[tta_listen_btn]
लग्न झालं त्यावेळी माझ्याकडं कवडीची अक्कल नोयती,माह्या वयाच्या एकविसव्या वर्षीच माय बापानं पोरगं जास्त वयाचं झालं त बिघडून जाईन म्हणून लग्न उरकून टाकाचं ठरवलं,त्याले कारण बी तसच होतं,बारावी पास होऊन बीएच्या फस्ट यिअरले शिकत होतो,सोबत त्यावेळी फ्लॉपी डिस्कवाल्या कम्प्युटरचा जमाना होता,नुसत्या कमांडवर कम्प्युटर चालवा लागाचं,तो बी कोर्स सातोसात निपटवत होतो तर लग्न उरकवाचं कारण हे होतं की एक दिवस मायेलें कपडे धुतानी एक फोटो माह्या शर्टाच्या खिशात सापडला,माय तितरबीतर झाली,थो फोटो घेऊन डायरेक्ट बापाकडं दाखवाले घेऊन गेली,बापानं बी काही खातरजमा न करता लगोलग कुटलं! चांगलं पेडसल्यावर फोटू दाखवत विचारलं “काय होय बे धंदे,तुझं वय किती न अशे गायरान धंदे कराले लागला! पोरीचा फोटू खिशात घेऊन फिरतं” मले कायबी सुचत नोयतं, मजा दोष काय होता हे बी समजत नव्हतं,मंग लक्ष्यात आलं,च्या भैन ह्या फोटू करतानी आपल्याले लाथा खा लागल्या,बापाले म्हणलं “बाबा आगा हा फोटू “दिव्याभारतीचा” हो” त्यावेळेले दिव्या भारती लैस फेमस झालती, एक दोन सिनेमे पाह्यले न ती बेज्जा आवडाले लागली होती.अन् ह्याच गोष्टीचा डायरेक्ट इफेक्ट माह्या लग्नापर्यंत यिउन पोचला.पोरगं गायरान व्हाचे लक्षणं दिसत हाये म्हणून माय मनातल्या मनात पुटपुटत होती त बाप एकसारखा लालबुंद डोळे काढून माह्याकडं पाहत होता. तसा मी बी कायी धुतल्या तांदळातला नव्हतोस,शाळेतली एक पोरगी आवडाची,तिच्यासोबत उम्या मस्त बोलत राह्यते, अभ्यास करत न्हायी म्हणून मायेजवळ कोणीतरी आधीस चुगली केली होती न थी गोष्ट खरी बी होती,पण त्या वेळेले आत्ताच्या पोरायले समजते तसं प्रेम बीम काही समजाचं न्हायी,मनातल्या मनात ब्लॅक ऍण्ड व्हाइट सिनेमात जसे हिरो हिरोईन दूर दुरुनस गाणं म्हणत प्रेम कराचे तसं त्यावेळचं प्रेम होतं,आत्ताच्या पोरायले त सांगास न्हायी लागत!थो काळ कमालीचा अलग होता,जी आवडाची तिच्यासोबत बोलाची त दूर साधं तिच्या जवळ जाची हिंमत व्हाची न्हायी,आजच्या सारखे मोबाईल नोहते,अख्या गावात ग्राम पंचायतची एकस टीव्ही होती न पाहाले सारा गाव उलथून पडे…. त्या टायमाले ज्या बी पोरीनी मनात घर केलं थ्या मनातल्या मनातस राह्यल्या,त्या आवडल्या तरी कायी उपयोग नसाचा… त मुद्दा डायरेक्ट माह्या लग्नावर यिउन एकदाचा शांत झाला.
दुसऱ्या दिवसापासून जे बी नातलग होते त्यायच्यात माय बापानं दवंडी पिटुन टाकली,पोरगं लग्नाचं हाये चांगली पोरगी भेटल त लक्षात ठेवा म्हणून, मंग का इकडून तिकडून पत्ते यायले लागले,पोरी पहाचा कारेक्रम सुरू झाला,मी थ्या वेळी भलतास बारका होतो,एका दिवशी माह्याच एका नातलगानं एक पोरगी हाये म्हणून दाखवाले घेऊन गेला,चहा चिवडा झाला,पोरगी लै सुंदर,गोरी पान, दिसता क्षणी नजरत भरणारी! पण का म्हाईत मले पसंद आली नाही,त्यायन विचारलं त्यायच्या समोर पसंद आहे म्हणून सांगलं, कोणाले खराब म्हणून सामोरासामोर रिजेक्ट करून मन दुखावनं बरं दिसलं नसतं, मी न थो नातलग दोघस होतो,तारीख सांगतों म्हणून वापस आलो,आल्यावर त्याले सांगून देल्ल “पोरगी बहोत सुंदर हाये पण चंचल वाटली भौ,मले न्हायी जमाची” थो विषय तेथच कट करून टाकला.काही दिवसानी दुसऱ्या पोरीचा पत्ता लागला,पाहाले गेलो,च्या भैन तिले पायल्या बरोबर लाईटस लागला,आबे ही त माह्यासोबत शिकत होती,तिनं चहाचे कप आणले,माह्याकडं पाह्यल्या बरोबर खुदकन हासली, मले पण थोडा हासा आलताच पण कंट्रोल करून घेतला.हिची हिस्ट्री न कारनामे इत्यंभूत माहीत असल्यानं तिले पसंद कराचा काही प्रश्नच उरला नव्हता! तर अशा रीतीनं दोन पोरी पाहून झाल्या होत्या,तेवढ्यात माझा क्लासमेट बाळू एकदिवस भेटला,विषय निघला, आबे एवढ्या लवकर कायले लग्न करून राह्यला,च्युत्या आहे का तू-तो, आबे त मी का करू सालं माय बाप मागस पडले त-मी, अशा रीतीनं विषय खोलात गेला,शेवटी बाळू म्हणला,आबे एक गोष्ट आयकते का,मजी बहीण आहे,करते का लग्न तिच्याशी,आपल्यास वयाची हाये,आमी एकास वर्गात होतो मॅट्रिकले,पसंद आली तरस सांग,जबरदस्ती न्हायी,काय बी का सांगते बे,आबे खरस पाहून त घे,तुले काही धरून बांधून बोहल्यावर चढवत न्हायी मी,पसंद आली त हो म्हण, न्हायी त न्हायी,बरं ठीक हाये चाल कधी जा चं! उद्या जाऊ!
दुसऱ्या दिवशी राजुऱ्याहून बस पकडली,दोघबी रिकामटेकडेस,त्या वेळी साधी सायकल घ्याची औकात नोहती, गाडी कोठून भेटन! बसमधून उतरलो,दोन किलोमीटर पैदल चालत हिचा गाव गाठला,हिचा बाप म्हणजे गणपत पाटील विरुटकर गावचा मोठा आणि शिस्तबद्ध माणूस,मान पान जपणारा.घरी गेलो, पोरगी पाहाले आलो म्हणून कोणाले माहीत होतं की नोहतं, म्हाईत न्हायी,पण आदर सत्कार भरभरून भेटत होता,ही पहिल्यांदा पाणी घेऊन आली,ती लाजण्यापेक्षा मले लैइस लाज येत होती,तिच्या चेहराबी काही स्पष्ट पाहू शकलो न्हायी.चहा घेतला न वापस,दोन किलोमीटर गोष्टी खापाडत निंगलो! बाळूची माय,आमच्या मोठ्या भावा करतानी मले खूब चांगल्या रीतीनं ओळखत होती,पोरगं चांगलं हाये,सज्जन हाये म्हणून तिनं आधीच तिकडं पुकारा करून टाकला होता,सध्या रिकामं हाये पण आपल्या पायावर उभं होईल याची ग्यारंटीच तिनं माह्या होणाऱ्या सासरेबुवाला देऊन टाकली होती.हिची माय अन बाळूची माय सख्या बहिणी असल्यानं,तिनं माह्या विषयी खूब मोठमोठ्या गोष्टी फेकून मारल्या होत्या.गणपत पाटलांना काही बी न पाहता डायरेक्ट आम्हाले पोरीले पाहाले या म्हणून तारीखच देऊन टाकली!
त्या तारखेले मी,महा मामा,बाप,मोठा भाऊ,बाळूचा बाप असे मिळून पाहाले गेलो,जुन्या पद्धतीचं तसम्याचं घर होतं ते,मातीच्या भिंती पण व्यवस्थित नीटनेटकं असलेलं,भिंतीवर लक्ष गेलं,हिच्या लहान बहिणीचं कसलं तरी सर्टिफिकेट चिटकवलं होतं, उगस्तरी वाचाच म्हणून त्या सर्टिफिकेटवरची जन्मतारीख वाचली,बैठकीत गावची काही पुरड लोकं पण बोलावली होती, पाणी वाणी घेतल्यावर ही चहा घेऊन आलती, नाव,गाव विचारून झालं,भाऊन जन्मतारीख विचारली आणि मले त एकदम झटकास बसला,तिनं चक्क तिच्या बहिणीच्या सर्टिफिकेटवरची तारीख सांगून टाकली होती,घोर आश्चर्यात बैठकीतून विचार कराले बाहेर पडलो, भाऊन न मामान विचारलं,का रे पोरगी पसंद हाये का? मी एका दमात हो म्हणून टाकलं! पुन्हा वापस बैठकीत बसलो, पोरगी पसंद हाये म्हणून सांगितलं,मंग बैठकीतल्या सज्जन लोकायनं म्हणलं “तुम्हाले पोरगी पसंद हाये त टिळा बोट्टू लावूनच घेवा,वेळ कायले लावाचा” आमच्यातलं कोणीतरी म्हणलं, आहो पण तुम्ही आमच्या घरावरी न्हायी आले न आजून! एकवेळ त घर पहा पोराचं,तिचा बाप म्हणला,आम्हाले पोरगं ठीक वाटलं,घर का पहाचं आता! अन्ते(अनिता) साखर घेऊन ये वाटीत,तोंड गोड कर जावयाचं” सगळ्यायले माल्यानं टिळा बोट्टू लावला,अंती न माह्या तोंडात साखर भरवली….त्यास दिवशी जेवणाचा बेत बी होऊन गेला…
आम्ही त्यायले घरापर्यंत या म्हणून तारीख देऊन परतीच्या प्रवासाला लागलो….
ठरलेल्या तारखेला सासरेबुवा आणि त्यायच्या गावाईतले काही सज्जन माणसं आमच्या घरी दाखल झाले,घरी आल्या आल्या पाहुण्यांयले धक्कास बसला,ते बांबूच्या ताट्यानी,कड्यानी बांधलेलं,वरून कवलं असलेलं घर पाहून थोडे थबकले! त्यायच्या कपाळावरच्या आठ्या सगळं टेन्शन दाखवत होत्या.चहा,पाणी आटपून बैठक पार पडली,लग्नाचा दिवस ठरवला, गावच्याच शाळेत लग्न कराच ठरलं,मी लग्नाले जावयाले आनाले जीप पाठवल म्हणून सासरेबुवानी एका दमात सांगून टाकलं,आमाले त खूबस मस्त वाटलं,आमचा बी खर्च वाचल म्हणून खुशीत आलो होतो.बैठक सरली अन जेवनखावन आटपून पाहुणे गावाकडं वापस गेले.
सासरेबुवा सोबत आलेल्या मोठ्या लोकायले माह्य घर काही आवडलेलं नोहतं,गेल्या गेल्या सासुरवाडीतल्या बायायले ही गोष्ट अधिकच रुचली न्हायी, “का पाहून हो म्हणले,ताट्या,तटकुडाचं कनं घर हाये,जमीन जुमला काय बी न्हायी,कशी राहील पोरगी म्हयी, पोरीच्या जीवनाचा सत्यानाश केला तुम्ही” सासूबाई मनातलं बोलत होती,मायेच्या वेदना उंबाळूण आल्या होत्या.गणपत पाटलांनी ठणकावून सांगितलं “एकवेळ पोरीले तेथ देल्ली म्हंजे देल्ली, आता मी शबद वापस घेणार न्हायी म्हंजे न्हायी” सोबत आलेल्या लोकायनी आपल्या घराचा रस्ता पकडला अन घरच्या सगळ्यायच तोंड एकदम शिवल्यासारखं बंद झालं”
ठरल्यावाणी लग्नाचा दिवस उजाडला,मामाजींन जीप सांगितली होती,त्यावेळी एस टी अन गाड्याची वरात बहुत कमी निंगायची, गावात एखाद्याकडस टू व्हीलर असाची ,मोबाईल त पहालेस भेटाचा न्हायी अन त्यावेळीस रोलचा कॅमेरा लग्नाचे फोटू काढासाठी वापराचे! असा जमाना होता तो! आमी नवरदेवाकडले मनुन विरुरवाल्या सरदारजीची ट्रक सांगितली,लै फेमस होती त्यावेळी! आमच्या घराच्या दारात जीप उभी झाली होती,सगळी वरात ट्रकमंदी भरली , पायात कोल्हापुरी चप्पल अन् डोकयात पांढरी टोपी घातलेला मी नवरदेव जीपमंदी जाऊन थाटात बसला.
वरात गावाजवळ पोचली,सोबत नेलेले वाजंत्री तोंडाने फुकु फुकु तुतारी वाजवाला लागले,सोबत्यांनी आणलेले फटाके एक जण फोडण्यासाठी गेला पण सासरेबोवानी त्याले तंबी देली, फटाके फोडाचे न्हायी,खाताचे ढगं हाये गावात,बिचारा एक बी फटाका न फोडता तसाच पडलेल्या चेहऱ्याने वापस आला.शाळेत लग्न असल्यानं सगळी व्यवस्था शाळेतच केली होती,वरातीतले काही सोबती गावात दारू दांद्राला गेले पण गावात दारुस भेटत न्हायी हे बिचाऱ्यांना नंतर माहीत झालं,अतिशय शांतीत वरात शाळेत पोचली,गेटवर रोलचा कॅमेरा घेऊन फोटू काढासाठी एक जण उभा होता,पोचल्या बरोबर त्यानं फ्लॅश मारणं चालू केलं, मले बी भाय बरं वाटत होतं,थ्या कॅमेरात एका रोलमंदी 35 फोटू निंगायचे म्हणून थो बहोत हिशोबानं फोटू काढाचा!
काही वेळात स्वस्ति श्री गननायकम गजमुखम म्हणत लग्न लागलं, फ्लॅश मारत कॅमेरेवाला मस्त फोटू काढत होता,लग्न सरता सरता त्याचा रोलबी संपून गेला,फोटू किती निघले म्हणून त्याने कॅमेरा उघडून रोल काढला अन पठयान आपल्या डोसक्यावर हातस मारून घेतला,रोलस उलटा टाकल्यानं एकबी फोटू निघला न्हायी,पुऱ्या लग्नात बेटा फ्लॅश मारत राह्यला.अशा रीतीने माह्या लग्नाचा एकबी फोटू माह्याकडं आठ्वणीसाठी शिल्लक राह्यला न्हायी….वरात निंगाची तयारी सुरू झाली,जीप कोठाय जीप कोठाय म्हणत आमच्याकडचे वऱ्हाडी जीपसाठी दांद्राला लागले पण थो कसा भेटल,थो त कवाचास फरार झाला होता,त्याले म्हणे फक्त नवरदेव आणाचेस पैसे देल्ले होते! आबे त निउन कोण देईन? असं मी कोनालेस तेथ विचारू शकत नोहतो! शेवटी नवरीनले घेऊन मी ट्रकच्या केबिनमंदी बसलो,दारू नाही भेटली म्हणून कोणी नाचत नोहतं अन जीप गायब झाली म्हणून मी चुपचाप बसलो होतो! तशीच वरात ट्रकमंदी बसून निंघली,एक किलोमीटर ट्रक चालली अन ती गप्पकन बंद पडली,काही केलं तरी ती चालू व्हाचं नाव घेत नोहती,सगळ्यायले उतरवलं तो सरदारजी होता,त्यानं फर्मान सोडलं, अबे सब लोग धक्का मारो। मग काय धक्का मारत मारत वरात गावावरी…..
नवी नवरी धक्का खात खात घरी आली अन ते “घर” पाहिल्याबरोबर पुन्हा तिला धक्काच बसला,डोळ्यात अश्रू अन मनात का पाहून माह्या बापानं ह्या घरात मले देल्ली असन ?
तिचा बाप तिच्या घरी सर्वाले सांगत होता,मी पोराले पाहून त्या घरी देल्ली अन एकवेळ देल्ली त देल्ली,ती अन तिह नशीब…….
खुप मस्त लग्नाची गोष्ट
धन्यवाद😀🙏