[tta_listen_btn]
हा ग्रंथ मराठा कुणबी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विषमतेवर आघात करणारा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचण्यापेक्षा कृतीतून दिसावा असा खुद्द देशमुख सरांचा आग्रह असतो.
प्रा_मा_म_देशमुख सर
■प्रा.मा.म.देशमुख यांनी धनवटे नॅशनल कॉलेजला इतिहासाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे,त्यांच्या कारकिर्दीत नागपूरमध्ये जी चळवळ चालविली गेली ती नागपूरच्या इतिहासात हादरे देणारी ठरली आहे,नागपूर हा संघाचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यात एक कुणबी सत्य इतिहास बाहेर काढतो म्हणजे काय? मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक ज्यावेळेस प्रसिद्ध झाले त्यावेळेस महाराष्ट्रातील भटांवर फार मोठा आघात झाला आणि पुस्तकातील विचार पसरू नये म्हणून त्यांनी आकाश पाताळ एक केले,त्यावेळेस देशमुख सर एकाकी झुंज लढत होते,सनातन्यांनी त्यावेळी त्यांना केलेला विरोध हा महाराष्ट्रात जेवढे पुरोगामी संत होऊन गेले अगदी तेवढाच विरोध देशमुख सरांना झेलावा लागला,ह्या पुस्तकाच्या विरोधात भट मंडळी उच्च न्यायालयात दाखल झाली,एवढेच कशाला याच मंडळींनी नागपूरमध्ये विद्यापीठासमोर सरांची प्रेतयात्रा काढून पुस्तकांची होळी सुद्धा केली, त्या ग्रंथातील मुद्देच एवढे प्रखर होते की ती आग अख्या महाराष्ट्रात पसरली,आचार्य अत्रे सारख्या बलाढ्य लेखकाने आपल्या काल्पनिक गोष्टीच किती खऱ्या आहेत म्हणून देशमुख सरांचा आपल्या लेखांमधून तिरस्कार करणे सुरू केले,आजही ते मुद्दे आजच्या पिढीने वाचले तर महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही,भटांचे रामदासाला शिवरायांचा गुरू सांगणे,असे बरेच दडलेले सत्य आपल्या लेखणी आणि पुराव्याच्या आधारे बाहेर आणण्याचे काम सरांनी केले आणि त्यामुळेच भटवर्ग पेटून उठला पण काही उपयोग म्हणावा तसा झाला नाही कारण शेवटी न्यायालयात भटांना हार पत्करावी लागली, सर्व पुराव्यनिशी सिद्ध करून सरांनी शेवटी केस जिंकलीच! दि.२७ जानेवारी १९६९ ला त्यावेळच्या पुरोगामी तरुणांनी सरांची गौरवयात्रा काढून तसेच उत्तर दिले!
देशमुख सरांचे वस्तुनिष्ठ संशोधन आजही कोणी खोडू शकले नाही,हातात लेखणी आणि खांद्यावर कुऱ्हाड घेऊन लिहा म्हणून सत्यवादीकार बाळासाहेब पाटील हे त्यांच्या मागे ढालीसारखे उभे राहिले.
सरांची रामदास आणि पेशवाई,राष्ट्रनिर्माते,वंश,भाषा,श्रेष्ठत्व आणि सत्य,शिवशाही,मनुवाद्यांशी लढा,साहित्यिकांची जवाबदारी अशी बरीच पुस्तके प्रसिद्ध आहेत.
📕पुस्तक : मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
📙लेखक: प्रा.श्री.मा.म.देशमुख सर,नागपूर
📘प्रकाशक: सौ.मंजुश्री देशमुख,शिवभारती प्रकाशन,नागपूर
📗पहिली आवृत्ती: ११ ऑक्टोबर १९९३
💰किंमत: ₹ ५०/-
■मराठा-कुणबी समाजाची दशा आणि दिशा■
हे पुस्तक मुख्यतः तीन प्रकरणात विभागलेले आहे,पहिल्या प्रकरणात मराठा कुणबी समाजाची दशा,दुसऱ्या प्रकरणात मराठा कुणबी समाजाच्या दुर्दशेची करणे आणि तिसऱ्या प्रकरणात मराठा कुणबी समाजाच्या प्रगतीसाठी काय उपाय आहेत हे दर्शविले आहे.या पुस्तकात काय आहे याचा मी थोडक्यात घेतलेला आढावा आपणास देत आहे.
■लिहिताना मराठा कुणबी असे वेगवेगळे लिहीत असले तरी दोन्ही जाती जवळपास सारख्याच आहेत,कित्येक ठिकाणी मराठा कुणबी असे लिहिल्या जाते आणि जवळपास प्रत्येक ठिकाणी मराठा कुणब्यांची आर्थिक,धार्मिक,सामाजिक स्थिती देखील तीच आहे.मराठा कुणबी समाज महाराष्ट्रात संख्येच्या दृष्टीने हा सर्वात मोठा समाज असून ९५% समाज हा जवळपास खेड्यात राहतो,शेतात राब राब राबतो,शिक्षणाचा अभाव,अंधश्रद्धा,रूढी परंपरांचा प्रभाव यामुळे या समाजाचे भरून न निघणारे नुकसान झालेले आहे.या समाजाचा दुरूपयोग वर्षोनुवर्षे होत राहिला याचे मुख्य कारण समाज जागृत नसणे हे होय.समाज अडाणी असला की कुटील,क्रूर आणि स्वार्थी लोक त्या समाजाची दिशाभूल करत असतात,स्वार्थी लोक अशा समाजात आपले काही हस्तक पेरतात आणि त्या हस्तकांद्वारे जातीय तणाव वाढवतात,इतर अल्पसंख्य समाजावर अन्याय करतात,अत्याचार करतात.देशापेक्षा देव मोठा असा चुकीचा समज अशा अडाणी समाजास करून देतात,देवभक्ती,धर्मभक्ती म्हणजेच देशभक्ती होय असा गैरसमज पसरविण्यात ते यशस्वी होतात.दूरदर्शन,वर्तमानपत्रे संपुर्ण मीडिया हि एका विशिष्ट वर्गाच्या ताब्यात असल्याने हा मीडिया त्यांनाच मदत करत असतो,हे अलीकडे सुद्धा पाहिलं तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
■विषमता वाढविणारे शिक्षण ग्रामीण भागात राहणाऱ्या मराठा-कुणबी, माळी, तेली, धनगर, आदिवासी, बौद्ध, मुस्लीम वर्गैरे ८५ टक्के बहुजन समाजाच्या शिक्षणाकडे आणि प्रगतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्याचा ‘देशद्रोह’ राज्यकर्त्यांकडून घडलेला आहे. अनेक खेड्यांत शाळाच नाहीत. खेड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण उपलब्धच नाही. बहुसंख्य मुली तर प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित आहेत. थोडक्यात अधिकारी कुणाच्या मुला-मुलींनी बनावे आणि शेतकरी, गुराखी आणि कष्टकरी कुणाची मुले-मुली बनावीत’ या ‘दूरदृष्टीनेच शिक्षणव्यवस्था केलेली आहे.या व्यवस्थेला कुणी धक्का लावू नये यासाठी ते अगदी ‘दक्ष’ असतात.भटजी, शेटजी, लाटजी यांच्या वर्चस्वातून ब्राम्हणेतर बहुजन समाजाला मुक्त करणे आणि त्याची प्रगती करणे आवश्यक आहे. या स्वातंत्र्य संग्रामाचा (मुक्तीलढ्याचा) एक भाग म्हणजे हा ग्रंथ होय. स्वतःपुरते तर जनावरांनाही कळते. परंतु जो रंजल्या-गांजल्यांसाठी झटतों तोच खरा मराठा,तोच खरा कुणबी! मग तो कोणत्याही परिस्थितीत असो! यासाठी मराठा-कुणबी समाजासह ८५ टक्केबहुजन समाजाची चळवळ निर्माण होणे हे अत्यावश्यक कार्य आहे.
■कुणब्यांची आर्थिक स्थिती■
मराठा-कुणबी समाजाची आर्थिक स्थिती पाहताना त्यांचे मुख्यतः पाच गट सर्वसाधारणपणे पाहायला मिळतात.
१.दारिद्रय रेषेखालील भूमीहीन शेतमजूर मराठा-कुणबी समाज – ४० टक्के.
२.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षाही निकृष्ट राहणीमान असलेला मराठा कुणबी समाज ३० टक्के.
३.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसारखे राहणीमान असलेला २५ टक्के.
४.तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसारखे राहणीमान असलेला – ४ टक्के .
५.प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांसारखे राहणीमान असलेला ‘वरचा बहुधन मराठा-कुणबी समाज – १ टक्का
■दारिद्रय रेषेखाली असणाऱ्यांची आकडेवारी सांगताना सरकारही लपवाछपवी करीत असते. महाराष्ट्रातील मराठा-कुणबी समाजातील ४० टक्के समाज हा दारिद्रय रेषेखालील पहिल्या विभागात मोडतो.
प्रामुख्याने भूमीहीन आणि अशिक्षित शेतमजुरांचा या वर्गात समावेश होतो. यात भूमीहीन पाटील, देशमुख, चव्हाण, पवार, शिंदे, गायकवाड, भोसले सुद्धा आहेत. कुटुंबासह, कच्च्याबच्च्यांसह काबाडकष्ट करावे; तरीही अर्धपोटी राहावे आणि आजार आला की, औषधावाचून मरावे; असा त्यांचा जीवनक्रम असतो.जाहीर सभांमध्ये गर्दी जमविण्यासाठी, मतांसाठी, मोर्चासाठी, मोर्चातील गोळीबारात मरण्यासाठी आणि जातीय दंगली घडवून आणण्यासाठी असा समाज चांगलाच उपयुक्त असतो.
■मराठा-कुणबी समाजातील वरचा बहुधनसमाज इतर समाजातील व्यापारी आणि उद्योगपतींसारखा खूप श्रीमंत नाही. परंतु त्यांच्यापेक्षा त्याला बहुजनसमाजात प्रतिष्ठा मात्र फार मोठी आहे. लग्न वगैरे प्रसंगी आमचा हा ‘वरचा वर्ग आपल्या ‘कर्जबाजारीं, ‘पोकळ श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात मात्र फार पटाईत आहे. जणू काही आपण ‘अन्नदाता आहोत असेच त्याला वाटत असते. पण हाच पैसा शाळा-कॉलेज वगैरे शिक्षण प्रसारासाठी खर्च करून ‘विद्यादाता बनण्याची वृत्ती क्वचितच व्यक्तींमध्ये आढळते. असा हा छत्रपती शिवरायांचा समाज। भुकेल्यांना अन्न देणारा; मागासलेल्यांना प्रगत करणारा! त्याच मराठा-कुणबी समाजाला मागासलेला म्हणणे म्हणजे त्याचा अपमान करणेच नव्हे काय? ज्या समाजात राजे, महाराजे, संस्थानिक, सरदार, देशमुख, पाटील, मंत्री अशी बडी बडी मंडळी आहे! त्यांचा समाज दरिद्री, अडाणी आणि अन्यायग्रस्त असला तरीही तसे कुणीही म्हणू नये; सांगू नये; दाखवू नये. कारण त्यामुळे आमच्या या वरच्या ‘महान बहुधनसमाजाची सगळी प्रतिष्ठाच मातीमोल होईल!
असे मोठमोठे राजे-महाराजे, पुढारी वगैरे ज्या समाजात आहेत, तो मराठा-कुणबी समाज ९९ टक्के गरीब आहे, यावर विश्वास तरी कसा बसावा? रांजणाच्या (हंड्याच्या) तोंडावर हिरे मोती दिसल्यावर त्याखाली सगळी रेती-माती भरलेली आहे असे करोडपती किती? एवढया प्रचंड मराठा-कुणबी समाजात ज्यांच्याजवळ कोटीपेक्षा कुणाला वाटेल? जास्त संपत्ती आहे. अशा व्यक्ती किती असतील? हा प्रश्न लेखकांनी अनेकांना विचारला. “विदर्भ मराठवाडयात तर कुणीच आढळत नाही. एखाद्या पुढाऱ्याची संपत्ती कोटीच्या आसपास असेल, पण कोटीच्या वर नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तरीही समाजातील करोडपती हाताच्या बोटांवर सहज मोजता येतील एवढी त्यांची संख्या लहान आहे;” असेच सर्वांचे मत पडले. असे श्रीमंत किती? महाराष्ट्रातील भटजी आणि शेटजी वर्गातील अधिकारी, कंत्राटदार, व्यापारी आणि उद्योगपती घराण्यांत करोडपतींची संख्या शेकड्यांनीच मोजता येईल मोठमोठया शहरांत अनेक मजली इमारती, मोटार टेलीफोन,व्हिडिओ, रंगीत टी.व्ही., फ्रीझ, वॉशिंग मशीन, स्कूटर्स, वातानुकुलीत मोटारी व घरे, वारंवार परदेशात दौरे अशी कुटुंबे मराठा-कुणबी समाजात किती आणि भटजी-शेटजी समाजात किती याचा विचार केला तर हा आपला राज्यकर्ता (??) ‘मराठा- कुणबी समाज त्यांच्या आसपास तरी आढळेल काय? (त्यांच्या आसपास आमचे फक्त चौकीदार, वेटर्स, घरगडी आणि ड्रायव्हर्स असतात).
■तीन गट
मुख्यतः मराठा कुणबी समाज पुढील तीन गटांत विभागलेला आहे,
१.परोपकारी आणि परिवर्तनवादी
२.उदासीन
३.जैसे थे वादी
१.परोपकारी आणि परिवर्तनवादी – या गटात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ. पंजाबराव देशमुख वगैरेंचा समावेश होतो.
२.उदासीन – बहुधन समाजातील हा गट निष्क्रीय आहे.
३.संकुचित आणि ‘जैसे थे’ वादी – या गटातील बहुधन कुणबी-मराठयांचे भट-ब्राम्हणांशी फार सख्य असते. ते एकप्रकारे भटांचे रक्षकच असतात.
■कुणबी मराठ्यांच्या प्रवृत्तीचा अभ्यास केल्यास आपल्या असं लक्षात येईल की हा वरचा बहुधन कुणबी वर्ग आपल्याला साथ देणाऱ्यांचा सांभाळ करतो. मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो! पण विरोधात असणाऱ्यांना शत्रू मानतो. मग सख्खा भाऊ का असेना! भाऊबंदकी, मारामाऱ्या, कोर्टकचेऱ्या, दारु यामुळेही या वर्गाची संपत्ती नष्ट झाली कर्जबाजारी झालेत. फक्त गावात जुना मोठा वाडा असतो म्हणून ते मोठे दिसतात. पूर्वी वतनदार वर्ग आपले वतन सुरक्षित ठेवण्यासाठी परक्यांचेही स्वामित्व स्वीकारीत असे. आज हीच प्रवृत्ती निराळ्या स्वरूपात निदर्शनास येते. आपली प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून कोणत्याही पक्षाचे तिकीट मागणारे बरेच आहेत.
■मराठा-कुणबी समाजाची सामाजिक स्थिती
भारतातील मराठा-कुणबी समाज निरनिराळ्या नावांनी ओळखला जातो. बिहार आणि उत्तर प्रदेशांत याच समाजाला कुर्मी असे म्हणतात. आंध्र,तेलंगणामध्ये रेड्डी गुजराथमध्ये आंजन, कडवा, लेवा आणि मतिया हया कुणब्यांच्या पोटजाती मानतात शिवाय माळी, धनगर, तेली वगैरेंच्या चालीरीती कुणबी-मराठयांसारख्याच आहेत. प्रत्येक जातीत साडेबारा पोटजाती असतात असा समज आहे. मराठा-कुणबी समाजात सुद्धा पोटजाती आढळतात. तिरोळे (तिल्लोरी), धनोजे, जाधव, बावणे, भाडे, लेवे, कडवे वगैरे पोटजाती आहेत. शिवाय, पाटील, देशमुख,सप्तकुळी,पंचकुळी अशा श्रेणीही आहेत.
सोयरिकीच्या बाबतीत ९५ टक्के मराठा-कुणबी समाजाच्या सोयरिकी त्यांच्या जिल्ह्यातच होतात. ‘वरच्या बहुधन समाजातील कुणबी-मराठ्यांचे नातेसंबंध मात्र सर्वत्र आहेत. तरीही दुसऱ्या पोटजातीत सोयरीक होत नाही.
असा हा मराठा-कुणबी समाज दिसायला मोठा असला तरी बेटी व्यवहाराचा विचार केल्यास अत्यंत संकुचित आहे. प्रत्येक पोटजात ही एक वेगळी अल्पसंख्य जातच बनलेली आहे. दुसऱ्या जातीतीलच नव्हे, तर आपल्याही जातीतील लोकांना कमी प्रतीचे, खालचे मानायला तो मागेपुढे बघत नाही. कारण, अशांजवळ मोठेपणा मिरविण्यासाठी दुसरे साधन (गुणवत्ता) नसते.
देखमुखांमध्येही स्वतःला ‘सुपर देशमुख आणि इतरांना लोअर देशमुख’ मानणारे महाभाग आढळतात. सागवान (कुलीन) आणि आडजात (हलके) असे शब्दप्रयोग करण्यात येतात.
■मराठा-कुणबी समाजाच्या दुर्दशेची कारणे.
मराठा कुणबी समाजाची बरीचशी कारणे प्रस्तुत पुस्तकात सांगितलेली आहेत,कारणे आणि उपाय समजण्यासाठी ह्या पुस्तकाचे प्रत्येकाने वाचन करणे तेवढेच क्रमप्राप्त आहे.काही कारणांचा थोडक्यात मागोवा याठिकाणी आपणास घेता येईल.त्या प्रमुख कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे ह्या समाजाने शिक्षणाचे महत्व कधी ओळखले नाही.त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला म्हणावे तेवढे महत्व दिले नाही.शेतीलाच सर्वश्रेष्ठ मानले,उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी गोड समजूत अजूनही आमच्या मनात घर करून आहे.त्याचा परिपाक असा झाला की समाज ज्ञान विज्ञानापासून वंचित राहिला,मागे पडत गेला,शेतीवरच अवलंबून राहिल्याने शेतीवर अतिरिक्त भार वाढला.नोकरीची महती ह्या समाजाला पाहिजे तशी अजूनही समजली नाही.नोकरीमुळे सत्ता,पद प्रतिष्ठा मिळते,या देशातील खरा राज्यकर्ता वर्ग म्हणजे पगारदार वर्ग होय,आपली लोकशाही ही पगारदार वर्गाच्या हाती आहे,आज उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती अशी वस्तुस्थिती झाली आहे.खर्चिक रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा हे कुणबी समाजास लागलेले रोग आहेत.घरी खायला दाणा नसला तरी कर्ज काढून लग्नात लाडू जिलेबीचे जेवण झालेच पाहिजे,पाच हजार लोकांना बोलवलेच पाहिजे,मुलगा झाला तर थाटात बारसे केलेच पाहिजे,सत्यनारायण घातलाच पाहिजे अशा खोट्या श्रीमंतीच्या,दिखाऊ खोट्या श्रीमंतीच्या विळख्यात हा समाज अजूनही थिजत आहे.उद्योग व्यापार करायची तयारी नसणे हा ही एक समाजासाठी मोठा धोंडा आहे.
■स्वार्थी नेतृत्व
मराठा-कुणबी समाजाच्या प्रगतीची तळमळ असलेले सदाचारी पुढारी आणि अधिकारी भरपूर आहेत. परंतु प्रभावहीन आहेत. संघटितही नाहीत. त्यामुळे स्वार्थासाठी समाजाचा बळी देणाऱ्या नेत्यांची हिंमत वाढलेली आहे. अशा समाजघातक नेत्यांनाच (चमच्यांनाच) भटजी-शेटजी वर्ग प्रसिद्धी देतो; पुढे आणतो; सत्तेवर बसवितो. समाजातील सदाचारी पुढारी मागे पडले. अडाणी आणि भोळ्या समाजाने भटजी-शेटजींच्या हस्तकांच्या हाती आपल्या समाजाचे नेतृत्व दिलेले असते आणि त्यामुळे पुढे चालून समाजासाठी ही मंडळी काहीच करत नाही.
हीच कुणबी समाजाचीआर्थिक,सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय कार्यकिर्द रसातळाला जाण्याचे मुख्य कारण आहे,खोट्या श्रीमंतीचा हव्यास,भाऊबंधकीत झगडे तंटे,कोर्ट कचेऱ्या,आपला एखादा कुणबी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचणारी खेकडा प्रवृत्ती हे समाजासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
असा पुस्तकाचा सारांश असला तरी ह्या सर्व गोष्टीवर सांगितलेले उपाय मात्र मी याठिकाणी जाणून बुजून लिहिलेले नाहीत याचे कारण असे की तुम्हा सर्वाना हे पुस्तक खरेदी करून वाचायचे आहे.
आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आज इथेच थांबतो आणि ग्रंथवसा मध्ये उद्या भेटायला येतो एका नव्या पुस्तकासह,तोपर्यंत जय जिजाऊ,जय शिवराय,जय भीम!