[tta_listen_btn]
■हा प्रवास साधा सोपा नव्हताच मुळी! आणि माझ्या जीवनात मी जे काही केलं ते यशस्वी होण्यासाठी नव्हतं तर ते होतं स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी!
मी माझ्या जीवनात काय केलं,किती कष्ट घेतले,आज इथपर्यंत कसा पोहचलो ही तर सांगण्याची गोष्टच नव्हे,जे केलं ते स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी केलेल्या कामासाठी स्वतःचीच पाठ मला थोपटावीशी वाटत नाही,कोरोनाच्या भयाण वातावरणात माझा हा आनंदाचा क्षण फिका आहे याची पुरती जाणीव आहे मला.परंतु माझ्या जीवनातला बरा वाईट प्रसंग प्रत्येकवेळी मित्रांसोबत शेअर करत आलोय म्हणून हा ही प्रसंग आपल्यासमोर ठेवतो आहे!
■”काय हो? पाठीवर हा व्रण कसला? नकळत पाठीवर तिनं हात फिरवला आणि तिच्या चिंतातुर चेहऱ्यावर बरच काही अधोरेखित झालं! अगं आज काम जरा जास्तच होतं पाठीवरून तीनशे चारशे पोती वाहलीनं म्हणून असेल कदाचित, तोंडातून अलगदपणे शब्द बाहेर पडले आणि डोळ्यात अश्रूंनी एकच गर्दी केली.. पन्नास पन्नास किलोचे पोते वाहतांना पाठीवरची चामडी कधी सोलून गेली हे मलाही जो पर्यंत तिचा हात पाठीवरून फिरला नाही तोपर्यंत कळलं नाही…. थांबा मी तेल लावते मग बरं वाटेल पण धीर सोडू नका हं तुम्ही, असेही दिवसं जातील आपले…….. मन सुन्न झालं आणि पुढल्या दिवशी त्याच उमेदीने कामाला लागलो…. हेच तिचं धीर देणं आजही मला त्या कठीण दिवसातल्या आठवणी ताज्या करून जातात…… जे क्षण आम्ही घालवले कठीण क्षणाशी दोन हात केले त्यावेळेला दुर्दैव ते हेच की स्वताला माझे नातेवाईक समजणाऱ्या आप्तगणांनी मात्र साधी विचारपूस करण्याची सुद्धा तसदी घेतली नाही………
सोयरसुतक त्यावेळी कोणालाही नव्हतं……..
खूप वाईट वाटतं……
पण त्याच वेळी बायकोचं माझ्या मागे खंबीरपणे उभं राहणं मला जगण्याची नवी उमेद देऊन गेली….
माझ्या लढवैय्या वृत्तीचा फटका सर्वाधिक तिलाच बसला हे मी आजही विसरू शकत नाही…साधा कंपनीमध्ये लेबर असणारा मी कामगारांच्या हक्कासाठी युनियनबाजी केल्याने महिनाभर बडतर्फ होऊन घरी बसतो आणि ती दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करून घर चालवते तेंव्हा कळतं की पोटाच्या भुकेसमोर असलं पुढारीपण करणं किती कवडीमोल असतं…… तिच्यासोबत जीवनाचं प्रत्येक गणित सोडविताना कधी ती बेरीज व्हायची तेंव्हा मी नेहमी वजा असायचो…..
■आजही आठवतय आमच्या मुलीचा म्हणजे प्रतिक्षाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा एक वर्ष हाताला काम नव्हतं,संसार कशाच्या भरवशावर चालविशील,पोरीला काय चारशील अशाप्रकारचे टोमणे घरून आणि शेजाऱ्या पाजाऱ्याणकडून नित्याचेच झाले आणि बरोबर एक वर्षांनी लेबर म्हणून सोलार कंपनीमध्ये कामाला जायला लागलो,त्यावेळी ज्या मित्रांनी मला मोलाची मदत केली,त्यांना कधीही विसरणे शक्य नाही,ट्रकमधून युरियासारखा पदार्थ भरून असलेल्या बॅगा आम्ही रोज किमान 600-700 खाली करायचो, बॅग खाली करणाऱ्या मित्रांमध्ये मी सर्वात कमी वयाचा असल्याने,त्याना पण माझी दया यायची,मग ते मला बॅगा पाठीवर नेण्यास मनाई करायचे आणि ट्रकमध्ये बॅगा उचलून देण्याचे काम माझ्याकडे द्यायचे,माझं वय त्यावेळेस केवळ 23 वर्ष होतं आणि कोणत्याही कामाचा कसलाच अनुभव नव्हता अपवाद केवळ शेतीचा थोडाफार अनुभव आणि आठवीत असताना भावासोबत जाऊन बांधकाम विभागाच्या वावरात खोदलेल्या नाल्या! आयुश्यात मला खोटी कामे करता आली नाही आणि कोणतीही गोष्ट कधी लपवता आली नाही आत्ताही लपवता येत नाही, मी भूतकाळात काय होतो आणि आत्ता काय आहे हे कुणाही पासून कधी लपवून ठेवण्यात मला स्वारस्य नाही,व्यर्थ अहंकारही नाही! माणसाला ध्येय साध्य करायचे असेल तर प्रचंड मेहनत करण्याची गरज आणि प्रचंड इच्छाशक्ती असली पाहिजे,त्या जोरावर तो कोणतेही काम सहज पूर्णत्वास नेऊ शकतो! आई वडिलांनी पोरगं बिघडून जाईल म्हणून अगदी वयाच्या 21 व्या वर्षीच माझं सदा मंगलम करून टाकलं,अनपेक्षितपणे जवाबदारी माझ्या खांद्यावर आली ज्यावेळेस मी एक बेरोजगार होतो,लग्न लवकर उरकल्याने मूलही लवकर झाली आणि याच जवाबदारीच्या ओझ्याने एक लेबर म्हणून संसारचक्रात पिसल्या गेलो! मी माझ्या मुलीला भाग्यशाली समजतो कारण ती ज्यावेळेस माझ्या जीवनात आली अगदी त्याच वेळेस मी कामाला लागलो,हाताला काम मिळालं.एवढं सगळं होतानाही माझं शिक्षण मात्र सुरू ठेवलं, लग्न झाल्यानंतर कम्प्युटर क्लासेस राजुऱ्याला सायकलने येणे जाणे करून पूर्ण केले.
■माझ्याकडे वेळ नाही म्हणून जीवनात कधी विचार केला नाही,वेळेचा उपयोग कसा करून घ्यायचा हे नेहमीच ठरवत आलो,असं म्हणतात की आलेली संधी सोडू नये ती संधी पुन्हा येत नाही म्हणून की काय माझ्या जीवनात ज्या संध्या मिळाल्या त्या मी कधीच सोडल्या नाही.पोती वाहताना प्रत्येक काम निरखून पाहत गेलो,प्रत्येक काम शिकण्याचा प्रयत्न करत गेलो,आमच्या बापजाद्यांनी जे काम कधी त्यांच्या आयुष्यात केले नाही ते काम मी शिकत गेलो,मी कारखान्यात कोणते काम शिकले ते या ठिकाणी लिहू शकत नाही,त्याला मर्यादा आहेत. परंतु इलेक्ट्रिक बॉयलर,जनरेटर इत्यादी कामे केवळ पाहून आणि अनुभवाने शिकत गेलो,त्यावेळेस एक बिहारी ऑपरेटर असायचा,त्याला नेहमीच भीती असायची की हा जर शिकला तर माझी हकालपट्टी निश्चित असेल म्हणून तो सतत आपल्या दूर ठेवायचा,कोणताच फॉर्म्युला तो द्यायचा नाही,तो ऐटीत ऑर्डर सोडायचा,कधी कधी पाय,डोके चेपून घ्यायचा! आम्हाला शिकता यावं म्हणून ते काम सुद्धा आम्ही करायचो पण त्याने थोडीही माहिती वा मदत केली नाही.ही ही गोष्ट तेवढीच सत्य की तो आत्ताही ऑपरेटरच आहे,याउलट प्रसाद साहेब म्हणून मॅनेजर होते,ते ही बिहारीच होते परंतु हा माणूस माझ्यासाठी देवमाणूस ठरला,मी पाहू पाहू माल तयार करणं शिकलोच होतो पण तो ऑपरेटर कधी मला संधी देत नव्हता! काही दिवसांनी वेळ अशी आली की आमच्या कम्पनीतून दुसऱ्या राज्यात माल पाठवायचा होता आणि ऑपरेटर एकच असल्याने केवळ दिवसा तेवढ्या मालाचे उत्पादन घेणे कठीण होते! एका दिवशी साहेबांनी मला ऑफिसात बोलावले ” पारखी,क्या तू माल बना पायेगा” साहेबांबद्दल एक आदरयुक्त भीती मनात असायची,सुरुवातीला प्रश्न ऐकून घाबरलो परंतु वर म्हटल्या प्रमाणे संधी पुन्हा पुन्हा येत नाही,मी लगेच म्हटलं “सर,मैं बना तो सकता हूं,लेकिन कुछ गडबड हो गयी तो….. अर्ध्यातच वाक्य कापत ते बोलले “कुछ नही होगा और होगा तो मैं हूं तुम्हारे पिछे” “सर,अभी तक तो बनाया नही” त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि “चल मेरे सामने तू आज बॅच बनाएगा” असं म्हणून ते मला घेऊन प्रॉडक्शन प्लांटमध्ये आले,त्या ऑपरेटरला सांगितलं आज पारखी बॅच बनायेगा,तूम चुपचाप देखते रहना, तो अवाक होऊन साहेबांच्या तोंडाकडे बघत राहिला,मी काम सुरू केलं एका तासात एक बॅच बनवून दाखवली आणि आश्चर्य म्हणजे त्या ऑपरेटरच्या बॅचपेक्षा माझी बॅच दर्जेदार बनली.सॅम्पल लॅबमध्ये चेक केलं आणि साहेबांनी त्याच वेळी सांगितलं की आज से तू पुरी नाईट शिफ्ट संभालेगा,माझ्यासोबत 4 पोरं आणि ती नाईट शिफ्ट आणि साहेबांनी दिलेली कौतुकाची थाप ही माझ्या यशाची पहिली पायरी ठरली!आता धावपडीच काम होतं पण पाठीवर पोते वाहायचं काम मात्र बंद झालं होतं, रुपेश काकडे,गजानन कोवे,वसंता मोंढे अशी मोजकी पण चांगली लोकं माझ्या सोबत होती नव्हे ते माझ्या प्रवासाचे साक्षी आहेत.
■माझ्या जीवनात नोकरी करत असताना पुन्हा दुसरी संधी आली ती 2008 साली,नुकताच भिलवाडा राजस्थान येथे नवीन प्लांट तयार होऊन पूर्ण झाला होता पण तो प्लांट चालविण्यासाठी तेथे जायला कोणी तयार होईना,शेवटी प्रसाद साहेबांनी बोलावून घेतलं,विचारला “पारखी जायेगा क्या?तेरे लिये एक चान्स है आगे बढनेका,पेमेंट भी बढेगा और तू सुपरवायझरभी बनेगा,बोल” मी म्हटलं सर घरमे पुछकर बताता हूं, घरी आलो घरी माझे सासरे नुकतेच आले होते,मी बायकोला म्हटलं की माझी ट्रान्सफर राजस्थानमध्ये होत आहे,काय करायचं,बायको एकदम गांगरून गेली, “आजी थे राजस्थान कुठं आपण कुठं,दोन हजार किलोमीटर दूर,कोणी मेल्याचाबी पत्ता नाई न वाचल्याचा,नाई बाप्पा नाई मनुन सांगून द्या सायबाले! हे सांगताना सासरेबुवा ऐकत होते,एकदम भडकले “का का मनली तू,अशी संधी येते का पुन्हा अन येथ राहून का कराच हाये तुले, पुढं जाशील का अशानं,थे काही नाही,सायबाले सांगून टाका,जातो म्हणून! मी म्हणलं “मामाजी,पोरगी लहानशी आहे,पोर्गबी 4-5 वर्षाचस आहे कसं होईल? थे काही नाई पोरीले ठेवून दे आमच्याकडं न पोराले सोबत घेऊन जा! दुसऱ्या दिवशी हिम्मत करून कम्पणीत गेलो, (वसंतराव) वरारकर साहेब दारावरच भेटले,मी म्हटलं साहेब का करू? काही समजून नाही राहिलं, “काही नाही रे अशी संधी येत नाही,तुझ्याकडे ती चालून आली आहे,संधी सोडू नको,तुझं भलं होईल,तू जा राजस्थानमध्ये!” त्यांचे शब्द ऐकून निर्धार पक्का केला आणि साहेबाला हो म्हणून टाकलं! राजस्थान एक वेगळं राज्य,लोकं मायाळू,प्राणिमात्रांवर दया करणारी,अशा राज्यात घरदार सोडून दोन हजार किलोमीटर दूर लहानशा पोराला सोबत घेऊन आम्ही नवरा बायको निघालो!
प्रत्येक प्रसंग लिहीत बसलो तर माझं आत्मचरित्रच होऊन जाईल एवढं लिहिता येईल!प्रवास तसा सोपा नव्हताच पण पावलो पावली चांगली माणसे भेटत गेली,योग्य मार्गदर्शन मिळत गेलं, महत्वाचं म्हणजे माझा स्वभाव दुसऱ्याचं वाईट करून आपलं भलं करून घ्यायचं असा नसल्याने मला कोणत्याच माणसाकडून कधी विरोध झाला नाही की कोणी पाय खेचण्याचा प्रयत्न केला नाही,तुम्ही आपल्या कामाशी,कर्तव्याशी इमान ठेवून वागाल तर यश नक्कीच तुमच्या पदरात पडत असतं, कोणाचे वाईट करून आपलं चांगलं होईल हे कोणत्याही माणसाने गृहीत धरू नये.सन 2009 मध्ये रामगुंडम तेलंगाणा येथे नवीन प्लांट कार्यान्वित झाला, राजस्थानहून माझी बदली तेलंगणा राज्यात झाली नव्हे तर सुधीर कुमार साहेब आहेत त्यांनी हेड ऑफिसला सांगून मला मागून घेतले,त्यावेळेस काही लोकांनी मला फोन केले होते की तू इकडे येऊ नकोस,ती जागा चांगली नाही,लोकं बरोबर नाही,तू आपली नोकरी फुक्कट गमावून बसशील पण मला मुळात चॅलेंज स्वीकारणं आवडतं म्हणून त्यांच्या फोनकडे मी दुर्लक्ष केलं आणि डिसेंबर 2009च्या 10 तारखेला रामगुंडम प्लांटमध्ये रुजू झालो,पहिल्याच दिवशी असा काही अनुभव आला की समोरचं दृश्य पाहून हबकून गेलो,सेक्युरिटी रूममध्ये आमचे कामगार पत्ते खेळत बसले होते,काही सिगारेट,बिळी ओढत होते,मी आलो तरी नवीन प्लांट इंचार्ज म्हणून कोणाला काही फारसे देणेघेणे नव्हते,त्यांची भाषा कळायला मार्ग नव्हता आणि मी काय बोलतोय हे त्यांना काही समजत नव्हते,खूप चॅलेंजिंग काम होतं.नोकरी करत असताना माणसाला राजकारण जमलं पाहिजे आणि तुम्ही कसे बोलता यावर सर्व गणितं अवलंबून असतं, हळूहळू सर्वाना विश्वासात घेतलं, प्लांटमध्ये जिकडे तिकडे अस्ताव्यस्त कचरा,जंगली झुडपं वाढलेली होती,त्यांच्याकडून स्वछता करून घेतली,बाजारातून नवीन झाडे आणली,लावली! प्रत्येक कामगाराला एका एका झाडाची जवाबदारी दिली,पुढे भविष्यात त्या झाडांची त्यांनी देखरेख केली,उजाड असलेला प्लांट झाडांनी गजबजून गेला,आज त्या झाडांची गोड फळे सर्वजण खात आहेत,मी त्यांच्याकडून काम घेत असताना माझ्या तोंडातून त्यांच्यासाठी कधी शिव्या निघाल्या नाहीत कारण माझा भूतकाळ मला चांगला ज्ञात होता,लहानाचा मोठा इथेच झालो,ते जे काम करत होते तेच काम कधीकाळी मी ही केले होते आणि एका कामगाराचं जीवन कसं असतं हे मी भोगून होतो.एक गमतीशीर गोष्ट सांगतो,मी दोन दिवस सुट्टीवर होतो आणि इकडे कोणीतरी गंमत केली की पारखी साहेबांची बदली झाली आहे,सकाळी बघतो तर काय कम्पनीच्या गेटला कुलूप लावून कामगारांनी ठिय्या मांडला शेवटी मलाच येऊन सांगावं लागलं की माझी ट्रान्सफर झालेली नाही,सुट्यावर आहे! तेंव्हा कुठे काम सुरू झालं,पाहायला गेलं तर पूर्ण कामगार वर्ग तेलगू भाषिक आणि मी एकमेव मराठी पण ते हेच प्रेम असतं जे तुम्ही अख्या आयुष्यात मिळवलं असतं.नोकरी करताना बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या तुमच्या वागण्यावर,बोलण्यावर,परिस्थिती सांभाळण्यावर अवलंबून असतात,आजही माझ्या हाताखाली 34 लोकांचा स्टाफ आणि 134 मजूर काम करतात,मला कोणालाच शिव्या देऊन काम करवून घेण्याची गरज पडत नाही,एक जरब असली पाहिजे,कामगारांच्या मनात तुमच्याविषयी आदर असला पाहिजे,वेळप्रसंगी त्यांच्या दुःखात तुम्हाला सामील होता आले पाहिजे,हेड ऑफिस आणि स्थानिक कामगार यांच्यातला मी खरं तर एक दुवा आहे,दोन्ही बाजू सांभाळून काम करत आलेलो आहे,आजही काही न समजल्यास मी कोणाला विचारण्यास माझा कमीपणा समजत नाही,या क्षेत्रात माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे असलेले वरारकर साहेब मला नेहमी मार्गदर्शन करत असतात,हेडऑफीस मधून देवगावकर साहेब,देवतळे साहेब,शरद साहेब,मनीष पराते,सलील पिल्लेवान, सुहास माकडे,संदीप दहीकर अशी बरीच मंडळी नेहमी मला सहकार्य करत असतात तर माझ्या प्लांटमधील किरण गौड,अजय विरुटकर,माजिद,चारी आणि बरीच मंडळी प्रेम करतात,आपण गोड तर अख्खी दुनिया गोड असे हे सूत्र आहे, हा किंचितही माझा सांगण्याचा अतिरेक नाही तर ही वस्तुस्थिती आहे….माझ्या जीवनाची……
■ज्या लेबर मित्रांसोबत पोती वाहिली त्याच मित्रांचा मी आज साहेब आहे याचा आज माझ्या मित्रांना जेवढा गर्व आहे तेवढाच त्या क्षणी त्या मित्रांनी मला सांभाळून घेतलं त्यांचा मला खूप अभिमान आहे. माझा पहिला पगार हातात आला अन आनंदाला सीमा राहिली नाही तो पगार केवळ १७०० रुपयेच होता पण मेहनतीचा! तो पहिला पगार बायकोच्या हातात ठेवला,तिचं वाक्य होतं “पोरीचा पायगुण लाभला बरं आपल्याला ,तुम्हाला काम मिळालं आता आपण एक करूया ह्या पैशापैकी १००० रुपये पोरीसाठी वेगळे ठेवू आणि ७०० रुपयामधी घर चालवू” मी म्हटलं हे कसं शक्य आहे, अहो तुम्ही काळजी नका करू मी सांभाळीन सर्व आणि तेच धोरण ती राबवत आली नेहमीसाठी!पैशाचं महत्व आणि दूरदृष्टी ठेऊन मुलीच्या भविष्याचा विचार करायला लावणारी माझ्या जीवनात सांगणारी ती एकमेव व्यक्ती होती….
■एक म्हण नेहमी माझ्या अंतर्मनात घुटमळत असे ” A beautiful Heart is more important than a beautiful Face” तुमचा चेहरा सुंदर नसला तरी चालेल पण तुमचं मन मात्र सुंदर,निर्मळ असायला पाहिजे.आज आयुष्याच्या ज्या वळणावर उभा आहे ते आयुष्य माझं एकट्याचं नाही,हे आयुष्य सुंदर घडविण्यात अगणित लोकांचे सहकार्य आहे,ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली,पाठ थोपटली अशा सर्वांना मी कसा विसरू शकेन,नोकरी करताना बरे वाईट अनुभव येत असतात,वाईट अनुभवातून शिकायला मिळतं तर बरे अनुभव आणखी आपल्याला समृद्ध करीत असतात.गेल्या 20 वर्षांपासून जे मला सांभाळून घेत आहेत असे श्री.सुधीर कुमार सर,श्री.वसंतराव वरारकर सर,श्री.शरद सवलालू सर आणि माझे कामगार बंधू! या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर आहेत, सामाजिक कार्यात वावरत असताना बऱ्याच मित्रांची ओळख झाली,आज मित्र परिवार एवढा मोठा आहे की मी प्रत्येकाचे नाव जरी लिहायला बसलो तरी एक रजिस्टर भरेल! मी भाग्यशाली आहे की तुम्हा सर्वांचे प्रेम मला नेहमी ऊर्जा देत असतात.
■एका लेबर पासून डेप्युटी मॅनेजर पर्यंतचा हा प्रवास निश्चितच काटेरी आणि खाचखडग्यांनी भरलेला होता पण मला मात्र तो कठीण वाटला नाही,एक निश्चित ध्येय तुम्ही उराशी बाळगत असाल तर ते नक्कीच तुम्ही गाठू शकता फक्त तुमच्यात मेहनत करण्याची तयारी,चांगल्या माणसांची संगत आणि जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी.मी माझ्या जीवनात खूप काही केले अशातला भाग नाही परंतु मी एक माणूस म्हणून उत्तम जगत आलोय हे मात्र नक्की! काही वेदना असतात ज्या कागदावर मांडता येत नाहीत किंवा त्या दाखवता येत नाही,त्या काळजातच बऱ्या असतात पण माझ्या हाताने कोणाचे वाईट होईल असे वागलो नाही याचा आनंद आहे.
माझं यशस्वी होत जाणं हे केवळ आपणा सर्वांच्या आशीर्वादाच फळ आहे.फक्त आज कमी जाणवते ती आई,वडील आणि सासऱ्यांची कारण मी पुढे जाताना त्यांना पाहायचं होतं आणि आज ते पाहण्यासाठी या जगात नाहीत….
जीवनाच्या पुस्तकाची ही काही केवळ पाने आहेत….
कुणाच्या दुःखावर कधी हसलो नाही
संपादन्या मर्जी कुठेही झुकलो नाही
जमवले असेल लाख रुपयेही कोणी
माणसांसोबत माणसासारखे वागण्यास
कुठेही मी चुकलो नाही…..