पृथ्वीभोवती म्हणणारा माणूस,शेषणगाच्या फण्यावर पृथ्वी डोलते म्हणणारा माणूस,विज्ञानाने मानवी जीवनात प्रवेश केल्यावर सफशेल खोटा पडला परंतु आपल्या दारावर,गाडीवर मिर्ची,लिंबू बांधण्याचे तो अजूनही टाळू शकला नाही.
निघालाच नाही राशीतून
आठवा चंद्र,चौथा गुरू
विज्ञानाच्या दिव्य उजेडात
अज्ञानाचे खेळ सुरू…
आमची बुद्धी अजूनही अंधश्रद्धेच्या खोल अथांग सागरात गटांगळ्या खात आहे हे त्याचेच द्योतक आहे आणि हा अंधार कायमचा प्रत्येकाच्या जीवनातून निघून गेला पाहिजे असे शब्दरूपी काव्य काळजाची स्पंदने या काव्यसंग्रहात आपणास पहावयास मिळतात.
●आपली अत्यंत नीच मानसिकता असते,आपल्या अवतीभवती रोगे सरांसारखी दर्जेदार साहित्य निर्माण करणारी मंडळी असताना आम्ही मात्र पुणे,मुंबई सारख्या सो कोल्ड स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या भागातील साहित्याला अतोनात भाव देऊन बसतो,चातुर्वर्ण्य व्यवस्थेसारखीच समान व्यवस्था आजही साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे हे दुर्दैव आहे,आमच्या आडनावावरून पुरस्कार ठरवले जातात.जेष्ठ,श्रेष्ठ साहित्यिकांचे थवे मिळून काम करतात,पुणे,मुंबईचे साहित्य श्रेष्ठ आणि विदर्भाचे साहित्य कनिष्ठ अशा नजरेने आमच्या साहित्याकडे पाहिल्या जाते,तो त्यांचा दोष नाही,तो आपला दोष आहे,आपण आपल्या माणसाच्या संपदेस ओळखत नाही किंवा अरे हा पाहिलाच आहे घे,कालचं पोरगं आम्हाला काय शिकवते अशी हेटाळणीची भाषा आणि वागणूक आपणच आपल्या माणसाला देत असतो.घरची गंगा,टोंग्ऱ्याला सांगा अशी परिस्थिती आमच्या साहित्यिकांची आहे,आमच्यातले काही चालू साहित्यिक व्यवस्थेचे पाय चाटतात आणि त्या व्यवस्थेला पाठिंबा देतात मग ती व्यवस्था यांना पुरस्कार तोंडी भरवते.विदर्भ ही कलावंतांची खाण आहे,तुम्ही जेवढी खोदाल तेवढे हिरेच मिळतील!