[tta_listen_btn]
1 जून 1998 इतर मित्र,मैत्रिणी यांच्या तुलनेत माझं लग्न फार लवकर झालं,म्हणजे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी माझा ढोल वाजला! आम्ही दोघेही जवळपास एकाच वयाचे आहोत,ती दहावीला होती तेंव्हा मीही दहाविलाच होतो,जेमतेम काही महिन्यांचा दोघात फरक असेल.माणसाच्या तुलनेत निसर्गतः समजून घेण्याची वृत्ती म्हणा किंवा सामंजस्यपणा हा स्त्रियांत अधिक असतो,कमी वयात त्या प्रौढ विचारांच्या होऊन जातात,घरची परिस्थिती,घरचे काम पुरुषांच्या मानाने जन्मताच त्यांच्या वाट्याला जास्त येते,पुरुषी अहंकार आठ वाजेपर्यंत झोपून असताना ती चार वाजेपासूनच सळा सारवणात लिप्त झालेली असते.तिच्या मनात अगदी बालपणापासूनच ठासून भरल्या जाते की ती दुसऱ्याच्याच घरी जायची आहे,मग तिला सगळी कामे यायला हवी,तिला स्वयंपाक यायला हवा,धुणं धुता यायला हवं,तिने कसं बोलावं,कसं वागावं,सातच्या आत घरात यायला हवं अशी नाना प्रकारची धमकीवजा बंधनं लादली जातात. 1998 चा काळही अगदी असाच होता,घरी टीव्ही नव्हता की हातात मोबाईल नावाची मूर्ख वस्तू नव्हती की आजच्या सारखं साखरपुढ्याच्या दिवशी नवीन मोबाईल घेऊन देण्याची प्रथा नव्हती.प्रदूषणमुक्त नातं आणि प्रदूषणमुक्त समाज होता,वडीलधाऱ्या लोकांचा मान सन्मान होता,त्यांच्या शब्दाबाहेर न पडणारी पिढी होती,आता सगळच प्रदूषणयुक्त झालेलं आहे,पोरगा बापासमोर दारू पिऊन धिंगाणा करतो तर सून मोठ्ठा गॉगल लावून रिल्स बनवते.
हे आमच्या लग्नाचं सिल्व्हर ज्यूबली वर्ष आहे,गेल्या पंचवीस वर्षात मी आणि माझी बायको अनिता आम्ही काय कमावलं आणि काय गमावलं याचं थोडक्यात विश्लेषण माझ्या बायकोसाठी मी येथे मांडत आहे.प्रत्येक स्त्री आपल्या संसारासाठी जोखीम पत्करत असते,ती आपला संसार सुखी संपन्न रहावा म्हणून रात्रंदिवस झटत असते.पाहायला अतिशय सुंदर,गोरीपान असेल आणि तिला संसारातली एबीसीडी समजत नसेल तर तिचं सौन्दर्य काही कामाचं नसतं उलट स्त्री पाहायला जरी सुंदर नसेल आणि आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे अहोरात्र ढाल बनून सोबत करत असेल तर त्याच्या सुख दुःखात साथ देत असेल तर तीच खरी खऱ्या अर्थाने अर्धांगिनी असते.एकदा स्त्रीचं लग्न झालं की सासरच तिचं माहेर असते,सासरची मंडळी तिचे शेवटपर्यंत खरे नातेवाईक असतात,स्त्रीने आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांचा दर्जा दिला तर तिचा संसार सोन्याहून पिवळा होतो,तिला जे सुख माहेरी मिळत होतं त्याच्या दुप्पट सुख केवळ ह्या एका गोष्टीने मिळतं.नाही तर काही स्त्रियांना मी बघतो की नवरा कमाई करतो आणि बायको आपल्या माहेरी दरा भरते आणि असा हरामीपणा एखाद्या बाईत असेल तर ती आयुष्यात कधीच सुखी होत नाही आणि सासरच्यांना पण कधीच सुखी ठेवू शकत नाही.अशा पद्धतीने मुलीने पाठविलेले धन स्वीकारणारेही नालायक असतात.काही जणी तर कोणत्याही वस्तू नवऱ्याच्या पैशाने घेतील आणि नाव मात्र आपल्या माहेरच्यांचे सांगतील,काय गरज असते अशी?
आपल्या मुलीला कोणते संस्कार द्यायचे हे सर्वस्वी मुलीच्या आई बापावर अवलंबून असते,एका मर्यादेपर्यंत मुलीचा लाड करत असताना मुलीला तुझा संसार तुला सांभाळायचा आहे,तुझे सासू सासरेच तुझे आता आई वडील आहेत आणि तुझा नवराच तुझं सर्वस्व आहे हे तिच्या मनात भरवून द्यावे लागते आणि हेच गणित हेच संस्कार स्व.गणपत पा.विरुटकर आणि आई सुभद्रानी अनिताच्या मनात भरवले होते ज्याचे माझ्या संसारात कोणत्याही चांगल्या वाईट परिस्थितीत तिने धीराने,चिकाटीने पालन केले.माझी त्यावेळची परिस्थिती,घर दार पाहून तिच्या गावच्या काही मंडळींनी खिल्ली उडवली होती,काय पाहून मुलीला त्या घरी दिलं,ताट्या,टिनाचं गळकं घर,पोरगा रिकामा,जमीन जुमला नाही,शेवटी का पाहून गणपत पाटलांनी सोयरीक केली असल! त्यावर माझ्या सासऱ्यांचं एकच उत्तर सगळ्यांना होतं,भले काहीही नसू दे,पोरगं निर्व्यसनी आहे,एक ना एक दिवस काही तरी करेलच! एकदा पोरीले देल्ली तवा देल्ली! हे शब्द आजही मला चांगले आठवतात.त्यांच्या शब्दावर मी कुठेतरी खरा उतरलो याचं मला आज समाधान आहे.
माझा इतिहास असो वा भूगोल मी कुठेही एखादही पान लपविलेलं नाही,जे होतं,जे आहे ते मी कित्येकदा लिहिलं आहे,लिहीत आलो आहे.ज्या वेळेस सामान्यपणे मुलींचे लग्न होतात त्यावेळेस आमचे लग्न झाले,मी जेमतेम 21 वर्षाचा होतो,माझ्या बरोबर असणारे मित्र शिकत होते आणि मी लग्नाच्या बोहल्यावर उभा होतो,माझा इतिहास गायरान नव्हता पण एका गैरसमजामुळे पोरगं दुसऱ्या जातीची कोण्या दिवशी उचलून घेऊन येईल म्हणून माय बापानी लढविलेली ती शक्कल होती, त्यावेळेला फारशी अक्कल नावाची गोष्ट नव्हती,त्या काळात प्रेम म्हणजे एकमेकांना हात न लावता जे होत होतं त्याचं नाव प्रेम होतं,आजच्या काळात शारीरिक संबंध म्हणजेच प्रेम इथपर्यंत काळ बदललेला आहे.अर्थातच त्यावेळी आमचं वय हे लग्नाचं नव्हतच,संसार करण्यासाठी जी समज दोघात हवी असते ती समजही त्या वयात नव्हती.
मी पहिला मूर्ख असेल जो लग्नाच्या पहिल्या रात्री कोण पोरगी आवडत होती,कोणतीले चिठ्ठी दिली होती,कोणासोबत लग्न करायची ईच्छा होती असे सगळे लफडे सांगून मोकळा झालो होतो,ती ही हो ला हो म्हणत ऐकून घेत होती,म्हणजे विचार करू शकता की मला केवढी अक्कल होती! तिला मात्र अक्कल होती,दुसरी असती तर अशा लफडेल गोष्टी ऐकून डोक्यावर हात मारून माहेरचा रस्ता धरली असती.अनिता चांगल्या शेतकरी कुटुंबातून आली असल्याने आणि गावातल्या वातावरणाशी मिळवून घेतल्याने तिला कोणत्याच गोष्टी कठीण गेल्या नाही.शेतीची सगळी अंगमेहनतीची कामे ती करून होती,निंदन,खुरपन,कापूस वेचणी शेतीच्या सगळ्या कामाशी तिचा जवळचा संबंध होता,माझ्या महत्वाच्या म्हणजे मी महिनाभर नोकरीवरून घरी बसण्याच्यावेळी तिच्या निंदण्याच्या रोजीने घर चाललं होतं आणि स्वयंपाक मग तो कोणताही असो तिला तिखट मीठ सांगण्याचे कष्ट माझ्या आईला कधी घ्यावे लागले नाही.माणूस शिक्षणाने नाही तर व्यवहारिकपणामुळे संसार कोणत्याही परिस्थितीत सांभाळू शकतो त्याचे उत्तम उदाहरण माझ्या जीवनात होते.राहायला बरोबर घर नाही,पाऊस आला कि रात्रभर जागत राहायचं,साधं मुलांना कपडे घेण्यासाठीसुद्धा पैसे नसायचे,कोणत्याच भौतिक सुविधा नसताना तिने आपल्या तोंडातून एकदाही तक्रारीचा ब्र सुद्धा काढला नाही.
माणसाला जोपर्यंत नेट लागत नाही तोपर्यंत संसार म्हणजे काय हे समजत नाही आणि कोणत्याही कामाचा अनुभव नसलेल्या माझ्यासारख्या त्यावेळी रिकामटेकड्या माणसाला तर संसार म्हणजे काय असतो हेच माहीत नव्हतं.गेल्या पंचवीस वर्षातल्या सुरुवातीचा दहा वर्षाचा काळ हा अत्यंत दयनीय आणि संघर्षाचा काळ होता.सुरुवातीला राजकारणाचा शोक,लग्ना अगोदरचे समाजकारण,अवांतर वाचनाचा भयंकर शोक असे न ना शोक होते पण आयुष्यात दारूला कधी स्पर्श केला नाही,पत्त्यांचा शोक कालही नव्हता आजही पत्ते मला समजत नाही अशा नालायक गोष्टींपासून कायम दूर राहिलो.आज अभिमान वाटतो,छाती फुगवून सांगू शकतो.यात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे,तुम्ही जगाशी भांडू शकता पण अंतर्गत कलह तुम्हाला नामशेष करतो आणि असा कलह तिच्यापासून माझ्या अख्या आयुष्यात झाला नाही.भांडण नावाची गोष्ट आमच्यात नव्हती आणि आजही नाही,रुसवे फुगवे कायम कुठेही असतात,सकाळी झालेला रुसवा,फुगवा संध्याकाळपर्यंत निपटलाच पाहिजे अशी भारी टेक्निक आमच्यात आहे,ज्याची खबर कुटुंबातल्या कोणालाच लागत नाही.आजही आमच्या दोघात काही झालं तर मुलांना त्याचा अतापताही नसतो.आयुष्यात तिच्यावर मी कधी हात उचलला नाही की तिने तशी वेळ येऊ दिली नाही.आम्ही कोणतेही निर्णय दोघे मिळून घेत असतो,कोणाला किती द्यायचे आहे आणि कोणाकडून किती यायचे आहे याचा हिशोब माझ्यापेक्षा तिच्याकडे जास्त असतो,मी प्रत्येक गोष्ट हिला सांगून ठेवत असतो,कोणाकडून पाच रुपयेही घेतले असेल किंवा मी देने असेल तरीही घरच्या बाईला माहीत असणे जरुरी असते,मी भुलक्कड आहे विसरून जातो,नवऱ्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याची कला कोणत्याही बाईत असली पाहिजे,सरकार चालण्यासाठी विरोधीपक्ष जोरदार पाहिजे,पैशाच्या बाबतीत मी जरा सढळ वागतो तर ती लै चोम्मक वागते,आपले मेहनतीने कमविलेल्या पैशाचा अपव्यय होऊ नये म्हणून तिचा नेहमीच प्रयत्न असतो,मात्र कोणाच्या मदतीसाठी कधी ना करत नाही मग तो पैसा परत आला तरी ठीक नाही तरी ठीक.संसारात मी पैशाचं एटीएम आहे तर ती पैशाची तिजोरी! पैशाचं मॅनेजमेंट तिला भारी जमतं,एक एक पैसा कसा वाचवायचा,एक वेळ पाच हजाराचा आणलेला किराणा दोन महिने तीन महिने कसा काटेकोरपणे वापरायचा हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.
आज आमचं दोघांचंही वय 45 आहे,लग्नाला 25 वर्षे पूर्ण झालीत,मेहनतीच्या पैशातून पै पै वाचवत वीस-बावीस लाखांचं घर बांधू शकलो,दहा लाखाच दोन-तीन एकर स्वतःच शेत घेऊ शकलो,आठ वर्षा अगोदर बँकेचं लोन घेऊन कमी किमतीत एक प्लॉट घेतला ज्याची किंमत आज बत्तीस लाख आहे,लोन खंडलं,एकुलत्या एक पोरीचं मागच्या वर्षी पंधरा लाख सारून धुमधडाक्यात लग्न केलं,हो थोडं फार कर्ज आहे पण त्याची चिंता नाही,पैशाचं मॅनेजमेंट ती करते! मुलीला जावई मनासारखे भेटले,आम्हाला इवाई-इनबाई दिलदार भेटले,आमच्यासारखेच! पोरगं बिटेक करतोय! पंचवीस वर्षात पुन्हा काय करायला पाहिजे होतं आणि हो दोन नंबरचं आपल्याकडे काहीच नाही,मी इन्कमटेक्स रेग्युलर शो करणारा माणूस आहे,त्यामुळे कोणाच्या बापाची भीतीही मला नाही.आता काही म्हणतील बहोत तिर मारले का? येस बेशक आम्ही तिरच मारले,आमच्या संसारासाठी,संसार यशस्वीपणे उभा करण्यासाठी!
म्हणून घरची बाई ही चांगली भेटली पाहिजे! हे सगळं वेल मॅनेजमेंटचा परिणाम आहे जो तिने समर्थपणे हाताळला आहे, घर बांधताना हातात केवळ सहा हजार रुपये होते पण पैशाच्या बचतीमुळे ते ही साध्य झालं, आयुष्यात ऐशो आरामाच्या गोष्टी कधीही घेता आल्या असत्या,गळ्यात मोठी चपलाकंठी,पोत कधीही लावून मिरवता आली असती,महागातली महाग साडी खाकेत बॅग लटकावून कधीही तू लावली असतीस,महाराष्ट्र दर्शन,गोव्याला जाण्याची तू कधीही जिद्द करू शकली असतीस,घरी कार लागली पाहिजे म्हणून तू कधीही हट्ट करू शकली असतीस पण माझ्या घामाच्या पैशाचा तू कधीच माज दाखविला नाहीस,माझा संसार उभा करण्यासाठी तू जिद्दीने माझ्यासोबत उन्हा तान्हात,उपाशीपोटी उभी राहिलीस,आपलं वय काही अजून संपलं नाही,कमी वयात यश संपादन केलं हा केवळ तुझ्या समर्पणाचा परिणाम आहे,जेंव्हा आपण साठचे होऊ तेंव्हा आपले नातू जवान असतील, सर्वात शेवटी वाचकांना एवढच सांगावसं वाटतं की तुम्ही आपल्या जीवनात काही नियमांचे काटेकोरपणे पालन केले,पैशाचे नियोजन केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या कोणत्याही कामात काड्या न घालता,कोणाचेही वाईट व्हावे असा विचार डोक्यात न आणता जीवन जगत असाल तर तुम्ही तुमच्या अख्या आयुष्यात समाधानी राहाल,सुखी आयुष्य हवं असेल तर काही नियम स्वतःच ठरवून वागावे लागतात,आपली आवक किती आणि जावक किती याचं तारतम्य ठरवावं लागतं, गेल्या 25 वर्षात नित्यनेमाने मी जे काही पैसे कमावतो त्यात आगाऊपणाचा खर्च माझ्याकडून होत नाही, कमावलेल्या पैशातून समाजातील गरजू लोकांना काही ना काही मदत करत आलोय,एखाद्या महिन्यात हा आकडा पाच हजारांपर्यंत जातो तर काही महिन्यात शंभर रुपयेही का होईना पण माझ्या मदतीचं काम थांबलेलं नाही आणि घरून अशा कामासाठी कधी किचकीच सुद्धा झाली नाही आणि अशा लोकांच्या आशीर्वादांमुळेच आम्ही समाधानी आहोत, हा अतिरिक्त खर्च सोडता बाकी मला दुसरा असा स्वतःचं नुकसान होईल,दुसऱ्यांना त्रास होईल असा छंद नाही,दारूला आयुष्यात स्पर्श केला नाही आणि करणार ही नाही,दारुवाल्या माणसाला पायाजवळही उभा ठेवायची ईच्छा नसते पण नाईलाजाने तुमच्या बोकांडी ते बसत असतात,पश्चाताप करत सहन करावं लागते. जो दारू पितो त्याची माझ्याकडे कवडीची किंमत नाही, आयुष्य उरलं किती याची चिंता आम्हाला नाही,जेवढं आहे ते ताठ मानेने जगू याची खात्री आहे, आज लोकं बोलतात अरे याने तर कमी वेळेत खूप प्रगती केली,लोकांचं असच असतं, त्या केलेल्या प्रगतिमागे लोकांना अहोरात्र केलेले कष्ट दिसत नाही,आमची मेहनत दिसत नाही, म्हणून लोकांना उत्तरे देण्यात अर्थ नसतो,तुम्ही मेहनत करा,स्वतःवर ताबा ठेवा तुमच्या सगळ्याच ईच्छा पूर्ण होतात, नाही तर दीडशे कमवायचे आणि शंभर नैन्टिला द्यायचे आणि चढल्यावर पारखी बहोत बदमाश माणूस आहे म्हणून बोंबलत फिरायचं, माझ्या हाताने इतरांचे भले झाल्याची लिस्ट मोठी आहे,कोणाचे वाईट केल्याची एकही केस नाही,मग माझं वाईट व्हावं अशा गोष्टी करणारे काय साध्य करतील,माझ्यात जो काही कमी अधिक चांगलेपणा आहे त्यामुळेच मला खूप लोकांचे प्रेम आणि मदत लाभते.
आज आमच्या मनात आलं की लग्नाला 25 वर्ष झालीत,थोडं का होईना एखादं तरी चांगलं काम आपल्या हातून घडावं म्हणून आज आम्ही मातोश्री वृद्धाश्रमात हा दिवस साजरा करणार आहोत,हातून काही चुका घडल्या असतील त्याचं प्रायश्चित्त आणि मनशांतीसाठी❤️❤️