परिवर्तन

[tta_listen_btn]


जीवनात काही गोष्टी अशा घडत गेल्या की माझ्यात थोडेबहुत का होईना परिवर्तन होत गेले,माझ्या जीवन जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या,मी त्याच वेगाने बदलत गेलो,सुरुवातीला मी एक पक्का राजकारणी होतो,वडीलांपासून मिळालेले ते खानदानी गुण होते,राजकारणाच्या घोळात इतरांबद्दल द्वेषाची भावना कायम मनात रेंगाळत असायची,त्याने आपले वाईट करण्याचा प्रयत्न केला ना मग आपणही त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी वागायचं ही भावना जोर धरू लागली,प्रत्येक गावात साहजिक राजकारणाचे गट तट असतात,माणसाच्या मनात कपट, द्वेष असल्याशिवाय राजकारण करताच येत नाही ही राजकारणाची पहिली पायरी मी ओलांडली होती, राजकारण करताना बहुमताने निवडून आल्यानंतर गावातील दुसऱ्या गटाशी कायम विरोधी दृष्टीने वागत गेलो,तो कदाचित वयाचाही फरक असू शकतो तारुण्यात अंगात रक्त सळसळत असतं आणि काही निर्णय चुकत जातात,लग्न झालेले नसल्याने जबाबदारीचं ओझं खांद्यावर नसतं,माय बापाच्या भरवशावर माणसाला शेर बहाद्दर झाल्यासारखा फिलिंग येतो आणि हे सर्व फिलिंग्ज, दुर्गुण त्यावेळी काठोकाठ भरलेले होते,अख्या जगाचं परिवर्तन करणारा मीच काय तो जन्माला आलोय अस वाटायचं,परंतु या सगळ्या कारभारात शालजोडे एवढे बसले की बापाच्या भरवशावरचं राजकारण कायम संपुष्टात आलं,झगडा सोडवायला म्हणून गेलो आणि फुकटच्या अंगावर केसेस लावून घेतल्या,न्यायाधीशांनी दहा दिवस तडीपार करून टाकलं आणि मेंदूत ट्युबलाईट लख्खकन जळला. आपल्याच लोकांना विरोध करून काय मिळतं, राजकारणासाठी त्यांचा द्वेष करून काय मिळतं हे समजून चुकलो,वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढणारा ते ही राजकारणासाठी! मी एकमेकद्वितीय असावा! त्यावेळेस पहिला धडा हा शिकला की आपण दुसऱ्याचा द्वेष,मत्सर केला की आपल्याही वाट्याला परतून द्वेषच मिळतो,भगवान गौतम बुद्धांच्या पंचशिलेतला हा सल्ला मला त्याच वेळेस मिळाला ज्यावेळेस मी बालिश होतो, परिस्थितीने शिकवून दिले की हिंसा हा मार्ग नाही आणि राजकारणाचा बिंदूच हिंसा असतो तो शारीरिक असो की मानसिक! समोरचा हिंसा करतो म्हणून तुम्हाला नाईलाजाने का होईना हिंसा करावीच लागते त्याशिवाय तुम्ही राजकारणात टीकूच शकत नाही,मी समजून चुकलो,मी त्याचवेळेस राजकारण सोडलं,माणसांचा द्वेष करणं सोडलं,हिंसा माझ्या रक्तात नाही जी होती तिला त्याचवेळी श्रद्धांजली अर्पण केली.
या घडामोडीतून मी स्वतःत खूप काही सुधारणा करू शकलो,स्वावलंबी होण्याचा मार्ग निवडू शकलो,समोरच्या व्यक्तीचा द्वेष मनातून नाहीस झाला,कपटी वृत्ती नाहीशी झाली,आई वडिलांच्या जीवावर आपण काहीही करू शकतो हा अहंकार नाहीसा झाला.पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा वाटला,जीवनात सर्वात मोठा प्रश्न असतो भूक,ती शमविण्यासाठी माझी धडपड सुरू झाली,पोरगं वाईट मार्गाला लागेल म्हणून अगदी कमी वयात आई वडिलांनी सदामंगलांम करून टाकलं,कामाला लागलो!लग्न झालं,जवाबदारी आली,जबाबदारीचं भान आलं,कष्ट उपसले,मार्गी लागलो.
हा जीवनातला पहिला टप्पा मला बदलविण्यात मोलाचा हातभार लावून गेला.माझ्या जीवनाचा दुसरा टप्पा सुरू होतो राजस्थानपासून,कामानिमित्त राजस्थानमध्ये माझ्या जीवनातली महत्वाची दीड वर्षे गेली जी अविस्मरणीय होती.केवळ पाच वर्षांच्या बाळाला सोबत घेऊन आणि आठ वर्षाच्या मुलीला स्वतःपासून दूर ठेवून हा मार्ग मी स्वीकारला होता.मुलीच्या विरहाच्या वेदना शब्दात सांगणे कठीण असते पण तोही अनुभव गाठीशी बांधल्या गेला.राजस्थानच्या मातीत प्रेम आहे,तिथली माणसं माणसावर तर प्रेम करतातच पण प्राण्यांवरही तेवढीच करतात हे प्रकर्षाने जाणवलं,वर्षभर पाण्याची बोंबाबोंब असलेला हा प्रदेश,शेती नाहीच्या बरोबर आणि जे मिळेल त्यात सामावून घेणारी संस्कृती हा समंजसपणा मला त्याठिकानाहून मिळाला,बाभळीच्या शेंगाचीही भाजी करून आपली भूक भागवता येते हे त्याठिकानाहून शिकता आलं,पाण्याची वानवा आणि अन्न धान्याचा तुटवळा असून देखील प्राणिमात्रांवर प्रेम कसं करावं हा संदेश मी घेऊ शकलो,प्रत्येक घरावर पक्षासाठी पाणी भरून ठेवलेला माठ आणि छपरावर त्यांना खायला गहू टाकलेला दिसायचा,छपरावर हजारोंच्या संख्येने येणारे कबुतर,कावळे आणि अंगणात बागळणारे मोर दिसायचे तेंव्हा मन भरून यायचं,अर्थातच लोकं प्रेमळ असल्याचा हा पुरावाच होता आणि त्याच ठिकाणाहून मनात प्रेमाने जागा घेतली,प्रत्येक जीव महत्वाचा आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम केलं की तेही जीव लावतात हे ही जाणवत राहायचं.प्लांटपासून शहरापर्यंत रोज जाणं येणं असायचं,रस्त्याच्या कडेला हरीण,निलगायी चरताना दिसायच्या,किती सुंदर वाटेल जर तुम्हालाही असं दृश्य दिसेल पण ही आपल्या आणि राजस्थानातल्या मानसात मी केलेली गल्लत ठरेल,मोर दिसला की त्याचं सौन्दर्य आपण न्याहाळीत बासण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही,मार दगळ घे जीव अन कर संध्याकाळी तर्री असं आपलं एकंदरीत गणित आहे,माणूस ज्या परिवेशात वाढतो त्या ठिकाणचे गुण घेत असतो,दीड वर्षात साधा कोंबडीचा रस्सा देखील आम्ही चाखला नाही,सभोवती प्राण्यांची पूजा करणारी,प्रेम करणारी माणसे असतील तर अशी ईच्छा तरी कोणाची होईल? पुन्हा तेथील अनुभवलेलं एक उदाहरण नाही दिल्यास त्या लोकांच्या प्रेमावरचा मी केलेला अविश्वास होऊ शकतो,एवढं सुंदर उदाहरण आहे,जे मला महाराष्ट्रात,तेलंगण्यात, आंध्रात कुठेही बघायला मिळालं नाही,त्याठिकाणी हिवाळा जेवढा कठीण त्याहीपेक्षा उन्हाळा खूप कठीण असतो,आठवळ्यात केवळ एक दिवस नळाला पाणी येतं जे तुम्हाला पूर्ण आठवळाभर आंघोळीसाठी,जेवणासाठी आणि पिण्यासाठी सांभाळून ठेवायचं असतं त्यामुळे पाण्याची किंमत त्या लोकांपेक्षा इतरांना माहीत असेल असं मला वाटत नाही.भर उन्हाळ्यात रस्त्याच्या दोन्ही कडेवर एका ठराविक अंतरावर पाण्याने भरलेला माठ घेऊन वाटसरूंची तहान भागविण्यासाठी बसलेल्या त्या महिला पाहिल्यावर तुम्हाला काय वाटेल? ही निरपेक्ष भावना आपल्यात का नाही,आपण एवढे उदार का नाही हा प्रश्न पडल्यावाचून मला राहिला नाही. हीच भावना,प्रेम मला राजस्थानच्या भूमीतून घ्यायला मिळालं.
आता मला काही वाटत नाही,कित्येक गोष्टींचं वाईट वाटत,कित्येक गोष्टी बदलाव्याश्या वाटतात,स्वतःत खूप काही बदलविण्याची गरज आहे असं कायम वाटत राहतं,काही ठिकाणी तो प्रयत्नही माझ्याकडून होत असतो,आता चिडचिड होत नाही,कुणाचा राग येत नाही,कोणाच्या कामात वा आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करावासा वाटत नाही,समोरचा माणूस नंगा का असेना मी त्याला द्वेषाच्या नजरेने बघू शकत नाही,ज्याचे कर्म जसे तसे परिणाम त्यालाच भोगावे लागतील अशी मनाला समजूत घालून पुढे चालत राहतो,आपण एखाद्याचे चांगले करू शकत नाही तर त्याचे वाईट योजण्याचा अधिकार देखील आपल्याला नसतो.त्यामुळे मला कोण माणूस कसा यासाठी जास्त विचार करण्याची गरज पडत नाही,मला जसे स्वच्छंदी जगता येईल तसा जगण्याचा प्रयत्न असतो,मला कोण चांगला कोण वाईट म्हणेल याने मला तसूभरही फरक पडत नाही,मला नावाने,पुरस्काराने मोठे होण्यात रस नाही,जगातील शंभर माणसे मला ओळ्खण्यापेक्षा माझ्यावर जीव लावणारी दहा माणसे जरी सोबत असतील तर मी कोणताही डाव हरणार नाही,ही खात्री आहे!

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी