[tta_listen_btn]
राहू दे मिठीत तुझ्या,दूर ढकलू नको,
गुपित दोघातले,कुठे उकलू नको….
ऑफिसमध्ये कामात गुंतून असल्याने आणि कामाने अगदीच अस्वस्थ झाल्याने जरा पाय लांब करून खुर्चीवरच रिलॅक्स झालो होतो.काम आटोपल्यानंतर फुलांचे,झाडांचे फोटो काढायचा आपला विशेष छंद पार पाडावा असा विचार मनात रेंगाळत होता तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर फोन आला,नंबर अन्होंन होता पण खाली गोवा असं लोकेशन दाखवत होतं! वाटलं आलाच आहे तर उचलून बघावं,तसेही दिवसभर कामानिमित्त कुठून ना कुठून अन्होंन नंबरनी फोन येतच असतात आणि असा फोन येणं माझ्यासाठी काही नवलाचं नव्हतच!
हॅलो…..”ओळखलं का?”
समोरून खूप मधुर आवाजात एका स्त्रीचा आवाज आला,नंबर अन्होंन, वरून ओळखला का म्हणून तीच विचारते…लांब पाय सोडलेले आपोआप जवळ आले आणि खुर्चीवर थोडा ताठ होऊन बसलो….मला ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त आणि ओळखीच्याच बोटावर मोजण्याइतपत स्त्रियांचे फोन येत असतात,मोबाईलमध्ये मोजून दहा बारा स्त्रियांचे (त्यात नातेवाईकपण आले) नंबर असतील!
“नाही..मॅडम,रॉन्ग नंबर लागलाय…चुकीने लागलाय का? समोरून हलकाच हसण्याचा आवाज आला ती हसत हसत म्हणाली “नाहीरे, रॉन्ग नाही राईट नंबर लागलाय” मी अधिकच कन्फ्युज झालो,मुळातच स्त्रियांसोबत मला बरोबर बोलता येत नाही आणि ही चक्क मला अरे म्हणते! कपाडावर आठ्या पडल्या मेंदूवर जोर देऊन आठविण्याचा प्रयत्न केला पण हुश्श ना आवाज ओळखीचा वाटत होता ना तिच्या बोलण्याच्या शैलीवरून ती ओळखीची वाटत होती.
पुन्हा समोरून ति बोलती झाली “अरे नाही ओळखलं का अजून” “अगं नाही ओळखलं,नंबर सेव्ह नाही आणि फोनवर पहिल्यांदाच तुझा आवाज ऐकतोय,कसं शक्य आहे ओळखणं? तिनं अरे म्हटलं म्हणून मॅडमच्या ठिकाणी अगं वैगेरे वाट्र बोलून मी मुद्दाम वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला! मुळात गोड बोलण्याची सवयच नसल्याने मी काय बोलू हेच समजत नव्हतं.”तू खूप छान लिहितोस,मी नेहमी वाचते फेसबुकवर” धत ‘तेरी ही नेमकी कोण असेल,समोर ठेवलेल्या लॅपटॉपवर पटकन फेसबूक उघडलं,फ्रेंडलिस्ट सर्च करू लागलो,त्याही फ्रेंडलिस्टमध्ये पाच हजारात खूप तर विसेक स्त्रिया मित्र म्हणून असतील,ज्याही आहेत त्या जवळपास ओळखीच्याच किंवा नावाने ओळखत असताना ही नवीनच कोण असेल हे मात्र कळत नव्हतं. “बरं,आठव, मॅट्रिकमध्ये असताना एका मुलीला तू चिठ्ठी दिली होतीस” हं…. पडला का उजेड आतातरी…” मी गप्पगार….एसीच्या थंड हवेत कपाडावर घाम आल्याचा एकदम फिलिंग आला.. बापरे ती ही बया… तब्बल सव्वीस वर्षानंतर…..”हो आठवलं” ती समोर नसूनही अगदी कावराबावरा अन लै दिवसांनी थोडंफार लाजलो मी…. “तू खूप मोठा माणूस झाला आता,आमच्यासारख्या गरिबाला कसा ओळखशील”……”ए असं काही नाही,मोठा झालो असतो तर तुझ्यासोबत बोललो असतो का?…आता तिला डायरेक्ट ए म्हणून म्हणता आलं याचं काही वाटलं नाही….”अरे काही नाही दिवाळीनिमित्त घर स्वच्छ करत होते,ती चिठ्ठी मिळाली जी माझं लग्न झाल्यानंतरही माझ्या सोबत ठेवली होती,ती आज हाताला लागली,वाचून हसू येत होतं” ती भराभरा बोलत होती,मी निमुटपणे सगळं ऐकत होतो.अचानक मी बोलून गेलो”थोडं मागे वैगेरे लक्ष दे, नवरा,बिवरा ऐयकत असल,फालतूची कुटाई होईल तुझी….देणं घेणं काही नाही….एकदम खेकसली “तुझ्यासारखा नाहीये तो”…..म्हणजे “हो तुझ्यासारखा स्वार्थी नाही….”मनाला बरं वाटलं,स्त्रिया आपली चूक कधीच मान्य करत नाही यावर या निमित्ताने पुन्हा शिक्कामोर्तब झाले.चिट्ठी देणारा मी, त्या चिठ्ठीला अख्ख्या आयुष्यात उत्तर देऊ न शकलेली ती आणि उलट मीच स्वार्थी! जजसाब ये तो सरासर अन्याय है। “वाटलं तुला फोनच करून बघावा”……मग आता काय विचार आहे,मला पटवायचा विचार तर नाही! नवरा बिवरा सोडून तर येणार नाही माझ्याकडे! मला हसू आवरता आलं नाही,मी तिला चिडवायच्या उद्देशाने जरा जास्तच बोलून गेलो, “गपरे,आता काय वय आहे काय,सुखी आहे मी,पोरं तुझ्या पोरांपेक्षा मोठी आहेत माझी”…… तिचं लग्न माझ्या लग्नाच्या अगोदरच झाल्याने तिचा पसारा अर्थातच लवकर वाढला होता,काळाच्या ओघात ती चिठ्ठी आणि ती विस्मृतीत गेली होती,मॅट्रिकच वय म्हणजे मनात असंख्य प्रश्नांची दाटी अन् निरागस प्रेमाची अनुभुती निर्माण होणारं वय असतं, नुकतीच शिशिरातली पानगळती संपून नवीन पालवी फुटून निसर्गाने आपला रंग बदलावा अगदी तसच हलकीच मिसरूड फुटून कोणावर तरी अलगद प्रेम व्हावे असं ते वय,या वयात भारी पोरी आवडतात,चिठ्ठी लिहायची आवड निर्माण होणे,कुठेतरी कोपऱ्यात बसून सिगारेट ओढून पाहणे असले उद्योग अत्यंत जोमात असतात आणि त्याच वयात ती आवडली म्हणून एक चिठ्ठी लिहून माझं तुझ्यावर आकाशा एवढं प्रेम आहे आणि आकाशातले चंद्र,तारे आणण्याचा कुटील डाव तिच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न याच वयात शिजत असतो,घरी नाही दाना न मला पुढारी म्हणा अशी नेमकी स्थिती प्रत्येकाची त्या वयात असते.हे आकर्षण असतं की प्रेम हे मात्र न कळणारं गणित आजही सोडवायला कठीण आहे.
आजच कशी काय आठवण झाली? अरे,फेसबुक पाहत होते,तुझा मस्त फोटो दिसला,तुझी आठवण आली,चिठ्ठीची आठवण आली,घर धुंडाळलं चिठ्ठी मिळाली”……म्हणजे तू अगोदर खोटी बोललीस..घर स्वच्छ करताना मिळाली म्हणून….”हो….पण ते बोलण्यासाठी म्हणून बोलले,तुझ्यावर खरच खूप प्रेम होतं माझं,त्या चिठ्ठीला उत्तरच काय साधं तुझ्या जवळ यायला किंवा बोलून सुद्धा मला व्यक्त होता आलं नाही रे त्यावेळेस,ती चिठ्ठी आजही जशीच्या तशी सांभाळून जपत आले… …..” मी स्तब्धपणे ऐकत होतो…..ती भावनेच्या सागरात खोल रुतत चालली होती….”तुझ्यावर निस्सीम प्रेम होतं माझं,तू एवढा निरागस होतास की मला साधा स्पर्श सुद्धा कधी केला नाहीस की जवळ येऊन बोलला देखील नाहीस”………ती चिठ्ठी,तुझं न आलेलं उत्तर….मी कसा काय तुझ्याकडे व्यक्त होणार होतो..मी एकतर्फी प्रेम करून बसलोय हाच समज होता माझा,मनातल्या मनात काहीतरी बोलत होतो…..तुझ्या न आलेल्या उत्तराला नकार समजून दूर राहिलो….तुला कल्पना आहे की मी बळजबरीने कोणतीच गोष्ट साध्य करत नाही…तुझ्यावर तरी कसा करणार होतो…..पंधरा मिनिटं सतत बोलल्यानंतर तिचं मन हलकं झालं,गेल्या सव्वीस वर्षांपासून न बोललेली ती… पूर्णपणे रीती झाली होती….शेवटी काय असतं प्रेम? केवळ शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम असतं का,नाही जीला साधा स्पर्शसुद्धा केला नव्हता,ती इतक्या दिवसांनी आपल्या संसारात सुखी असताना,लेकरांची आई झाली असताना मला आज सांगते की माझ्यावर तिचे किती प्रेम होते,निस्वार्थपणे आपली भावना व्यक्त करते,आपले प्रेम व्यक्त करतेय…….
“तू कसा आहेस?” एकदम मस्त….”तुझं यश बघताना खूप आनंद होतो,तू केलेली कठीण मेहनत मी बघत आली आहे….दूर असले म्हणून काय झालं….लक्ष असतं तुझ्यावर”….”ये बये, आता लक्ष ठेवू नको,पोराबाळांचा माणूस आहे मी….बायकोला माहीत झालं तर नसली आफत येईल माझ्यावर”……”मला नाहीत का मुलं?तुझ्यासोबत काही लफडं करायला फोन नाही केला, काय रे बायकोला घाबरतो का”…..नाही ती समजून घेते…..म्हणून तर मी बिनधास्त आहे…”हो रे ती नशीबवान आहे….मुलं कशी आहेत….छान…तुझी….माझी पण!….तुझ्या पहिल्या घरासारखं माझं टिनाचं घर आहे…नवरा कष्ट करतो आहे, हे खूप चांगल्या मनाचे आहेत…खूप प्रेम करतात…..पण सगळं भेटूनही काही तरी सुटलं असं वाटत असतं आयुष्यात कधी कधी,माझी नजर न लागो तुला,तू कधी येणार तर नाहीसच पण कधी आलास तर ये भेटायला….
“नको! डार्लिंग दूरचं डोंगर दुरूनच चांगलं असतं…ते तसच असू दे…
सुखी रहा….
(प्रस्तुत कथा काल्पनिक असून या कथेशी कुठेही साम्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा,कथेत लेखकाने नायकाची भूमिका साकारली याचा अर्थ लेखक कथेतला नायकच आहे असा समज करून घेऊ नये)
-✍️उमेश पारखी