[tta_listen_btn]
मला आठवतात ते दिवस,आमच्या जीवनातले अत्यंत हलाखीचे दिवस होते ते,घरात सर्वात लहान असल्याने आई वडिलांचं अधिकचं प्रेम माझ्या वाट्याला आलं होतं आणि सर्वात लहान असल्याने आई वडिलांचा सहवास अधिक लाभला! आई वडील माझा हट्ट कोणत्याही स्थितीत पूर्ण करत असत आणि त्यावेळेस परिस्थितीही अशी होती की माझा हट्टही ना च्या बरोबरीचा असे,एखाद्या वेळेस महाग पेन घ्यावीशी वाटायची तर अवांतर वाचनाची त्या वेळेस भल्लीच आवड असल्याने एक एक रुपया गोळा करून किशोर,चांदोबा सारखे मासिक मासिक वर्गणी भरण्यासाठी आईकडे हट्ट धरायचो! तो हट्ट आई पूर्ण करायची, बाबा थोडे रागिष्ट असल्याने आईचं प्रेम मला जास्त वाटायचं,बाबांकडे मी कोणतीही गोष्ट मागत नसे!
गावातलं वातावरण शहरांपेक्षा अधिक समृद्ध असतं,शहरासारखी गावात बंद दरवाजा संस्कृती नसते,गावातील लोकं एकमेकांच्या मदतीला प्रत्येक वेळेला तयार असतात,माझं बालपण गावातलं असल्याने आणि आम्ही गावातच राहत असल्याने ही बंद संस्कृती आम्ही कधी अनुभवली नाही,ज्यावेळेस जातीचा चष्मा समाजातून निघला नव्हता अगदी त्या वेळेस आमच्या घरी प्रत्येक जातीची मुलं माझ्यासोबत खेळायला यायची,आई प्रत्येक लेकरावर सारखीच प्रेम करायची,जातीभेद आमच्या आईच्या संगोपणातच नव्हता त्यामुळे आमच्याही मनात कधी जातिद्वेष उतरला नाही,आई अतिशय प्रेमळ आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जात असे म्हणूनच की काय माझ्या आईबद्दल अख्या गावात आदर,सन्मान होता जो आईचा शांत संयमी स्वभाव दर्शवत होता,आपल्या आईबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक वेगळी भावना असते,आईविषयी प्रत्येकजण भरभरून बोलत असतो,आईबद्दल बोलताना डोळे आपोआप पाणावतात,आई आईच असते तिची जागा विश्वातील कोणताही व्यक्ती घेऊच शकत नाही! आईबद्दल खूप लिहायचं आहे,ते भविष्यात लिहिनही!
काही दिवसांपासून आईची तब्येत काहीशी बरी वाटत नव्हती,ती थकल्या थकल्या सारखी वाटायची,एक दिवस संध्याकाळी आईने आवाज दिला,अरे माझं डोकं दुखतय, थोडा बाम लावून दे बरं! आई बाजेवर झोपली होती,मी बाम घेऊन आईजवळ गेलो,तिचे डोके मांडीवर घेऊन चोळायला लागलो,आई काहीतरी सांगत होती “तू खूप मोठा माणूस बन, तुझ्याकडून दुसऱ्याले जेवढी मदत करता येईल तेवढी करत जा,पुण्याचा हिशोब होतो रे कुठे ना कुठे,आपल्या कर्माचे फळ कुठे ना कुठे मिळत असते,आपल्या हाताने कोणाचे वाईट होईल असे वागू नको,तुले जिंदगीत काही कमी पडणार नाही” ती बोलत होती,मी बाम चोळत होतो,ती बोलता बोलता थांबली,मला वाटलं ती झोपी गेली असेल,मी “आई आई म्हणत विचारत होतो “आई होते का आता” आई शांत होती,ती कायमची शांत झाली होती,निपचित……