वय वर्ष पंचेचाळीस!

[tta_listen_btn]


■आज मी हे जे काही लिहितोय ते मला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी कंटाळा आला तरी पूर्ण वाचावे ही माझी विनंती आहे.
आयुष्यात दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली नसती अन माणसाच्या आयुष्यात नाती नसती तर रुक्ष आयुष्यात प्रेमाचा गोळवा कधीच निर्माण झाला नसता.आयुष्यातून एक एक दिवस वजा होताना जो दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करतो तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो! आणि हाच वाढदिवस आपल्या सोबत जी नाती साजरी करतात ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम असल्याचा दाखला देऊन जातात.आयुष्य म्हणलं की सुख दुःखाची रेलचेल असतेच पण दुःखाचे क्षण माणसाला आठवणीत राहतात तर सुखाचे असंख्य क्षण माणूस क्षणात विसरून जातो नव्हे हा तर माणसाचा स्वाभाविक गुणधर्मच असतो.
आयुष्याच्या पंचेचाळीसव्या वर्षात आज माझे पदार्पण होत आहे आणि अशा वेळेस भूतकाळाचा मागोवा घेताना सुखाचे क्षण कमी आणि दुखातलेच क्षण जास्त आठवतात पण आता ते आठवण्यात काही स्वारस्य उरत नाही,कोळसा कितीही उजळला तरी तो काळाच असतो म्हणून उगाळण्यात काही अर्थ नाही! आजच्या वाढदिवशी शुभेच्छांचा एवढा भडिमार मी कधीच अनुभवला नव्हता,कॉल्स, व्हाट्सएप,फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छांचा एवढा वर्षाव होता की प्रत्येकाला लिहून कृतज्ञता व्यक्त करणे माझ्याच्याने जमले नाही,सुरुवातीला काही जणांच्या शुभेच्छा स्टेट्सला देखील ठेवल्या परंतु काहीच वेळात माझे मानसिक स्वास्थ्य डगमगले आणि सर्वांचे मेसेजेस स्टेटसला लावणेही जमले नाही.
■असे का व्हावे?मी मनात विचार करतो की मी कसलाही सेलिब्रिटी नाही,राजकारणी नाही की स्वतःला प्रकाशझोतात आणून घेणारा स्वार्थी मनुष्य नाही,मग माझ्यावर प्रेमाचा वर्षाव तुम्हा सर्व मंडळींनी का म्हणून केला असेल? काल रात्री 11 वाजून 34 मिनिटांपासून जी सुरुवात झाली ती अजूनही सुरू आहे,एवढं प्रेम तर एखाद्या राजकारण्यालाही मिळत नाही,क्षणभर वाटलं आपुन तो साला साब बन गया पण नाही माझे पाय कालही जमिनीवर होते,आजही आहेत आणि उद्याही राहतील,मी मातीतला माणूस आहे,मला मातीत मिसळणे पसंत आहे उगाच पंख लावून उडायचे आणि उडून जमिनीवर आपटायचे नाही.
प्रत्येक माणसाने नाती जपली पाहिजे,आपल्यावर कोणीतरी प्रेम करणारं असावं आणि आपण कोणावर तरी प्रेम करावं तेंव्हाच नातं टिकतं,बहरतं! परंतु प्रेमात जेंव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेंव्हा अपेक्षाभंग झाला की आपण स्वतःला दुःखात लोटून घेतो. म्हणून मी कधीच अपेक्षा ठेवून कुणावर प्रेम केलं नाही.ते निरर्थक असतं! जेथे अपेक्षा तिथे प्रेम नसतं!
■मी नेहमीच स्ट्रेट फॉरवरडेड राहिलो आहे,जे जेवढं आहे,जेवढं मिळालं आहे त्यात समाधानी असतो,हाच स्ट्रेटपणा माझ्या प्रत्येक गोष्टीत असतो,माझ्याकडे लपविण्यासारखं काही नाही तेंव्हा कोणाला घाबरायचीही मला कधी गरज पडली नाही.एक बोललो आणि एक वागलो अशी गोष्ट माझ्याबाबतीत घडली नाही.प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे क्षण येत असतात सुखाच्या क्षणी माजलो नाही की दुःखाच्या क्षणी मैदान सोडून पळ काढला नाही.प्रत्येक संकटाला मी जीवनात आलेली संधी समजून वागलो,प्रत्येक प्रश्नावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला,संकटाला घाबरून मनाचे दरवाजे बंद करून बसलो नाही. तुमचं प्रेम मिळण्याची कारणं शोधायचा प्रयत्न करतो तेंव्हा मी स्वतःला बऱ्याच अंशी बदलून घेतलं हे मूळ मला सापडतं, मी क्रोधावर नियंत्रण मिळवू शकलो,मत्सर,द्वेषाला मनावर कब्जा मिळवू दिला नाही.नेहमी एकच विचार केला समोरच्या व्यक्तीचे मी भले करू शकत नसेल तर त्याचे वाईटही करण्याचा आपल्याला अधिकार नाही.प्रत्येक माणूस वाईट नसतो,त्याला वाईट करतात त्याचे दुर्गुण! एखादा माणूस आपल्याला पटत नाही म्हणजे नेमकं काय? एक तर त्याचे विचार पटत नाही किंवा त्याचे गुण पटत नाही.मग यावर मार्ग नसतो का,निश्चित असतो! एकतर जो पटत नाही त्याला त्याच्याच मार्गावर सोडून देणे किंवा त्याला आपल्या सहवासाने माणसात आणने! शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माची फळे त्याला मिळत असतात आणि जो सुधारला तोच माणूस बनून समाजात उत्तीर्ण होतो.
■गेल्या 44 वर्षात माझ्यासमोर असे असंख्य प्रसंग आलेत,असंख्य मित्र आलेत ज्यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं,कोणी खिशात एक दमडीही नसताना मदत करणारा निघाला तर कोणी पाठीत खंजीर खुपसून पळणाराही निघाला! परंतु लोकं तुमच्यासोबत वाईट वागली म्हणून तुम्हीही तसं त्यांच्याशी वागावं असं काही असतं का? अजिबात नाही! तशी गरजही नाही.आपल्याशी वाईट वागणाऱ्याला मी आपल्या डिक्शनरीतच ठेवत नाही हा माझा मोठा गुण आहे,त्यामुळे जो आपल्याशी वाईट वागला त्याच्याशी आपला संबंधच येत नाही.
कित्येकांना वाटतं की एवढ्या कमी वयात हा माणूस एवढा यशस्वी कसा काय झाला असेल,माणूस यशस्वी झाला तर सगळ्यांच्या नजरेत येतो परंतु त्याच वेळी त्या माणसाने भूतकाळात किती कष्ट उपसले असतील याचा विचार मात्र कोणाच्या मनात येत नाही,कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही,परिश्रम करावे लागतात,कष्ट उपसावे लागतात आणि ते मी केले त्याचेच परिणाम आहेत की आज मी कुठेतरी चांगल्या स्थितीत गुजराण करीत आहे पण मला त्या परिस्थितीचा अजूनही विसर पडलेला नाही,मी जे काही भोगलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये हीच ईच्छा असते.
लग्न लवकर झाल्याने अगदीं कमी कालावधीत संसाराची जवाबदारी पेलावी लागली,अर्थातच मुलं देखील लवकर झाली,त्यावेळेस माझ्या मुलांना साधी खेळणी देखील घेऊन देऊ शकलो नाही की खांद्यावर खेळवू शकलो नाही,त्यांना चांगले कपडे घेऊन देऊ शकलो नाही याची आजही खंत वाटते,बायको सांभाळून घेणारी नसती,उडावू खर्चणारी असती तर जे आज डोक्यावरचे केस गेले ते त्याच वेळेस गेले असते,तिचं शिक्षण कमी आहे पण दुनियादारीत काय करावे हे तिच्या एवढं मला आज देखील कळत नाही,
हाती धरून विळा,ती निंदायाला जाये
डोळ्यामंदी आसू कसे आपसूक वाहे
काम भेटे न्हायी तवा जीव बेजारून जाये
हाती दोर पाळण्याचा पिल्लू टकटक पाहे…..
■आमचं दोघांतलं जगणं अगदी ट्रानस्परंट आहे,आयुष्यात कोणतीच गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली नाही,ते पहिलं प्रेम असो की लफडं,नावासहित,गावासहित तिला सगळच माहीत आहे,काय लपवायचं त्यात? आणि लपवून काय साध्य झालं असतं? तिच्या एवढा संयमी,समजूतदारपणा निश्चितच कित्येक स्त्रियांमध्ये नसतो,नवऱ्यावर संशय घेणाऱ्या बाया भरपूर मिळतील पण नवऱ्याने जे सांगितलं ते मोठ्या मनानं स्वीकार करणारी माझी बायको एकटीच आहे अशी माझी पक्की धारणा आहे.म्हणून आज 24 वर्षात एकदाही आम्ही झगडलो नाही की तिच्यावर आयुष्यात हात उगारला नाही.
■आता ती म्हणेल तुम्ही जावई ईवायाचे झाले आहात ते वाचतील तर काय म्हणतील पण आमचं नशीब थोर आहे,जावई,ईवाई दिलदार मिळाले आहेत.ते आम्हाला समजून घेतील,असं कमी जास्त सर्वांच्या आयुष्यात येत असतं हे सर्वश्रुत आहे.
■आज काही मित्रांचे,दोन तीन मैत्रिणीचे(त्या दोन दोन लेकरांच्या आया आहेत) फोन आले,जुन्या आठवणी ताज्या झाल्या,झरझर डोळ्यासमोरून गेल्या’मन प्रफुल्लीत झालं पण मनाला अतोनात असह्य दुःखही झालं की ज्यांना मी माझं समजत होतो त्यांना माझ्यासाठी दोन शब्दही लिहावेसे वाटले नाही….
-उमेश पारखी

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी