नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण

[tta_listen_btn]


प्रस्तुत ग्रंथ नशीब आणि प्रयत्नवाद या विषयाची उत्कृष्टपणे सांगळ घालणारा आहे.

गड्या तू आपले
जीवन असे जग
अडल्या नडल्यांमधे
तू आपला देव बघ
अंधाऱ्या वाटेसाठी तू तारा बन
अन्
गुदमरल्या जिवनासाठी तू वारा बन..

📕पुस्तक : नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!
📙लेखक: श्री.सुनील चौधरी
📘प्रकाशक: श्री.बालाजी जाधव,पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.
📗तृतीय आवृत्ती: १९ फेब्रुवारी २०१८
💰किंमत: ₹ ३०/-

■अशा सुंदर आणि प्रफुल्लीत करणाऱ्या ओळींनी लेखकाने या पुस्तकाची सुरुवात केली आहे,प्रत्येक माणसाने बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मॉलिशपर्यंत कोणत्याही धंद्याची लाज बाळगू नये,सन्मानाने भरपूर पैसा कमवावा पण यश मिळविण्यासाठी चुकीचा मार्ग कधी निवडू नये,यश म्हणजे जीवनाचा सर्वांगीण विकास होय.टीव्ही आणि वर्तमानपत्रात आपण अनेकदा पाहतो की धनवृद्धी यंत्र घेतल्याने धनवर्षा होते,निरनिराळ्या अंगठ्या घातल्याने श्रीमंत होते,तीन चार हजाराच्या अशा यंत्रांनी आणि अंगठ्यानी जर आपल्या घरात आरोग्य,शांती, समृद्धी,सुख शांती येत असेल तर डॉक्टरांची गरजच पडली असती का आणि बैठ्या ठिकाणी असे यंत्र वापरून बिल गेट्स होता आले नसते का?.
■नशिबाची संकल्पना
नशीब, भाग्य, दैव्य, प्रारब्ध, प्राक्तन, संचीत हे एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत. आपले दैनंदिन जीवन हे अगोदरच ठरलेले आहे. कुणीतरी आपले भाग्य लिहून ठेवले आहे आणि जसे आपल्या नशिबात लिहीलेले असेल तसेच घडेल. नशिबाच्या पुढे कोणी जावूच शकत नाही. कितीही प्रयत्न केले तरी नशिबापुढे कोणाला जाता येत
नाही हीच संकल्पना आपल्या सर्वांच्या डोक्यात आहे. नशिबावर विश्वास ठेवणाऱ्यांत अडाणी व परिस्थितीने गरीब लोकांचा तर समावेश होतो. परंतु त्याच बरोबर शिकलेले व सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शिक्षक,प्राध्यापक,वकील, डॉक्टर,इंजिनिअर,साहित्यिक,कलावंत,खेळाडू इतकेच नव्हे तर काही तथाकथित शास्त्रज्ञही (?) ‘नशीब’ मानतात.
दिवसभरात अनेक वेळा अनेक ठिकाणी ‘नशीब’ हा शब्द कानावर पडल्याशिवाय राहत नाही. गप्पा चर्चेत व भाषणातही ‘नशीब’ आलेच. कुणाचे घर जळाले तर म्हटले जाते ‘नशिबच खराब’ (Bad Luck) कुणाला वेळेवर न जावूनही बस मिळाली तरी ‘दैव चांगले’ (Good Luck) कुणी आजारी पडले, दीर्घ आजाराने ग्रासले तर त्यांचे ‘संचीत’च (मागच्या जन्माचे कर्म) असे असेल त्याला कोण काय करणार असे म्हटले जाते. परिक्षेत विद्यार्था पहिल्या नंबराने आला की ‘काय भाग्यवान आहे पोरगा’ आणि नापास झाला की ‘नशिबच खोटं त्याला काय करणार आपण? कुणाचा अपघात झाला की ‘प्रारब्धाचे भोग’ आणि त्याच गाडीवर लिहीलेले असते ‘दैव जाणिले कुणी?’ तसेच कुणाला मुलबाळ झालं की ‘नशिबवान’ आहे. मुलबाळ नाही झालं की, ‘तिच्या नशिबातच नसेल तर काय होणार?’ आणि जर का एखाद्याला ‘मुलगा’ झाला तर ‘सुदैव’, आणि ‘मुलगी’ झाली की ‘दुर्दैव’ एखादा पाय घसरून विहीरीत पडला तर म्हटले जाते की ‘त्याच्या नशिबात असेल’ म्हणून तसे झाले. वरील अनेक उदाहरणांवरून नशिबाचा लोकांवर किती पगडा आहे हे आपल्याला दिसून आलेच असेल. उठता बसता क्षणोक्षणी या नशिबाचा उल्लेख कानावर पडत असतो. जीवनातील सुख दुःख हे सर्वस्वी नशीब म्हणजेच भाग्यावर अवलंबून आहे. चांगले झाले तरी नशीब व वाईट घडले तरी नशीब. त्यातूनच दैव, दुर्दैव, सुदैव अशी नावे तयार झाली. भाग्य, दुर्भाग्य, किस्मत, बदकिस्मत, Lucky,Unlucky, Good Luck , Bad Luck व परीक्षेला जाताना Best of Luck आले.
जीवनाचा प्रत्येक क्षण लोकांनी नशिबाच्या नावावर जणू अर्पण केला आहे. जीवनात यश-अपयश येतच असते. परंतु अपयशाला दुर्दैवाने तर यशाला दैवाने म्हणजेच नशिबाने ग्रासले याला जबाबदार कोण? नशीब ही संकल्पना कुठून आली असेल? काय कारणे आहेत की नशिबवाद आमच्या रक्तात इतका भिनला की ‘प्रयत्नांती यश आम्ही मान्य केले नाही? काय कारण आहे की आम्ही मानवाच्या असामान्य प्रतिभेलाच नाकारले?
■लेखकांनी आपल्या पुस्तकात प्रा.मा.म.देशमुख सरांचे एक सुंदर उदाहरण वाचकांसाठी दिले आहे,एखाद्याला विचारले की नारळात पाणी का असते? त्याचं एकच उत्तर असते “देवाची करणी अन नारडात पाणी” मग त्यालाच जर पुन्हा विचारले की “कोण्या कोण्या नारडात पाणी का नसते?” मग पुन्हा समोरच्याचे उत्तर तेच असते,”देवाची मर्जी म्हणून कोण्या कोण्या नारडात पाणी नसते” यावरून असं लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी माणूस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दैव,भाग्य,नशीब यामध्येच शोधत असतो.
प्रश्न अनेक निर्माण होतात. जे निर्माण करणेच येथे गुन्हा ठरवीला जातो किंवा याबद्दल बोलण्याचे धाडस कुणी दाखवत नाही. म्हणून नशिबवादी नेभळट, षंढ पिढी तयार होते. चिकित्सा केल्यास नशीब म्हणजे शुद्ध पळपुटेपणा, नेभळटपणा व कमजोर मनोवृत्तीचे लक्षण आहे हे आपल्या लक्षात येईल. तरीही एखाद्याला असे वाटत असेल की “नशिबात असेल तेच मिळते, तसेच होते तर मग एक करा की एखाद्या झाडाला पळत पळत जावून टक्कर द्या, जोराची टक्कर… अहो घाबरलात काय? नशिबात असेल तर तुम्हाला लागणार नाही की काहीच होणार नाही. आता आजारी पडल्यावर असेच म्हणायचे “जाऊ द्या आजारी पडणे हेच माझ्या नशिबात होते तिथे डॉक्टर काय करणार? नशिबात असेल तर आपोआप बरे होवू.” आणि हो, घरातील कपसाला आग लागून घर खाक झाल्यावर रडायचे नाही ते नशिबातच होत असे मोठ्या मनाने स्विकारायचे? अहो नशीब बलवत्तर असेल तर आपले कुणीही वाकडे करू शकत नाही असेच म्हणतो ना आपण? एक काम करा. घरातील कपबश्या घ्या आणि डोक्यावरून खाली फेका. नशीब असेल तर फुटतील नाहीतर सुरक्षित राहतील. अगदी जशाच्या तशा तुमच्या कानफटात मारली तर तुम्ही नशिबातच होते म्हणून स्विकाराल काय?
■नशीब मान्य असेल तर करून बघा…
नाहीतर नशीब नावाचे थोतांड मनातून फेकू द्या. प्रयत्नवादी जीवन जगून प्रयत्नाला बुद्धिची, विवेकाची कल्पकतेची (Imagine tion) जोड द्या आणि यशाच्या उच्च शिखरावर विराजमान व्हा! यश तुमची वाट पाहत आहे!

■नशीब अस्तित्वातच नाही. तुम्हाला नशिबाची भीती दाखवून, ज्योतिष्याची भीती दाखवून लुबाडणारे मात्र अनेक आहेत. नशिबाची तुम्हाला कोणी भीती दाखविली तर त्याच्या एक कानफटीत मारा आणि त्याला सांगा तुझ्या नशिबातच असे होते तर? चालेल काय?
■नशीब नावाच्या गोष्टीला कधी महत्व न देणारे उदाहरण आपल्याच राज्यात घडून गेले हे आपल्याला माहीतच नाही,शिवरायांचा दूरदृष्टीपणा पाहिल्यास त्या काळातही महाराज नशीब नावाच्या वृत्तीला कधी थारा देत नसत हेच आपल्याला दिसून येईल.आजही बाळ पालथे जन्माला आले तरी अशुभ घडले असेच समजले जाते. २४ फेब्रुवारी १६७० रोजी सोयराबाईंच्या पोटी पुत्ररत्न (राजाराम) जन्माला आले. परंतु त्यांचा जन्म पालथा झाला. त्यावेळी पुरोहित म्हणाले – “मुलगा पालथा जन्माला म्हणजे अपशकून झाला त्यावर शिवरायांनी जे उत्तर दिले ते लक्षात घ्या. शिवराय म्हणाले “मुलगा पालथा जन्मला म्हणजे तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही.” यावरून लक्षात येते की शिवाजी महाराज सुद्धा शुभ-अशुभ ऐवजी कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे होते. छत्रपती शिवरायांचा हा विश्वास राजाराम महाराजांच्या राणीसाहेब महाराणी ताराराणी यांनी मोगलशाही पालथी घालून सार्थ ठरविला.
तात्पर्य, तुमचे-आमचे भविष्य, नशीब किंवा भाग्य कुणी ठरवत नसते. ते कोणालाही सांगता येत नाही, आपले भविष्य आपणच ठरवायचे असते,निर्माण करायचे असते.
याव्यतिरिक्त ग्रहांच्या दोषांबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका कुशंका असतात,तेवढ्या दूर अवकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो,पृथ्वीवर अनेक देश आहेत ज्या देशात ग्रह पाहून भविष्य सांगण्याचा खोटारडेपणा नाही पण भारतातीलच लोकांना शनी कसा काय कोप करतो हा न समजणारा प्रश्न आहे,अमेरिका, जापान, चीन या देशातील लोकांवर शनी का कोपत नाही. अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या शनीची साडेसाती पृथ्वीवरील आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील,एखादया खेडेगावातील नगरात, गल्लीत, राहणाऱ्यां धडधाकट तरुणामागे शनी कशी काय लागतो? उगाच बदनाम केले आपण या ग्रहांना, अहो हे विश्व एवढे व्यापक आहे की आपली पृथ्वी म्हणजे विश्वातील एक कण आहे. मग आपण तर विश्वातील अति अति.. अति सुक्ष्म कणातले सुक्ष्मकण आहोत, तुमच्यामागे लागलायला शनी आणि ग्रह काही रिकामे नाहीत. कुठलाच ग्रह आपली कक्षा सोडत नाही आणि सोडली तर सर्व पृथ्वीचाच नाश होईल.अनेक शास्त्रज्ञ या ग्रहांचा मानवी जीवनासाठी,पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी काही उपयोग होईल का?या दृष्टीने संशोधन करीत आहेत आणि आपण या ग्रहांमुळे आपल्या जीवनावर दुष्परिणाम होतात असा गैरसमज करून घेत आहोत. ■ज्यांचे “मन, मस्तिष्क, मनगट आणि मणका मजबूत असतो ती माणसं ज्योतिष्य किंवा नशिबावर विश्वास ठेवत नाहीत” नशीब अस्तित्वात नाही. हे अर्थातच भाग्य, दैव, प्रारब्ध, प्राक्तन, संचीतही अस्तित्वात नाही. ललाटरेषा, ब्रह्मलिखित अस्तित्वात नाही.
■समर्थ रामदासाने हा दैववाद पसरविण्याचे काम त्या काळी भरपूर प्रमाणात केले ते म्हणतात “मना त्वांची रे पूर्वसंचित केले।तयासारखे भोगणे प्राप्त झाले” पूर्वसंचित म्हणजे मागच्या जन्मीचे पाप असा अर्थ घेऊन रामदासाने जे मागच्या जन्मी केले त्याचे फळ याजन्मी भोगावे लागते असे म्हटले तर त्याच काळात संत तुकोबांनी त्यांचे हे म्हणनेच खारीज केले.तुकोबारायांनी पुनर्जन्म नाकारला आहे म्हणजे साहजिकच मागच्या जन्मीचे पाप वाप सुद्धा नाकारले आहेत.
तुकोबाराय म्हणतात
“साखरेचा नोहे ऊस।आम्हा कैसा गर्भवास।।
बीज भाजुनी केली लाही।जन्म मरण आम्हा नाही।।
याचाच अर्थ साखरेपासून पुन्हा ऊस तयार होत नाही,बीज भाजून केलेल्या जमिनीत टाकल्या तरी त्यापासून झाड तयार होत नाही,त्याचप्रमाणे एकदा माणसाचा मृत्यू झाला,एकदाची माणसाची राख झाली तर पुन्हा जन्म होणे शक्यच नाही.अशा पद्धतीने तुकोबारायांनी पुनर्जन्म,नशीब,मागच्या जन्मीचे पाप वैगेरे भ्रामक कल्पना खोदून काढलेल्या आहेत.
■जगी सर्व सुखी असा कोण आहे?
ह्या रामदासाच्या प्रश्नाला उत्तर देताना सावित्रीबाई फुले म्हणतात
“जगी सर्व सुखी।असा एक आहे,विचारे मना तूची।शोधूनि पाहे।।
मन त्वाची रे।ज्ञान संचित केले।।तयासारखे सौख्य।ते प्राप्त झाले।।
ज्या व्यक्तीजवळ ज्ञान आहे,ती जगातली सर्वात सुखी व्यक्ती असते,ज्ञानासारखी श्रेष्ठ गोष्ट नाही,अज्ञानाने दुःख,दारिद्र्य ओढवले असे फुले सांगतात.विद्येमुळे मती,नीती,गती व वित्त गेले आणि आमची प्रगती रोखली असे स्पष्ट मत म.फुलेंनी व्यक्त केले,यशाचे सुख आणि व्यक्तिमत्व विकासाचे तंत्र आपण समजून घेण्याची गरज आहे.
■अपयशयावर पांघरून घालणारा शब्द ‘नशीब
जगात अत्यंत कठीण परिस्थितीशी रोज जीवघेणा संघर्ष चाललेला असतो. त्यात आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाचा आपण खूप मोठा बाऊ करतो. आपण खूप मोठ्या खड्क्यात पडल्यासारखे आपणास वाटू लागते. त्यात अपयशाचे खापर आपण नशीबावर फोडतो आणि सोयीस्कररित्या किंवा नकळतपणे आपल्या अकार्यक्षमतेवर, चुकांवर पांघरून घालतो. त्यातून फार मोठे संकट ओढावते. परंतु नशिबावर खापर फोडून आपण यशस्वी होवू शकतो काय? नाही ना! मग अपयश आल्यावर खचून जावू नका. ‘अपयशा मध्येच ‘यश’ दडलेले आहे ते शोधा. म्हणजेच आपण केलेल्या चुका कमी करा. परिस्थितीचाही विचार करा. प्रयत्नांची शिकस्त करा. जिद्द
सोडू नका. संयमही सोडू नका. यश तुम्हाला नजरेच्या टप्प्यात आलेले दिसेल. खरेतर आज आपण ज्या युगात वावरतो त्यात अडचण, अडथळे जुन्या काळांपेक्षा निश्चितच कमी आहेत. म्हणून अपयश आल्यावर खचून जाऊ नका ‘नशीबावर’ खापर फोडणे बंद करा.
■नशीबवाद – आत्मघातकी मार्ग, प्रयत्नवाद – जीवनाला ऊजळताना सूर्य,
कर्मकांड, उपासतापास, अंधश्रद्धेकडे मनुष्य वळतो. त्याला स्वत:च्या नशीबवाद म्हणजे निराशावाद तर प्रयत्नवाद म्हणजे आशावाद. नशीबवाद म्हणजे नकारात्मक विचार तर प्रयत्नवाद म्हणजे सकारात्मक विचार. नशीब वादातून नेहमीच खच्चीकरण होते. नशिबाच्या नावाने व्यक्ती आत्मपरीक्षण करून स्वत:च चुका शोधत नाही. सर्व काही नशिबाचा खेळ आहे असे म्हणून जीवनाला मरगळ येते. खचलेल्या मनात अशक्त विचारांचा भरणा वाढतो. त्यातूनच बचावासाठी विविध कर्मकांड,उपासतापास, अंधश्रद्धेकडे माणूस वळतो,त्याला स्वतःच्या चुका कळत नाही किंवा तो त्याकडे दुर्लक्ष करतो.याचा अर्थ नशीब हा स्वतःहून स्वतःच्या पायावर मारून घेतलेला धोंडा आहे.

असाध्य ते साध्य । करीता सायास ।।
कारण अभ्यास । तुका म्हणे ।।

म्हणजे जगातील असाध्य वाटणाऱ्या, अशक्य वाटणाऱ्या सर्वच बाबी प्रखर प्रयत्नाने, अभ्यासाने साध्य होतात असे तुकोबाराय म्हणतात. हाच प्रखर प्रयत्नवाद इथल्या जनतेत पेरून तुकोबारायांनी ‘वारकरी’ घडवीले. हेच वारकरी शिवरायांचे ‘धारकरी’ झाले व अशक्य वाटणारे, स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर शक्य करून दाखविले. म्हणून प्रयत्नवाद हा जीवनाला उजाळणारा सूर्य आहे. सूर्य हा सर्व जगाला प्रकाशमान करीत असतो. शिवरायांच्या प्रयत्नवादी जीवनातून प्रेरणा घेवून जगभरात अनेक प्रभावी व्यक्ती घडल्या. ज्या वेळेस माँ साहेब जिजाऊंनी आणि शहाजी राजेंनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले त्यावेळेस शिवाजीराजे सोबत फक्त शेकडो हजारो मावळे होते तर त्यांना पाच शाह्या सोबत लढा द्यायचा होता. पाण्याची कमतरता, साधनांची कमतरता यामुळे हार न मानता ‘एक मावळा, लाख मावळा तयार करून ध्येय साध्य केले. म्हणून प्रयत्नवादी माणसे साधने-संसाधने यांच्यापुढे हार मानत नाहीत तर आहे त्या घटकांचा योग्य वापर कसा करायचा हे त्यांना माहीत असते. संकटसमयी अशा व्यक्ती रडत नाहीत. तर लढत असतात. नशीबाला दोष न देता संघर्धाची परीसीमा गाठून परीस्थितीला आपल्या मर्जीप्रमाणे झुकवतात.
अशा प्रकारे हा पुस्तकाचा सारांश आहे,आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे आणि मनातल्या अंधश्रद्धा गाडून,नशिबवाद सोडून प्रयत्नवाद स्वीकारावा.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी