[tta_listen_btn]
●तुझ्या जन्माची बातमी गौतमने कम्पणीच्या गेटवर दिली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि तू दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला होता,पती खांद्यावरची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,तुझा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली होती,तो कामाचा थकवा,ते घामेजलेलं शरीर कसलीच जाणीव त्यावेळेला नव्हती,माझा अंश चेहऱ्याने कसा दिसतो याकडेच डोळे लागलेले होते,त्यावेळेला काही झालंच तर दवाखान्यात न्यायला सुद्धा जवळ एक दमडी शिल्लक नव्हती,महिनाभर कम्पणीत जाणं आणि महिन्यापोटी सतराशे रुपये पगार घेऊन घर चालवणं,दवाखान्यात नेण्याचा खर्च मात्र तू बहाद्दराने वाचवला होतास,तू घरीच प्रकट झालास,तुझा छोटासा चेहरा माझेच प्रतिबिंब भासत होते अर्थातच तू माझ्यावरच गेला होतास,तुझ्या आजी आजोबांपासून घरात जाती,धर्माचा,कोणत्या माणसांचा भेदाभेद नव्हताच! त्यामुळे आपल्या घरात सुद्धा हा भेदभाव कधी आला नाही आणि त्यामुळेच तुझ्या आईचं बाळंतपण गावातल्या कांबळे नावाच्या बौद्ध धर्मीय महिलेनं केलं,एका अर्थाने तुझ्यासाठी तीने आईचीच भूमिका पार पाडली होती,ती रोज यायची तूला मालिश करायची,अंघोळ करायची आणि कसलीही तक्रार न करता परत जायची.
●अत्यंत बिकट परिस्थिती,टिनाचे आच्छादन असलेल्या दोन खोल्याचं घर आणि आमच्या लग्नात सप्रेम भेट आलेला रवी कंपनीचा एक फॅन,एक लोखंडी बेड एवढं विश्व! माझ्या कामामुळे मुलांकडे त्यावेळेला विशेष लक्ष देता येत नव्हते की अंगा खांद्यावर खेळवता सुद्धा येत नव्हते आणि त्या परिस्थितीत कंपनीत कामाला जर गेलो नाही तर जगण्याचे वांदे झाले असते ते वेगळेच! आपलं मुल कसं आहे हे त्याच्या आई बापा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही माहीत नसतं.
●तू नुकताच एक महिन्याचा झाला असेल आणि असह्य वेदनेने विव्हळायला लागलास,रात्रभर रडायचा,कित्येक रात्री जागत काढायच्या,आमच्या कोणाच्याच लक्षात येत नव्हतं की नेमकं तुला काय झालं होतं,कधी पोट फुगल्यासारखं वाटायचं,तू आपल्या वेदना रडून मांडायचास.दुसऱ्या दिवशी कंपनीतून पाचशे रुपये ऍडव्हान्स घेऊन तूला राजुऱ्याला घेऊन गेलो,त्यावेळेला एक बाबुराव म्हणून डॉक्टर कम अटेंडन्ट प्रसिद्ध होता,त्याच्याकडे जाण्याचा सल्ला बऱ्याच जणांनी दिला होता.भांभावलेल्या स्थितीत तोच सल्ला पर्याय मानून तुला घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो,आमच्या अगोदर लहान लहान मुलं तिथं इलाजासाठी आलेली होती आणि तो डॉक्टर एक लहानशी सळाख गरम करून त्या तान्ह्या बाळांच्या पोटावर लासवत होता, मन अगदी चर्र झालं,एवढ्या तान्ह्या बाळांवरती एवढा निर्दयी उपचार? ते पाहून एका क्षणात तूला घेऊन सरकारी दवाखाना गाठला,त्यावेळेस रामचंद्र म्हणून एक सद्गृहस्थ डॉक्टर होते,त्यांनी आत्मीयतेने विचारपूस केली,तूला उबडा,उताणा टाकून तपासून घेतलं आणि सांगितलं की याला काही प्रोब्लेम्स आहेत म्हणून हा रडतोय,एक इंजेक्शन तूला टोचून काही इंजेक्शन लिहून दिली आणि सांगितलं की याला रोज सकाळ संध्याकाळ दोन इंजेक्शन आठवळाभर द्यायचे आहेत,हा छोटासा प्रॉब्लेम देखील त्या परिस्थितीत अभाळाएवढा आम्हाला मोठा होता,रोज राजुऱ्याला याला घेऊन येणं,तेही सकाळ,संध्याकाळ हे काही सोपं काम नव्हतं. हाती पैसा नाही,येण्याजाण्याचा खर्च देखील उसनवारी करूनच करावा लागणार होता,तेवढ्यात डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं आणि चेहऱ्यावरच्या हावभावाहून ओळखलं,तुमच्या गावाकडे कोणी डॉक्टर असेल तर बघा आणि हे इंजेक्शन द्या त्याला. आशेचा किरण उगवावा तसे त्यांचे बोल होते.
पोराला घेऊन आम्ही गावाला परत आलो,गावाहून येण्याजाण्याचे कोणतेच वाहन तेंव्हा उपलब्ध नव्हते,माझ्या गावाहून वरूरला यायला सायकलनेच प्रवास करावा लागायचा,
एव्हाना तू रडायचा थांबला होतास आम्ही उगीच तुझ्या पोटावर गरम चटके देऊन आणले असते,किती वाईट घडलं असतं.वरूरला कोतपल्लीवर डॉक्टर आहेत त्यांच्याकडे याला इंजेक्शन देऊन आणायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवसांपासून सकाळ संध्याकाळ तुला आणि तुझ्या आईला सायकलवर बसवून नेणे आणने करायला लागलो,आठवळाभर तुझ्या नाजूक मांड्यावर त्या इंजेक्शनचे होणारे घाव पाहून डोळ्यात अश्रू यायचे,मन सुन्न व्हायचं.
एका आठवळ्याचा जुलूम सोसल्यावर तू हसायला,बागळायला लागलास, खिन्न झालेलं माझं मन अगदी टवटवीत फुललं! आता पन्नास किलोच्या बॅगाच काय ,अख्या दुनियेला एका झटक्यात उलथापालथ करिन असा भ्रामक विचार डोक्यात अवतरुन गेला होता……