[tta_listen_btn]
माझ्या नोकरीच्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या,ज्या गोष्टींनी माझे किती भले झाले हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या कृतीने कुणाचे तरी थोडेफार का होईना चांगले झाले असेल असे वाटते.आपल्या कठीण प्रसंगातही आपल्या हातून काहीतरी चांगले जेंव्हा घडते तेंव्हा तो आनंद,ते समाधान माणसाला शब्दात व्यक्त करता येत नाही.जीवन क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत उद्या नाही परंतु आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे परिणाम हे सदैव चांगले येत असतात,त्या कामांमुळे आपल्या जीवनात काही ना काही सकारात्मक गोष्टी घडत जातात.आपण जे करू त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगले,वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतात आणि त्यासाठी वेळेनुसार आपल्या जीवनात स्वतःच्या आचरणात,विचारात परिवर्तन घडवून घेणे जरुरी असते! नोकरी करताना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना सांभाळून घेतांना त्यांच्या अडी-अडचणी,दुःख-वेदनांशी समरस व्हावे लागते,वेळप्रसंगी त्यांनी केलेल्या चुकांवर पांघरूण घालावे लागते आणि हे सारे करताना खूप काही शिकण्यास मिळते, त्याचवेळी आपल्यातल्या चुका स्वतःला कळायला लागतात,मनातला अहंकार,क्रोध गळायला लागतो.हा प्लस पॉईंट आपल्या आयुष्यात सहजपणे प्लस होत जातो.मी कोणत्याही व्यक्तीला ज्यावेळेस प्रत्यक्षात भेटतो त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये जे काही चांगले गुण मला वाटतात ते माझ्याकडे का नाहीत हा विचार करतो, कोणताही माणूस वाईट नसतो,त्याच्यातील दुर्गुण त्याला वाईट करतात,मी कायम कोणत्याही गोष्टीतून काही ना काही कसे चांगले मिळेल हेच मिळविण्याचा प्रयत्न करत आलोय,चांगले अथवा वाईट घेणे हे आपल्या हातात असते,ते आपल्याला ठरवायचे असते,आयुष्याच्या प्रत्येक मोडीवर आपल्याला बरीचशी बरी वाईट माणसे भेटतात,काही आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणतात तर काहींना आपण ओळखू न शकल्याने आपल्या आयुष्याची वाट लावून जातात आणि वाट लावून घेण्याला सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार असतो कारण समोरच्या व्यक्तीला ओळखण्यात आपल्या हातून चूक होते.
मी सद्गुणांचा पुतळा आहे असा कोणी समज करून घेत असेल तर ते साफ चुकीचे आहे,प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो,मी ही परिपूर्ण चांगला गुणी माणूस आहे हे मला स्वतःलाच वाटत नाही,सामान्य माणसासारखे काम,क्रोध,मद, मत्सर हे गुण माझ्यातही आहेत पण त्या दुर्गुणांना दूर ठेवण्याचा मी हमखास प्रयत्न करत असतो,माझ्यातल्या उणिवांना दूर करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यातल्या वाईट गुणांना ओळखून त्यावर कसे नियंत्रण आणता येईल त्याचा कायम विचार करत असतो.पूर्वी एखाद्या कामगाराने एखादी चूक केली की मला खूप राग यायचा,आत्ताही येतो! ऍक्शन वर रिऍक्शन ही सहज भावना आहे ती होत असते पण माझ्या रागावर गेल्या काही वर्षात बरेचशे मी नियंत्रण आणू शकलो,मी एखाद्यावर रागावलो की माझ्या वरचे साहेब म्हणायचे पारखी गलती तो इंसानसेही होती है जो इंसान गलती नही करता वह जिंदगीमे कुछ करही नही सकता,तो चूक करतोय म्हणजे ती तुझी चूक आहे,त्याला योग्य मार्गदर्शन तुझ्याकडून व्हायला हवे होते ते झाले नाही म्हणून त्याने चूक केली,मग तूच सांग चूक कोणाची? आणि तेंव्हा लक्षात यायचे की यार यात तर माझीच चुकी आहे त्याला जे काम मी शिकवायला पाहिजे होते तेच नाही शिकवले मग तो तर चुकी करणारच! मला माझी चूक कळायची आणि तावाने आलेला राग एकदम शांत होऊन जायचा! पुढे मी स्वतःला त्या कामगारात पाहायला शिकलो,ते जगायला शिकलो! एखाद्याला एखाद्या वेळेस चुकीची शिक्षा म्हणून कामावरून बंद करायचो त्यावेळेस साहेब म्हणायचे पारखी कधीही कोणाच्या पोटावर मारायचे नसते,अरे त्याने चूक केली त्यात त्याच्या कुटुंबाचा काय दोष पण त्याच्या चुकीची शिक्षा त्याचा परिवार उद्या भोगेल, त्याला तू कामावरून काढले तर त्याचा परिणाम त्याच्या अख्या कुटुंबावर पडेल,चार पैसे कमविणारा तो आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंब असे सगळेच रस्त्यावर येतील हे तुला तरी पटेल का? आणि एक माणूस म्हणून हे मला कधीच पटण्यासारखं नसायचं कारण एका कामगाराचं जीवन मी जगलो आहे,हाल अपेष्टा सोसल्या आहेत हे आठवून टचकन डोळ्यात पाणी यायचं!
हे सगळं लिहिण्याचा प्रपंच याचसाठी की मी बऱ्याचशा प्रसंगातून खूप काही शिकलो,माझ्यातल्या उणिवा मला दूर करता आल्या.माझ्या रागावर कायमस्वरूपी नियंत्रण आणू शकलो,कोणत्याही गोष्टीबद्दल मनात राग न येऊ देता शांतपणे विचार करून मार्ग काढणे शिकू शकलो.
या गोष्टीचा फायदा माझ्या वैयक्तिक जीवनात खूप झाला,माझ्या मनात इतरांबद्दल क्रोध येणे,इतरांबद्दल मत्सर वाटणे,इतरांचा हेवा वाटणे इत्यादी गोष्टी माझ्या जीवनातून हद्दपार झाल्या,कोण काय करतोय,का करतोय,कशासाठी करतोय याचा मी फारसा विचार करत नाही,माझ्या हातून कोणाचे वाईट होणार नाही,कोणाला ईजा होणार नाही ही दक्षता घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे माझे कधी वाईट होणार नाही ही खात्री वाटते,साहजिक आहे आपण स्वतः कुठे इतरांच्या काड्या केल्या नाही तर दुसऱ्या कोणाचीही तुमच्यात काड्या करण्याची हिंमत होत नाही.
बारा वर्षांपासून तेलंगान्यात मी जाणे येणे करतोय,या काळात कित्येक अपघात पाहिले,कोरोनाच्या वेळेस सैरभैर झालेली माणसे पाहिली, मदतीसाठी याचना करणारी लहान लहान मुले पाहिली, प्रत्येक वेळेस माझ्या ऐपतीनुसार मदत करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला,एकसिडेंट झालेल्या व्यक्तींना स्वतः अंबुलन्समध्ये टाकून दवाखान्यात घेऊन गेलो,कोरोनाकाळात रस्त्याच्या कडेला अन्नाला मोहताज झालेल्या लेकरांना अन्नाचे पॅकेट्स पुरवले,एकदा शिर्डीजवळ असणाऱ्या एका गावातले जोडपे,तान्हे बाळ घेऊन टू व्हीलरने देवदर्शनासाठी निघाले होते त्यांनी हात दाखवला गाडी महाराष्ट्र पासिंगची दिसली म्हणून चौकशी केली,त्यांचं पॅकेट हरवलं होतं, अन्नासाठी त्यांचा जीव कासावीस झालेला,हातात पैसा नाही आणि ते तान्हे लेकरू पाहून माझा अहंकार त्याच ठिकाणी गळून पडला,वाटलं आयुष्यात शेवटी काय ठेवलं आहे? त्यांना जेवण आणून दिलं, त्यांनी आपलं आधार कार्ड दाखवलं आणि काही पैशाची मदत करा म्हणून याचना केली,त्यांची स्थिती पाहून मन गहिवरून आलं,त्यांना कसलाही विचार न करता काही पैसे दिले,तब्बल दीड महिन्यानंतर त्यांचा फोन आला,मनातून भरभरून बोलले,मी नको म्हणतानाही त्यांनी मी दिलेले पैसे फोन पेनी ट्रान्सफर केले.शिर्डीकडे आल्यास आमच्या गावाला नक्की या म्हणून निमंत्रण सुद्धा दिलं,एव्हाना मी सगळच विसरून गेलो होतो,ते भेटले होते हेही विसरलो होतो आणि त्यांना मदत केली होती हेही विसरलो होतो…आपले मन,हेतू शुद्ध असेल तर तुमच्यावर जळणारा केवढाही मोठा शत्रू असू द्या तुमचं काहीच वाकडं होत नाही…
हे एवढं सांगून मी काही खूप मोठं काम केलं अशातला भाग नाही पण चांगल्या कामाची पावती म्हणूनच मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात समाधानी आणि बेधडक आहे,मी ज्यांना जसा पटलो तसा आहे,माझ्याही डोळ्यात अश्रूच येतात…शेवटी मीही एक माणूसच आहे….मला कोणी बदमाश म्हणलं काय,वाईट म्हणलं काय मला त्याचा किंचितही फरक पडत नाही कारण माझ्या हाताने कोणाचे कधी वाईट झाले नाही हे मलाच ठाऊक आहे….
दाखवतो एक आणि करतो एक अशी माझी वृत्ती नाही…ती असणार नाही…पाठीत खंजीर खुपसणाऱ्याची माझी जात नाही…..आयुष्य सुंदर आहे फक्त इतरांच्या आयुष्यात काड्या न करता जगता आलं पाहिजे……