[tta_listen_btn]
फेसबुक पोष्ट : माझ्या घराचं चित्र बघून अनेक मित्रानी मनाला सुखावून टाकणाऱ्या कमेंट्स दिल्या,मी अत्यंत सुखावून गेलो! घराला सहा वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून हा फोटो लावला होता! कोणाची नजर न लागो असे म्हणतात पण अशा नजरा माझ्या कोणत्याच गोष्टींना लागत नसतात नव्हे तशा भुक्कळ अंधश्रद्धाळू गोष्टींवर माझा विश्वास आधीही नव्हता,आत्ताही नाही,ज्या गोष्टीसाठी घाम गाळला,कष्ट उपसले ती गोष्ट जगाला दाखविण्यात मला तरी काही उणे वाटत नाही, खरे तर मी माझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो,मी माझ्या माणसांवर,मित्रांवर,लेकरांवर आणि मनात भडभडणाऱ्या जखमांवरसुद्धा!!!
गावखेड्यात एक म्हण आहे “घर बांधून पाह्य नाही त पोरीचं लगन करून पाह्य” आणि हे एक साधं वाक्य पूर्ण करण्यासाठी माणसाची अक्खी हयात निघून जाते, हे वाक्य प्रत्यक्षात आणण्या इतपत सोप्प कधीच कोणालाही नसतं,ज्यांना बापजादयांची रेडिमेड इस्टेट लाभते त्यांच्यासाठी कदाचित अशा गोष्टींची किंमत नसावी पण वाळवंटात पाण्याचे थेंब शोधणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या पाण्याची किंमत नक्कीच माहीत असते.प्रत्येकाला वाटतं की आपलं एक सुंदर घर असावं,कोणी हौसेने घर बांधतात तर कोणी बंगला बांधतात पण मला माझ्या परिस्थितीने डोक्यावर छत बांधण्यास उद्युक्त केले,विषम परिस्थितीत निर्णय घ्यायला भाग पाडले,वाईट परिस्थितीत राहण्याचा बराचसा अनुभव माझ्या पाठीशी आहे,ताट्याच्या,कड्याच्या,कवेलुच्या,टिनाच्या पत्र्याच्या झोपडीवजा घरात राहून हे घर जे दिसतय ते बांधायला घेतलं.ज्या वेळेला घर बांधायचा विचार केला त्यावेळेस हातात काय तर केवळ सहा हजार रुपये होते,जुने टिनाचे घर पाडण्याचे दुःख होतेच कारण त्या घराचा पायवा माझ्या वाईट प्रसंगात माझ्या मित्रानी खोदून दिला होता,ते ही एक रुपया न घेता! ते घर पाडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता,वीस बाय दहाच्या जागेत तीन खोल्या दाटीवाटीने बसविल्या होत्या,खोल्या एवढ्या निरुंद होत्या की बाहेरून कोणी आलं तरी झोपण्यासाठी अंगणात यावं लागायचं.त्याही परिस्थितीत मी कधीही लाचारी पत्करली नाही की कोणाकडे हात पसरले नाही,अशा वेळेस आपले कोणतेच नातेवाईक कामी पडत नाही ही जगाची रीत आहे,आपलं खटलं आपल्यालाच सांभाळावं लागतं.
जुनं घर पाडून त्याठिकाणी केवळ मी,माझी बायको आणि माझे दोन कॅलेंडर सुखाने राहावेत एवढ्यासाठीच नवीन घरकुल बांधावं हे माफक स्वप्न होतं. मी आयुष्यात फार कमी आणि मोजकीच स्वप्न पाहिली त्यापैकी हे एक स्वप्न होतं. माणसाने अवास्तव स्वप्न पाहू नयेत,जी स्वप्न सत्यात उतरवता येतील आणि तीही इमानदारीने अशीच स्वप्ने पहावीत.इतरांना मूर्ख बनवून,फसवून,लुबाळून श्रीमंत होण्यापेक्षा माणसाने दारिद्र्यात जीवन घालवले ते चांगले कारण ही बनवाबनवी करून मिळविलेली इज्जत,श्रीमंती लोकांना दाखविण्यासाठी ठीक परिणती ती तुम्हाला मानसिक समाधान,सुख कधीच देणारी नसतात.माणसाने स्वतःची गरज काय आणि किती हे लक्षात घेऊन काम केले तर कोणतेही स्वप्न असू द्या ते नक्कीच पूर्ण होतात.
मी घर बांधताना एक रुपयाचेही लोन घेतले नाही कारण मी जी प्लॅनिंग केली होती त्या प्लॅनिंगनुसार ही गोष्ट घडवून आणली होती,सुरुवातीपासून ज्या आर ड्या काढल्या त्या यावर्षी मिळणार हे माहीत होतं,पैसा जो माझ्यासाठी ज्या वेळेस कामी नव्हता तो नातेवाईकांना दिला होता तो त्यांना यावर्षी द्या म्हणून सांगून ठेवलं होतं,केवळ नावाच्या क्रेडीटवर विटा,सिमेंट,लोहा असे साहित्य मला मिळणार होते ही खात्री होती,अशा युक्त्यांनी मी माझ्या घराचे स्वप्न पूर्ण करणार होतो.घराचे डिझाइन तयार करण्यासाठी मला इंजिनिअरची गरज लागली नाही,ते मी स्वतः तयार केले होते.
जुने घर पाडण्याचे काम आम्ही दोघे नवरा बायकोनी सुरू केले,बायकोचे दोन भाचे मदतीला आले,टीना उतरल्या होत्या,भिंतीची एक एक वीट हथोड्याने पाडायला सुरुवात केली,अर्धे घर पाडले,मी हथोड्याने विटा पाडत होतो तर बायको पडलेल्या विटांमधून काही चांगल्या विटा पुन्हा कामी येतील म्हणून एक एक काढत होती,मी हथोड्याने वीट पाडत असताना अचानक एक वीट खाली विटा काढत असलेल्या बायकोच्या हातावर पडली,हाताच्या एका बोटाचे दोन तुकडे झाले……
दुसऱ्या हाताने तिने तुटलेले बोटाचे दोन्ही तुकडे एकमेकांना पकडून उभी राहिली,काय झालं ते पटकन माझ्या लक्षात आलं आणि तिला घेऊन तात्काळ दवाखाण्यात गेलो,बोटाच्या दोन्ही तुकड्यातील केवळ एक नस शिल्लक राहिली होती,डॉक्टरांनी जोडजंतर करून बोट शिवले,ते जुळणार की नाही हा प्रश्नच होता,कालांतराने बोट जुळले पण ते कायमचे वाकडे झाले! ही घर बांधण्यातली न विसरणारी आठवण पदरी पडली.
ज्यांना वडिलोपार्जित घरदार मिळतं, इस्टेट मिळते त्यांनी ती जपली पाहिजे,घर बांधणे आज खूप कठीण आहे,काळ खुप कठीण आहे,गरजा ओळखल्या पाहिजे,पैसा कमवायला खूप कष्ट लागतात तर गमवायला दहा मिनीटेही पुरी असतात.अवास्तव खर्च आणि अवास्तव स्वप्न या दोन्ही गोष्टी वाईटच,समोरच्याने कार घेतली म्हणजे आपणही ती घ्यावीच असे काही नाही,आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला तिची गरज आहे का याचा आधी विचार केला पाहिजे,ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांना नाचू द्या की आडवे उभे पण आपल्याला नाचायला आपलं अंगण पुरेसं आहे का याचा विचार आपल्यालाच करायचा असतो.
एवढसं घर,एवढी लंबी कथा! एवढं सांगायचा माझा उद्देश पोम्बाडिंगी हाकने नाही की मी खूप काही मोठ्ठे काम केले अशातलाही भाग नाही,जे कष्टाने उभं केलं ते सांगण्याचा हक्क तर मला आहेच ना….
माझ्या कोणत्याही कामात मी दैवी चमत्कार,नशीब अशा गोष्टींना थारा दिलेला नाही,रस्त्यावर हळदी कुंक लावून ठेवलेल्या निंबाचेही कित्येकदा मी शरबत करून प्यायलो आहे…तर रस्त्यावर ओवाडून ठेवलेल्या अंड्याला जोड्याने ठोकर मारली आहे….
बेटा इमानदारिसे मेहनत करो…हजार रास्ते अपनेआप खुल जायेंगें।