[tta_listen_btn]
▪️मी ज्यावेळेला राजस्थानमध्ये नोकरिनिमित्याने होतो त्यावेळेस माझा मित्र म्हणाला की यार भिलवाड्यामध्ये एक जोतिष्य राहतात जे तंतोतंत भविष्य सांगतात,चल एकदा त्याच्याकडे जाऊन येऊ! अर्थातच भविष्य,भोगसाधु,भोंदूबाबा असल्या लोकांवर विश्वास नसल्याने मी त्याला स्पष्ट नकार दिला. पण मित्र अधिकच विनंती करू लागला की खरं खोटं नंतर बघू पण एकदा जाऊन तर येऊ,तो काय सांगतो किंवा तो काय करायला लावतो ते बघू,त्याने सांगितलेले करणे न करणे आपल्या हातात आहे,जाऊन पाहायला काय हरकत आहे. मी तयार झालो म्हटलं चला एकदा बघूच शेवटी किती खरं किती खोटं ते सुद्धा कळेल.
▪️राजस्थानातील भिलवाडा हे शहर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासारखं जिल्ह्याचं ठिकाण आहे,त्याठिकाणी जवळपास 2500च्या वर कपडा मिल्स आहेत,ज्यात रेमंड, मयूर सारख्या नावाजलेल्या कंपन्यांचे कापड मिल्स आहेत.मी ज्या ठिकाणी कामाला होतो ते ठिकाण जवळपास 70 किमी दूर असल्याने माझा मित्र आणि मी सकाळीच टू व्हीलरने निघालो,भिलवाड्याला पोहचल्यानंतर एका बंगल्यात त्या जोतिष्याचे वास्तव्य होते,भिंतीवर बऱ्याच देवीदेवतांचे फोटो अन अगरबत्तीचा सुहास अख्या बंगल्यात पसरलेला,मन अगदीच प्रसन्न झालं. पाणी घेता का म्हणून विचारणा झाली,बाजूला एक टेबल आणि त्या टेबलावर कोणत्यातरी देवाची मूर्ती हार घातलेल्या अवस्थेत होती,भगव्या वस्त्रात ती दोन माणसे होती त्यापैकी एक भविष्य सांगायचा आणि दुसरा त्याला मदत करायचा!
▪️टेबलशेजारी दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या ज्या माझ्यासारख्या कस्टमर्स साठी ठेवल्या होत्या.आम्ही खुर्चीत बसलो,एकाने अगरबत्ती पेटवली आणि माझ्या हातात देत समोरच्या मूर्तीची पूजा करायला सांगीतली, तो जसं म्हणेल तशी पूजा मी करत गेलो.
▪️पूजा संपल्यानंतर जो प्रमुख होता तो बोलायला लागला “आप महाराष्ट्रके चांदा डिस्ट्रिक्टके राजुरा तालुकाके एक छोटेसे खेळेगांवसे ताल्लूक रखते है”
च्यामायला जिंदगीत याले कधी भेटलो नाही,मग याने जिल्हा तालुका गाव कसं काय तंतोतंत सांगितलं,मी अवाक झालो,मला विश्वासच बसत नव्हता,ज्याठिकाणी मी होतो त ठिकाणचं मुळी अनोळखी होतं, अशा अनोळखी शहरात हा साधू माझी ओळख अगदी हुबेहूब कशी काय सांगू शकतो, मी म्हटलं “हां आपने जो बोला वह सही है,मै महाराष्ट्रसे बिलॉंग करता हु। आता त्याच्यावर विश्वास ठेवण्यापालिकडे माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता कारण त्याने जे सांगितलं ते सत्य होतं.
▪️तो म्हणाला की “मैं आपका भविष्य आपका भूतकाल बता सकता हूं और आपके भूतकालमे जो बातें घटी है वह सिर्फ आपकोही मालूम है,जो मैं बताऊंगा उसमे आपकी निजी बातें भी शामिल है,क्या आप अपने दोस्त को साथ रखेंगे, आप चाहे तो उनको बाहर बैठनेकेलिये बोल सकते है” सालं अजब आहे,माझ्या भूतकाळात लपविण्यासारखं काय होतं जे मित्रापासून लपवायच आहे” मी म्हटलं “महाराज जो भी है आप बतादो,किसीसे छुपाने लायक कोई बात नही है” मित्र बाजूला बसून राहिला,ही 2009 वर्षातली गोष्ट होती ज्यावेळेला टेपरेकॉर्डर आणि आणि कॅसेटचा जमाना होता, टेबलावर टेपरेकॉर्डर ठेवून होते ज्यात तो साधू जे काही बोलेल ते टेप करून आम्हाला देणार होता.मूर्तीसमोर कापूर पेटवत त्याने त्याच्या सहकाऱ्याला काही आणण्यास सांगितले,तो आत गेला त्याने दोन ताडपत्रांचे गठ्ठे आणले ज्यात अंदाजे वीस वीस पाने होती आणि त्याच्यावर बहुतेक तमिळ भाषेत काही तरी लिहिलेलं दिसत होतं.त्याने सोबत शाईचा पॅड आणला होता, “आप एक काम कीजिये इस कोरे कागजपे आपके दोनो हातोंके अंगठोंको निशान लगाइये” सहकाऱ्याने कोऱ्या कागदावर माझ्या दोन्ही हाताच्या अंगठ्याचे निशाण घेतले आणि तो कागद त्या महाराजांकडे दिला,महाराजाने त्या ठप्यांकडे कटाक्षाने पाहिले आणि माझ्याकडे पहात तो म्हणाला “आपको मैं बिस प्रश्न पूछुंगा जिसका जवाब आपको केवल हाँ या ना में देना है,आपको कोईभी दूसरी बात नही बोलनी है,आपको जो बात सत्य लगे या आपके हिसाबसे सही हो उसके लिए हां बोलिये,अगर कोई बात गलत महसूस हो तो ना बोलिये” मी मान हलवत त्याला होकार दिला!
▪️”क्या आप चार भाई और आपको एक बहन है और सभीमें आप सबसे छोटे हो?” गोष्ट खरी होती ना म्हणण्याचा प्रश्नच नव्हता,मी म्हटलं “हां, सही बात है।” “पिताजी का नाम प अक्षर से शुरू होता है और म अक्षरपर खतम होता है,सुरू शब्द परशु और बाद का शब्द राम है,कुल मिलाके आपके पिताजी का नाम परशुराम है,आपके माताजीके नाम मे एकही शब्द है और दोनोभी एकही अक्षर से बने है प्रथम शब्द ली और अंतिम शब्द ला है,याने आपके माताजीका नाम लीला है,क्या यह सही है” सगळं एकदम आश्चर्यकारक होतं, मी महाराष्ट्रातून दोन हजार किलोमीटर दूरवर आहे,ओळ्खणारं कोणी नाही,माझ्या पर्सनल गोष्टी याठिकाणी कोणालाही शेअर केल्या नाही,बोलता बोलता वडिलांचं नाव आपण सहज बोलून जातो,ते कोणी ऐकलं असेल किंवा वडिलांचं नाव सहज माहीत होत असतं म्हणून याला माहीत झालं असेल पण आईचं नाव हा कसं काय सांगू शकतो? मनात विचारांचं थैमान सुरू होतं पण समोर जे तो सांगत होता ते खरं असल्याने मी होय असं उत्तर त्याला देत होतो, खरी गंमत आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट ही होती की त्याने जो एक प्रश्न केला तो त्याठिकाणी माझ्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत असण्याचा प्रश्न नव्हता आणि तो प्रश्न होता “उमेशजी आप जब कक्षा 8विमे थे तब क्या आपको एक लडकीपर प्यार आया था, क्या आपने उसको एक चिठ्ठी जो टाईपरायटरसे टाईप की हुयी थी, वो दी थी! हालांकि आपका वह प्यार एकतरफा था,लेकिन आपके मनमे उस लड़किके लिए बेहद प्यार था,आपने जो चिट्ठी दी थी वह नीमके पेड़के पास टुकड़ो टुकडोमे मिली थी” एव्हाना माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर अरे साला ये तो बहोत हरामी निकला” असे भाव अवतरले होते! “और इस तरहा आपका दिल टुटनेके कारण तालाब के किनारे आपने सिगारेट के दो पॅक एकही दममे खतम कर दिए थे” महाराज बोलत होते आणि त्यावेळचं म.रफी यांचं ओठावर असलेलं “इक दिलके तुकडे हजार हुये कोई यहा गिरा कोई वहा गिरा” आत्ता मनात वाजत होतं. मन फ्लॅशबॅक झालं होतं! असे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात,नवलाची काही एक गोष्ट नसते “वह जवानी जवानी क्या जीसकी कोई कहाणी ना हो” महाराजाने ताडकन विचारले “उमेशजी ये सही है या गलत” मी ताडकन फ्लॅशबॅक मधून बाहेर आलो “महाराज आपकी पुरी बात सही है मेरा जवाब हा है” मनात विचाराचे युद्ध सुरू होते एवढ्या खोलातली गोष्ट ह्या महाराजाला कळली कशी? कोणी माहिती दिली असेल ही शक्यताही अशक्य होती,ही जादू वैगेरे छे छे ह्या गोष्टी मी मानतच नव्हतो,मग नेमकं याला माझी पर्सनल गोष्ट माहीत तरी कशी झाली असेल.
▪️अशी “हो” उत्तर असणारी बरीच प्रश्न त्या साधूने विचारली पण महाराज लुटारू नव्हता त्याने एवढीच ईच्छा व्यक्त केली की तुमच्या इच्छेनुसार मला जे द्यायचे ते द्या,मी मागणार नाही,खिशात पाचश्याची नोट होती,आरतीत सरकवून दिली.विश्वास ठेवावा की ठेवू नये या द्वंद्वात मी फसलो होतो,माझ्या घरी चक्की आहे इथपासून तर पाचवीत इंग्रजीत 99% मार्क्स घेतले होते इथपर्यंत तंतोतंत त्या साधूने सांगितले होते नंतर भविष्यात कोणत्या वर्षी मोठ्या पदावर तुम्ही बसाल आणि किती वर्षे जगाल,तुमच्यावर काय संकटे येतील,तुम्ही बाईच्या लफडयात वैगेरे फसणार आहात का अशा पुड्या त्याने नंतर सोडल्या असाव्या!
▪️2009 ते 2023 एवढ्या कालावधीत बऱ्याच गोष्टींची सत्यता पडताडून बघता आली,हिप्नॉटीजम आणि माईंड रिडींग हे जे दोन प्रकार आहेत,ह्या दोन गोष्टींनी समोरच्या माणसाच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे सहज जाणून घेता येतं, बागेश्वर शास्त्री महाराजांसारखे महाभाग हिंदू धर्माच्या नावावर पोळी शेकून घेतात ते यामुळेच, हिप्नॉटीजम आणि माईंड रिडींग हे शास्त्र आहे,तुम्ही कधी हिप्नॉटीजमच्या कार्यक्रमास हजेरी लावली असेल तर तुम्हाला असं दिसून येईल की हिप्नॉटीजम झालेला माणूस हिप्नॉटीजम करणाऱ्याचे ऑर्डर्स फॉलो करत असतो,वांगं खायला देऊन तुम्ही गाजर खात आहात आणि ते खूप रुचकर आहे असे सांगत असतो आणि हिप्नॉटीजम झालेला माणूस आपला पूर्ण ताबा सुटल्यामुळे तो वांग्याला गाजर म्हणून कचाकचा खात सुटतो. शास्त्र आणि तंत्रज्ञान हे वापरण्यावर ठरत असतं की त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत,वापरणाऱ्याचा उद्देश चांगला असेल तर तो समाज हितासाठी वा वापरणारा चतुर असेल तर लोकांना मूर्ख बनविण्यासाठी या शास्त्रांचा उपयोग करत असतो.आपण सुहानी शहा सारख्या मुलीचे आभार मानले पाहिजे की माईंड रिडींग करून अशा चमत्काराच्या गोष्टी करता येतात,जुन्या काळी हे ज्ञान नव्हतं,शास्त्र नव्हतं,वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता,समाजात कम्युनिकेशनच्या सुविधा नव्हत्या,समाजात शिक्षण नव्हतं आणि त्यामुळेच अशा चमत्काराच्या गोष्टी सहज चालत होत्या,पाण्याने दिवे पेटत होते,तुकोबांना न्यायला त्या काळी डायरेक्ट वैकुंठातून विमान येत होतं,आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण कोणता मार्ग स्वीकारतो,धर्माच्या नावावर च्युतीये बनून राहण्याचा की एक विज्ञाननिष्ठ समाज तयार करायचा!
✍️