बघ विसरता येत असेल तर….

रिमझिम पाऊस पडत होता,कदाचित मृगाचा तो पहिलाच पाऊस असावा! वातावरणात मंद असा मातीचा सुगंध पसरला होता,रिपरिप पडणाऱ्या पावसाचा स्पष्ट आवाज कानावर पडत होता,कित्येक वर्षानंतर मला तुला भेटायचं आहे केवळ एवढ्याच शब्दात एक मॅसेज मोबाईलवर आला होता,तिचा नंबर मोबाईलमध्ये नसल्याने नक्की भेटणारी व्यक्ती कोण असू शकेल ही उत्कंठा मनाला लागली होती परंतु दुसऱ्याच मॅसेजने ती उत्कंठा काळजीत परावर्तित झाली होती,पाऊस सुरू झाल्याने तिच्या येण्याची आशा आता जवळपास धूसर झाली होती पण मन मानायला तयार नव्हते,राहून राहून मी मोबाईल मध्येच उघडून पाहत होतो की तीने न येण्याचा मॅसेज तर नाही पाठवला, मनात विचारांची गर्दी झाली होती की इतक्या वर्षानंतर असं काय काम पडलं असेल की तिला मला गुपचूप भेटण्याची ईच्छा झाली होती,तिचा संसार व्यवस्थित सुरू होता हे मी ऐकून होतो,तिच्या संसारवेलीवर दोन टवटवीत फुलं देखील फुलली होती,मग असं काय झालं असावं की तिने मला एकांतात भेटण्याची ईच्छा व्यक्त केली,तिला प्रत्यक्षात भेटल्याला आता बराच कालावधी लोटलेला होता नव्हे त्यावेळी आजानतेपणाने म्हणा किंवा आकर्षणाने तिच्यावर जडलेलं अगदी कमी वयातलं प्रेम होतं,खरं तर एका अर्थाने तो अंकुरत्या वयातला बालिशपणा होता.त्यावेळेस ती नववीत तर मी जेमतेम दहावीत होतो असेल,आज जशी फास्ट जीवनशैली आली आहे त्यामानाने तो काळ ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा सारखा होता,त्याकाळात त्या सिनेमात प्रेमीयुगल जसे दुरदुरुन गाणं म्हणत आपलं प्रेम व्यक्त करायचे अगदी तसच माझं आणि तिचं प्रेम होतं,जे कधीही शारीरिक स्पर्शाने बाटलं नाही.प्रेम म्हणजे आत्मिक अनुभूती होती,ते निष्पाप निरागस नातं होतं, त्यावेळेस प्रत्यक्षात कधी ते व्यक्त करता आलं नाही हा भाग सोडला तर ती मनातून मला आणि मी तिला आवडत होतो हे मात्र नक्की होतं. तिला कित्येकदा मनातली गोष्ट सांगण्याचा मी सतत प्रयत्न केला,तिच्या नावाने कित्येक चिठया लिहिल्या त्या फाडल्या, देण्याची हिम्मत कधीच झाली नाही.मला आठवतं तिच्यासाठी तिला चिठ्ठी लिहावी म्हणून त्यावेळी शहरातून गुलाब काढलेले रंगीत पेपर विकत घ्यायचो,त्यावर खूप काही लिहायचो आणि कोणाच्या हातात पडल्यास नसली आफत येईल म्हणून ते फाडून टाकायचो.एक दिवस मोठी हिम्मत करून,मनाची तयारी करून एक चिठ्ठी लिहून तिच्या पुस्तकात लपवून ठेवली.याचे परिणाम काय होतील याची तसूभरही चिंता वाटली नाही पण मनात भीती मात्र दाटून होती.तिला काय वाटेल,तिची रिऍक्शन काय असेल याच विचारात रात्र गेली,डोळ्यात सारखी तीच दिसायची आणि अभ्यासासाठी पुस्तक उघडलं तरी पाना पानावर तीचच प्रतिबिंब दिसायचं.
सकाळी शाळेत गेलो,तिच्या नजरेत नजर मिळविण्याची हिम्मत नव्हती पण तिला चोरून बघत राहायचो.पुस्तकात ठेवलेली चिठ्ठी तिने वाचली असेल का?वाचली असेल तर तिला काय वाटलं असेल असे नाना विचार डोक्यात चक्रीवादळाप्रमाणे घोंगावत होते,मन अस्वस्थ होतं! ती जवळ येताना बघून माझ्या कपाळावर घाम फुटला होता,ती जवळ येताच तिने कागदाचा एक चोळा केलेला तुकडा माझ्या हातावर ठेवला अन काहीही न म्हणता ती आल्या पावली परत गेली,मी आ वासून बघत राहिलो! त्या तुकड्यात नेमकं काय असेल म्हणून मी तो चोळामोळा झालेला कागद हळुवारपणे उघडला,त्यात लिहिले होते “शाळेमागे जा,एक मोठा दगळ आहे त्याच्याखाली उत्तर शोध” मन अधिकच अस्वस्थ झालं अन उत्कंठा अधिकच वाढली.तसा धावतच शाळेच्या मागे गेलो,तो दगळ शोधला आणि बघतो ते काय माझ्या त्या दिलेल्या चिठ्ठीचे असंख्य फाडलेले अवशेष दिसत होते.मनाला खूप वेदना झाल्या,जखम खोलवर झाली होती.डोळ्यात आसवांनी जागा केली होती,एवढा कठोर अपमान आणि एवढं कठोर उत्तर मला कदापि अपेक्षित नव्हतं.ती सहज मला तू आवडत नाही हे एवढंच वाक्य म्हणली असती तरी काही विशेष वाटलं नसतं पण इतक्या क्रूरतेने दिलेलं उत्तर माझ्या जिव्हारी लागलं होतं.ते चिठ्ठीचे तुकडे हातात घेतले अन तसाच वर्गात जाऊन बसलो,अभ्यासात मन लागत नव्हतं की शाळेत बसायची ईच्छा उरली नव्हती.सरांकडे गेलो तब्येत बरी नाही म्हणून खोटं बोलून सुट्टी मागितली आणि घराकडे वळलो.
त्याच सायंकाळी मित्राला घेऊन तळ्याची पार गाठली,येताना सिगारेट आणि माचीस सोबत घेऊन आलो होतो.दहावीचं वर्ष आणि हातात सिगारेटचे पॉकेट,आत्ता कमाल वाटते,आश्चर्य देखील वाटते,प्रेमभंग माणसाला काहीही करवून घेते आणि ते वय ना प्रेम करण्याचं होतं ना प्रेमात पडण्याचं होतं तरीपण ह्या सगळ्या गोष्टी त्या वयात माझ्या बाबतीत घडत होत्या.चुकून दारूचा ग्लास हातात आला नव्हता नाही तर तो त्या दिवशी नक्कीच खाली झाला असता.मित्र समजावत होता,मी एकावर एक सिगारेट फुंकत होतो.पॉकेट संपता संपता रात्र झाली होती.डोळ्यातून असवांच्या धारा वाहत होत्या,मित्र कसाबसा मला मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करत होता.एका पोरीमुळे जगण्याची रंगतच बिघडली होती.घरी आलो न जेवताच खाटेवर पडलो,झोप येत नव्हती,डोळ्यात ती आणि तीच खेळत होती…..मी काय एवढा वाईट आहे,तिने माझा का धिक्कार करावा असे असंख्य प्रश्न माझ्या अंतर्मनात द्वंद्व करत होते.
सकाळी उठलो,काल काय झालं त्याचा विचार डोक्यातून जात नव्हता पण तिला बघून यावेच असे मनाला वाटले आणि तिच्या घराच्या रस्त्याने निघालो,ती दारात उभी होती,तीच लक्ष माझ्याकडे गेलं अन तिने तोंड वाकडं करून मान फिरवली.मी तसाच परत फिरलो,आता हा अपमान पुरेसा होता.घरी आलो न जेवता दफतर उचललं आणि शाळेत गेलो.तिने केलेल्या अपमानाचा बदला मला घ्यायचा होता आणि त्याचे उत्तर मॅट्रिकमध्ये चांगल्या गुणांनी पास होणे होते हेच होते हे मनात ठरवून टाकले होते,रागात भूमितीचे बारा प्रमय एका झटक्यात तोंडपाठ केले,रविवार उन्हाडक्या करण्यात जायचा तोच दिवस दिवसभर बैलांना शेतात चारण्यात जाऊ लागला,त्यांच्या मागे मागे जोरजोरात बोंबलून कविता,निबंध,प्रश्न उत्तरं तोंडपाठ करण्यात जाऊ लागला.आता ती पुस्तकाच्या पानात दिसत नव्हती की मनात येत नव्हती,मला बदला घ्यायचा आहे याचं एकाच उद्देशाने मी अभ्यास करण्यास झपाटलो होतो.
ते पहिलं प्रेम होतं,माणसाला सर्वच विसरता येतं पण पहिलं प्रेम मात्र माणूस विसरू शकत नाही,कोवळ्या वयात हृदयावर झालेल्या घावांवर आयुष्यभर औषध मिळत नसतं,जखम भरली जाते पण व्रण कायम असतात आयुष्यभर आठवणी काढत असतात.आज निकालाचा दिवस होता,मनात घालमेल होती त्यावेळेला ऑनलाइन निकाल नसायचा,तो शाळेत जाऊन घ्यावा लागायचा.मनातल्या मनात घाबरत शाळा गाठली,शाळेच्या खोलीत प्रवेश केला,शाळेतली सगळी मुलं,मुली रांगेत बसली होती,मला बघताच मुख्याध्यापक उठून उभे राहिले,मी पुन्हा दचकलो मला वाटलं यांच्या शिव्या तर मला मिळणार नाही,मनात भीती वाटायला लागली होती. वेलकम डियर यु आर रिअली ग्रेट,अरे तू आमच्या शाळेचं नाव मोठं केलं,तू सर्वात जास्त टक्के घेऊन पास झालास,मला काही सुचत नव्हतं..डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते,मुख्याध्यापकांच्या पाया पडलो,मार्कशीट हातात घेतली,पुढे बसलेल्या मुलामुलींवर नजर गेली,ती कुठे आहे? माझे डोळे तिला शोधत होते….मी करून दाखवलं म्हणून तिला सांगायचं होतं, तू नाकारलस तरी मी काय करू शकतो हे तिला दाखवायचं होतं…. ती…….मान खाली घालून बसून होती….आज तिला माझ्या नजरेत नजर मिळविण्याची हिम्मत नव्हती……
नंतर मी मागे वळून पाहिलं नाही,मी गाव सोडला,तिचं नंतरच्या काळात काय झालं याची साधी दखलही मी घेतली नाही,मी शिकत गेलो एका नामांकित कम्पणीत मोठ्या हुद्यावर पोहचलो.काही वर्षांनी एका दिवशी मित्राने फोन केला,अरे तिचं लग्न झालं आता दोन मुलं आहेत, मी म्हटलं “छान,नवरा कसा आहे तिचा,सुखात आहे ना ती””हो चांगल्या घरी पडली,नवरा कुठेतरी नोकरीवर आहे,सुखी आहे” “हो यार,ती सुखात असू दे,आपलं प्रेम नाकारलं तेंव्हा ती अगदीच कोवळ्या मनाची होती,समजलं नाही तिला,ती दुःखात रहावी असं त्याहीवेळी वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाही,सुखात राहू दे” मित्र सांगत होता,मी बोलत होतो,क्षणभर ती डोळ्यासमोर दिसावी तशी तिचं प्रतिबिंब मनात उमटलं होतं. ती आठवली होती………
भूतकाळातल्या आठवणीत असतानाच एक स्त्री छत्री घेऊन येताना दिसली,इतक्या वर्षांनी तिच्यात बदल होऊनही मी सहज तिला दुरूनच ओळखलं,छत्री बाजूला ठेवत तिने विचारलं “कसा आहेस?” “हं… ठीक आहे,तू?” तिचा चेहरा गंभीर दिसत होता,तिला नेमकं काय सांगावं हे सुचत नसावं,”अग मी विचारतोय कशी आहेस तू” ती भानावर येत “मी” “हो तूच” “अरे ठीक आहे मी” कापऱ्या आवाजात तिनं उत्तर दिलं,मला शंका आली की नक्कीच काही तरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच इकडे बोलावलं असणार,मला कल्पना आली.”काय प्रॉब्लेम आहे,संकोच न करता सांग” “अरे कसं सांगू…” “माझ्यावर अजून प्रेम आहे का तुझं?” तिच्या ह्या प्रश्नाने मात्र मला धक्काच बसला,मी विचारात पडलो.”अग पण आत्ता हा प्रश्न कशासाठी,माझही लग्न झालय,तुझही झालय, दोघांनाही मुलं बाळं आहेत” तिने मी बोलताना मध्येच माझं बोलणं थांबवत म्हटलं “अरे हो म्हणूनच विचारतेय तुझं आजूनदेखील माझ्यावर प्रेम आहे?” “तुझी माझ्या मनातली जागा कोण बरे घेऊ शकेल” मी सहज बोलून गेलो आणि तिला उचंबळून आलं अन ती धाय मोकलून रडू लागली,तिच्या चेहऱ्याकडे पाहताना मला उगीचच मी गुन्हेगार आहे की काय असा भास व्हायला लागला.तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा बाहेरच्या पावसासारख्या कोसळत होत्या.”अग पण नेमकं झालय तरी काय?” मी तिच्या खांद्यावर माझे दोन्ही हात ठेवत विचारलं.रडत तिने मला घट्ट मिठी मारली,माझ्यासमोर असंख्य प्रश्न वायूवेगाने निघून गेले,तिने मला आपल्या बाहुपाशात घेतले होते पण माझ्यात तिच्या पाठीवरून हाथ फिरविण्याची देखील हिम्मत होत नव्हती.असं नेमकं काय झालं की ती एवढी सेन्सेटिव्ह झाली होती,तिला बाजूला घेत विचारलं “अग, असा काय प्रसंग झालाय ते तर सांग एकदा” “अरे,माझा संसार सुरळीत सुरू होता,यांना पगार देखील चांगला मिळत होता,माझ्या संसारात दोन छोटी छोटी मुलं देखील आलीत पण एकदिवस माझ्या सुखी संसाराला ग्रहण लागलं,यांना पिण्याचं व्यसन लागलं,पिण्यामुळे यांची नोकरी गेली” ती रडत आपलं दुःख मांडत होती,मी अस्वस्थ नजरेने तिला न्याहाळत होतो “व्यसन एवढं वाढलं की घरातली वस्तू विकण्यापर्यंत यांची मजल गेली,दोन छोटी मुलं, त्यांचं शिक्षण बंद झालं,अरे आज खायला सुद्धा माझ्या घरी अन्नाचा कण नाही” नकळत माझ्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली,अश्रू डोळ्यातून बाहेर येण्याचे प्रयत्न करू लागले,ती बाहेर पडणाऱ्या पावसासारखी कोसडत होती “अरे,आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत,त्यांना वाचवायला सुद्धा माझ्याकडे एक रुपया देखील नाही,माझ्या मुलांचं कसं होईल,बापाचं छत्र हरवलं तर मी यांना घेऊन कशी जगू” मी नेमका कोणत्या अवस्थेतून जात होतो हे मलाच कळत नव्हतं,मी काय पाऊल उचलणार होतो हे मलाच ठाऊक नव्हतं “मिस्टर कुठे भरती आहेत तुझे” तिने हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं नाव सांगितलं” खिशात आजच मिळालेला पगार होता,अलगद हात खिशात गेले….पगाराचं बंडल तिच्या हातावर ठेवत म्हटलं “काळजी नको करुस मी आहे” “काळजी घे,मुलांची,स्वतःची, तू अजूनही मला प्रियच आहेस,जा तुझा संसार बघ,मदत लागलीच तर हक्काने सांग,माझ्या डोळ्यातले अश्रू पुसत तिला मी जायला सांगितलं,जा आता” ती अश्रू पुसत माझ्या पायावर डोकं ठेवू लागली,मी तिला दूर करत मिठीत घेतलं.”जा काळजी घे” ती जाताना मागे वळून वळून पाहत होती अन मी शून्य नजरेने उभा होतो…..
खिशातून फोन काढला,डॉक्टरांचा नंबर लावला “डॉक्टरसाहेब मी बोलतोय,तो 15 नंबरचा पेशंट कोणत्याही स्थितीत बरा करा,त्याचे जेवढे बिल होईल तेवढे माझ्याकडे लागले,त्यांच्या पत्नीला मागू नका की यातलं काही सांगूही नका”
………..

सहा महिन्यांनंतर ऑफिसमधील फोन वाजला “अरे,मी बोलतेय” “हं बोल ग” “अरे तुझ्यामुळे माझा संसार सुरळीत झाला,यांची दारू सुटली, ते पुन्हा नोकरीवर जाताहेत,त्यांच्या ऑफिसमध्येपन तूच फोन केला ना,माझी मुलं पण शाळेत जायला लागली,तुझे उपकार कसे फेडू,काय केलं म्हणजे तुझे उपकार फिटतील”

“मला विसरून जा………”

(ही काल्पनिक कथा आहे,या कथेचा वास्तविक जीवनाशी,पात्रांशी वा घटनांशी काही एक संबंध नाही तसे आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)

-उमेश पारखी

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी