अतृप्त ईच्छा

[tta_listen_btn]

रिमझीम पावसाची नुकताच सुरुवात झाली होती,विजेच्या प्रकाशाचा नयनरम्य सोहळा आसमंतात उजळून निघत होता,एका विजेच्या कडकडाटाने रवी भानावर आला,लाईट नसल्याने स्वयंपाक करायचे राहून गेले होते,दहा बाय दहा च्या रूममध्ये एकटाच दोन महिण्यागोदर रहायला आला होता,नोकरीनिमित्त बदली झाल्याने घरदार सोडून आपली लहान लहान मुलं आपल्या पत्नीसोबत ठेवून अशा नवीन शहरात तो आला होता,रोज सकाळी दोन वेळचं जेवण तयार करून 9 वाजताच्या दरम्यान जो कामावर जायचा तो थेट संध्याकाळी 9 वाजताच यायचा,नोकरी जेमतेम पोट चालवेल अशीच असल्याने आणि आपल्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी त्याने कधीच आपले शौक केले नाही की सुपारीच्या खांडाचं व्यसन सुद्धा त्याला जडलं नव्हतं.
“रवी” बाहेरच्या दरवाजातून एका कोमल स्वरात हाक दिल्याचं त्याच्या कानावर आलं,आवाज ओळखीचा वाटला “काय मालकीण” रवी दरवाज्याकडे पाहून सहज पुटपुटला,दरवाज्यावर मालकीण बाई उभ्या होत्या “काय करतोयस” म्हणत त्या सरड रूममध्ये दाखल झाल्या.”कायरे लाईट नसताना तू काय करतोयस,बाहेर गच्चीत येऊन रिमझिम पावसाचा आनंद घ्यायचा ना! “काय मालकीण बाई,काय गरीबाची चेष्टा करताहात,अहो आता कुठे भिजत कामाहुन आलोय,पुन्हा भिजलो तर बिमार नाही का पडणार” “नाहींरे सहज गम्मत केली,तू कर जेवण आणि झोप, थकला असशील, मी ही जाते साहेब यायची वेळ झालीय आता” म्हणत त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि रवी शांतचित्ताने आपले जेवण आटपून झोपी गेला.
रवीच्या वयापेक्षा कदाचित दहाक वर्षांनी मोठ्या म्हणजे जवळपास चाळीस बेचाळीस वर्षाच्या असलेल्या मालकीनबाई दिसायला तशा जेमतेमच,सावळ्या रंगाच्या, साहेब सरकारी कंपनीत मोठ्या पगाराच्या मोठ्या हुद्द्यावर! घरात भरपूर पैसा,संपत्ती असतानाही एका खोलीत भाडेकरू ठेवणारा कंजूस! मुलगा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असल्याने त्याला एका मोठ्या शहरात एका नामांकित वसतिगृहात रहायला ठेवलं आणि घरून शिक्षण घेणारी लग्नाच्या वयाची मुलगी असं त्यांचं विश्व होतं.साहेब रोज सकाळी आठ वाजताच निघून जायचे आणि पाच वाजता न चुकता आपली ड्युटी करून परत यायचे,घरी मालकीनबाई आणि त्यांची मुलगी दिवसभर घरी राहून कंटाळायच्या.
रवीला वरच्या मजल्यावर रूम दिली असल्याने यांचा तसा रोजचा संबंध येणे नव्हताच.
एक दिवस धावत पळत घामाघूम झालेल्या मालकीनबाई रविकडे धापा टाकत आल्या,तेंव्हा रवीचं लक्ष त्यांच्या वरखाली होत असलेल्या छातीवर गेलं “रवी अरे खाली चल लवकर”” “काय झालं मालकीनबाई एवढ्या का घाबरल्या,काही प्रॉब्लेम आहे का? “अरे…हो खाली खूप मोठा साप आलाय,त्याला हाकलरे बाबा” “हात्तीच्या एवढच होय,काय मालकीण सापाला घाबरता होय,आत्ता हाकलून लावतो” तोपर्यंत मालकीनबाईने नकळत रविचा हात आपल्या हातात घेऊन घट्ट पकळला होता आणि धापा टाकत असलेल्या तिच्या शरीरातून गरम श्वास रवीला कशाची तरी जाणीव करून देत होता.
रवी धावतच खाली आला “कुठाय तो साप” “अरे इथेच होता,आत्ताच बघितला मी” मागे उभ्या असलेल्या मालकीनबाई बोलत होत्या.परंतु साप कुठेच मिळेना,अखेर अर्ध्यातासानंतर रवी म्हणाला “काय मालकीण बाई येथे साप नव्हताच तुम्हाला काहीतरी भ्रम झाला,उगाचच घाबरल्या तुम्ही,निवांत व्हा साप वैगेरे नाही इथे”म्हणत रवी आपल्या रूमकडे जाण्यास वळला,मालकीनबाई गालातल्या गालात रविकडे पाहून हसल्या की जसं तिला काहीतरी रवीला सांगायचं होतं,ती डोळ्यातली चमक पाहून रवीसुद्धा क्षणभर स्तब्ध झाला,एक एक पायरी चढून आपल्या रूमकडे जाऊ लागला.
संध्याकाळी साहेब अचानकपणे वर आले “रवी,बरं झालं बाबा तू होतास तुझी मालकीण आज मरता मरता वाचली,विषारी साप होता असं सांगत होती ती,तू त्याला हुसकावून लावलं म्हणे” रवी निस्तब्ध मालकाच्या तोंडाकडे पहायला लागला,काय बोलावे हेच रवीला सुचेना,मालकीनबाई खोटे का बोलत असाव्या,त्या ठिकाणी सापच नव्हता तर हुसकावून तरी कसा लावला असेल मी असे अनेक विचार मनात येत असताना “होनजी लै विषारी साप होताजी” एवढेच शब्द तोंडून बाहेर पडले.”बघ बाबा ,इथे आजूबाजूला कोणी नाही म्हणून तुला भाड्याने रूम दिली,तुझा आधार सुद्धा आम्हाला राहील,थोडं मी नसतानी मालकीनबाईकडे लक्ष देत जा” “हो जी,मी पाहीन जी” डोक्याचा भुसा व्हायच्या अगोदर मालक चालते झाले आणि रवीच्या मनात वादळाने जन्म घेतला “का बरे मालकीण खोटी बोलली असावी”या एकाच विचारात रवीची रात्र पार पडली.
सकाळची वेळ होती,रवी झोपून नुकताच उठला आणि ब्रश करता करता गच्चीवर जाऊन दात घासू लागला,मालकीनबाई सुद्धा खाली व्हरांड्यात दात घासत बसल्या होत्या,त्यांनी रात्रीचा गाऊन अशापद्धतीने घातला होता की परपुरुषाची नजर सुद्धा घायाळ व्हावी,रवीच्या मनात चलबिचल झाली त्याने तात्काळ ते ठिकाण सोडलं आणि पुन्हा तो विचार करू लागला की माझ्यासोबत मालकीनबाई अशा का वागताहेत,नसेल माझा भ्रम असेल कदाचित पुरुषी मानसिकतेमुळे मला असं वाटत असेल,मनाला समजावीत तो स्वयंपाक करण्यात दंग झाला,सर्व सोपस्कार आटोपून आपल्या कामावर रोजच्या वेळेवर निघून गेला.
कामावरून थकून आलेला रवी आराम करण्यासाठी म्हणून खाटेवर पडलाच होता तेवढ्यात खोलीतल्या आतल्या दरवाजावर थाप पडली,डोळे चमकले,सायंकाळच्या वेळेस आतल्या दरवाज्यावर कोण बरे थाप मारत असेल “हो आलो,कोण होय” म्हणून त्याने दरवाजा उघडला,क्षणाचाही विलंब न लावता मालकीनबाईने रवीला घट्ट मिठीत घेतले,रवी भांबावून गेला “मालकीण अहो काय करताहात तुम्ही,तुमची मुलगी खाली आहे” “असुदे रे गेल्या पाच वर्षाच्या वनवासातून मला मुक्त कर रे,मी व्याकुळ आहे”रवी अवाक नजरेने तिच्याकडे पाहू लागला,”अहो हे चुकीचं आहे,मी तसा नाही जसा तुम्ही विचार करताहात” “ते मला काही सांगू नकोस,तू मला आवडलास,माझी ईच्छा पूर्ण कर” लख्खपणे रवीच्या डोळ्यासमोर त्याच्या पत्नीचा चेहरा तरंगला,वाटून गेलं “अरे नवरा सोबत असताना ही अशी करतेय तर माझ्या बायकोचं मन किती विशाल असेल की मी बाहेर नोकरी करत असताना सुद्धा ती चारित्र्याला जपते” मालकीनबाई जवळ अगाध पैसा,ऎशोआराम असताना ही इतकी का बरे व्याकुळ असेल…
एक झटका मारून तिची घट्ट असलेली मिठी सोडविली आणि रवी एकदाच बोलला ” मालकीनबाई हेच प्रेम तुम्ही आपल्या नवऱ्याला द्या,अहो त्या बिचाऱ्यासोबत इतकी वर्ष संसार केला आणि आज केवळ मी तरुण आहे आणि तो म्हातारा झाला म्हणून त्याला सोडायला निघालात,अहो शरीराच्या भुकेपेक्षा हृदयातल्या प्रेमाने त्यास जवळ करा,तुमच्या दोन मुलांचा बाप होतांना,तो तारुण्यात असतांना त्यानेही जर असेच केले असते तर तुम्ही काय केलं असतं….
तुमचा खरा सोबती तो आहे मी नाही….
आणि दुसऱ्याच दिवशी रवी रूम सोडून दुसऱ्या रूमच्या शोधात निघाला……

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी